नवा कोरोना वायरस भारतात 'सुपर स्प्रेडर' ठरेल?

२४ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


कोरोनाच्या लसीच्या रूपानं आशेचा किरण दिसत असतानाच जगाच्या काळजीत पुन्हा भर पडलीय. ब्रिटनमधे कोरोना वायरसचा नवा प्रकार आढळून आलाय. हा नवा प्रकार लसीचं काम बिघडवेल की काय अशी भीतीही व्यक्त केली जातेय. नवा वायरस ७० टक्यापेक्षाही अधिक वेगानं पसरू शकतो. पण जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र घाबरायचं कारण नाही असं म्हटलंय.

कोरोनावरच्या लसीमुळे साथीच्या काळाचा सामना अधिक प्रभावीपणे आपल्याला करता येईल या आशेत अनेक देश आहेत. ब्रिटन आणि अमेरिकेत तर कोविड १९ ची लस द्यायला सुरवातही झाली होती. अशातच ब्रिटनमधे कोरोना वायरसचा नवा प्रकार पुढे आला. त्याचा वेग इतका आहे की, त्यावर सहज नियंत्रण मिळवणं शक्य नसल्याचं ब्रिटन सरकारनं जाहीर केलं. जगभरची सरकार, कंपन्यांना काळजीत पडल्या. आधीच कोरोनानं जगभरच्या अर्थव्यवस्थांचं कंबरडं मोडलंय.

आजही कोरोना लसीवर जगभर वेगानं काम सुरुय. चाचण्या होतायंत. संशोधनही चाललंय. लसीसाठी अनेक देशांनी आधीच ऑर्डरही दिल्यात. पैशाची गुंतवणूकही झालीय. कोरोनाच्या फटक्यातून अनेक देश हळूहळू सावरायचा प्रयत्न करतायत. अशातच कोरोना वायरसचा एक वेगळा प्रकार अचानक समोर आल्यामुळे सगळ्यांच्याच चिंतेत भर पडलीय. ब्रिटनमधल्या नवा प्रकारामुळे युरोपात मात्र खळबळ निर्माण झाली. विमान प्रवासावरही निर्बंध घालण्यात आले.

हेही वाचा: सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

नवा वायरस अधिक वेगवान

कोरोना वायरसच्या मूळ प्रजातीपेक्षा सध्याच्या वायरसचा संसर्ग अधिक वेगानं वाढत असल्याचं म्हटलं जातंय. वायरसचा हा नवा प्रकार केवळ ब्रिटनमधे आढळून आलेला नाहीय. तर ब्रिटनसोबत ऑस्ट्रेलिया, इटली, नेदरलँडमधल्या काही लोकांमधे ही प्रजाती दिसून आल्याचं जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओनं म्हटलंय. याआधी ऑक्टोबरमधे कोरोना वायरसमधे म्युटेशन होत असल्याचं दिसून आलं होतं. म्युटेशन म्हणजे वायरसमधल्या जेनेटिक सिक्वेन्समधला बदल.

थोडक्यात काय तर वायरस एकाच्या शरीर किंवा पेशीतून दुसऱ्याच्या शरीर, पेशीत जाताना त्यात कमी अधिक बदल होणं. वायरस स्वतःमधे बदल करून एका नव्या रुपात पुढे येतो त्याला वायरसचा नवा स्ट्रेन असं म्हटलं जातं. सध्याच्या वायरसमधे १७ प्रकारचे बदल आहेत. स्पाईक प्रोटीनमधला बदल या सगळ्यात महत्वाचा. कोरोना वायरसचा फोटो आपण पाहिला असेल. त्यात या वायरसच्या बाहेरच्या बाजूला एक मुकुटासारखा भाग आपल्याला दिसतो. इथूनच वायरस प्रोटीन बाहेर काढतो. याला स्पाइक प्रोटीन म्हणतात. 

कोणताही वायरस स्पाइक प्रोटीनमधून मानवी पेशींमधे प्रवेश करत असतो. इथूनच संसर्ग व्हायला सुरवात होते. नव्या वायरसमधे या स्पाइक प्रोटीनची रचना बदललीय. सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदा हा वायरसचा नवा प्रकार आढळलाय. नोव्हेंबरमधे लंडनमधल्या एकूण कोरोना पेशंटपैकी २५ टक्के लोकांना या नव्या वायरसनं आपल्या विळख्यात घेतलं. डिसेंबरमधे हे प्रमाण ६६ टक्क्यांवर आलंय. म्हणजे महिन्याभरात आकडेवारीत दुपटीपेक्षा अधिक वाढ झालीय. वायरस संदर्भातल्या या महत्वाच्या नोंदी बीबीसीवर वाचायला मिळतात.

वायरसचा नवा प्रकार ७० टक्क्यापेक्षाही अधिक वेगानं पसरू शकतो असं ब्रिटनमधल्या एका संशोधनात समोर आलंय. पण त्याबद्दल अद्याप पुरेशी माहिती नाहीय. ब्रिटनच्या सरकारने मात्र या नव्या वायरसचा वेग पाहता त्यावर लक्ष ठेवणं महत्वाचं आहे असं म्हटलंय. शिवाय ब्रिटनमधे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊनची घोषणाही केलीय. नव्या वायरसमुळे मृत्युदर अधिक आहे असं काही घडलेलं नाहीय याकडेही लक्ष द्यायला हवं.  

हेही वाचा : खरंच कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरेल का?

लसीवर परिणाम होईल?

वायरसचा नव्या प्रकारामुळे सध्या एक मुद्दा अधिक चर्चेत आहे. लसीवर काम होत असताना आणि ब्रिटन आणि अमेरिकेत लस द्यायला सुरवात झाली असताना या नव्या वायरसमुळे त्याच्यावर काही परिणाम होऊ शकेल का? सध्या याबाबत काळजी करायचं कारण नाही असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. कोणत्याही वायरसशी लढायचं तर शरीरातली रोग प्रतिकारशक्ती वाढायला हवी. बऱ्याच लसी रोग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी काम करतात.

कोरोना वायरसचा विचार करून जगभरच्या कंपन्यांनी लस तयार केलीय. वायरस वेगळाच असल्यामुळे आधीच तयार करण्यात आलेल्या अँटी बॉडीज काम करतील का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. म्युटेशन ही अगदीच सामान्य गोष्ट म्हटली जाते. वायरसमधे बदल झाला म्हणजे तो धोकादायक असेलच असं नाही. वायरसमधल्या जेनेटिक सिक्वेन्समधे बदल झाला तरी लस आपलं काम करू शकेल. पण हुरळून जायची गरज नाहीय.

नवा वायरस वेगानं पसरतोय त्यामुळे सजग रहायला हवं. वायरसमधे असेच बदल होत राहिले तर ते मात्र धोक्याचं ठरेल. वेळोवेळी लसीत बदल करावे लागतील. अर्थात सध्या फक्त यावर रिसर्च चाललाय. ठोस अशी माहिती पुढे आलेली नाही. आपण ब्रिटन सरकारच्या संपर्कात आहोत शिवाय इतर देशांना याबद्दलची माहिती वेळोवेळी दिली जाईल असं डब्ल्यूएचओनं जाहीर केलंय. त्यामुळे सध्यातरी कोणताही ठोस निष्कर्ष किंवा अंदाज बांधता येणार नाही. 

खबरदारी आपली, जबाबदारी सरकारची

कोरोना वायरस वाढत असताना सुरवातीच्या काळात भारताने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. नियोजनावरून सरकारवर टीकाही करण्यात आली होती. सध्या सरकार खबरदारी घेताना दिसतंय. केंद्र सरकारनं ब्रिटनमधून भारतात येणारी २३ ते ३१ डिसेंबर पर्यंतची सगळी विमानं रद्द केलीत. प्रवाशांवरही काही निर्बंध घातलेत. २१ आणि २२ डिसेंबरला भारतात आलेल्या प्रवाशांची कोरोना टेस्ट करणं बंधनकारक असेल. 

खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारनंही प्रवाशांसाठी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात. याआधीच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर एक बैठक घेतली होती. मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पत्रकार परिषद घेऊन नव्या वायरससंबंधी अपडेट दिलीय. नव्या प्रकारातली एकही व्यक्ती भारतात आढळून आली नसल्याचं नीती आयोगाचे सदस्य वी. के. पॉल यांनी म्हटलंय.

वायरसमधे नवे बदल झाले असले तरी त्याचा परिणाम मृत्युदर किंवा हॉस्पिटलायजेशनवर होणार नाही. आपण सावध रहायला हवं. शिवाय लॅबोरेटरीत येणाऱ्या नमुन्यांचं जेनेटिक सिक्वेसिंग सुरू केल्याची माहितीही पॉल यांनी दिलीय. सोशल डिस्टंस, नियमांचं पालन, मास्क घालायला हवा. गर्दीच्या ठिकाणी जाणं लोकांनी टाळायला हवं. 

हेही वाचा : आजारी पडण्यापूर्वी कुठे कुठे जातात कोविड १९ चे पेशंट?

दुसऱ्या लाटेचा फटका बसेल?

ब्रिटन, स्पेन आणि युरोपातल्या इतर अनेक देशांमधे कोरोना वायरसची दुसरी लाट आली होती. त्यामुळे तिथं पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणाही करण्यात आली. भारतात युरोप, अमेरिकेसारखं फिजिकल डिस्टसिंग झालेलं नाही. त्यामुळे अँटिबॉडीज मोठ्या प्रमाणात झाल्या असणार. आपल्याकडे हर्ड इम्युनिटी आहे म्हणून कोरोनाचं संकट दूर होईल या भ्रमात राहता नये. पण इतर देशांना जसा दुसऱ्या लाटेचा फटका बसलाय तसा मात्र आपल्याला बसणार नाही 

सध्याच्या घडीला भारतात कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीच्या वर पोचलीय. पण रिकवरी रेट ९५ टक्क्यांवर आहे. आपल्याकडच्या रुग्णांची संख्याही कमी होतेय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात सध्या कोरोनाच्या ऍक्टिव रुग्णांची संख्या ३ लाखाच्या खाली आहे. गेल्या १६३ दिवसातली ही सगळ्यात कमी आकडेवारी आहे. आपल्याकडे दुसरी लाट आलीच तरी ती तितकीशी प्रभावी ठरणार नसल्याचंही म्हटलं जातंय. 

डब्ल्यूएचओ म्हणतेय, घाबरायचं नाय

या नव्या प्रकारामुळे युरोपात घबराट निर्माण झालीय. अनेक ठिकाणी प्रवासावर बंदी घातल्यामुळे जिकडे तिकडे माणसं अडकून पडलीत. जागो जागी गाड्यांच्या लांब रांगा लागल्यात. युरोपसोबत भारत, पाकिस्तान, सौदी अरेबिया, कॅनडा, हॉंगकॉंगसारख्या देशांनीही इंग्लंडमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातलीय. जगभरातल्या ४० देशांनी ब्रिटनमधून होणाऱ्या प्रवासावर बंदी घातलीय. पण जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र या नव्या वायरसला घाबरण्याचं कारण नाही. त्याला रोखता येऊ शकतं असं म्हटलंय. 

संघटनेच्या आरोग्यविषयक आपत्कालीन विभागाचे प्रमुख माइक रायन यांनी यासंदर्भात एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. 'परिस्थिती नियंत्रणाबाहेर नाहीय. पण ती स्वतःच्या भरवश्यावर सोडताही येणार नाही.' असं रायन यांनी स्पष्ट केलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या साथरोगतज्ज्ञ मारीया वॅन केरखोव यांनी हा नवा प्रकार जास्त गंभीर किंवा घातक नसल्याचं म्हटलंय. शिवाय ब्रिटनमधे जो कोरोना वायरसचा नवा प्रकार आढळून आलाय तसाच याआधी ऑस्ट्रेलिया, इटली, नेदरलँडमधल्या काही लोकांमधे दिसून आल्याचं निरीक्षणही त्यांनी नोंदवलंय.

हेही वाचा : 

पाणी कसं प्यावं?

कोरोना लसीच्या स्पर्धेत कोण पुढे, कोण मागे?

कोरोना काळात कसा शोधायचा एका चांगल्या डॉक्टरचा पत्ता?

मोफत पॅड देऊन स्कॉटलँडनं मासिक पाळीची गरिबीच दूर केलीय

या आजींनी आत्ता कोरोनाला आणि १०० वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूलाही हरवलंय