विधानसभेसोबतच सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणुकही होतेय. भाजपमधे गेले उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. स्वतः शरद पवार यांनी साताऱ्यात जाऊन मोर्चेबांधणी केलीय. त्यामुळे साताऱ्यात तिसरी मिशी इतिहास घडवणार का, अशी चर्चा सुरू झालीय.
सातारा लोकसभा निवडणुकीचं काय असा प्रश्न निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाल्यानंतर भल्याभल्यांना पडला होता. त्यामुळेच की काय मराठी पत्रकारांनी वारंवार खातरजमा केली की, साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेबरोबर खरंच नाही होणार ना? त्यावर अगदी पढवल्याप्रामाणे होय, होणार नाही, असंच ठाम उत्तर निवडणूक आयोगाने दिलं.
मात्र पत्रकारांना माहिती होतं की साताऱ्याची पोटनिवडणूक ही विधानसभेबरोबरच होणार. म्हणून त्यांचा विश्वासच बसत नव्हता. अगदी निवडणूक आयोगावर, मुख्य निवडणूक आयुक्तांवरही त्यांचा विश्वास बसत नव्हता. आणि दोन दिवसांतच आयोगानेही स्वतःचा विश्वासघात करुन पत्रकारांच्या विश्वासाला जागत सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली. साताऱ्याच्या गादीमधे किती दम आहे, हे त्याचवेळी सिद्ध झालं.
हेही वाचाः डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!
निवडणूक लावून घेण्यात यश आलं असलं तरी ही निवडणूक तशी सोपी नाही याची कल्पना दस्तुरखुद्द उमेदवारांनाही आहे. मग तशी मांडणीही करण्यात आली. भावनिक साद घालण्यात आली. कमजोर कमजोर उमेदवार असावा यासाठी माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने आवयाही उठवून झाल्या. पण सत्य जास्तकाळ लपून राहात नसतं हेच खरं. अखेर उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील असा सामना निश्चित झाला. हे सर्वसाधारणपणे अपेक्षित असंच होतं.
उदयनराजेंची प्रतिमा, त्यांचं घराणं, त्यांची स्टाईल, त्यांचा स्वभाव अवघ्या जगाने विविध माध्यमांच्यामधून अनुभवला आहे. दुसरीकडे श्रीनिवास पाटील यांच्याबाबतीत जुन्या पिढीला माहिती आहे. त्यांच्या कामांची माहिती आहे. त्यांच्या स्वभावाची माहिती आहे. गेली अनेक वर्ष ते घटनात्मक पदावर म्हणजे राज्यपालपदी राहिल्याने त्यांचा मतदारसंघाशी संपर्क नाही किंवा नव्हता असा होरा आहे. मात्र त्यामधे खरंच तथ्य आहे का? तर याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल.
हेही वाचाः आजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय?
धडाडीने काम करणारा एक सनदी अधिकारी अशी श्रीनिवास पाटील यांची मूळ ओळख. पुण्याचे आयुक्त, १९९९ ते २००९ या काळात कराडचे खासदार, सिक्कीमचे राज्यपाल असा प्रवास करुन पुन्हा उदयनराजेंच्या विरोधात ते लोकसभेच्या रिंगणात उतरलेत.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया ही मार्मिक अशीच म्हणावी लागेल. ‘ही निवडणूक जनता विरुद्ध उमेदवार अशी आहे. या निवडणुकीत एकीकडे जनता उमेदवार आहे आणि दुसरीकडे विरोधी उमेदवार आहे. या निवडणुकीत जनता नक्कीच निवडून येणार,’ असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय.
