राहुल गांधींनी केरळमधल्या वायनाडमधून उमेदवारी अर्ज का भरला?

०५ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


राहुल गांधी आज वायनाडमधे फॉर्म भरण्यासाठी गेलेले असताना झालेली गर्दी आश्चर्यचकीत करणारीच आहे. ते गांधी घराण्याच्या परंपरागत अमेठी मतदासंघाबरोबरच केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढत आहेत. आजवर कधीच चर्चेत नसलेला हा मतदारसंघ राहुल यांनी निवडला. त्या मागची कारणं आणि त्याचं एकंदर राजकारण समजून घेणं इंटरेस्टिंग आहे.

`उत्तर भारत असो, ईशान्य भारत किंवा दक्षिण भारत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप इथली संस्कृती आणि इतिहास उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. मोदी सगळ्या संवैधानिक संस्थांना इजा पोचवत आहेत. त्याला आव्हान देण्यासाठी मी उत्तर भारताबरोबरच दक्षिण भारतातूनही लढतोय. भारत हा एक आहे, हा संदेश देण्यासाठी मी केरळमधे आलोय.`

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळमधल्या वायनाडमधून निवडणुकीचा अर्ज भरला. त्याआधी झालेल्या रोड शोसाठी प्रचंड म्हणावी अशी गर्दी जमली होती. पत्रकारांनी नेहमीचे प्रश्न विचारले. त्यांना उत्तर म्हणून ते नेहमीच्या अघळपघळ स्टायलीत बोलत होते.

हेही वाचाः राहुल गांधी ७२ हजारांत गरिबीवर वार कसा करणार?

राहुल पळालेः भाजपची टीका

पण राहुल गांधी सांगताहेत त्यावर भाजपवाल्यांचा बिलकूल विश्वास नाही. आपल्याकडे वर्ध्यात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल यांचं नाव न घेता टीका केली होती, शेवटी ते हिंदूंची संख्या कमी असलेल्या मतदारसंघातच निवडणूक लढायला गेलेत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी टीका करताना राहुल यांचं थेट नाव घेतलं होतं.

राहुल गांधींचा नेहमीचा मतदारसंघ उत्तर प्रदेशातला अमेठी हा आहे. तिथे ते निवडणूक लढवणार आहेतच. सोबत आता त्यांनी वायनाडमधूनही फॉर्म भरलाय. अमेठीतल्या त्यांच्या प्रतिस्पर्धी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा दावा आहे की पराभवाला घाबरूनच राहुल वायनाडला पळालेत.

२०१४ला स्मृती इराणींनी राहुल गांधींची लीड तीन लाखांवरून एका लाखावर आणली होती. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसला एकही आमदारकीची जागा जिंकता आली नाही. स्मृती इराणी निवडणूक हरल्यानंतरही गेली पाच वर्षं अमेठीत ग्राऊंडवर्क करत आहेत. त्यामुळे त्यांनी राहुलना आव्हान निश्चितपणे उभं केलंय.

हेही वाचाः महाराष्ट्रातली काँग्रेस नेतृत्वहीन होतेय?

पण आता पूर्वीसारखी मोदी लाट नाही, अमेठीत भाजपवगळता सगळ्या महत्त्वाच्या पक्षांचा राहुलना पाठिंबा आहे आणि राहुल यांची प्रतिमा पाच वर्षांच्या तुलनेत फारच सुधारलीय. त्यामुळे अमेठीत राहुल निवडणूक हरण्याची शक्यता नाही, यावर राजकीय निरीक्षकांचं एकमत आहे. मात्र स्मृती इराणी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत असल्याचंही सगळ्यांना मान्य आहे.

वायनाड मतदारसंघ आहे तरी कसा?

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला वायनाडचा परिसर घनदाट जंगलं आणि हिरव्यागार भातशेतीने सजलाय. वायनाडचा अर्थच भातशेताने भरलेला प्रदेश असा आहे. गेल्या काही वर्षांत हा परिसर पर्यटकांचं आकर्षण बनलाय. पण केरळच्या इतर भागांच्या तुलनेत अद्याप इथे विकास पोचलेला नाही.

