अखिल भारतीय साहित्य महामंडळाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड केलीय. पहिल्यांदाच ख्रिस्ती साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झालीय. फादर हे वसईचे आहेत. वसईत आपल्याला मराठीपण, साहित्य चळवळ, संस्कृती इत्यादी गोष्टी आजही ठळकपणे दिसतात.
जानेवारी २०२० मधे उस्मानाबाद इथे ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड झाली. निवडणूक प्रक्रिया बंद केल्यानंतर ही दुसरीचं निवड आहे.
मराठी ख्रिस्ती साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म ४ डिसेंबर १९४२ला वसई तालुक्यातल्या नंदाखाल गावातला. ते एका सामवेदी ख्रिस्ती कुटुंबात जन्मले. याच गावातल्या संत जोसेफ मराठी हायस्कूलमधे त्यांचं शिक्षण झालं. १९७२मधे त्यांनी कॅथॉलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. पुणे युनिवर्सिटीतून त्यांनी समाजशास्त्रात बीए, तर धर्मशास्त्रात एमए केलंय.
धर्मगुरु होण्यासाठी ८ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. या अभ्यासात त्यांना ख्रिस्ती धर्माबरोबरच इतरही धर्मांची तोंड ओळख आणि महत्त्वाच्या ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास करतानाच त्यांना संत साहित्यात गोडी निर्माण झाली. त्यांनी पुढे जाऊन संत साहित्याचा अभ्यास केला. संत तुकारामांवर पीएचडीसुद्धा केली.
फादर दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरु आहेत. तरी पर्यावरणाचे रक्षणकर्ते, साहित्यिक, शहरातला ग्रामीण ओलावा जपणारं व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख. १९८३ ते २००७ ही २४ वर्ष ते ‘सुवार्ता’ मासिकाचे संपादक होते. हे वसईतलं सगळ्यात लोकप्रिय मासिक म्हणून ओळखलं जातं. हे मासिक मराठी भाषेतून निघतं. आजही हे मासिक तेवढंच लोकप्रिय आहे.
पूर्वी हे मासिक प्रामुख्याने मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित असलेलं वार्तापत्र म्हणून ओळखलं जाई. पण दिब्रिटोंनी या मासिकाद्वारे सामाजिक प्रबोधनाचं कार्य केलं. आणि मासिकाला एका समाजापुरतं मर्यादित ठेवलं नाही.
दिब्रिटोंनी सुरवातीला सुवार्तामधून हरित वसईचा लढा चालवला. नंतर ‘हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभारली. वसईतल्या ’राजकारणाचं गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचं राजकारण’ यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला. आणि मोहीमही राबवली.
वसईतल्या तरुणांना दिब्रिटो सुवार्तातून भेटले. पण महाराष्ट्रातल्या तरुणांना ते ज्युनिअर कॉलेजच्या मराठीच्या पुस्तकातून. ओअॅसिसच्या शोधात या त्यांच्या पुस्तकातला उतारा अभ्यासासाठी होता. ‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची’ हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी बराच काळ इस्रायलमधे राहून संशोधन केलं. त्यांची आजवर लिखित, संपादित आणि अनुवादित २३ पुस्तकं आलीयत.
हेही वाचा: पुरुषोत्तम बोरकरांचं जगणं वावटळीतल्या दिव्यासारखं
महाराष्ट्रात १९२६मधे 'महाराष्ट्रीय ख्रिस्ती साहित्य सेवा मंडळाची' स्थापना झाली. या मंडळातर्फे मराठी-ख्रिस्ती साहित्य संमेलनं भरतं. पुणे शहरात १० ते १३ जानेवारी १९९२च्या १५ व्या मराठी-ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिब्रिटो झाले. त्यावेळी आपल्या भाषणात ते म्हणाले, 'एकमेकांच्या धर्मातली व्यंगं काढून, त्यांचं भांडवल करण्याचा काळ आता संपला. माणसा-माणसांतलं सामंजस्य वाढवण्यासाठी सहकार्य, सुसंवाद आणि सखोल अभ्यासाची गरज आहे.'
मराठीत खूप चांगलं साहित्य निर्माण झालंय. पण त्याचं इतर भाषांमधे भाषांतर झालं नाही. म्हणून ते महाराष्ट्रतच अडकून पडलंय. ते इतर भाषेत गेलं पाहिजे. जगभरात पोचलं पाहिजे, असं ते मराठी साहित्याबद्दल म्हणाले.
निसर्ग, पर्यावरण यांचं चित्रण नेहमीच फादर दिब्रिटोंच्या साहित्यात दिसून येतं. हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. यावर फादर म्हणतात, 'मी वसईत निसर्गाच्या सानिध्यात वाढलो. निसर्गाने मला घडवलंय. आपण लक्षात घेतलं पाहिजे की निसर्ग वाचला तर माणूस वाचेल.'
दिब्रिटोंच्या लेखनाच्या वैशिष्ट्यांची मुळं आपल्याला वसईत सापडतात. वसईची मुख्य ओळख आपल्याला करून दिली जाते ती ख्रिस्ती नगरी म्हणून. मुंबईला लागून असलेल्या वसईत दिब्रिटो म्हणतात त्याप्रमाणे झाडंझुडपं, तलावं, डोंगर, समुद्र, नदी असं निसर्गाचं सुंदर चित्र बघायला मिळतं. जे त्यांनी लहानपणापासून अनुभवलं.
पण आज वसई झपाट्याने बदलतेय. गावांचं शहरात रुपांतर होतंय. पण तिथले लोक गावं, निसर्ग, संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत. या ख्रिस्ती गावात ख्रिश्चनांबरोबर हिंदू, मुस्लिम, शीख धर्मीयसुद्धा राहतात. आणि मुख्य गोष्ट अशी की इथे सगळेच लोक मराठी बोलतात. नव्याने आलेले अन्यभाषिक लोक मात्र या संस्कृतीचा भाग अपवादानेच झालेत.
हेही वाचा: अरुणा सबानेः एकटेपणाचा खंबीरपणे सामना करण्यासाठीची प्रेरणा
अर्नाळा, आगाशी, शिरलय, नंदाखाल, बोळींज, उमराळा, गाम, भुईगाव, निर्मळ, मर्देस, भुईगाव, नानभाट, गोम्सआळी इत्यादी उत्तर वसईतली तर गिरीज, सांजेर, पापडी, मुळगाव, पाली, मर्सेस, रमेदी या उत्तर आणि दक्षिण वसईततल्या गावांमधे ख्रिस्ती लोक मोठ्या प्रमाणात राहतात.
हा समाज इथे ५०० वर्षांपासून आहे. इथे पोर्तुगीजांचं राज्य स्थापन झाल्यानंतर अनेक समाजांचं धर्मांतर झालं. त्यापैकी सामवेदी ब्राह्मण, सोमवंशी क्षत्रिय, ओळकर, आदिवासी, कोळी आणि इतर मच्छिमार समाजातले लोक मोठ्या संख्येने ख्रिस्ती झाले. पण या समाजाचे लोक आणि धर्मांतरित झालेले लोक एकत्र राहतात. एकाच आळीत त्यांची घरं आहेत. त्यांचे एकमेकांशी चांगले संबंधही आहेत.
धर्मांतर झालं तरी त्यांनी आपली मूळ मराठी संस्कृती सोडली नाही. त्यांचा दैनंदिन व्यवहार मराठीतच होतो. तिकडे प्रत्येक समाजाची मराठी बोलीभाषासुद्धा आहे. त्यात वाडवळी, कोकणी, आगरी, कोळी, रानकरकोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, वारली आणि सामवेदी ज्याला ख्रिस्ती लोक कादोडी म्हणतात. आपल्या धर्मविधीपासून सणांपर्यंत सगळ्यातच त्यांनी आपल्या मूळ संस्कृतीला मागे सोडलं नाही.
रोज सकाळी होणारी प्रार्थना. ज्याला ख्रिस्ती लोक मिसा म्हणतात. तीसुद्धा मराठीभाषेतून होते. चर्चमधले फादर मराठीत बोलतात. फादरांच्या दर काही वर्षांनी बदल्या होतात. दुसऱ्या भागातून आलेल्या फादरांनाही वसईत आल्यावर मराठी शिकावं लागतं. आणि तिथे चक्क जय देवा, जय देवा, जय येशू ख्रिस्ता अशी आरतीही म्हटली जाते.
