बहिरं व्हायचं नसेल तर डब्ल्यूएचओचा कानमंत्र आताच ऐकायला हवा

०५ मार्च २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशकडून ३ मार्च हा 'वर्ल्ड हिअरिंग डे' म्हणून साजरा केला जातो. त्याच निमित्ताने पहिल्यांदाच एक रिपोर्टही जाहीर करण्यात आलाय. २०५० पर्यंत जगातल्या २५ टक्के लोकांना ऐकायची समस्या निर्माण होऊ शकेल. इतकंच नाही तर यातले ७० कोटी लोक असे असतील ज्यांना ट्रीटमेंटची गरज पडेल, असं रिपोर्टमधे म्हटलंय. भविष्यात बहिरं व्हायचं नसेल तर हा धोका आतापासूनच गांभीर्याने घ्यायला हवा.

आपण गप्पा मारतो. एकमेकांशी निवांत बोलतो. पण कधीतरी आपल्या एखाद्या शब्दावर कुणी पुन्हा पुन्हा ‘काय?’ असं केलं की आपण चिडतो. तू बहिरा आहेस का? असं आपण सहज बोलून जातो. एकमेकांची टर उडवायचा हा प्रयत्न असतो. अर्थात कधीकधी तो नकळत घडतो. हे नकळत, मजे मजेतलं बोलणं खरं ठरलं तर?

३ मार्चच्या 'वर्ल्ड हिअरिंग डे'च्या निमित्ताने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात डब्ल्यूएचओचा एक रिपोर्ट आलाय. २०५० पर्यंत जगातली २५ टक्के लोकसंख्या कानाच्या कोणत्या ना कोणत्या आजारानं त्रस्त असेल, हॉस्पिटलच्या चकरा मारेल असं हा रिपोर्ट सांगतोय. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर बहिरा आहेस का? हे आपलं मजेतलं म्हणणं खरं ठरायला वेळ लागणार नाही.

हेही वाचा: बंद शाळांमुळे शिक्षणातल्या 'बहुजन हिताय'चे तीन तेरा

कानावरचा पहिलाच रिपोर्ट

दरवर्षीप्रमाणे डब्ल्यूएचओनं परवा 'वर्ल्ड रिपोर्ट ऑन हिअरिंग’ अशा नावाचा एक रिपोर्ट जाहीर केला. 'हिअरिंग केअर फॉर ऑल' अशी यावेळेसची थीम आहे. या थीममधे ‘स्क्रीन,’ ‘रिहॅबीलिटी,’ ‘कम्युनिकेट’ या शब्दांवर भर देण्यात आलाय. कान किंवा ऐकण्याच्या समस्या चर्चेत आणणारा हा जगातला पहिलाच रिपोर्ट आहे.

कान किंवा ऐकायच्या ज्या काही समस्या आहेत त्याची कारणं शोधता येतात. त्यावर वेळीच उपचारही करता येतील असं या रिपोर्टमधे म्हटलंय. या कारणांमधे संसर्ग आजार, जन्माच्यावेळी येणाऱ्या अडचणी, आजूबाजूचा गोंगाट आणि महत्त्वाचं म्हणजे आपली लाइफस्टाइल अशा बऱ्याच गोष्टी येतात. हे सगळं रोखायचं तर त्यात जास्तीत जास्त गुंतवणूक करायला हवी, असं या रिपोर्टमधे म्हटलंय.

'ऐकायला येणं ही खूपच महत्वाची गोष्ट आहे. ऐकायला आलंच नाही तर त्याचा परिणाम अभ्यास, संवाद आणि आयुष्यावरही होऊ शकतो. शिवाय लोकांचं मानसिक आरोग्य आणि नातेसंबंधांवरही त्याचा परिणाम होईल. हा रिपोर्ट समस्येच्या व्याप्तीबद्दल बोलतो. काय करायचं हे सांगताना त्यावरचा तोडगाही सांगतो,' असं डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधेनॉम गेब्रेसियस यांनी म्हटलंय.

४ पैकी १ व्यक्ती बहिरी असेल

जगभरातल्या एकूण लोकसंख्येपैकी ४६ कोटी ६० लाख म्हणजेच ६.१ टक्के लोकांना बहिरेपणाचा सामना करावा लागतोय. त्यात ४३ कोटी २० लाख म्हणजे जवळपास ९३ टक्के लोक म्हातारे असतील. त्यात २४ कोटी २० लाख पुरुष तर १९ कोटी महिला आहेत. तर ३ कोटी ४० लाख म्हणजेच ७ टक्के इतकी लहान मुलं आहेत. ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या एक तृतीयांश व्यक्तींना याचा अधिक त्रास होतोय.

