कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश

२८ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ३ मिनिटं


अपंगांच्या भारतीय क्रिकेट टीमने टी ट्वेंटी वर्ल्ड क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. त्याची चर्चाही होतेय. पण आपल्याकडे अपंगांसाठीच्या योजना अगदी तुटपुंज्या आहेत. त्यांचे छंद, त्यांची आवड, त्यांच्यातली कला याबद्दल कुणी फारसा विचार करत नाही. विकसित देशांमधे मात्र सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न होतात.

धडधाकट असलेल्या तरुणांचा भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड कपमधे यशासाठी चाचपडत असताना, अपंगांच्या भारतीय क्रिकेट संघानं टी ट्वेंटी वर्ल्ड सिरीज क्रिकेटचे विजेतेपद मिळवण्याची करामत करून दाखवलीय. इंग्लडमधे वूर्सेस्टरशायर इथं झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी यजमान इंग्लंडचाच ३६ धावांनी दणदणीत पराभव केला.

भारतात अपंग हा एक बोजा

भारतीय संघाचं कौतुक यासाठी की हा संघ अपराजित राहिला. दुसरं म्हणजे आपल्याकडच्या तुलनेत इतर देशांमधे अपंग अशा व्यक्तींची खूपच चांगल्या तऱ्हेने काळजी घेतली जाते. त्यांना केवळ सहानुभूती न दाखवता चांगल्या सोयी सुविधा पुरवल्या जातात. खऱ्या अर्थाने ते आपल्या पायावर उभे राहतील अशी व्यवस्था केली जाते. अनेक कल्याणकारी योजना त्यांच्यासाठी राबवल्या जातात.

त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे सरकारी पातळीवरून प्रयत्न केले जातात. अपंग असल्याने कुठलाही न्यूनगंड त्या व्यक्तीला वाटणार नाही याबद्दल जागरूकता असते. यामुळे तिथे कला, क्रीडा क्षेत्रातही अपंगांना चांगला वाव मिळतो. त्यांना त्यांचे गुण सहज व्यक्त करता येतात. त्या तुलनेत भारतात अपंग हा एक बोजा आहे असा दृष्टिकोन अनेकांचा असतो.

भारताच्या संघाचा कॅप्टन विक्रांत पालघरचा

आपल्याकडे अपंग व्यक्तीचा केवळ त्याचा सांभाळ करायचा एवढंच डोक्यात असतं. त्याला नोकरी मिळावी आणि त्यानं त्याचं पोट भरायचं हेच पाहिलं जातं. त्यांचे छंद, त्यांची आवड, त्यांच्यातली कला याबद्दल कुणी फारसा विचार करत नाही. यामुळे अपंग आपल्यातले कला, क्रीडांमधले गुण खुरटतात. साधारण अशी पार्श्वभूमी असताना भारतीय संघाने एवढा मोठा विजय मिळवलाय. ही कौतुकाचीच गोष्ट.

या संघाचं नेतृत्व करणारा विक्रांत हा आपल्या पालघरमधल्या कांबेदे गावचा. लहान वयात पोलियोने ग्रासलं असूनही क्रिकेट खेळायची खूप हौस. सुदैवानं आईवडलांनी त्याला रोखलं नाही. व्यवसायाने कोळी असलेल्या या जोडप्याने मुलगा एवढी प्रगती करेल असं स्वप्नातही वाटलं नसेल. पालघरला त्याची शाही मिरवणूक निघाली तेव्हा दिवाळी असल्यासारखं त्यांना वाटलं असणार. विक्रांतने या स्पर्धेत अष्टपैलू चमक दाखवली हे विशेष.

हेही वाचा: मुंबईचा श्रेयस अय्यर टीम इंडियात चौथ्या नंबरची जागा घेईल?

आणि प्रशिक्षकांचा निर्णय योग्य ठरला

त्याच्या शिवाय देवव्रत रॉय हाही अष्टपैलू म्हणून चमकला. पण तो नेमका अंतिम सामन्याआधी जायबंदी झाला. १६ जणांच्या टीम ऐवजी राखीवमधे असलेल्या सनी गायोत या हरियाणाच्या युवकाला थेट अकरामधे खेळवलं. तशी परवानगी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी दिली. त्यांची ही चाल यशस्वी ठरली. सनीने इंग्लिश संघ सुस्थितीत असताना त्यांचे दोन गडी बाद केले.

अशाप्रकारे सामना फिरवला गेला. सोबत रवींद्र सांटे याने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी केली. संघाचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी हे गुरू द्रोणाचार्य आचरेकर सरांचे शिष्य. त्यामुळे खेळाडूंना घडवायचे, प्रोत्साहित करायचे यात ते माहिर आहेत. त्यांनी या खेळाडूंवर खूप मेहनत घेतली. त्यामुळेच त्यांच्या कष्टाचं चीज झालं असं म्हणावं लागेल.

आता जबाबदारी क्रिकेट बोर्डाची

सर्व खेळाडूंनी हा विजय दिवंगत अजित वाडेकर यांना अर्पण केलाय. वाडेकर यांनी अपंग क्रिकेटपटूंसाठी भरीव काम केलं. अनेकदा ते मनोर इथं जाऊन या खेळाडूंचा सराव बघायचे. त्यांना परिस हात असलेलं म्हटलं जायचं ते उगाच नाही. त्यांनी मनाने विकलांग असलेल्या भारतीय संघाला १९७१ मधे विंडीज आणि इंग्लंडमधे विजय मिळवून दिला.

त्यांनी शरीराने अपंग असलेल्यांना खऱ्याअर्थाने विजयाचा मार्ग दाखवला. अपंगांसाठी जरुर योजना निघाल्यात. काही सोयी सुविधासुद्धा आहेत. पण एक तर त्या तुटपुंज्या तरी आहेत किंवा त्यांचा लाभ घेणारे तरी सधन असतात. आता भारतीय क्रिकेट बोर्डाची जबाबदारी आहे. त्यांनी या संघाला घसघसीत बक्षिसं देऊन अपंग क्रिकेटला चांगले दिवस आणावेत. या श्रीमंत मंडळाला हे जमलं नाही तर मंडळावरची माणसं मनाने विकलांग आहेत असं म्हणावं लागेल. त्यासाठी क्रिकेट बोर्डानं प्रयत्न करण्याची गरज आहे.

हेही वाचा: 

झाशीची राणी आता हॉलिवूडही गाजवणार

सांगली, कोल्हापुरातल्या महापुरापासून आपण काय धडा घेणार?

सर दोराबजी टाटांनी बायकोचे दागिने विकून टाटा स्टीलला सावरलं!

नवनीतभाई शहाः संयुक्त महाराष्ट्र लढ्याला पाठिंबा देणारे गुजराती आमदार