अश्विनची मुरलीधरनशी बरोबरी, आता कुंबळेंचा रेकॉर्ड मोडणार?

१६ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने एक नवा रेकॉर्ड पार केला. इंदौर इथल्या टेस्टमधे त्याने गुरुवारी बांगलादेशचा कॅप्टन मोमिनुल हमला बोल्ड करत मायदेशातल्या ग्राऊंडवर टेस्ट क्रिकेटमधे अडीचशे विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला. असा विक्रम करणारा तो तिसरा भारतीय आहे. आता त्याला अनिल कुंबळेचा एक रेकॉर्ड मोडण्याचे वेध लागलेत.

आर. अश्विनने अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्यानंतर भारतीय फिरकीचा वारसा समर्थपणे सांभाळलाय. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या टेस्टमधे त्याने मायदेशात सर्वात जलद २५० विकेटचा टप्पा गाठण्याच्या शर्यतीत जगप्रसिद्ध स्पिनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुथैय्या मुरलीधरनशी बरोबरी साधलीय. अश्विनच्या ६८ टेस्टमधे ३५७ विकेट घेतल्यात.

अश्विनलाही फास्ट बॉलिंगचा मोह

आता अश्विनला हरभजनचा टेस्टमधे ४१७ विकेटचा विक्रम खुणावतोय. त्यानंतर तो अनिल कुंबळेच्या ६१९ विकेटच्या मिशनवर असण्याची शक्यता आहे. पण खरंच अश्विन कुंबळेचा विक्रम मोडून भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर होईल का? हे येणारा काळच ठरवेल कारण त्याचं वाढतं वय, ऐन भरात आलेले फास्ट बॉलर, स्पिन डिपार्टमेंटमधे वाढलेली स्पर्धा यामुळे अश्विन कुठपर्यंत मजल मारतो हे बघावं लागेल.

अश्विन सध्या जगातल्या सर्वोत्तम ऑफ स्पिनरमधे गणला जातो. असं असलं तरी तो बाय बॉर्न स्पिनर नाही. तोही आपल्या करिअरच्या सुरवातीच्या काळात इतरांप्रमाणे फास्ट बॉलिंगकडे आकर्षित झाला होता. सलामीला बॅटिंगबरोबरच तो मध्यम गतीने बॉलिंग कर होता. कॉलेजमधल्या कोचनी त्याला ऑफ स्पिन ट्राय करायला सांगितलं. त्यानंतर ज्युनिअर लेवलवर सलामीला खेळणारा अश्विन मोठा होत गेला तसतसा तो फुल टाईम ऑफ स्पिनर झाला. 

अश्विन काही सुरवातीपासूनच टेस्टसाठीचा आदर्श ऑफ स्पिनर नव्हता. तो टीम इंडियात आला तो २०१० च्या आयपीएल हंगामानंतर. त्याची एंट्रीही मर्यादित षटकांच्या मॅचमधे झाली आणि त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही मर्यादित अशीच होती.

हेही वाचाः बाबरानं मंदिर पाडून मशीद बांधली नाही, तरीही निकाल रामलल्लाच्या बाजुने का लागला?

टी २० च्या प्रभावात झाली सुरवात

सुरवातीच्या काळात त्याच्यावर टी-२० चा इतका प्रभाव होता की त्याचा बॉलिंगचा वेगही प्रचंड होता. कॅरम बॉलच्या इतक्या प्रेमात होता की तो ऑफ स्पिन कसा करतात हेच विसरला होता. यात त्याचाही दोष नाही म्हणा. २०१० नंतर जागतिक क्रिकेटमधे पारंपरिक स्पिन बॉलिंग अडगळीत गेली होती. कॅरम बॉल म्हणजेच फिरकी बॉलिंग येत नसेल तर तुम्ही फिरकीपटूच नाही असं एक चित्र निर्माण झालं होतं.

याला अपवाद होता तो इंग्लंडचा ग्रॅम स्वान. याच काळात टी २० वनडेच्या बदललेल्या फॉरमॅटमुळे हरभजनची शैली बिघडली. कॅरम बॉल किंग असलेल्या अश्विनने टेस्ट आणि वनडेतली हरभजनची जागा पटकावली. त्याच्याकडच्या कॅरम बॉलचं नाविन्य असेपर्यंत त्याने विकेट घेण्याचा धडाका लावला. पण हा कॅरम बॉल त्याच्या आयुष्याला पुरणारा नव्हता.

अखेर खरी कलाच आली कामी

कॅरम बॉलच्या अतिवापरामुळे अश्विन ऑफ स्पिन, बॉलला लूप देणं आणि बॉल ड्रिफ्ट करणं ही कलात्मक बॉलिंगच विसरला. याचा फटका टीमला पर्यायाने त्यालाही बसला. तो टीम बाहेर फेकला गेला. यावेळी त्याची उपयुक्त बॅटिंगही त्याच्या कामाला आली नाही.

