जगभरातल्या आरोग्य विभागांमधे साधारण ७५ टक्के महिला कर्मचारी असतात. पण जागतिक नेत्यांच्या यादीत फक्त २५ टक्केच जागा महिलांनी व्यापलीय. पण गंमत म्हणजे, कोरोनाविरुद्ध लढण्याचं मॉडेल निर्माण करणाऱ्या बहुतेक देशांच्या प्रमुखपदी महिलाच आहेत. संख्या कमी असली तरी आपल्या आपत्ती व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर या महिलांनी आपापल्या देशाला कोरोनापासून दूर ठेवलंय.
सध्या सगळ्या जगानेच कोरोनाविरूद्ध युद्ध पुकारलंय. कोरोनाशिवाय दुसरा कोणताही मुद्दा जगातल्या कुठल्याही राजकारण्यासाठी महत्त्वाचा नाहीय. या युद्धातही महिला पुरुषांपेक्षा जास्त हिंमतीनं लढतायत आणि जिंकतायतंही!
खरंतर, महिला नैसर्गिकरित्या दयाळु, प्रेमळ असतात, असं पुरुषसत्तेत वाढणाऱ्या आपल्या सगळ्यांना वाटत असतं. त्यांच्या या स्वभावगुणांमुळेच महिला सेवा शुश्रुषेचं काम चांगलं करू शकतात असाही गैरसमज अनेकजण बाळगून असतात. यामुळेच, जगातल्या कुठल्याही देशात आरोग्य विभागात महिलांची संख्या जास्त असते. द शांघाय वुमन्स फेडरेशनने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, कोरोनावायरशी लढताना चीनमधे ९० टक्क्यांपेक्षा जास्त नर्स आणि निम्म्याहून अधिक डॉक्टर महिला होत्या.
जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्लूएचओच्या एका अहवालानुसार, जगातल्या देशोदेशीच्या आरोग्य विभागांमधे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ७५ टक्के महिला असतात. पण जागतिक दर्जाच्या नेत्यांपैकी फक्त २५ टक्के भाग महिलांनी व्यापलेला आहे. म्हणजेच सेवा, शुश्रुषेसारखी कथित कमी दर्जाची समजली जाणाऱ्या कामांचं ओझं महिलांच्या खांद्यावर ढकलून बौद्धिक चर्चांसाठी आजही आपण पुरुषांना प्राधान्य देतो. पण संख्या कमी असली तरी त्यातही महिलांनीच बाजी मारलेली दिसते.
हेही वाचा : कोरोनाचा प्रादुर्भाव ही माणसाचीच चूक आहेः युवाल नोवा हरारी
अमेरिकेप्रमाणेच जर्मनीतही कोरोनाचं संक्रमण खूप मोठ्या प्रमाणावर झालं. तिथे आत्तापर्यंत सुमारे ९० हजार लोकांना कोरोनाची लागण झालीय. पण त्यामानाने तिथे फारच कमी लोकांचा कोरोनानं मृत्यू झालाय. त्यामुळेच जर्मनीच्या या मृत्यूदराचा जगभर बोलबाला होतोय. आणि यामागचं कारण जर्मनीच्या चान्सेलर अन्जेला मर्केल यांनी लोकांना विश्वासात घेऊन खरी माहिती दिली हे आहे.
डीडब्लू न्यूज या जर्मन न्यूज एजन्सीनं दिलेल्या एका बातमीनुसार, देशातल्या कमीतकमी ६० टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे. ही गोष्ट मर्केल यांनी सुरवातीलाच सांगून टाकली. स्वतः मर्केलसुद्धा दोन आठवडे विगलीकरणात राहिल्या होत्या. जिथे लोक कोरोना आमच्या कंट्रोलमधे आहे, असं सांगत माहिती दडवादडवीचा खेळ खेळत होते. तिथे मर्केलबाई पहिल्याच झटक्यात माझ्या देशातली ६० टक्के जनता कोरोनाच्या विळख्यात असल्याचं सांगत होत्या. आणि कोरोनाची साखळी ठेचून काढण्यासाठी तातडीनं कामाला लागल्या.
शिवाय, लॉकडाऊन जाहीर न करता केवळ आवाहन करून लोकांना घरीच थांबायला सांगितलं. कोरोना साथीमुळे साधी लक्षणं दिसली तरी पेशंटला हॉस्पिटलमधे भर्ती करणं आणि त्याची झटपट तपासणी करून औषधोपचार चालू करण्याची पद्धत विकसित केल्यामुळेच जर्मनीचा मृत्यूदर कमी राहिला.
हेही वाचा : जेसिंडा अर्डेन, यू आर माय लीडर
जर्मनीप्रमाणेच न्यूझीलंडचीही स्थिती दिसून येते. जवळपास न्यूझीलंडमधे एकूण १२३९ लोकांना कोरोनाची लागण झाली आणि आश्चर्य म्हणजे आत्तापर्यंत त्यातल्या फक्त एकाचा मृत्यू झालाय. न्यूझीलंडची लोकसंख्या ही पन्नास लाख आहे. मग एवढ्या लोकांवर कंट्रोल करणं खूपच सोप्पंय, असं काहीजण म्हणतात. पण जगभराशी कनेक्ट असलेल्या या जनतेतून कोरोनाची तोडणं हे आव्हान होतं. बेजबाबदारपणे या परिस्थितीला सामोरं गेल्यास पन्नास लाख लोकसंख्या पाचावर यायला काहीही वेळ लागत नाही, हे कोरोनाच्या गुणाकारी वेगानं वाढीतून स्पष्ट झालंय.
