काँग्रेस पक्ष इतका का गोंधळलाय?

०३ मे २०२१

वाचन वेळ : ४ मिनिटं


देशाला प्रबळ विरोधी पक्ष हवा आहे. तो देण्याची क्षमता या निवडणुकांनी तपासून पाहिली. काँग्रेस त्यात अपयशी ठरलाय. एका हाताच्या बोटांइतकी म्हणजेच पाच राज्यांतल्या काँग्रेस आघाडीची सत्ता वगळता सगळी राज्य भाजप आणि प्रादेशिक पक्षांच्या ताब्यात गेलीत. येत्या विधानसभा निवडणुकांमधेही याहून वेगळं काही चित्र राहण्याची शक्यता फार कमीच आहे.

सामान्य जनतेला काँग्रेस हवी आहे; पण काँग्रेस नेतृत्वाला हा जनाधार हवा आहे का? असा प्रश्न पाच राज्यांच्या निवडणूक निकालाने अधोरेखित केलाय. लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली असताना, विधानसभा निवडणुकांचा कल आणि कौल त्यासाठीची दिशा दाखवून देत असताना काँग्रेसच्या कामगिरीचं मूल्यमापन निराशाजनक आणि दिशाहीन असंच करावं लागतं.

१३६ वर्ष जुन्या, अनुभवी आणि देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असणार्‍या पक्षाची ही अवस्था देशासमोर पर्यायी राजकारण उभं राहणार की नाही, विरोधी सक्षम राजकारणाची, जगण्या-मरण्याच्या लढाईत अडकलेल्या सामान्य माणसाच्या विरोधी आवाजाला धार देण्याची जबाबदारी कोण घेणार, यासारखे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करणारी निश्चितच आहे.

अंतर्गत हेव्यादाव्यांचं काय?

काँग्रेसमधे नेतृत्वाचा छुपा वाद अजूनही संपलेला नाही, तो धुमसतोच आहे. दुसर्‍या फळीतले अनेक प्रमुख नेते भाजपचे संभाव्य राजकारण आणि त्याच्या यशाकडे डोळे लावून त्यात आपली जागा शोधण्याच्या मागे लागलेत.

भारतीय जनता पक्षाने आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय राजकाणात साम-दाम-दंड-भेद नीतीने उभं केलेलं आव्हान मोडता येणं कठीण झालंय, ते अशा संधिसाधू नेत्यांमुळेच.

सोनिया-राहुल-प्रियांकांपलीकडे काँग्रेस नेतृत्वाची यादी पुढे सरकत नसल्याने पन्नास वर्षांहून अधिक काळ देशाचं आणि राज्यांचं नेतृत्व करणार्‍या पक्षाची ही दयनीय अवस्था काळानुसार न बदलल्यामुळे झालीय. यामुळेच गेल्या ७२ वर्षांत सर्वात खालच्या स्तरावर पक्ष गेल्याची टीका गुलाम नबी आझाद यांच्यासारखा नेता करतो.

२३ नेते सोनिया गांधींना पत्र पाठवून नेतृत्वावर टीका करतात. काँग्रेसचा प्रत्यक्ष मैदानावरचा संघटनात्मक प्रभाव कमी झाल्याचा आरोप पी. चिदंबरम यांच्यासारखा नेता करतो, काँग्रेसला पर्याय म्हणून बघितलं जात नाही, असं ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणतात.

हेही वाचा: दाढी वाढवून गुरुदेव होता येत नाही आणि खादी वापरून महात्मा

मुद्दे बाजूनं तरीही

तमिळनाडू, आसाम, केरळ आणि आसाम या राज्यांत काँग्रेसने अस्तित्व राखलं असलं, तरी निवडणुका जिंकायची प्रबळ इच्छाशक्ती, त्यासाठी व्यूहरचना आणि रणनीती या सार्‍याच गोष्टींचा मोठा अभाव निवडणुकांमधे दिसून आला. या सर्वच राज्यांमधे सत्तेचा अनुभव पाठीशी असतानाही त्यांना काहीच चमकदार करता आलं नाही.

पक्षाच्या मतांची टक्केवारी कमालीची घसरतेय. नोटा बंदी, कलम ३७०, एनआरसी, सीएए, अयोध्या, कृषी कायदे यासारख्या राष्ट्रीय मुद्द्यांवर काँग्रेस भूमिका घेऊ शकला नाही. केवळ सत्ता मागायला आला असाल, तर आमच्याकडे येऊ नका, असा थेट इशारा या पाच राज्यांतल्या जनतेने काँग्रेसला दिलाय.

हाच इशारा काँग्रेस पक्षासाठी निकालाचा अर्थ आहे. याच मुद्द्यांवर आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, पुद्दुचेरी या राज्यांमधे काँग्रेसला संधी होती. भाजपच्या विरोधात वातावरण तयार करता आलं असतं. पण नेहमीप्रमाणे काँग्रेस सुस्त राहिली. त्याचा फायदा इतर पक्षांनी घेतला. काँग्रेसने संधी गमावली.

वातावरण नसताना भाजपला संधी

आसाम, केरळ या राज्यांमधे नेतृत्वाचा आणि रणनीतीचा अभाव दिसला. आसाम गण परिषदेसारख्या पक्षाला आणि काँग्रेसला गुंडाळून ठेवत भाजपने हे राज्य राखलं. २००१ ते २०१६ अशी पंधरा वर्ष सत्ता असताना, राज्याच्या प्रश्नांची जाण असताना, जनमत भाजपसाठी फारसं पोषक नसताना काँग्रेसला तिथं मुसंडी मारता आली नाही.

१२६ पैकी काँग्रेस आघाडीला ४९ जागा मिळवत पक्षाने विरोधी बाकावर बसायचं ठरवलं. भाजपला केवळ २६ जागा त्यापेक्षा अधिक मिळाल्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशानंतर भाजपला रोखणं कठीण झालं. एकेकाळच्या सत्ताधारी आसाम गण परिषदेला सोबत घेत भाजपने आसामी राजकारण ताब्यात घेतलंय.

हेही वाचा: आंदोलन मोडण्याचे मोडीत निघालेले हाथखंडे मोदी सरकारला का हवेत?

इथं आघाड्यांमुळेच काँग्रेस तगली

तमिळनाडूत अण्णा द्रमुकच्या मदतीने भाजप मोठं आव्हान निर्माण करेल असं चित्र होतं, ते द्रमुक या पारंपरिक विरोधकाने काँग्रेसला सोबत घेत खोटं ठरवलं. या यशात काँग्रेसचा वाटा किती शोधावा लागेल.

हीच स्थिती केरळममधेही. डाव्या आघाडीला तोंड देणं काँग्रेस नेतृत्वाखालच्या आघाडीला जमलं नाही. पुद्दुचेरीत भाजपने गेल्या चार महिन्यांत केलेली राजकीय खेळी त्या पक्षाच्या पथ्यावर पडली. नाहीतर हे राज्य या पक्षाला मिळवता आलं नसतं.

काँग्रेसची वाताहत कायम

देशाला प्रबळ विरोधी पक्ष हवा आहे. तो देण्याची क्षमता या निवडणुकांनी तपासून पाहिली. काँग्रेस त्यात अपयशी ठरला आहे. हाताच्या बोटावरच्या पाच राज्यांतल्या काँग्रेस आघाडीची सत्ता वगळता सगळी राज्य भाजप आणि प्रादेशिक पक्षांच्या ताब्यात गेलीत.

येत्या विधानसभा निवडणुकांमधेही याहून काही वेगळं चित्र राहण्याची शक्यता कमीच आहे. काँग्रेस पक्ष पुरता गोंधळलेला आहे. त्यामुळे या गोंधळलेल्या राष्ट्रीय पक्षाची आताच्या विधानसभा निवडणुकीत झालेली ही वाताहत झाली आहे, इतकंच म्हणायला हवं.

हेही वाचा: 

नोकरीच्या योग्यतेचे नाहीत भारतातले पदवीधर तरुण

महाविकासआघाडीचं नवं सरकार पाच वर्षं चालेल की नाही?

सरकारला धडकी भरवणारं महुआ मोईत्रा यांचं वायरल भाषण

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग १