लव ऍट फर्स्ट साईट सिनेमातच बरं!

१४ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


नजरेतून होणारं पहिलं प्रेम. पहिल्या प्रेमाची सुरवात खरंतर. या प्रेमाचे किस्से आपण जगभर सांगत हिंडावं इतकं ते हवंहवंसं वाटतं. पण त्यात जात, धर्म आडवा आला तर? सगळं फिस्कटतं. प्रेम व्यक्त करण्याआधीच हे सगळं घडतं. अशावेळी निरपेक्ष प्रेमाच्या चिंधड्या उडतात. प्रेमाची स्वप्न ही स्वप्नच राहतात.

प्रेम हा शब्द कानावर पडला की, मन सिनेमातल्या दुनियेकडे वळतं. सिनेमातले आशिक अडचणींना सामोरे जात असले, त्यांच्यावर कितीही संकट येत असली, तरी शेवटी त्यांची भेट आनंदाने होते किंवा त्यांचं एकत्र येणं ठरलेलं असतं. हे केवळ सिनेमातच होत असावं. मला कुणी प्रेमाविषयी काही विचारलं तर मी त्याला दोन भागात पाहीन. पहिलं शाळेतलं आणि दुसरं कॉलेजमधलं प्रेम!

शाळेत आमच्या वर्गात एखादी सुंदर मुलगी असतेच. ती आम्हाला फार आवडायला लागते. पण ते प्रेम असतं की आकर्षण हे त्यावेळी समजत नाही. आमच्या मनात फक्त आणि फक्त प्रेम भावना असायची. कारण त्यावेळी आकर्षण काय असतं या गोष्टीची समज कदाचित नसते. म्हणून प्रेमाविषयी कोणताच विकृत विचार त्यावेळी नसतो.

हेही वाचा: ‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम

त्या मुलीवर आपलं खूप प्रेम आहे म्हणून जवळच्या मित्रांना आम्ही सांगयचो. सोबतच तुझी वहिनी आहे रे! असंही म्हणायला लावायचो. शाळेतले मित्रही नमूनेच. ते आमच्या शब्दाला शब्द देणारे होते. शाळेत आपल्याला आवडणाऱ्या मुलीसोबत कामानिमित्त दोन शब्दांचं बोलणं होतं. त्या दोन शब्दांचंही आम्ही मित्रांजवळ एवढं वर्णन करून सांगायचो की जगातलं सगळ्यात श्रेष्ठ प्रेमावरचं पुस्तक आपलंच असावं.

प्रेमाचं पुस्तक आपण खूप आनंदानं वाचून दाखवतो. पण या सर्व गोष्टींमागे मनात कोणतीही चुकीची भावना नसते. आपण हे कुणाच्या सांगण्यावरून करत नसतो. शाळेत प्रेम करताना आपण जाती, धर्माचा आणि समाजाचा विचार करत नसतो. ज्या पोरीवर प्रेम केलं ती आपल्याला भेटणार की नाही असाही विचार नसतो. फक्त प्रेमाच्या नदीत वाहत राहावं हा विचार मात्र असतो. तोही खराखुरा. पण त्यात एक वेगळीच भावना जपलेली असते. म्हणून शाळेतल्या प्रेमात एक वेगळाच आनंद असतो.

कॉलेजच्या प्रेमाबद्दलचा अनुभव वेगळा आहे. निस्वार्थ प्रेम करणारा माझा मित्र अनिल. कॉलेजमधे पहिल्या वर्षापासून तो सखिना या मुस्लिम मुलीवर प्रेम करायचा. ओळख कशी करयची, मैत्री कशी करायची हेच प्रश्न त्याच्या मनात असायचे.

हेही वाचा: वो सुबह कभी तो आयेगी!

फस्ट इयरला आम्हाला पोस्टमार्टम कसं करायचं ते शिकवलं जायचं. ते लवकरच सुरू झालं. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी बॅचनुसार न चुकता स्वतःचं एप्रेन, ग्लोवज आणि पोस्टमार्टम करताना वापरली जाणारी सर्जिकल इस्ट्रुमेंट आणावी लागायची. त्यावेळी सखिनानं एप्रेन आणलं नव्हतं. अनिलनं स्वतःचं एप्रेन त्याला दिलं. स्वतःसाठी मात्र सिनियर्सकडून घेतलं.

पुढे त्यांच्यात मैत्री झाली. अनिल मात्र स्वप्नाच्या दुनियेत स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यात रमला. स्वतःला रोमिओ, मजनू, रांझा समजायला लागला. मुली एवढा विचारही करत नसतील कदाचित. तीही त्याच्यावर प्रेम करते, असं त्याला वाटत होतं. त्यामुळे एक दिवस अनिलनं सखिनाला मनातली गोष्ट सांगितली. पण ती काहीही न बोलता निघून गेली. अनिल पूर्ण वेळ परत परत मोबाईलवर मॅसेज, कॉल येतो का म्हणून पाहत राहिला.

दुसऱ्या दिवशी अनिलनंच नेमकं काय झालं ते विचारलं. तेव्हा सखिना म्हणाली, आपण खूप वेगळ्या कल्चरमधून येतो. तुझा धर्म माझ्या धर्माशी जुळत नाही. त्यामुळे आपल्यात काहीच होणार नाही. 'तुझ्यासाठी तुझ्या धर्मात येऊन तुझ्याशी लग्न केलं तर सगळं चांगलंच होईल का?' असं अनिलनं विचारलं. पण सखिनानं त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही. तिनं बोलणं थांबवलं.

यात दोन वेगळ्या धर्मांची बंधनं होती. मात्र प्रेमाला कोणतंच बंधन नसतं. प्रेमाची परिभाषा ही धर्माच्या पलीकडे आहे. म्हणून प्रेम हे निस्वार्थ असणं गरजेचं आहे. ज्यात कुठल्याच विकृती नाहीत असं प्रेम.

हेही वाचा: तुमचं आमचं सेमच असतं

मुंबई नगरीत वैद्यकीय शिक्षणासाठी आल्यावर सुरवातीला अनेक गोष्टींसोबत प्रेमाबद्दलही खूप उत्सुकता होती. होणारं प्रेम शेवटपर्यंत असेल म्हणजेच अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर मुलं हे लग्नाचा विचार करूनच प्रेम करतात, असं मला अनुभवावरून वाटतं. त्यांना माहीत नसतं की, त्यांच्या लवस्टोरीमधे आयुष्याला कलाटणी देणारा एक टर्निंग पॉईंट येणार असतो. पण याचसोबत आपल्याच जातीतली एखादी चांगली पोरगी मला मिळावी वगैरे म्हणणारीही मुलं माझ्या आसपास दिसतात.

याच विषयावर मी माझ्या जवळच्या मैत्रिणीला विचारलं. तिला कसा मुलगा हवाय. सुरवातीला जातीचा असला पाहिजे, हे आलं. नंतर मग तिची मागण्यांची एक लिस्टच सुरू झाली. ही लिस्ट पाहिली तर माझ्यासारखे त्यात बसतच नाहीत. मला यात कुठेच प्रेम दिसत नव्हतं आणि मग अशा प्रकारच्या प्रेमात 'वॅलेंटाईन डे'चा अर्थ काय असतो कुणास ठाऊक?

'लव ऍट फर्स्ट साईट' पहिलं प्रेम असे शब्द सिनेमातच चांगले वाटतात. रिअल लाईफमधे मुलींना या गोष्टीचा थोडाही फरक पडत नसतो. त्यांना फक्त मुलगा त्यांच्या कॅटेगरीमधे येतो की नाही, हे महत्त्वाचं असतं. आमच्या वैद्यकीय क्षेत्रात असं खूप क्वचित प्रेमी असतील ज्यांचं पुढे चालून काही भविष्य झालंय. फस्ट इयरपासून शेवटच्या वर्षापर्यंत सोबत असतील. अगदी बोटावर मोजण्याइतकी असतील.

कारण पहिल्या वर्षी झालं ते प्रेम शेवटच्या वर्षापर्यंत टिकत नाही. ते फक्त आकर्षण असतं असं मला वाटतं. पण जे मनातून चांगल्या भावनेनं खरं प्रेम करतात तसं किती मुला, मुलींना खरंच आवडतं? कारण पोरींना या गोष्टीची खात्री झाली असते आणि मग मुलांपासून दूर जाणं, बोलणं टाळणं अशा गोष्टी होतात. अशावेळी तो मुलगा त्या मुलीसाठी जगातला सर्वात वाईट मुलगा ठरतो. माझ्या मते, त्याचं काहीच चुकत नाही. कारण त्याने प्रेम व्यक्त करण्याआधीच हे सगळं घडतं, आणि त्याची स्वप्न ही स्वप्नच राहतात.

हेही वाचा: 

आशिक लाथ कधी मारेल, सांगता येत नाही

समलैंगितकेलाही आपलंसं करणारं प्लेटोनिक लव

खलील जिब्रान : प्रेमाची देववाणी सांगणारा प्रॉफेट!

(आनंद मालुसरे मूळचा धुळ्याचा असून मुंबईच्या आयुर्वेदिक कॉलेज, सायन इथं शिक्षण घेतोय)