१३ फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिवस का साजरा करतात?

१३ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज १३ फेब्रुवारी. जागतिक रेडिओ दिवस. काळ जसा बदलत गेला तसं हे माध्यमही बदललं. अनेक पिढ्यांंचं माहितीपूर्ण मनोरंजन करणाऱ्या या माध्यमाचं अस्तित्व सेलिब्रेट करण्यासाठी 'युनेस्को'ने २०११ मधे जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली. २०१२ मधे पहिल्यांदा इटलीत हा दिवस साजरा झाला. पण रेडिओ दिवस का आणि कशासाठी साजरा केला जातो?

जगभरातल्या एंटरटेन्मेट क्षेत्राला सध्या सुगीचे दिवस आलेत. या क्षेत्रात रोज नवनव्या माध्यमाची भर पडतेय. गोष्टी सांगण्यापासून या क्षेत्राची सुरवात झाली. पुढे त्याचा साहित्य, नाटक, रेडिओ, सिनेमा, टीवी आणि नंतर कम्प्यूटर या क्रमाने विकास होत गेला. आता तर हे क्षेत्र डिजिटल झालंय. या प्रक्रियेत एका माध्यमाची जागा दुसऱ्याने घेतली. असं असलं तरी जुनं ते सोन अशी एक म्हण प्रचलित आहे. याचीच प्रचिती रेडिओ ऐकल्यावर येते.

रेडिओवर श्रोत्यांनी आणि कलाकारांनी भरभरून प्रेम केलंय. टीवी आला तसं हे माध्यम काहीसं मागे पडलं. म्हणजे आता रेडिओचे दिवस संपले अशी चर्चा सुरू झाली. पण टेक्नॉलॉजीच्या जोरावर हे माध्यम नव्या वेशभूषेत आपली सेवा देण्यासाठी आजही पूर्वीपेक्षा अधिक जोमाने सज्ज आहे. हे सगळं फक्त एका बदलाने शक्य झालं. ते म्हणजे एफएम वाहिनीचा उदय. एफएम वाहिनीच्या उदयानेच रेडिओला आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं शक्य झालं.

रेडिओ दिवसाचा इतिहास

रेडिओचा शोध १९०० मधे इटालियन शास्त्रज्ञ गुल्येल्मो मार्कोनीने लावला. मात्र या माध्यमाचा खरा प्रचारप्रसार सुरू झाला तो १३ फेब्रुवारी १९४६ पासून. युनायटेड नेशन्सची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अर्थात युनेस्कोनं या दिवशी आपलं युनायटेड नेशन्स रेडिओ नावाचं चॅनेल सुरू केलं. या दिवसाची आठवण म्हणून गेल्या ९ वर्षांपासून 'जागतिक रेडिओ दिवस' साजरा केला जातोय.

रेडिओ हा मूळ लॅटिन शब्द आहे. रॅडिस या लॅटिन शब्दामधून रेडिओ शब्द तयार झाला. ‘स्पोक ऑफ अ विल बीम ऑफ लाईग्ट रे’ असा त्याचा अर्थ होतो. सुरवातीला रेडिओ हा 'वायरलेस टेलिग्राफी' अशा स्वरूपात ओळखला जायचा.

सध्याच्या काळात एफएम पाठोपाठ 'सारेगमप कारवा' असं रेडिओ सारखं दिसणारे एक नवं साधन संगीत प्रेमींना सापडलंय. चारेक हजार गाण्यांचा संग्रह असलेलं हे उपकरण त्याला रेडिओसारखा लूक दिल्यामुळे खूप हिट झालंय. जुन्याजाणत्या लोकांमधे तर मी सारेगमप कारवावर हेहे ऐकल्याच्या चर्चाही बघायला मिळतात.

हेही वाचा: पदोन्नतीत आरक्षण हा मूलभूत हक्क नाही, असं सुप्रीम कोर्टाने का म्हटलं?

असा हा रेडिओचा इतिहास

रेडिओचा शोध १८८५ मधे मार्कोनीनं लावल्याचं मानलं जातं. त्याने १८९५ मधे इटलीमधे आपला पहिला आकाशवाणी सिग्नल पाठवला. १८९९ पर्यंत त्याने इंग्रजी वाहिन्यांभोवती पहिले वायरलेस सिग्नल वाजवले. दोन वर्षांनी इंग्लंडकडून न्यूफाउंडलँड तेलाचे ‘एस’ हे पत्र मिळालं. इटालियन रिसर्चर आणि इंजिनियर ग्विलिएलमो मार्कोनीने पहिलं यशस्वी दीर्घ निर्वाह वायरलेस तारणाचं प्रक्षेपण आणि मार्केटिंग केलं.

१९०१ मधे पहिल्यांदाच ट्रान्सअटलांटिक रेडिओ सिग्नल प्रसारित करण्यात आलं. १९३७ मधे मार्कोनीचा मृत्यू झाला. जगदीशचंद्र बोस यांनीही अशाच एका प्रयोगाचं प्रदर्शन कोलकत्यात १८८४ मधे केलं होतं. पुढे या रेडिओ तंत्राचा वापर सैनिकी आणि इतर कामांसाठी व्हायला लागला. भारतात १९२७ मधे पहिल्यांदा रेडिओचं प्रसारण सुरू झालं.

