माहितीचं डिजिटल भांडार असलेल्या विकिपीडियाचा बड्डे!

१५ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


कुठल्याही विषयावरची बेसिक माहिती हवी असेल तर आपली वर्चुअल पावलं विकिपीडियाकडे वळतात. आपल्या या लाडक्या विकिपीडियाचा आज बड्डे! विकिपीडिया विशीत प्रवेश करतोय. विकिपीडिया आता विशीत प्रवेश करत असलं तरी २००० साली शून्यातून याची सुरवात झाली. अनेक अडचणींवर मात करत विकिपीडिया आज आपल्या जगण्याचा महत्त्वाचा भाग झालंय.

कसलीही माहिती हवी असेल तर आपल्याकडे आता एक सोप्पा मार्ग उपलब्ध झालाय. गुगलवर आपल्याला हव्या असलेल्या माहितीचा की वर्ड सर्च केला की पहिला पर्याय येतो तो विकिपीडियाचा. विकिपीडियावर सगळ्या गोष्टींची बेसिक पण डिटेल माहिती उपलब्ध असते. आणि विशेष म्हणजे ही माहिती मोफत आणि सर्वांसाठी खुली असते. ही सगळी माहिती 'ओपन सोर्स लायसन्स'प्रमाणे उपयोगात आणली जाते. त्यामुळेच विकिपीडियाला एनसायक्लोपीडिया म्हणजेच ज्ञानकोश म्हणतात.

आज या ज्ञानकोशाचा वाढदिवस आहे असं म्हणता येईल. १५ जानेवारी २००१ ला विकिपीडियाचा जन्म झाला. आज या वेबसाईटवर इंग्रजी भाषेत ५० लाखांपेक्षा जास्त लेख आहेत. इतकंच नाही तर जगभरातल्या ३०० हून अधिक भाषांमधली माहिती विकिपीडियावर उपलब्ध आहे.

विकिपीडिया नेमकं आहे काय?

विकिपीडिया हा ऑनलाईन एनसायक्लोपीडिया अर्थात ज्ञानकोश आहे. इंटरनेटच्या जमान्यात आपल्याला बरीच माहिती तात्काळ मिळते ती विकिपीडियामुळेच. यावर अफाट माहिती उपलब्ध असते. ही माहिती कुणीही सामान्य माणूस लिहू शकतो. आपल्या दिवसातला ठराविक वेळ बाजुला काढून एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला असणारी माहिती या साईटवर लिहिली जाऊ शकते. तसंच आवश्यकतेनुसार त्यात बदलही करता येतात. अशी माहिती लिहिणाऱ्यांना विकिपेडियन असं म्हटलं जातं.

या साईटवर रजिस्टर केलं असेल तर आपल्याला आपला लेख लिहून पब्लिशही करता येतो. विकिपीडियात अधिकाधिक बदल कसे करता येतील याचा प्रयत्न आजकाल होताना दिसतोय. लिहिलेल्या सगळ्या लेखांची नोंद विकिपीडिया ठेवतं. लेखांमधे बदल होत असताना ते बदलही रेकॉर्ड केले जातात.

साईटचं विकी हे नाव एका सर्वर प्रोग्रॅममधून आलंय. विकी हा शब्द सुरवातीला एका कॉम्प्युटर प्रोग्रॅममधे वापरला गेला होता. १९९५ मधे वार्ड कॅनिंगहॅम यांच्यामुळे तो प्रचारात आला. त्यावेळेस ‘विकी विकी वेब डॉट विकी’ हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं. विकी म्हणजे एक अशी वेबसाईट ज्यात वेब ब्राऊजरचा वापर करून कोणताही कंटेंट ऍड करता येईल किंवा डिलिट आणि पुन्हा रिवाईज करता येईल.

हेही वाचा : २०१९ चा निरोपः आपला मोबाईल कसा बदलला?

