नरेंद्र मोदींना खलनायक करुन हाती काहीच लागणार नाही

२३ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेचं कौतुक केलंय. ते करताना त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केलाय. तसंच नरेंद्र मोदींची टिंगलटवाळी करुन त्यांच्याशी सामना करता येणार नाही हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय.

राजकीय विश्लेषक कपिल सतीश कोमिरेड्डी ‘मालेवोलेंट रिपब्लिक: ए शॉर्ट हिस्ट्री ऑफ द न्यू इंडिया’ या पुस्तकाचं प्रकाशन जयराम रमेश यांच्या हस्ते झालं. या प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्यांनी मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेचं कौतुक केलं. जयराम रमेश हे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. तसंच काँग्रेस आणि बुद्धिजीवी वर्तुळात त्यांचं नाव आहे.

रमेश यांच्या या भाषणाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनीही रमेश यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय. सिंघवींनी आपल्या ट्विटमधे म्हटलं, 'मोदींना एखाद्या खलनायकासारखं ट्रीट करणं चुकीचं आहे, असं मी नेहमीच सांगत आलोय. ते केवळ पंतप्रधान आहेत म्हणून नाही तर अशी टीका करून विरोधक त्यांची मदतच करत आहेत.'

जयराम रमेश यांचं भाषण सध्या वायरल झालंय. या बुधवारच्या भाषणाच्या आज शुक्रवारी जवळपास सगळ्याच पेपरमधे बातम्या आल्यात. त्या बातम्यांवरून रमेश यांच्या भाषणाचा हा मुद्देसुद रिपोर्ट.

नरेंद्र मोदींचं काम ओळखा

उज्ज्वला योजनेचं कौतुक करताना रमेश यांनी दोन महत्त्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधलंय. काँग्रेसच्या वर्मावरही बोट ठेवलंय. ते म्हणतात, पंतप्रधान मोदी यांच्या सरकारचं मॉडेल हे पूर्णपणे नकारात्मक नाही. त्यांच्या कामाचं महत्त्व समजून घ्यायला हवं. प्रत्येकवेळी त्यांना खलनायक म्हणून उभं करुन काहीच साध्य होणार नाही.

सध्याच्या काळात आपण नरेंद्र मोदींच्या कामाचं स्वरुप ओळखायला हवं. २०१४ ते २०१९ या पाच वर्षात त्यांनी जे काम केलं त्याचं महत्त्व नेमकं समजलं तरच मोदी सत्तेवर येण्याचं कारण समजेल. सत्तेवर येण्यासाठी त्यांना ३० टक्के लोकांनी पाठिंबा दिलाय. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला जवळपास ३७.४ टक्के मतं मिळालीत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात मोदींच्या नेतृत्वातल्या एनडीएला ४५ टक्के मतं मिळाली आहेत. हे कसं शक्य झालं?

नरेंद्र मोदी ज्या भाषेत बोलतात ती भाषा लोकांना आपलीशी वाटते. ही भाषा लोकांशी जोडणारी आहे. याआधी जी काम झालेली नाहीत ती आज मोदी करतायंत हे आपण समजून घेत नाही तोपर्यंत त्यांचा मुकाबला आपल्याला करता येणार नाही. त्यांना आपण प्रत्येकवेळी खलनायक ठरवतो आहोत. त्याची गरज नाही.

मोदींची ‘गवर्मेंट इकॉनॉमी’

जयराम रमेश यांच्याकडे मनमोहन सिंग सरकारच्या काळात ग्रामीण विकास आणि स्वच्छता हे मंत्रालय होतं. त्यांनी हे स्पष्ट केलंय की कुणाच्याही कौतुकासाठी ही विधानं नाहीत. पण मोदींनी त्यांच्या कार्यकाळात सरकारमधे ज्या गोष्टी आणल्यात त्या समजून घेण्याची गरज आहे. खासकरुन सरकारचं गवर्मेंट इकॉनॉमीचं मॉडेल. सरकारचं इकॉनॉमीचं मॉडेल हे जसं भासवलं जातंय पूर्णपणे नकारात्मक नाही.

या सरकारचं राजकारण वेगळं आहे. मोदी सरकारच्या या मॉडेलनं ज्या पद्धतीचे सामाजिक संबंध प्रस्थापित केलेत ते खूप वेगळे आहेत. हे संबंध थेट लोकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहेत. त्यामुळे त्या पद्धतीने सरकारच्या या मॉडेलकडे पाहायला हवं. मोदींची यामागची स्ट्रॅटेजीही वेगळी आहे.

हेही वाचा: पंतप्रधानांना देशातल्या तिन्ही सैन्यदलांचा एकच प्रमुख का हवाय?

उज्ज्वलाने जोडले कोट्यवधी महिलांना

रमेश यांनी मोदी सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा संदर्भ दिला. २०१९ च्या लोकसभेच्या कॅंपेनमधे सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची टिंगल करण्यात आली. उज्ज्वला योजना यात वरचढ होती. ‘स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’असा नारा देत केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्‍वला योजनेतंर्गत देशातल्या दारिद्रय रेषेखालच्या ५ कोटी महिलांना घरगुती एल.पी.जी. गॅस कनेक्शन मोफत उपलब्ध करुन दिला.

सगळ्या अभ्यासांतून हे स्पष्ट झालंय की सरकारची उज्ज्वला योजना असंख्य महिलांपर्यंत पोचली. महिलांच्या रोजच्या जगण्याशी याचा थेट संबंध होता. त्यामुळे महिला खुश होत्या. मोदींना २०१४ पेक्षा जास्तीचं यश हे या लोकसभेत मिळालं ते यामुळेच.

प्रत्येक वेळी टीका नको

२००९ मधे मोदींचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला. विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विक्रमही त्यांनी केला होता. ते या उंचीवर कसं पोचले. हेसुद्धा समजून घ्यावं लागेलं. निवडणुकीवेळी शेतकऱ्यांचा मुद्दा आला. पण यासाठी लोकांनी सरकारला जबाबदार धरलं नाही. मग हे बरोबर असो की चूक. त्यानंतरचे निकाल हे आपल्या समोर आहेत. नरेंद्र मोदींनी हे सगळं कसं मिळवलं?

जनता त्यांच्या कामाचं कौतुक करतेय. या कौतुकामागचं कारण आपल्याला समजून घेता आलं नाही तर या व्यक्तीचा सामना आपण करु शकणार नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी त्यांना खलनायक ठरवण्यात काही उपयोग नाही. त्यानं काही साध्यही होणार नाही.

हेही वाचा: 

काँग्रेस गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष निवडण्याची रिस्क का घेत नाही?

ईश्वरी अवतारापलीकडे एक माणूस म्हणून कृष्ण चरित्र समजून घ्यायचंय?

वाजपेयींचे सहकारी दुलत म्हणतात, ३७० हटवल्यामुळे काश्मीरमधे वाढू शकतो दहशतवाद