‘ऑल इंडिया रेडिओ’ ते ‘आकाशवाणी’

इंडियन ब्रॉडकास्टींग कंपनीने मुंबई आणि कोलकत्यातल्या दोन रेडिओ स्टेशन्सच्या माध्यमातून प्रसारणाला सुरवात केली होती. पुढे ही कंपनी दिवाळखोरीत निघाली आणि सरकारने रेडिओचं प्रसारण आपल्या ताब्यात घेतलं. १९३६ मधे त्याला ‘ऑल इंडिया रेडिओ’ हे नाव मिळालं. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावर्षी भारतात केवळ सहाच रेडिओ स्टेशन्स होती. ‘ऑल इंडिया रेडिओ’ला ‘आकाशवाणी’ हे नाव म्हैसूरच्या एम. व्ही. गोपालस्वामी यांनी दिलं.

स्वातंत्र्यानंतर भारतात रेडिओला खूप चांगले दिवस आले. विविध भारतीने रेडिओवरच्या मनोरंजनाला एक वेगळी उंची बहाल केली. ‘हवामहल’, ‘सितारों की महफिल’ यासारखे एकाहून एक सरस कार्यक्रम, शास्त्रीय संगीताच्या मैफली यामुळे आकाशवाणी अल्पावधीतच लोकप्रिय झाली. टीवीच्या आगमनानंतर रेडिओचा पडता काळ सुरू झाला. १९८२ मधे भारतात कलर टीवी आला आणि आकाशवाणीची लोकप्रियताही कमी होऊ लागली.

स्मार्टफोनमधल्या काही गोष्टी आपल्या जीवनाचा भाग बनल्या. त्या यादीत रेडिओचं स्थानही खूप महत्त्वाचं आहे, असं म्हणायला हरकत नाही. एफएम चॅनेलला स्मार्टफोनची जोड मिळाल्याने रेडिओ ऐकणाऱ्यांची संख्या अनेक पटीने वाढली.

हेही वाचा: ‘हो, मी गे पॉर्न स्टार आहे, आणि मला त्याचा गर्व वाटतो!’

रेडिओचेही प्रकार बदलले

रेडिओतल्या बदलाबरोबरच रेडिओ संचातही अनेक बदल झालेत. सुरवातीच्या काळात केवळ काही नळ्या आणि वायरच्या माध्यमांतून हे रेडिओ सेट तयार केले जायचे. पुढे लाकडाच्या कॅबिनेटच्या आकाराचे रेडिओ सेट आले. बॅकेलाइट म्हणजे सुरवातीच्या काळातल्या प्लॅस्टिकचा शोध लागल्यानंतर मग रेडिओ तयार करण्यात त्याचा वापर होऊ लागला. हे रेडिओ केवळ काळ्या आणि तपकिरी रंगातच असायचे.

१९५० नंतर प्लॅस्टिकचा वापर करून वेगवेगळ्या रंगांचे रेडिओ संच तयार करायला सुरवात झाली. १९५४ मधे लहान रेडिओ संचाचा म्हणजे ट्रान्झिस्टरचा उदय झाला. हे ट्रान्झिस्टर फारच महाग असायचे. त्यानंतर मात्र अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे लहान-मोठे रेडिओ तयार होत गेले. सिगारेटच्या पाकिटाच्या आकाराचे रेडिओ मोठ्या प्रमाणात क्रिकेट मॅचचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी वापरले जाऊ लागले.

नंतरच्या काळात केवळ हेडफोनच्या आकाराचे रेडिओ आले. चीनी बनावटीचे आयपॉडच्या आकाराचे रेडिओही आले. सध्या मोबाइलमधे उपलब्ध असलेल्या रेडिओंमुळे एक नवीनच क्रांती झालीय.

काळाप्रमाणे रेडिओ माध्यमात बदल

१९७७ मधे भारतात एफएम रेडिओचं तंत्रज्ञान आलं. आणि आकाशवाणीची लोकप्रियतेला पुन्हा धुमारे फूटू लागले. सध्या आकाशवाणीच्या अनेक रेडिओ स्टेशन्सबरोबरच खासगी रेडिओ वाहिन्याही आपल्या कार्यक्रमाचं प्रसारण करत आहेत. खासगी एफएम वाहिन्यांची सुरुवात १९७७ मधे चेन्नईत झाली. त्यानंतर गोव्यामधे काही खासगी कंपन्यांना एफएम रेडिओ चॅनेल सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली.

सध्या भारतातल्या ७२ शहरांमधे खासगी एफएम चॅनेल सुरू आहेत. मुंबईत तर तब्बल १६ खासगी एफएम चॅनेल चालतात. त्यात आकाशवाणीच्या एफएम गोल्ड आणि रेनबो या वाहिन्यांचाही समावेश आहे. जसा काळ बदलला तसं रेडिओ हे माध्यम काळाप्रमाणे बदलत गेलं. त्यात नवनवे बदल होत गेले. हे बदलही लोकांनी स्वीकारले. लोकांची लाईफस्टाईल बदल तसं रेडिओनं स्वतःमधे बदल केले. त्यामुळेच रेडिओ हे आजच माध्यम बनलं. आणि हेच रेडिओचं आजही अस्तित्व टिकवून ठेवण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे.

हेही वाचा: 

दिल्लीच्या निकालावर कोण काय म्हणालं?

केंद्रात मोदी आणि राज्यात कुणीही, असा फरक मतदार खरंच करतात?

तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?