२०३० पर्यंत ही आकडेवारी ६३ कोटींच्या रात पोचेल. तर २०५० पर्यंत हाच आकडा ९० कोटींपेक्षा जास्त होईल. वेळीच योग्य ती पावलं उचलली नाहीत तर पुढच्या काळात ही आकडेवारी अधिक वाढेल. २०५० पर्यंत जगातल्या २५ टक्के लोकांना कानांची कोणती ना कोणती समस्या निर्माण होईल. म्हणजे काय तर २०५० पर्यंत जगातली ४ पैकी १ व्यक्ती कानांनी बहिरी असेल.

यातल्या २५ टक्क्यांमधे ७० कोटी लोक असे असतील ज्यांना कानांच्या आजारासाठी ट्रीटमेंटची गरज पडेल. २०१९ मधे अशा लोकांची संख्या ४३ कोटी होती. आपल्याला बहिरं व्हायचं नसेल तर या धोक्याकडे आताच गांभीर्याने पहायला हवं.

हेही वाचा: कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!

मनुष्यबळाचा अभाव

कान आणि ऐकणं या दोन गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. पण लहानपणापासून त्यात काय इतकं असं म्हणून या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केलं जातं. सरकारकडूनही आरोग्याचा विषय म्हणून यात जितकी गुंतवणूक व्हायला हवी तितकी होत नाही. त्यावर विचारही केला जात नाहीय. ही गुंतवणूक फारच कमी खर्चिक असल्याचं डब्ल्यूएचओनं या रिपोर्टमधे म्हटलंय.

आपल्याकडे आधीच फार कमी माहिती असते. आरोग्य सेवा देणाऱ्यांकडेही त्याबद्दलच्या माहितीचा अभाव असतो. साहजिकच ऐकायला कमी येणं आणि कानांविषयीचे आजार, त्याचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं याबद्दलचं ज्ञानही फार कमी असतं. हा विषय आरोग्य व्यवस्थेचा म्हणावा तेवढा भाग झालेला नाही. त्यामुळेच ज्यांना ऐकायला कमी येतंय किंवा कानांचा काही आजार आहे त्यांच्यापर्यंत पोचणं खूपच अवघड होऊन जातं.

आपल्याकडे असलेल्या मनुष्यबळाच्या अभावाकडे हा रिपोर्ट लक्ष वेधतो. ७८ टक्केपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या देशांकडे १० लाख लोकसंख्येमागे फक्त एक नाक, कान, घसातज्ञ म्हणजे ईएनटी स्पेशालिस्ट आहे. ९३ टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या देशांकडे १० लाखामागे १ ऑडियोलॉजिस्ट आहे. १७ टक्के देशांमधे १० लाखामागे एक स्पीच थेरपिस्ट आहे. तर ज्यांना ऐकू येत नाहीय अशा ५० टक्के मुलांमागे केवळ एक शिक्षक आहे.

ऐकायला न आल्यामुळे आपलं जे काही नुकसान होतंय त्यापासून वाचायचं तर वेळीच उपचार सुरू करायला हवेत. पण या क्षेत्रातल्या तज्ञांची असलेली कमतरता, त्यातली असमानता हासुद्धा एक मुद्दा आहे.

हेही वाचा: या बाळंतपणाने सरकारी आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास जन्माला घातलाय

भारताचाही ‘कान गळतोय’

'वर्ल्ड रिपोर्ट ऑन हिअरिंग' जाहीर करायच्या पॅनलमधे डब्ल्यूएचओच्या कार्यकारी बोर्डाचे अध्यक्ष असलेले भारताचे डॉक्टर हर्षवर्धन यांचाही समावेश होता. हर्षवर्धन केंद्र सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. स्वतः आरोग्य क्षेत्रात काम केल्यामुळे त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने या रिपोर्टचं महत्त्व स्पष्ट केलंय. भारतात रिपोर्ट जाहीर करताना त्यांनी महत्वाच्या मुद्यांवर बोट ठेवलंय.

कानाशी संबंधित आजार वाढणं भारतासाठी धोक्याची घंटा आहे. कारण आपल्याकडची मोठी लोकसंख्या आधीच या बहिरेपणाची शिकार झालीय. त्यासाठी भारताच्या संदर्भातली डब्ल्यूएचओची २०१८ ची आकडेवारी पहायला हवी. २०१८ पर्यंत भारतातल्या ६.३ टक्के लोकांना कानानं कमी ऐकू येत होतं. वयस्कर माणसांमधे हेच प्रमाण ७.६ टक्के इतकं आहे.