श्रीनिवास पाटील २००९ नंतर मतदारसंघात 'प्रवासी' होते. मात्र त्यांचा जनसंपर्क कधीच तुटला नाही. कराडमधील कार्यालयात त्यांच्याकडे कुणाचाही मुक्तद्वार प्रवेश आजही आहे. राज्यपाल असतानाही त्यांनी कुणालाही अंतर दिलं नाही. अनेकांनी त्यांचा पाहुणचार अनुभवलाय. आपुलकी अनुभवलीय. खरंतर अनेकांनी म्हणण्यापेक्षा ज्या-ज्या मराठी माणसाने सिक्किमला भेट दिली, ते श्रीनिवास पाटील यांचं आदरातिथ्य विसरुच शकत नाहीत.
श्रीनिवास पाटील यांची नाळ ते कितीही बाहेर राहिले तरी कराड किंवा साताऱ्यापासून तुटली नाही. जिल्ह्यात कुठंही, काहीही निमंत्रण असेल तर त्यांनी ते कधीच चुकवलं नाही. ते जेव्हा जेव्हा कराडमधे असतात तेव्हा त्यांची भेट घेण्यासाठी येणाऱ्यांचा ओघ सतत सुरू असतो. मुक्तद्वार प्रवेश असल्याने त्यांना कुणी भेटायला आला आणि त्यांची भेट झालीच नाही हे विरळाच.
हल्लीच्या निवडणुका या तरुणांच्या निवडणुका झाल्या आहेत. परंपरागत निवडणुका राहिल्या नाहीत. व्हॉट्सअप, फेसबुक इन्स्टाग्राम या माध्यमांचा वापर करणाऱ्या तरुणांच्या हाती आता निवडणुका गेल्या आहेत. त्या तरुणांच्याबद्दल श्रीनिवास पाटील यांचा अनुभवही आपुलकीचाच पाहायला मिळतो.
जुन्या जाणत्यांना ते ज्या आत्मियतेने भेटतात. त्याच उत्साहाने ते तरुणांनाही भेटत असतात. त्यांचे विचार ऐकून घेतात. त्यांना सोल्युशन देतात. जात्याच हुशार माजी सनदी अधिकारी असल्याने तरुणांची नस ते अगदी सहजगत्या पकडतात. आणि आता हीच तरुणाई आता उदयनराजे भोसले आणि श्रीनिवास पाटील यांचा निकाल लावणार आहे.
हेही वाचाः सत्यशोधकीय नियतकालिकेः वाङ्मयेतिहासात मोलाची भर घालणारा संदर्भ ग्रंथ
साताऱ्याच्या राजकारणात गेल्या वीस वर्षांत दोन मिशा गाजत होत्या. त्या म्हणजे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि नरेंद्र पाटील यांच्या मिशा. उदयनराजेंनी आपण एकाच गोष्टीला घाबरतो ते म्हणजे पिळदार मिशा असं म्हटलं होतं. मागच्यावेळी नरेंद्र पाटील यांच्या रुपाने त्यांच्याविरोधात मिशी उभी ठाकली होती. तुलनेने अननुभवी अशी ती मिशी होती. आता मात्र तसं नाही.
श्रीनिवास पाटील यांची मिशी अनुभव आणि कामाचा दांडगा उरक असलेला पिळ या मिशीला आहे. लोकसंपर्कही मोठा आहे. तसंच गेल्या निवडणुकीत म्हणजेच लोकसभेत देशभर कमळ फुललं असताना साताऱ्यात घड्याळाने कमाल केली होती. एवढ्या लवकर लोक घड्याळाची टिकटिक विसरतील का? तसंच प्रत्येकाला आपलासा वाटणारा आपल्यातला वाटणारा तरीही खंबीर सुसंस्कृत नेतृत्वाची पावती दिलेला श्रीनिवास पाटील यांच्यासारखा उमेदवार मिळाला आहे. आता या निवडणुकीत आलेली ही तिसरी मिशी राजांना चितपट करणार का, हे २४ तारखेला कळेलच.
हेही वाचाः
भाजपच्या उमेदवार याद्यांमधे कुणाचा बोलबाला?
काँग्रेसच्या विधानसभेसाठीच्या पहिल्या यादीचा अर्थ काय?
ईडीच्या कारवाईचा फायदा पवार उठवणार की फडणवीस?