शुन्यातून उभारला विकिपीडिया

विकिपीडियाचे दोन संस्थापक आहेत. एक लॅरी सेंगर आणि दुसरे जिमी वेल्स. लॅरी सेंगर विकिपीडियाचे सहसंस्थापक आणि अमेरिकन इंटरनेट प्रोजेक्ट डेवलपर म्हणूनही काम करतात. तर जिमी वेल्स अमेरिकन इंटरनेट आंत्रप्रेनॉर म्हणून वेगळी भूमिकाही बजावतायत.

लॅरी लेंगर यांचा जन्म वॉशिंग्टनमधे झाला. ‘अमेरिकन इंटरनेट प्रोजेक्ट डेवलपर सिटीजेंडियम’चे ते संस्थापक आहेत. त्यांचं बालपण अलास्कात गेलं. आपल्या आवडीच्या फिलॉसॉफीत बीए केलं. २००० मधे ओहियो स्टेट युनिवर्सिटीतून त्यांनी फिलॉसॉफीमधे डॉक्टरेट घेतली.

जिमी वेल्स यांचं पूर्ण नाव जिमी डोनाल वेल्स. त्यांना जिम्बो असं म्हटलं जायचं. त्यांचा जन्म १९६६ मधे अल्बामा या भागात झाला. जिमी यांनी ऑबर्न आणि अल्बामा महाविद्यालयातून अर्थशास्त्रात मास्टर्स केलं. शिक्षण पूर्ण करत असताना ते कॉलेजमधे शिकवायला जायचे. जॉबसाठी डॉक्टरेटचं शिक्षण थांबवलं. त्यानंतर रिसर्च डायरेक्टर म्हणून शिकागोतल्या एका फर्ममधे काम केलं.

याच काळात या दोन मित्रांनी एक वेब पोर्टल तयार केलं. त्यासाठी फ्री एनसायक्लोपीडिया, न्यूपेडिया यांनी फंडिंग केलं आणि १५ जानेवारी २००१ ला लॅरी लेंगर आणि जिमी वेल्स यांनी विकिपीडिया हे पोर्टल लॉन्च केलं. आणि एका नव्या माहितीच्या साठ्याचा उदय झाला. त्यालाच आपण विकिपीडिया म्हणतो.

अनंत अडचणींचा सामना

विकिपीडिया हा शब्द विकी आणि एनसायक्लोपीडिया यांनी मिळून बनलाय. इथं केवळ इंग्रजीत नाही तर इतर अनेक लोकल भाषांमधे माहितीचा साठा उपलब्ध होतो. वेगवेगळ्या भाषांमधे लेख लिहिता येतात. अमेरिकेतल्या फ्लोरिडामधल्या टम्पा इथं विकिपीडियाचं मुख्य कार्यालय आहे. एम्सटर्डम आणि सियोल या ठिकाणीही काही सर्वर आहेत.

विकिपीडियाची सुरवात ही न्यूपेडियाच्या पार्श्वभूमीवर झालेली होती. त्यात अडचणी आल्या. ऑनलाईन एनसायक्लोपीडिया असलेल्या न्यूपेडियाला सपोर्ट म्हणून विकिपीडिया पुढे आला. पण पुढच्या काळात सगळ्यात लोकप्रिय वेबसाईट म्हणून ती विकिपीडिया प्रकाशझोतात आली. २५ सप्टेंबर २००१ पर्यंत विकिपीडियावर १३,००० लेख होते. २००२  मधे न्युपिडियाचे सर्व लेख विकिपीडियामधे बदलले.

हेही वाचा : जागतिक पुरुष दिन विशेषः लैंगिकतेला आधार बदलत्या माध्यमांचा

स्थानिक भाषांमधूनही मिळते माहिती

विकिपीडिया हे इंटरनेटवरच आतापर्यंतच सगळ्यात मोठं डेटा पोर्टल आहे. लाखो लेख त्यावर आहेत. त्यामुळे छोट्यातली छोटी माहिती इथं सहज उपलब्ध होते. जगभरातल्या सगळ्या महत्वाच्या भाषांसोबत प्रादेशिक भाषांमधेही माहिती मिळते. इंटरनेटचा वापर करणाऱ्या व्यक्ती आपापल्या लोकल भाषांमधे माहिती मिळवत असतात. त्यामुळे विकिपीडिया हे सहज सोपं माध्यम आहे.

विकिपीडियाचा वापर करायचा तर त्यासाठी मोठा अडसर नसतो. इंटरनेटचा वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एका क्लिकवर माहिती मिळवता येते. आपल्याकडे कोणती माहिती असेल तर तीही आपण शेअर करू शकतो.

विकिपीडियावर एक स्वतःच पेज तयार करून आपण आपला लेख पब्लिश करू शकतो. आपण लिहिलेल्या एखाद्या लेखात काही बदल करायचा असेल तसंच त्यात काही नवी भर घालायची असेल तर ते करण्याचा पर्यायही यात उपलब्ध आहे.

विकिपीडियाला अनेक भावंडं आहेत

२००३ मधे विकिपीडियाला आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी विकिमीडिया फाऊंडेशन अस्तित्वात आलं. विकिपीडियाचं हे फाऊंडेशन चालवतं. विकिपीडियासारखेच अनेक प्रोजेक्ट या माध्यमातून चालवले जातात. विक्शनरी हा ऑनलाईन शब्दकोश, विकीबुक्स, विकीहाऊ असे अनेक उपक्रम विकिपीडियानं नंतरच्या काळात चालू केले. हे उपक्रम म्हणजे विकिपीडीयाची भावंडंच आहेत.

कुठल्याही भाषेतल्या कुठल्याही शब्दांचं इंग्रजी भाषांतर पुरवणं हा विक्शनरीचा उद्देश आहे. विक्शनरीतून जगभरातल्या ४००० भाषांमधल्या शब्दांना इंग्रजीत ट्रान्सलेट करता येऊ शकतात. विकीबुक्समधे फ्री कंटेंट आणि पुस्तकांचा समावेश असतो.

वेगवेगळे कोट्स, सुविचार मिळवण्याचं एक माध्यम म्हणजे विकीकोट. तर अभ्यास साहित्यासाठी विकीवर्सिटी तसंच मेटा विकी नावानं इतर प्रोजेक्टशी कॉर्डिनेट करणार एक माध्यमही आहे. असे अनेक ओपन कंटेंट असलेले प्रोजेक्ट विकिमीडिया फाऊंडेशनद्वारे चालवले जातात.

विकिपीडियाची विश्वासार्ह आहे तरीही

एखादा कंटेंट तयार करायचा असेल किंवा कोणत्याही विषयावर संशोधन करायचं असेल तर हे माध्यम अधिक महत्वाचं ठरत. विद्यार्थ्यांना तर याचा अधिकच फायदा झालाय. विकिपीडियामधे कोणतीही माहिती सर्च केल्यावर त्या संबंधित लेखाखाली आपल्याला आकडेवारी आणि इतरत्र गोष्टींसाठी संदर्भसुचीही येते. मिळालेल्या संदर्भांची आपण सतत्या पडताळून घेऊ शकतो.

ऑनलाईन एनसायक्लोपीडियाच्या तुलनेत ही माहिती मात्र कमी विश्वसनीय मानली जाते. इंटरनेटवर जर विकिपीडियावरच्या माहितीबद्दल सर्च केलं तर गुगलवर आपल्याला अनेक लेख, ब्लॉग पोस्ट, विडिओ मिळतात. विकिपीडियाच्या विश्वासार्हतेबद्दल यात वेगवेगळी माहिती मिळते. विकिपीडियावरही यासंदर्भात अनेक आर्टिकल मिळतील. त्यामुळे डोळे झाकून यावर विश्वास ठेवू नये असं विकिपीडिया स्वतःच आपल्याला सुचवतं.

हेही वाचा : 

फाईव जीचा पाळणा कोण हलवणार?

ड्रायवरलेस गाड्यांचा आपल्याला फायदा होणार की तोटा?

तर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ

स्मार्टफोनच्या जमान्यातही लोकांना फीचर फोनचा नाद का सोडवत नाही?