नाताळमधे तर कॅथलिक काय प्रोटेस्टंट काय आणि ईस्ट इंडियन काय सगळेच लोक फराळ करतात. त्या फराळात काही नव्या गोष्टी असल्या तरी आपल्या दिवाळीसारख्या पारंपरिक लाडू, चकली, करंजी, शिंगोळे, शंकरपाळे, पोह्यांचा चिवडा हे पदार्थ असतातच. तसंच कोकण पट्ट्यात बनणार तांदळाच्या रव्याचा केक म्हणजे रेवाळंही इथे हमखास बनवतात.
नाताळमधे नाताळ कॅरलचं खूप आकर्षण असतं. कॅरल म्हणजे नाताळमधली गाणी. आळी आळीतली, गावातली तरुण मंडळी एकत्र येऊन चौकात किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी वादकांसह गाण्याचा छोटा कार्यक्रम करतात. यात मराठी गाणी मोठ्या प्रमाणात गायली जातात. पूर्वी या कॅरल गाण्यांत भजन, कीर्तन आणि आरत्याही म्हटल्या जात होत्या.
दिवाळीप्रमाणे नाताळमधे आणखी एक गोष्ट होते. ती म्हणजे नाताळ अंक प्रकाशित होतात. साधारण ८ ते १० अंक दरवर्षी वाचकांच्या भेटीला येतात. या अंकात मराठी भाषेसह तिथल्या बोलीभाषांचाही वापर होतो. या अंकांचा फॉरमॅट दिवाळी अंकांसारखा कथा, कविता, लेख, व्यंगचित्रं, फोटो फिचर, मुलाखती असाच असतो.
हेही वाचा: नयनतारा सहगल पुन्हा एकदा व्यवस्थेला झोडणारं काय बोलल्यात?
नाताळ असो किंवा लग्न, समारंभ अशा विशेष प्रसंगी आपण पारंपरिक म्हटल्यावर कोणते कपडे घालू? आपण तर नऊवारी साडी नेसू, धोतर नेसू. बरोबर. अगदी आत्ता-आतापर्यंत वसईतले ख्रिस्तीसुद्धा लुगडं, चोळी आणि धोतर आणि बंडीच घालायचे. आणि हाच त्यांचा पारंपरिक पेहराव आहे. गेल्या काही वर्षांपासून पाश्चात्यांप्रमाणे गाऊन, सूट-बूट घालू लागलेत.
दिब्रिटोंशी त्यांच्या पारंपरिक कपड्याबद्दल विचारलं असता ते म्हणतात, मला आजही माझी आई आठवते. गुडघ्यापर्यंत नेसलेलं लुगडं, चोळी, दागिने, केसात माळलेला गजरा. पोर्तुगीज आल्यानंतर ख्रिस्ती धर्मात धर्मांतर झालं. हे धर्मांतर झाल्यानंतर सर्व ख्रिस्तींनी आपल्या कपड्यांच्या रंगात बदल केला. लाल रंगाचं लुगडं महिला नेसू लागल्या. तर पुरुष पांढऱ्या रंगाचं धोतर आणि बंडी. आणि डोक्यावर लाल टोपी. नंतर सदऱ्यावर बाह्या नसलेला काळा कोटही आला.
दागिन्यांमधे पोतमाळ, पाशीहार, ठुशी, बोरमाळ याच पारंपरिक दागिन्याचा वापर होतो. सदऱ्याची सोन्याची बटणं, अंगठी, साखळी असेच दागिने आजही बनवले जातात. त्यात काही नव्या डिझाईन किंवा डायमंड वगैरे आलेत.
ख्रिस्ती लोक मुळात वेगवेगळ्या समाजाचे. त्यांचा साईड बिझनेस वेगवेगळा होता. मात्र शेती प्रामुख्याने सर्वच करत होते. आता वसईत शेतीचं प्रमाण कमी झालंय. सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पदांवर काम करतायत. अनेक लोक परदेशात राहतायत.
पूर्वी हेच वसईतले ख्रिस्ती मुंबईत दूध, भाज्या, फुलं, फळं विकायला येत. आजही काही लोक आपल्या घराजवळच्या जागेत भाजी लावतात. त्यातली जास्तीची भाजी विकतात. आणि भाजीवाले ती आपल्याकडे म्हणजे मुंबईत घेऊन येतात. मुंबईतल्या प्रत्येक भागातल्या भाजी बाजारात वसईच्याच भाजीला मागणी असते.
हेही वाचा: धनगर संमेलनाच्या निमित्ताने मूक समाज बोलू पाहतोय
वसईत मिशनरी लोकांनी मोठ्या प्रमाणात शाळा उभारल्या. तिथूनच शिक्षणाला सुरवात झाली. त्यामुळे साहित्याचं महत्त्व खूप उशिरा इथल्या लोकांना समजलं. पण आज हेच वसई साहित्य नगरी म्हणून ओळखलं जातं. १९५५ ला पहिल्यांदा वसईत मराठी मासिक सुरू झालं. ते म्हणजे सुवार्ता. इथूनच साहित्य चळवळीला सुरवात झाली. म्हणून आजही तिथले साहित्यिक सुवार्ता मासिकाचं नाव घेतात.
दिब्रिटो संपादक झाल्यावर मासिकाने कात टाकली. आणि सुवार्ता एका वेगळया रुपात वाचकांसमोर उभं राहिलं. यातून पर्यावरण रक्षण, पाणी बचाव तसंच बिल्डर, माफियांविरुद्ध निडरपणे आपली भूमिका मांडली. पुढे सुवार्ता मासिक महाराष्ट्रातच नाही तर जगभरात पोचलं.
वसईमधे चर्चासत्रं, संमेलनं, मेळावे भरू लागले. आणि मासिकात महाराष्ट्रातले नामवंत लेखक, कवी लिहू लागले. त्यांच्याबरोबर वसईकरांचाही साहित्य क्षेत्रात सहभाग वाढला. यातून बरेच लेखक आणि कवी उद्याला आले. म्हणूनच सुवार्ताला वसईतल्या साहित्य चळवळीचं केंद्र म्हणतात. आणि यात फादर दिब्रिटोंचा मोलाचा वाटा आहे.
दिब्रिटो आणि सुवार्ता यांच्यामुळे साहित्यिकांची नवी फळी तयार झाली. या वसईतल्या साहित्यिकांचं काम फक्त वसईपुरतं नाही. आणि मुख्य म्हणजे हे साहित्यिक मराठी भाषेत लिहितात. यात कोणत्याच विशिष्ट जाती, धर्माचं वर्चस्व नाही. तिथल्या महत्त्वाच्या मराठी ख्रिस्ती साहित्यिकांची नावं सांगायची तर बिशप थॉमस डाबरे, फादर हिलरी फर्नांडिस, फादर फ्रान्सिस कोरिया, सायमन मार्टिन, सिसिलिया कार्वलो, जोसेफ तुस्कानो, रॉक कार्वलो, डॉ. रजीन डिसिल्वा, वर्जेश सोळंकी, निरंजन उजगरे आणि अनुपमा उजगरे इत्यादी.
आज वसईत १०० तरी लेखक, कवी आहेत. आणखी तयार होतायत ते वेगळेच. गंमत म्हणजे आपण मराठी, मराठी संस्कृती असं फक्त बोलतो. या ख्रिस्ती नगरीत गेल्यावर तिथलं मराठीपण आपल्याला भारावून टाकतं. त्यांनी जपलेली मराठी भाषा, परंपरा, संस्कृतीचं कौतुक वाटतं. आणि ख्रिस्ती असूनही त्यांचे हिदू, शीख, मुस्लिमांशी असलेले संबंध बघून सर्वधर्मसमभाव काय असतो, हे समजतं. याच वातावरणात घडलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे एक ख्रिस्ती असूनही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेत.
हेही वाचा:
मंदीच्या जात्यात रोजगारी भरडतेय
आजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय?
मराठवाड्याच्या मागासलेपणात पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचं गुपित
संमेलनाध्यक्षांच्या भाषणापेक्षाही महत्त्वाचं लक्ष्मीकांत देशमुखांचं भाषण
संमेलनाला जाताय, मग वि.भि. कोलतेंच्या बंडखोर वारशाविषयी हे वाचा