या सेटबॅकनंतर तो भानावर आला आणि त्याने कलात्मक बॉलिंग पुन्हा आत्मसात केली. त्यानंतर त्याने विकेट घेण्याचा धडाकाच लावला. आता तो जगातला अव्वल 'शैलीदार' ऑफ स्पिनर बनलाय. त्याचा ट्रेडमार्क असलेला कॅरम बॉल आता क्वचितच बघायला मिळतो. आता चर्चा त्याच्या फ्लाईटची, ड्रिफ्टची आणि लूपची होते.

त्याला परिपूर्ण ऑफ स्पिनर होण्यासाठी काऊंटी क्रिकेट खेळणंही पथ्यावर पडलं. त्यामुळे तो फिरकी बॉलिंगचा पाया असलेल्या गोष्टींजवळ गेला. त्यात त्याने महारत मिळवली. याचा फायदा त्याला टी-२० मधेही होताना दिसतोय. आपण ते गेल्या काही आयपीएल हंगामात बघतोय. विशेष म्हणजे हरभजन आणि अश्विन एकाच टी २० च्या उथळ फिरकीच्या दुर्दैवी फेऱ्यात अडकले. अश्विन त्यातून योग्यवेळी बाहेर पडला. हरभजनच्या बाबतीत मात्रं तसं झालं नाही. त्यामुळे वय बाजूने असूनही हरभजन टीम इंडियातून बाहेर फेकला गेला.

हेही वाचाः भाजप-शिवसेनेकडून युती तोडण्याची अधिकृत घोषणा टाळण्यामागची चार कारणं

कुंबळेला मागं टाकण्याचं आव्हान

अश्विनने घरच्या मैदानावर सर्वात जलद २५० विकेट घेत मुरलीधरनशी बरोबर साधलीय. असं असलं तरी त्याला भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर बनायचंय. अनिल कुंबळेला मागं टाकण्यासाठी बरेच कष्ट करावे लागणार आहेत. कुंबळेने १३२ टेस्टमधे ६१९ विकेट घेतल्यात. अश्विनच्या ६८ टेस्टमधे आतापर्यंत ३५७ विकेट झाल्यात.

अश्विनचा विकेट घेण्याचा वेग चांगला असला तरी आणि या वेगाने तो हरभजनच्या ४१६ विकेटचा रेकॉर्ड सहज पार करणार असला तरी वय आणि परिस्थिती त्याच्या बाजूने नाही. तो आता ३३ वर्षांचा आहे. म्हणजेच तो आता कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आलाय. 

टीम इंडियामधे अश्विनला नवोदित फिरकीपटूंच्या आव्हानालाही सामोरं जावं लागणार आहे. तसं आताच त्याला या तरण्याबांड फिरकीपटूंनी आव्हान दिलंय. यात प्रामुख्याने चायनामॅन बॉलर कुलदीप यादव आणि लेग स्पिनर यजुवेंद्र चहल यांचा समावेश आहे. तसंच जागतिक स्तरावर सध्यातरी मनगटी स्पिनर्सची चलती आहे. येत्या काळात याचा परिणाम टीम इंडियावरही पडणार यात शंकाच नाही.

अश्विनने भारतात सर्वात जलद २५० विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. आता येत्या काळात हा वेग कायम राहील याची शाश्वती नाही. आता भारतीय फास्ट बॉलर्सनी भारतात विकेट घेण्याचा सपाटा लावलाय. याचा परिणाम म्हणजे भारतातल्या खेळपट्ट्या फास्ट बॉलर्सना पोषक बनवल्या जाताहेत. त्यामुळे आता भारतात फास्ट बॉलर्सची विकेट घेण्याची सरासरी वाढेल. नाही म्हटलं तरी याचा परिणाम फिरकीपटूंवर होणारच. फास्ट बॉलर्सनी जास्त विकेट काढल्यावर फिरकीसाठी उरणार तरी काय? या सर्व परिस्थितीत अनिल कुंबळेच्या रेकॉर्डला गाठणं तितकंस सोपं नाही.

हेही वाचाः 

कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी

सौरव गांगुली बीसीसीआयमधे दादागिरी करू शकेल?

अमोल मुझुमदारच्या वाट्याला आव्हानांशिवाय दुसरं काय?

सगळं संपलंय, असं वाटेल तेव्हा शाहबाज नदीमची ही गोष्ट वाचा

राष्ट्रपती राजवट हे राजकीय पक्षांचं नाही तर राज्यपालांचं अपयश!