कोरोनाचे ६ पेशंट सापडल्यावर लगेचच तिथल्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी जगभरातून प्रवास करून आलेल्या सगळ्यांना दोन आठवड्यासाठी सेल्फ आयसोलेशन करायला लावलं. हा आकडा शंभरवर पोचण्याच्या आतच त्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. शिवाय, प्रेस कॉन्फरन्सद्वारे लोकांशी संवाद साधताना आर्डर्न शारीरिक आरोग्याबरोबरच लोकांच्या मानसिक आरोग्यावरही बोलतात. तिथल्या लोकांना आश्वस्त करतात.
ख्रिश्चन लोकांचा इस्टर संडे नावाचा एक सण असतो. काल परवाच झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्समधे हा सण साजरा करायला मिळणार नाही, म्हणून न्यूझीलंडमधली छोटी मुलं नाराज झाल्याचं एका पत्रकाराने अर्डेन यांना सांगितलं. तेव्हा, मुलांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन इस्टरचं प्रतिक असलेल्या सशाला आम्ही आमच्यासोबत कामाला घेतल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या उत्तरामुळे सध्या त्यांचं खूप कौतूक होतंय.
गेल्यावर्षीचीच गोष्ट आहे. न्यूझीलंडमधे दोन मशिदीत शिरत एका माथेफिरूने गोळीबार केला. ५० जण मारले गेले. त्यावेळीही सगळ्यांना सोबत घेत आपण यातून मार्ग काढू अशी ग्वाही देणारं अर्डेन यांचं भाषण खूप गाजलं. सारे प्रोटोकॉल झुगारून मशिदीत जात लोकांना दिलासा दिला.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?
साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
डेन्मार्कच्या राष्ट्राध्यक्ष मेट फ्रेडरिक्सन यांनी तर कोरोना वायरसशी लढण्याचा आपला ‘डॅनिश वे’च शोधून काढलाय. कोरोना वायरसचा प्रादुर्भाव युरोपात सुरू झाल्यानंतर संपूर्ण देशात कडक लॉकडाऊन जाहीर करणारा डेन्मार्क हा पहिला देश होता. त्याबरोबरच देशाच्या बॉर्डर सील करणाराही तो पहिला देश ठरला. आत्तापर्यंत डेन्मार्कमधल्या ४,६८१ लोकांना कोरोनाची लागण झालीय आणि त्यातल्या १८७ लोकांचा मृत्यू झालाय.
‘बाकीच्या युरोपियन देशांनी केलं तेच आम्हीही केलं. फरक इतकाच की आम्ही त्यांच्यापेक्षा लवकर पावल उचलंली,’ असं मेट म्हणतात. महिनाभरानंतर १५ एप्रिलला डेन्मार्कमधला लॉकडाऊन मागं घेण्याचा निर्णय मेट यांनी जाहीर केलाय. पण मोठ्या मोठ्या कार्यक्रमांना १० मेपर्यंत परवानगी देण्यात येणार नाही.
साना मारिन यांची तर डिसेंबर २०१९ मधेच फिनलंडच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. फिनलंडच्या त्या सगळ्यात तरुण राष्ट्राध्यक्षा आहेत. निवड झाली तसं त्यांना कोरोनाशीच्या संकटाशी दोन हात करावे लागले. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी काहीच करत नाही असा आरोप त्यांच्यावर मार्चमधे केला जात होता.
पण त्यानंतर फिनलँडमधे आणीबाणी जाहीर करून त्यांनी झटक्यात परिस्थिती आटोक्यात आणली, अशी माहिती व्लॉग या वेबसाईटवर देण्यात आलीय. आत्तापर्यंत फिनलॅंडमधे कोरोनाचे २,९०५ पेशंट सापडलेत आणि ४८ जणांचा मृत्यू झालाय.
चीनच्या अत्यंत जवळ असूनही कोरोनाला आपल्या छोट्याशा बेटाच्या तटबंदीवरच रोखणाऱ्या तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांचंही कौतूक करायला हवं. सोशल डिस्टसिंग आणि कोरोनाच्या तपासणीवर भर देऊन त्यांनी कोरोनाला दूर ठेवलं. त्साई, मेट आणि मारिन या तिघीही फार तरूण आहेत. तरीही, त्यांचा अनुभव, हुशारी आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया याच्या जोरावर त्यांनी भल्याभल्या महाशक्तिशाली राजकीय नेत्यांपेक्षाही चांगली कामगिरी केलीय.
हेही वाचा : कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!
दक्षिण कोरियाचं काही महिलेच्या हातात नाही. पण तिथं वायरस हंटर हा किताब मिळालाय तो एका महिलेला. आरोग्य अधिकारी जंग यून क्योंग यांच्यामुळे दक्षिण कोरियातला कोरोना आटोक्यात राहिल्याचं म्हटलं जातं. कोरियात अद्ययावत औषधांची निर्मिती आणि चाचण्यांचं संशोधन करण्यापासून ते नागरिकांना दिलासा देण्यासाठी वेळोवेळी पत्रकार परिषदा घेण्यापर्यंत सगळं नियोजन त्यांनी चोख सांभाळलं. तिथल्या नागरिकांचा विश्वास जिंकला आणि योग्य काळजी कशी घ्यायची याचे धडेही त्यांच्याकडून गिरवून घेतले. त्यामुळे लॉकडाऊन न करता दक्षिण कोरियानं कोरोनाशी दोन हात केले. या कामगिरीमुळेच आता कोरियात क्योंग यांना राष्ट्राध्यक्ष करावं अशी मागणी जोर धरतेय.
कोरोनाला दुष्टकर्मी इंग्रज समजून त्याच्याशी दोन हात करणाऱ्या झाशीच्या राण्यांची संख्या आपल्या भारतातही कमी नाही. 'दोन ते अडीच तासात कोरोनाची तपासणी करून देणारं एक कीट मायलॅब या पुण्याच्या संस्थेत काम करणाऱ्या साथरोगतज्ञ मीनल भोसले यांनी बनवून दिलं. महत्त्वाचं म्हणजे, त्या स्वतः गरोदर होत्या. आणि कीट बनवून झाल्यानंतर दोनच तासात त्यांची प्रसुती झाली,' असं बीबीसीच्या एका बातमीत म्हटलंय.
साऱ्या भारत देशाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नमस्ते ट्रम्प करण्याचे वेध लागले होते. त्यामुळे आपल्याला भारतात कोरोनानं कधी एंट्री केली तेच कळालं नाही. एंट्री कधी केली हे माहीत नसलं तरी आपण कोरोनाची थट्टामस्करी करण्यात काही मागं नव्हतो. तर ३० जानेवारीला केरळमधे कोरोनाचा पहिला पेशंट सापडला. अख्ख्या राज्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं. संपूर्ण राज्याला भीतीच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी केरळच्या आरोग्य मंत्री के. के. शैलजा या झाशीच्या राणीसारखं लढत होत्या. निपाह, इबोला यासारख्या वायरसपासून धडा घेऊन त्यांनी कोरोनाची तयारी आधीच सुरू केली. एकट्या केरळ राज्यात जवळपास १.२ लाख बेड तयार ठेवले होते.
शैलजा यांना प्रेमाने शैलजा टीचर असं म्हटलं जातं. त्यांच्या चोख नियोजनामुळे आत्तापर्यंत फक्त दोनच पेशंटचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुळातच केरळमधे कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या फार मर्याादीत होती. केरळमधे कोरोनाचे फक्त ३७५ पेशंट सापडले. त्यापैकी १७९ पेशंट बरे होऊन घरीसुद्धा गेलेत. उरलेल्या १९४ पेशंटवर अजूनही हॉस्पिटलमधे उपचार चालू असले तरी तेही लवकरच बरे होऊन घरी जातील.
हेही वाचा : कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी १ मार्च २०२० ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. अमेरिकेतल्या कोरोना वायरस टास्कफोर्स सदस्यांच्या बैठकीचा हा फोटो होता. म्हणजेच कोरोनाशी लढण्यासाठी काय करायला हवं याबाबतचं प्लॅन तयार करण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या अधिकारी या फोटोत चर्चा करताना दिसत होते. वरवर पाहता, हे चित्र फार भारी वाटतं. पण अमेरिकेच्या या टास्कफोर्सच्या फोटोत एकही बाई दिसत नाही.
कुणी म्हणेल अशा संकटाच्या काळात स्त्री पुरुष समतेचा ढोल वाजवून काय हातात पडणार? पण खरंतर, हा मुद्दा फक्त समतेचा नाही. जगात पुरुषांएवढीच बायकांची संख्या आहे. कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी सगळ्यात अनुभवी आणि हुशार अधिकाऱ्यांना सोबत घेतलं जातंय. अशावेळी जगातल्या निम्म्या लोकसंख्येचा अनुभव प्रातिनिधीक स्वरूपात लक्षात घेणं ही आत्ताची गरज आहे. पण भारतासोबतच इतर कुठल्याही देशात तसं होताना दिसत नाही.
थोडक्यात फिनलँड, जर्मनी, डेन्मार्क, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया या देशांचे राष्ट्राध्यक्ष किंवा आरोग्य प्रमुख पदावर महिला असलेल्या देशांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केलीय. याउलट, पुरुष राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान असलेल्या अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटन, भारत यासारखे देशांमधे कोरोनाने नाकीनऊ आणलेत.
हेही वाचा :
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
देवदासी समाजातून गानसरस्वती घडण्याचा इतिहास प्रेरणा देतो
कोरोनाकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळून वारकऱ्यांनी आदर्शच घातलाय
ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?
लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक