फाईव जी टेक्नॉलॉजीकडे शंकेनं का पाहिलं जातंय?

०७ जून २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


फाईव जी टेक्नॉलॉजी आरोग्यासाठी धोक्याची आहे असं म्हणत प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांचा अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने त्यांना २० लाखांचा दंड ठोठावलाय. या टेक्नॉलॉजीमुळे जगात काय काय बदल होणार याबद्दल कुतुहल आहे. पण त्याचवेळी या टेक्नॉलॉजीकडे संशयाने पाहणाऱ्यांची संख्याही वाढतेय.

फाईव जी ही मोबाईल टेक्नॉलॉजीची पाचवी पिढी. मागच्या चार दशकात चार पिढ्या पाठीमागे पडत फाईव जी टेक्नॉलॉजी जगभरात बाळसं धरतेय. मोबाईल टेक्नॉलॉजीच्या पहिल्या चारही पिढ्यांनी माणसाच्या जगण्यावर अनेक चांगले वाईट परिणाम केले. त्याचे अनेक फायदे आणि तोटेही आपण अनुभवले. भारतालाही या नव्या टेक्नॉलॉजीचं कमालीचं आकर्षण आहे.

फोर जी टेक्नॉलॉजीमुळे माणसाच्या जीवनशैलीत लक्षणीय बदल झाले. जागतिक खेडी नावाची संकल्पना याच टेक्नॉलॉजीमुळे प्रत्यक्षात आली. इतकंच काय तर कोरोनाकाळात साधारण ६० टक्के लोकांचा रोजगार या टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे. त्यामुळे फाईव जीमुळे जगात काय काय बदल होणार याबद्दल कुतुहल असतानाच या नव्या टेक्नॉलॉजीकडे संशयाने पाहणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

हेही वाचा: ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?

फाईव जी विरोधात याचिका

नुकतंच दिल्ली उच्च न्यायालयात फाईव जीचं हे प्रकरण गाजलंय. प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला यांनी फाईव जी टेक्नॉलॉजीमुळे आरोग्याला होणार्‍या धोक्यांबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांचं असं मत होतं की, 'माणूस सातत्यानं प्रगती करतोय. पण त्या प्रगतीचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होणार आहे याचाही विचार करायला हवा. सध्या देशात फाईव जी नेटवर्कचं काम सुरु करण्याची चर्चा आहे. पण त्या नेटवर्कचा आपल्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होणार आहे याचाही विचार व्हायला हवा'.

जुही चावला यांनी कदाचित केवळ प्रसिद्धीसाठी याचिका केलीही नसेल पण दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावत २० लाखांचा दंड ठोठावला. याचिकाकर्त्याने कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर केला आणि न्यायालयाची सुनावणी चालू असलेला वीडियो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या सर्व कारवाईत एक गोष्ट मागे सुटली ती म्हणजे खरंच फाईव जी टेक्नॉलॉजी आरोग्याला घातक आहे का? जगभरातले लोक या मोबाईल टेक्नॉलॉजीच्या पाचव्या पिढीविषयी इतके साशंक का आहेत? 

जगभर अफवांचं पेव

जग कोरोनाशी लढत असताना अनेक युरोपियन देशात 'स्टॉप फाईव जी' नावाने आंदोलन चालू झालं. ब्रिटनमधल्या डर्बी शहरात लोकांनी फाईव जी टॉवर पाडून पेटवून दिले. या टेक्नॉलॉजीसाठी उभ्या केलेल्या अनेक पायाभूत सुविधांना लक्ष्यही केलं. इतकंच काय त्यांनी फाईव जी टेक्नॉलॉजीचं उभारणी आणि दुरुस्तीचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर हल्ले केले.

फाईव जीमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि कोरोनाचा धोका अधिक वाढतो अशी त्यांची समजूत होती. शिवाय फाईव जी लहरींमधून कोरोना अधिक जलदगतीने पसरतो असंही त्यांचं मत होतं. त्यात कोणतंही सत्य नाही हे आता सिद्ध होतंय. त्याचवेळी अमेरिकेतला प्रसिद्ध अभिनेता वुडी हॅरेलसन याने या चळवळीला पाठींबा दिलाय.

हेही वाचा: भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी

आर्थिक घडामोडींमागे टेक्नॉलॉजी

आज संपूर्ण जग टेक्निकल प्रगतीच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनाच्या महासंकटामुळे टेक्नॉलॉजीत कमालीचं परिवर्तन पाहायला मिळतंय. रोबोटिक, कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, इंटरनेट ऑफ थिंग्ज, मानव विरहित वाहनं या क्षेत्रात बदलाचे जोरदार वारे वाहतायत.

सर्व जग लॉकडाऊनमधे असताना ज्या काही आर्थिक घडामोडी चालू होत्या त्या याच टेक्नॉलॉजीच्या आधारे चालू होत्या. मुळात ही सर्व टेक्नॉलॉजी फोरजी वायरलेस नेटवर्कवर आधारलेली आहे. फोरजीच्या मर्यादा लक्षात घेऊन फाईव जीसाठी सर्वच देशांनी पुढाकार घेतला आहे. भारतही याला अपवाद नाही.

फाईव जीमुळे नवं विश्व

१९८० चं दशक 'ऍनॉलॉग वाईस' प्रणालीचं होतं. १९९० च्या दशकात 'डिजिटल वाईस' प्रणाली विकसित झाली. २००० च्या दशकात मोबाईल इंटरनेटचा जन्म होतो. मोबाईल कम्प्युटिंग आणि मोबाईल अप्लिकेशन या वेगवान प्रणालीमुळे संपूर्ण जग जवळ आलं. २०१० च्या दशकात फोरजी आलं आणि मोबाईल टेक्नॉलॉजीनं मोठी झेप घेतली.

एचडी वीडियो स्ट्रीमिंग, सोशल मीडिया, ई कॉमर्स, मॅपिंग, पेमेंट गेट वे यांचा अतिशय प्रभावी वापर चालू झाला. २०२० च्या दशकात मागच्या दशकातले दोष आणि अडचणी दूर होऊन मोबाईल टेक्नॉलॉजी या दशकावर आपलं प्रभुत्व गाजवणार हेच खरं.

स्वयंचलित वाहनं, ड्रोनद्वारे डिलिवरी सारखे यांत्रिक बदल होतीलच शिवाय मेडिकल ऍप पेशंटच्या सर्वसामान्य आजारांचं निदान करून त्यावर उपचारही करतील. फाईव जीमुळे एक नवीन विश्व निर्माण होईल.

हेही वाचा: मोबाईलमधून खासगी गोष्टीत डोकावणाऱ्या वॉट्सअॅपचं काय करायचं?

अनेक शास्त्रज्ञ साशंक आहेत

मानवी आयुष्यावर आर्थिक, सामाजिक आणि आरोग्याच्या दृष्टीने इतके मोठे परिणाम होणार असतील तर त्याचे दुष्परिणाम होतील का याचा विचारही करायला हवा. अनेक शास्त्रज्ञही नवीन टेक्नॉलॉजीविषयी साशंक आहेत. अमेरिकेतल्या 'आरटी अमेरिका' या संस्थेने तर 'मानवतेवरचे अश्लाघ्य प्रयोग' असं म्हणून टीका केली आहे.

अभिनेत्री जुही चावला यांनीही आरोग्यावर विपरीत परिणाम होतात अशी शंका उपस्थित केली. अनेक लोकांनी फाईव जीचे परिणाम मानवी शरीरावर विशेषतः मेंदूवर, मज्जासंस्थेवर, रक्ताभिसरणावर होतात. फाईव जीमुळे मोठ्या प्रमाणावर टॉवर मानवी वस्तीत उभे करावे लागतील त्यामुळे हे परिणाम अधिक व्यापक होत जातील अशी भीती व्यक्त केलीय.

फाईव जीमुळे अर्थव्यवस्थेला गती?

जगातल्या अनेक शास्त्रज्ञांनी फाईव जी टेक्नॉलॉजीच्या लहरी मानवी शरीरात प्रवेश करत नाहीत. शिवाय मानवी शरीराच्या दृष्टीने फाईव जी टेक्नॉलॉजी पूर्णपणे सुरक्षित आहे असं सांगतात. अजूनही जगभरात या टेक्नॉलॉजीवर संशोधन चालू आहे. भारतही पुढच्या ३ वर्षात स्वतःची फाईव जी टेक्नॉलॉजी निर्माण करतोय.

फाईव जी सारख्या टेक्निकल अपग्रेडेशनमुळे भविष्यात टेक्नॉलॉजीत आपण आघाडीवर राहण्याची संधी आहे. शिवाय अनेक रोजगाराच्या संधी या क्षेत्रात वाट पाहत आहेत. फोरजी सारख्या अद्ययावत मोबाईल टेक्नॉलॉजीचा वापर करून देशाच्या आर्थिक वृद्धीमधे वाढ करता येते हे आकडेवारीने सिद्ध झालंय.

फाईव जीमुळे भारतात १ ट्रिलियन अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते असे आकडे आहेत. त्यामुळे फाईव जीच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याची ही योग्य वेळ आहे. २०१८ ला संसदीय समितीच्या अहवालात म्हटलंय की, भारताने फाईव जी मोबाईल टेक्नॉलॉजीची बस चुकवलीय. तेव्हा आता आणखी वेळ होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

हेही वाचा: ओटीटीची मजल सुखवस्तू प्रेक्षकांपर्यंतच : नितीन वैद्य

प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान

फाईव जीमुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्याची हानी होते का किंवा हृदयाशी संबंधित आजारांमधे वाढ होत आहे का? हे जसं आपण पाहतोय तशी ही टेक्नॉलॉजी आल्यामुळे अकुशल किंवा कमी कौशल्य असलेल्या रोजगारावर गदा येईल का?

भविष्यात आजच्या तरुणांकडे कोणती कौशल्यं असायला हवीत? डिजिटल असमानता वाढेल का? या टेक्नॉलॉजीची फारशी ओळख नसलेल्या लोकांची गोपनीयता धोक्यात येईल का? तसंच भारतीय समाजातला धार्मिक तणाव वाढेल का?

सोशल मीडियातल्या सगळ्यांच्या खाजगीपणाचं संरक्षण होईल का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपले कायदे या टेक्नॉलॉजीला पूरक आणि त्याच वेळी नियंत्रणात ठेवू शकतील का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान पुढच्या काळात आपल्या पुढे असेल.

टेक्नॉलॉजीचा डोळसपणे स्वीकार

ब्रिटिशांनी भारतात आधुनिक न्याय यंत्रणा उभी केली. न्यायाची संकल्पना रुजवली. त्याच इंग्लंडमधे फाईव जी विरुद्ध आंदोलन पेटलं. जाळपोळ आणि मारहाण झाली. लोकांनीच या आधुनिक मोबाईल टेक्नॉलॉजीला अपराधी ठरवलं आणि शिक्षा केली.

याउलट भारतात जुही चावला फाईव जी विरुद्ध न्यायालयात गेल्या आणि रितसर सुनावणी झाली. हे जसं मानवी सभ्यतेकडे पडलेलं एक पाऊल तसंच फाईव जी हे आधुनिक जगाकडे पडलेलं अजून एक पाऊल आहे. डोळसपणे आपण त्याचा स्वीकार करायला हवा.

फाईव जी टेक्नॉलॉजी आरोग्यासाठी धोक्याची आहे असं म्हणत प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांचा अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने त्यांना २० लाखांचा दंड ठोठावलाय. या टेक्नॉलॉजीमुळे जगात काय काय बदल होणार याबद्दल कुतुहल आहे. पण त्याचवेळी या टेक्नॉलॉजीकडे संशयाने पाहणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

हेही वाचा: 

फेसबूकचं भाजपशी झेंगट आहे का?

सोशल मीडियाच्या फोडणीसाठी अॅक्सिडेंटलचा मसाला

 यापुढे मी रिलायन्सच्या कोणत्याही वस्तू वापरणार नाही, कारण

जागतिक पुरुष दिन विशेषः लैंगिकतेला आधार बदलत्या माध्यमांचा