अमेरिकेच्या ह्युस्टन शहरात अनिवासी भारतीयांशी संवाद साधण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हाऊडी मोदी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रम्प यांनी हजेरी लावली. एखादा परदेशी नेता अमेरिकेत कार्यक्रम घेतो. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना तिथे आमंत्रित करतो आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्पही ते आमंत्रण मोठ्या आनंदात स्वीकारतात, ही काही साधारण गोष्ट नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सात दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेलेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर हे पंतप्रधानांसोबत आहेत. मोदी सरकार २.० सत्तेत आल्यावर मोदी पहिल्यांदाच एवढ्या दीर्घ परराष्ट्र दौऱ्यावर गेलेत. टेक्सास प्रांतातल्या ह्युस्टन इथे झालेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमाने पंतप्रधानांच्या दौऱ्याची दणक्यात सुरवात झालीय.
मोदींनी ५० मिनिटं हिंदीत भाषण केलं. या भाषणात त्यांनी काश्मीरपासून ते हागणदारीमुक्त भारत यासारख्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या मुद्द्यांना हात घातला. काश्मीर प्रश्नावर हस्तक्षेपासाठी आपण तयार असल्याचं सांगून ट्रम्प यांनी गोंधळ निर्माण केला होता. मोदींनी संधी हेरत ट्रम्पसमोरच भारताची काश्मीरवरची भूमिका स्पष्ट केली.
एवढंच नाही तर मोदींनी इलेक्शन मोडमधे असलेल्या ट्रम्प यांच्यासाठी ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ असा नाराही लावला. अबकी बार मोदी सरकारच्या धर्तीवर मोदींनी अमेरिकेच्या धरतीवर अबकी बार ट्रम्प सरकारचा नारा दिला. समोर बसलेल्या हजारो अनिवासी या नाऱ्याला भारतीयांना टाळ्यांच्या कडकडाटात अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्यामुळे मोदींच्या भाषणाचा, हाऊडी मोदी कार्यक्रमाचा भारतावर काय परिणाम होणार आहे, याची चर्चा सुरू झालीय.
हेही वाचाः आजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय?
अमेरिकेत जवळपास ४० लाख भारतीय राहतात. धंदापाणी करतात. त्यातून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतात. कॅलिफोर्नियातल्या सिलिकॉन वॅलीमधे तर भारतीय आयटी प्रोफेशनल्सचा मोठा दबदबा आहे. म्हणजेच आपण सिलिकॉन वॅली ही अनिवासी भारतीयांची म्हणजे भारतीय अमेरिकन समुदायाच्या राजधानीचं शहर आहे. पण पंतप्रधानांनी हाऊडी मोदी कार्यक्रमासाठी ह्युस्टनची निवड का केली? हाऊडी मोदी म्हणजेच कसे आहेत मोदी? मोदी कसे आहेत, ते सांगण्याचा हा कार्यक्रम होता.
लल्लनटॉप वेबपोर्टलचे संपादक सौरभ द्विवेदी आपल्या एका कार्यक्रमात सांगतात, ‘ह्युस्टन हे टेक्सास राज्याच्या राजधानीचं शहर आहे. टेक्सासला जगाची ऑईल कॅपिटल म्हणजेच तेलाची राजधानी म्हणून ओळखलं जातं. सध्या भारत आयात करत असलेल्या तेलापैकी केवळ ५ टक्के तेल अमेरिकेतून येतंय. पण येत्या काळात अमेरिकेतून आयात होणाऱ्या तेलाचं प्रमाण वाढू शकतं. कारण पंतप्रधानांच्या उपस्थितीत त्यासाठीच्या बोलणी सध्या सुरू आहेत.’
ते पुढे सांगतात, ‘अमेरिकेत राहत असलेल्या भारतीय वंशांच्या लोकांपैकी जवळपास दीडेक लाख लोक हे ह्युस्टनच्या आजूबाजूला राहतात. जगभरातले भारतीय वंशाचे लोक ही आपली सॉफ्ट पॉवर आहे, हे गृहित धरून भारतात आपलं परराष्ट्र धोरण ठरवतंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेतले भारतीय वंशाचे लोक हे दुसऱ्यांच्या तुलनेत खूप ताकदवान आहेत. अमेरिकेतल्या राजकीय पक्षांना इलेक्शन फंडिग देणाऱ्यांत भारतीय आघाडीवर असतात. त्यामुळेच हाऊडी मोदीसाठी ह्युस्टनची निवड झाली.’
२००२ मधे गुजरात दंगल झाली. या दंगलीनंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेला जायचं होतं. पण अमेरिकी प्रशासनाने मोदींना विसा नाकारला. केंद्रात अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वातलं भाजपचं सरकार असतानाही मोदींना विसा मिळू शकला नाही.
काळाचं चक्र फिरलं आणि मोदी २०१४ मधे प्रचंड बहुमताने केंद्रात सत्तेवर आले. मग पाच वर्षांपूर्वीच्या सप्टेंबरमधेच मोदींनी न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन इथे भव्यदिव्य इवेंट घेतला. त्यावेळी अनिवासी भारतीयांसमोर भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत मोदींनी सभागृह दणाणून सोडलं होतं. हा हाऊडी मोदीचा हा भाग एक होता.
आता पाच वर्षांनी पुन्हा एकदा असाच इवेंट झाला. पण या इवेंटचा काळ आणि वेळ खूप महत्त्वाची आहे. भारताचे अमेरिकेसोबतचे व्यापारी संबंध ताणले गेलेत. गेल्या वर्षभरात तर दोन्ही देशांमधलं टेन्शन वाढलंय. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भाजपचं सरकार आल्यावर दोनेक दिवसांनीच ट्रम्प यांनी भारतीय मालावरचा कर वाढवून भारताला झटका दिला होता. दुसरीकडे काश्मीरवरून ट्रम्प उलटसुलट वक्तव्य करताहेत. अशावेळी हा कार्यक्रम होतोय.
हेही वाचाः विशेष दर्जा काढल्याने काश्मीरचा प्रश्न सुटला की अधिक गुंतागुंतीचा झाला?
अनिवासी भारतीयांशी संवाद साधण्यासाठीचा हा मोदींचा अमेरिकेतला तिसरा इवेंट आहे. याआधी २०१४ मधे न्यूयॉर्कमधे आणि नंतर २०१७ मधे सिलिकॉन वॅलीत असे कार्यक्रम झालेत. पण आतापर्यंत अशा कार्यक्रमात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे हाऊडी मोदी या कार्यक्रमाचं महत्त्व आपोआप वाढतं.
आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक परिमल माया सुधाकर सांगतात, ‘काश्मीरबद्दलच्या निर्णयावरून अमेरिकेतला एक गट भारतावर नाराज आहे. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि ट्रम्प एका स्टेजवर येणं याला खूप महत्त्व आहे. ट्रम्प आणि मोदी सोबत आल्याने अमेरिकेने भारताला वाळीत टाकलं नाही, ही गोष्ट स्पष्ट झालीय. नाहीतर जगभरात असं काही झालं की अमेरिकेतले सत्ताधीश नियंत्याच्या, नियंत्रकाच्या भूमिकेत येतात. ती गोष्ट या स्टेज शेअरिंगने निकालात निघालीय.’
परिमल यांच्या मते, ‘अमेरिकेसोबत भारताचे व्यापारावरून वाद सुरू आहेत. आता भारताने आपली एवढी मोठी ताकद दाखवल्यावर ट्रम्प प्रशासनाला भारताच्या हितसंबंधांना धक्का पोचेल असा कुठलाही निर्णय घेताना चारदा विचार करावा लागेल.’
