नेमेची येतो पावसाळा, तसं पावसाळ्यात मोठमोठ्या शहरातल्या इमारती कोसळतात. अगदी पत्त्याच्या डावासारख्या. या इमारती पत्त्याच्या डावातल्या असल्यासारखं आपल्याला वाटून जातं. लोकसंख्येचा खूप सारा ताण सोसत असलेल्या मुंबई आणि पुण्यात यंदाही आतापर्यंत पन्नासेक लोक इमारतीखाली सापडून मेलेत. शेकडो लोक जखमी झालेत. इमारती कोसळण्याचा हा सिलसिला सुरूच आहे. हा सिलसिला कसा थांबणार?
जून, जुलै या दोन महिन्यांमधे पावसामुळे पाणी भरण्याच्या बातम्यांसह आणखी काही बातम्या सातत्याने वाचायला, बघायला मिळतात. त्या म्हणजे मुंबई, पुण्यात इमारती कोसळण्याच्या, भिंत पडण्याच्या. कोसळलेल्या बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली अनेकांना नाहक जीव गमवावा लागला. कित्येकजण जखमी झाले. अशा घटना घडल्या की आपलं मन हेलावून जातं. का घडतं असं? का सरकार आधीच काही उपाययोजना करत नाही? असे प्रश्न आपल्या मनात येतात.
दरवर्षी पावसाळ्याच्या आधी मुंबई महापालिका धोकादायक इमारतींच्या याद्या जाहीर करते. यात इमारतीची रचना आणि झालेली झीज यानुसार विभागणी करून आकडे जाहिर करते. नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार मुंबईतल्या ४८५ इमारती अतिधोकदायक परिस्थितीत आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की, एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०१५ पासून १ हजार ८३० निवासी बांधकामं कोसळली. त्यात १ हजार ११९ लोकांना जीव गमवावा लागलाय.
घरं कोसळतात, धोकादायक इमारतींची यादी जाहिर होते, पालिका निधी काढते, आकडेवारी येते पण या इमारती काही कोसळायचं थांबत नाहीत. प्रश्न कायम राहतो. इंजिनियर बिरांची आचार्य यांनी आपल्या स्ट्रक्चर या ब्लॉगमधे यावर सविस्तर लिहिलीय. ते लिहितात, कोणतंही बांधकाम करण्यापूर्वी त्याचा एक आराखडा, प्लॅनिंग बनवलं जातं. ते प्लॅनिंग नेहमीच १०० वर्षं टिकेल या दृष्टीनेच बनवलं जातं. पण तो प्रकल्प पास होताहोता, तो बांधताना आणि शेवटी बनल्यावर त्यात बराच फरक पडतो. आणि त्या बांधकामाचं आयुष्यमान कमीकमी होत जातं.
गेल्या १५ ते २० वर्षांमधली बांधकामं साधारण ४० ते ५० वर्षं टिकतील एवढीतरी त्या बांधकामाची गुणवत्ता असते. पण प्लॅनमधे बदल का होतात? तर यात भ्रष्टाचार होतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे. अनेक बिल्डर पैसे खिशात घालण्यासाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरतात. आणि बांधकामाची तपासणी करणारे सरकारी अधिकारीसुद्धा यात सामील असतात.
भ्रष्टाचारामुळे बांधकाम कोसळण्याचं प्रमाण जास्त असल्याचं आचार्य लिहितात. आणि अक्षय कुमारनेही खट्टा मिठ्ठा सिनेमातून याचं गोष्टी दाखवल्यात. त्यामुळे हा प्रकार आता सगळ्यांनाच माहिती झालाय. हे ओपन सिक्रेट आहे. म्हणूनच तर सिनेमाला समाजाचा आरसा म्हणतात.
हेही वाचा: मुंबईचा श्वास असणारी खारफुटीची ५४ हजार झाडं बुलेट ट्रेनसाठी तोडणार
फक्त भ्रष्टाचार हेच एकमेव कारण नाही. तर अकुशल कामगार हेसुद्धा यासाठी जबाबदार असतात. बांधकामात सामील होणारे कामगार हे अनुभवाने आणि त्यांच्या वरिष्ठांकडून शिकतात. पण तरिही कंटाळा करून किंवा काम समजलं नसल्यास चुकीचं काम होतं. त्यामुळे इमारतीच्या रचनेत गडबड होते. आणि बांधकाम कमकुवत होतं किंवा इमारतीची झीज लवकर होते.
वारा आणि पाऊस यांचासुद्धा बांधकामांवर सुक्ष्म परिणाम होत असतो. कोणत्याही बांधकामात स्टील, लोखंड वापरलं जातं. सिमेंट व्यवस्थित लावलं नसेल किंवा बांधकामाला बरीच वर्ष झाल्यावर वारा आणि पावसाच्या हळूहळू होणाऱ्या परिणामाने त्याचा थर झिजतो. आणि पाणी आत शिरून बांधकामाचा मूळ ढाचा कमकुवत होऊ लागतो. कारण स्टीलमधे वजन उचलण्याची शक्ती कमी होते. विशेषत: चाळीच्या पत्र्याच्या घरात थेट लोखंडी चॅनलला थेट पाणी लागतं असल्यामुळे या घरांची लवकर झीज होते.
हेही वाचाः तर पूल बांधायची कामं लष्करावरच सोपवावी लागतील
ही सगळी कारणं आहेत ज्यामुळे बांधकाम कमकुवत होतं आणि अशा दुर्घटना घडतात. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण स्वत:. हो आपल्या चुकीमुळेसुद्धा अशा घटना होण्यासाठी पूरक ठरतात. आता हे कसं काय?
आपण काय करतो, उलट आपण तर आपल्या घराची किती काळजी घेतो. पण आपण सुशोभिकरण करण्यासाठी वेगवेगळे खिळे मारतो, , फोटो फ्रेम लावतो, झाडाच्या कुंड्या ठेवतो, एसी लावतो, खिडक्यांना लोखंडी जाळ्या लावतो. तसंच रिनोवेट करताना कुठेतरी लिकेज राहिलं असेल किंवा आधीच्याच लिकेजवर काम केलं नसतं. या सगळ्यांमुळे बांधकामाची झीज होते.
आपण आपल्या घरात राहायला जातो त्यावेळी मिळालेल्या जागेनुसार त्या घराची क्षमता ठरलेली असते. विशिष्ट किलो सामानापेक्षा आपण जास्त सामान ठेवलं की बांधकामावर परिणाम होण्यास सुरवात होते. अगदी एखादी कुंडी किंवा खिळासुद्धा त्या भिंतीची झीज करण्यासाठी पुष्कळ असतो. कधी कधी आपण गॅलरी आत घेऊन जागा मोठी करतो पण या सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या बांधकामावर परिणाम करतात. गॅलरी आणि आतल्या बांधकामाच्या गुणवत्ता आणि क्षमतेत फरक असतो.
विशेषत: चाळींमधे एकावर एक मजले बनवले जातात. पण मूळ बांधकाम काही नव्याने बांधत नाहीत. म्हणजे मूळ बांधकामाची क्षमताच तेवढी नसते. जिथे ते घर ४० वर्ष जगणार असतं. त्या घराची क्षमता थेट ५० टक्क्यांनी कमी होते, असं सिविल इंजिनियर शशांक पै यांनी सांगितलं. मग आपलं घर धोकादायक आहे की नाही हे कसं ओळखायचं? आपण जास्त सामान ठेवलंय की नाही असे ओळखावं? आणि काय उपाययोजना करायच्या?
हेही वाचा: आज रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना!
आपण आपल्या सोसायटीत एका इंजिनियरला बोलावून इमारतीचं आयुष्य तपासू शकतो. किंवा आपण हे फक्त आपल्या घरासाठीही करू शकतो. तसंच घराची एखादी बाजू कमकुवत झाली तर लोखंडी चॅनलने सपोर्ट देण्यासाठी काही उपाययोजना करता येतील. पण हे उपाय करताना इंजिनियरचा सल्ला घेणं कधीही चांगलं ठरेल.
तसंच पालिका धोकादायक बांधकामांच्या याद्या जाहीर करण्याबरोबरच, दरवर्षी बजेटमधे निधी जाहिर करते. यंदाच्या बजेटमधे २०१.४ कोटींचा निधी देण्यात आलाय. म्हणजेच मुंबई पालिकेच्या एकूण भांडवली खर्चाच्या २%. पालिकेकडे संपूर्ण शहराचं सर्वेक्षण असतं. त्यानुसार अतिधोकादायक बांधकाम पुन्हा बांधणं आणि ज्या इमारतींची झीज होतेय, तिथे आधीच उपाय केल्यास ते बांधकाम धोकादायक होणारच नाही, असा उपाय आचार्य यांनी सुचवलाय.
त्याचबरोबर महापालिकेने अग्निशमन केंद्रांची संख्या वाढवली पाहिजे. कारण आयआयटी मुंबईच्या अभ्यासानुसार दर ९३ हजार लोकांमागे किमान एक अग्निशमन केंद्र असावं. पण आपल्याकडे विशेषत: मुंबईत दर १३ लाख लोकांच्या मागे एक केंद्र आहे. अरे भाऊ, न्यूयॉर्कसारख्या शहरात तर दर ११ हजारांच्या मागे एक केंद्र आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारची आपत्कालिन परिस्थिती लगेच आटोक्यात आणता येईल.
हेही वाचाः
चांद्रयान २ : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारं पहिलं अंतराळयान
५० वर्षांआधीच्या बँक राष्ट्रीयीकरणाने घातला मोदी सरकारच्या जनधन योजनेचा पाया