'भारतातल्या २ टक्के लहान मुलांना 'कान गळणं' या समस्येचा सामना करावा लागतोय. आपल्याकडे लहान मुलांचे कान गळणं ही खूपच नॉर्मल गोष्ट समजली जाते. काहीवेळा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं,' असं डॉ. हर्षवर्धन म्हणतात. २००६ ला सुरू झालेल्या राष्ट्रीय बहिरेपणा प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमाचा उल्लेखही त्यांनी केलाय. तसंच कोरोनाचं संकट कमी झाल्यावर नेमकं आपण काय करणारं आहोत याचा रोडमॅपही त्यांनी समोर ठेवलाय.

तरुणांसाठी ६०-६० चा फॉर्म्युला

१२ ते ३५ या वयोगटातल्या जवळपास १०० कोटींच्या जनरेशनला इयरफोनसारख्या साधनांमुळे ऐकायला कमी येत असल्याचं डब्ल्यूएचओनं म्हटलंय. ६० ते ६५ डेसिबल इतका आवाज नॉर्मल समजला जातो. त्यापलीकडे आवाजानं पातळी ओलांडणं हे धोक्याचं आहे. त्याचा आपल्या ऐकायच्या क्षमतेवर परिणाम होतो.

ऐकायला कमी येणं ही समस्या तरुणांमधे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं अनेक कानाचे डॉक्टर म्हणतात. अर्थात त्यापासून स्वतःला वाचवता येऊ शकतं. हेडफोनचा वापर ६० मिनिटं करणं आणि आवाजाची मर्यादाही ६० टक्क्यांच्या खाली आणणं हा त्यावरचा उपाय असल्याचं दिल्लीच्या फोर्टिस्ट हॉस्पिटलचे कान, नाक, घसा विभागाचे डायरेक्टर डॉ. अतुल कुमार मित्तल एका मुलाखतीत म्हणतात.

इयरबर्ड हेडफोनमुळे कान दुखायची शक्यता अधिकच असते. त्याऐवजी कानावरून वापरले जाणारे हेडफोन घ्यायला हवेत. आवाजाच्या गोंगाटापासून वाचवणाऱ्या हेडफोनची बाजारात चलती आहे. त्यांचाही वापर करता येईल. अशा हेडफोनमुळे आवाज वाढवायची गरजही पडत नाही.

हेही वाचा: राष्ट्रीय कन्या दिन :  तारा मनाच्या का मूक होऊ लागल्या?

कान वाचवायचा कानमंत्र

गोवरसारखा असणारा रुबेला आजार, मेंदूतला ताप अशावेळी केलं जाणारं लसीकरण, आई आणि नवजात बालकांची काळजी, कानाशी संबंधित आजार, इन्फेक्शन यावर वेळीच उपचार करायला हवेत. त्यामुळे लहान मुलांशी संबंधित ६० टक्के घटनांना रोखता येऊ शकतं, असं डब्ल्यूएचओनं रिपोर्टमधे म्हटलंय.

वयस्कर लोकांना आजूबाजूच्या गोंगाटाचा खूप जास्त त्रास होत असतो. वेगवेगळ्या सण समारंभांमधे, रॅली, मिरवणूकांमधे मोठ्या प्रमाणात डीजेसारख्या गोष्टी लावल्या जातात. कानठळ्या बसण्यापलीकडे त्यातून बाकी काहीच साध्य होत नाही. त्यामुळे त्यापासून त्यांना वाचवायला हवंच शिवाय ओटोटॉक्सिक औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

कानांची नीट काळजी घेणं, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजापासून सुरक्षितता, योग्य वेळी लसीकरण असे काही उपाय आहेत. कानांच्या काहीएक समस्या आहेत त्यांनी ठराविक काळानं चेकअप करत रहायला हवं. खबरदारी आणि जबाबदारी दोन्हीही घ्यायला हवी.

हेही वाचा: 

लोकशाहीतून गायब झालाय विरोधी पक्ष : रवीश कुमार (भाग २)

लॉकडाऊन असू शकेल का कोरोना पेशंटची संख्या वाढण्यावरचं उत्तर?

मराठी जगात दहाव्या नंबरची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असताना संपेल कशी?

तंबाखूविरोधी दिवसः तंबाखू कंपन्या तरुणांनाच आकर्षित करण्यासाठी कॅम्पेन का राबवतात?