अमेरिकेत लाखोंच्या संख्येने भारतीय हे पारंपरिकदृष्ट्या डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक म्हणून ओळखले जातात. म्हणजेच बराक ओबामा, हिलरी क्लिंटन यांच्या पक्षाचे पाठीराखे. ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत. त्यांच्या पक्षाला भारतीयांतून पुरेसा पाठिंबा मिळत नाही. एका सर्वेनुसार, २०१५ मधे झालेल्या निवडणुकीत जवळपास ८५ टक्के भारतीय हे डेमोक्रॅटिक पक्षाच्या तर १५ टक्के भारतीय रिपब्लिकनच्या सोबत होते, असं इंग्रजी वेबपोर्टल द क्विंटच्या स्टोरीत म्हटलंय.
येत्या १४ महिन्यांत अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होतेय. ट्रम्प यांना पुन्हा निवडून यायचंय. ट्रम्प यांचं सारं काही नीट सुरू आहे. तरीही छोट्याछोट्या अल्पसंख्यांक समाजांना सोबत घेण्याची स्ट्रॅटेजी त्यांनी अवलंबलीय. कारण गेल्या चार वर्षांत ट्रम्प यांच्या कारभारामुळे अल्पसंख्यांक समाज तसंच अनिवासी नागरिकांमधे असुरक्षिततेची भावना निर्माण झालीय. ही गोष्ट ट्रम्प यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर परवडणारी नाही. मोदींनी ट्रम्प यांची हीच गरज ओळखून अब की बार ट्रम्प सरकार हा नारा दिलाय. पण यावरून मोदींवर खूप टीका होतेय.
अबकी बार ट्रम्प सरकार असं म्हटल्याने मोदींवर टीका होत असली तरी आपला मेसेज पोचवण्यात मोदींना यश आलंय, असं द क्विंटचे एडिटोरियल डायरेक्टर संजय पुगलिया सांगतात. पुगलिया यांनी द क्विंटच्या पॉडकास्ट बुलेटिनमधे हाऊडी मोदी इवेंटचं विश्लेषण केलंय.
पुगलिया यांच्या मते, 'आपला मेसेज अधिक तीव्रतेने पोचवण्यासाठी मोदी खूप ताकद लावतात. वाद व्हावा, चर्चा व्हावी, म्हणजे आपला मेसेज अधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत जाईल, याची काळजी ते घेतात. मोदी, ट्रम्प दोघंही आपापल्या देशातल्या नागरिकांना संबोधित करत होते. त्यांच्याशी संवाद साधत होतो. हाच त्यांच्यासमोरचा टार्गेटेड ऑडियन्स होता. आणि त्यात त्यांना चांगलं यश आलंय.'
हेही वाचाः ट्रम्पतात्यांचा दोस्त नरेंद्र मोदींना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी झटका
कुठल्याही सार्वभौम, लोकशाही देशातल्या निवडणुकांमधे, राजकारणात दुसऱ्या देशाने हस्तक्षेप करून नये, हे जागतिक परराष्ट्र धोरणाचं मुलभूत तत्त्व आहे. हे तत्त्व तितक्याच कसोशीने जवळपास सगळ्याच देशांनी पाळलंय. पण हे तत्त्व पाळण्याचंही स्वतःचं असं राजकारण आहे. म्हणजे असं, की थेट हस्तक्षेप न करता आपल्याला हव्या असलेल्या सरकारसाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणं, त्यासाठी फंडिग मिळवून देणं यासारखे उपाय योजले जातात.
आपण बऱ्याचदा ऐकतो, की देशाच्या कारभारात परकीय शक्तींचा हस्तक्षेप होतोय. पण हा हस्तक्षेप म्हणजे काही उघड उघड प्रचारसभा नसते. नारेबाजी नसते. जे करायचं ते उजव्या हाताचं डाव्या हाताला कळू द्यायचं नसतं. पण मोदींनी हे तत्त्वच मोडीत काढण्याचा पायंडा पाडलाय, असं आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक परिमल माया सुधाकर यांना वाटतं.
परिमल सांगतात, ‘कुठल्याही लोकशाही देशात एखाद्याच्या बाजूने प्रचार करणं चुकीचं आहे. आणि ट्रम्प ही निवडणूक हरले तर भारतासाठी खूप मोठी डोकेदुखी ठरेल. ट्रम्प जिंकले तरीही येत्या काळात भारतासाठी नव्या अडचणी निर्माण होऊ शकतात. तिथल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांनी संसदेत काश्मीरवर एखादा प्रस्ताव मांडला, त्याच्यावर निव्वळ चर्चा जरी घडवून आणली तरी ती गोष्ट भारतासाठी खूप अडचणींची ठरू शकते. आणि मोदींनी अबकी बार ट्रम्प सरकार हा नारा देऊन त्या अडचणींना मोकळी वाट करून दिलीय.’
‘काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यावर तर भारताने खूप गांभीर्याने पावलं उचलणं गरजेचं आहे. असं असताना मोदींनी थेट अब की बार ट्रम्प सरकारचा नारा दिलाय. हाऊडी मोदीला सुरवातीपासूनच मोदी आणि ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराचा इवेंट असं स्वरूप आलं. हे आपल्याला टाळता आलं असतं. पण जगभरातच हा नवा ट्रेंड तयार होतोय,’ असं परिमल सांगतात.
‘इस्त्रायलमधे जयपराजयाचं गणित ठरवण्यात रशियन ज्यू निर्णायक भूमिकेत आहेत. या ज्यूंना आपल्याकडे खेचण्यासाठी पंतप्रधान बेंझामिन नेत्यानाहू यांनीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना इस्त्रायलमधे बोलावलं होतं. एवढंच नाही तर नेत्यानाहू यांनी आपल्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचे फोटोही आपल्या बॅनरवर छापले होते. पण निवडणुकीचे जे सुरवातीचे कल येताहेत त्यात नेत्यानाहू पिछाडीवर आहेत. म्हणजे नेत्यानाहूंचा पराभव झालाय.’
हेही वाचाः ट्रम्पतात्यांनी भारतासोबत खोटारडेपणा का केला?
ट्रम्प हे एकीकडे मोदी यांच्यासोबत स्टेज शेअर करून अनिवासी भारतीयांना जवळ करण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे ते पाकिस्तानलाही गोंजारताहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या या वागण्याचा नेमका अर्थ काढणं खूप गुंतागुंतीच झालंय. पण ट्रम्प यांना ही कसरत करावीच लागणार आहे, असं परिमल यांना वाटतं.
ते म्हणतात, ‘अमेरिकेत एक मोठा गट आहे, जो काश्मीरच्या मुद्द्यावरून चिंतेत आहे. दुसरीकडे अमेरिकेला पाकिस्तानला नाराज करणंही चालणार आहे. अमेरिकेला येत्या काळात अफगाणिस्तानातून आपलं सैन्य मायदेशी न्यायचं आहे. त्यासाठी पाकिस्तानची मदत हवीय. अशावेळी ते पाकिस्तानला दुखावू शकत नाही. म्हणून ट्रम्प यांच्याकडून सध्या दोन्ही बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही ट्रम्प यांच्यासाठी तारेवरची कसरतच आहे.’
काश्मीर प्रश्न आणि व्यापारी संबंध अशा दुहेरी पातळीवर अमेरिका आणि भारत यांचे संबंध ताणले गेलेत. काश्मीरच्या प्रश्नावर सध्यातरी ठोस तोडगा दिसत नाही. पण पंतप्रधान मोदी अमेरिकेत असेपर्यंत व्यापारी संबंधांबाबत काहीतरी ठोस घोषणा झाली, तर ट्रम्प यांचं मोदींसोबत स्टेज शेअर करणं सफल झालं असं आपण म्हणू शकतो.
हेही वाचाः
पंडित नेहरूंनी ३७० कलम आधीच कमजोर कसं केलं होतं?
पंतप्रधानांच्या नाशिकमधल्या भाषणाचे ५ बिटविन द लाईन्स अर्थ
नरेंद्र मोदींच्या मॅन वर्सेस वाईल्डच्या ट्रेलरपेक्षा मिम्स जास्त इंटरेस्टिंग
वसईचे फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, कारण
बायकांचा अकलेशी संबंध काय, असं म्हणाऱ्यांना बबिता ताडेंची चपराक