वायनाड लोकसभा मतदारसंघ २००९च्या मतदारसंघ पुनर्रचनेत तयार झालाय. त्यात वायनाड आणि मलपुर्रम या जिल्ह्यातले प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघ आणि काझिकोडे जिल्ह्यातला एक असे सात मतदारसंघ आहेत. जेव्हापासून हा मतदारसंघ बनलाय तेव्हापासून तिथे काँग्रेसचाच खासदार जिंकत आलाय.

हेही वाचाः महाराष्ट्रात काँग्रेसचं घोडं कुठं अडतंय?

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले एमआय शानावास यांनी २००९ला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवाराला दीड लाख मतांच्या फरकांनी हरवलं होतं. २०१४ला हाच लीड फक्त २० हजारांवर पोचला. गेल्या वर्षी शानावास यांचं निधन झालं. हा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो.

वायनाडची निवड का केली असावी?

  • काँग्रेस म्हणतंय, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या तिन्ही प्रदेश काँग्रेसने राहुल गांधींना आपल्या राज्यातून निवडणूक लढवण्याचं निमंत्रण दिलं होतं.
  • वायनाड हा केरळमधे असला तरी त्याच्या सीमा कर्नाटक आणि तामिळनाडूला चिकटलेल्या आहेत. त्यामुळे इथे निवडणूक लढल्यावर पूर्ण दक्षिण भारतात प्रभाव टाकता येऊ शकतो.
  • दक्षिणेत राहुल गांधींची लोकप्रियता वाढलीय. विशेषतः महिलांमधे त्यांचं फॅन फॉलोईंग वाढलंय. वेगवेगळ्या सर्वेत हे दिसून आलंय. काँग्रेसला त्याचा फायदा उचलायचा असावा.
  • इथले खासदार एमआय शानावास यांच्या निधनानंतर केरळ काँग्रेसचे दोन मोठे नेते रमेश चेन्निथला आणि ओमन चंडी या मतदारसंघातून लढण्यास उत्सुक होते. त्यावर वाद सुरू होते. राहुल यांच्या उमेदवारीने हा वाद निवळलाय.
  • ३५ टक्क्यांहून जास्त मुसलमान, १० टक्के ख्रिश्चन, तितकेच आदिवासी या सामाजिक गणितामुळे वायनाड राहुल यांच्यासाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ बनलाय.
  • यापूर्वी इंदिरा आणि सोनिया गांधी यांनी दक्षिण, उत्तर अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा शिरस्ता घालून दिलाय. २०१४ला पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनीही वडोदराबरोबरच वाराणशीत निवडणूक लढवून उत्तर प्रदेशात प्रभाव निर्माण केला होता.

विरोधात भाजपचा उमेदवार नाही

भाजप या मतदारसंघात फाईटमधेही नाही. राहुल गांधी यांची लढत आहे ती कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवाराशी. २०१४ला भाजपने तिथे मुसंडी मारली होती. पण त्यांना मिळालेल्या मतदानाचं प्रमाण १० टक्क्यांच्या वर गेलं नव्हतं. त्यामुळे भाजपने तिथे आपला उमेदवारही दिलेला नाही.

भारतधर्म जनसेना म्हणजेच बीडीजेएस या मित्रपक्षाचे प्रमुख तुषार वेलापल्ली यांना भाजपने मैदानात उतरवलंय. त्यांनीच हा पक्ष उभारलाय. शबरीमला प्रकरणात त्यांनी बायकांच्या मंदिरप्रवेशाला प्रखर विरोध केला होता. ते खरं तर थ्रिसूर मतदारसंघातून लढण्याच्या तयारीत होते. पण अमित शाहांनी त्यांना राहुल यांच्या विरोधात उतरवलंय.

हेही वाचाः नागपुराच्या प्रचारात डीएमके, डीएमओ, टीएमकेचं राज्य

त्यांचे वडील वेलापल्ली नातेसन हे एझावा या ओबीसी जातीच्या संघटनेचे प्रमुख आहे. याच समाजातून आलेले नारायण गुरू या आक्रमक धर्मसुधारकांनी केरळमधे मोठी सामाजिक क्रांती घडवली होती. वेलापल्ली नातेसन त्यांच्या विचारधारेशी जोडलेले असल्यामुळे विशेषतः शबरीमला प्रकरणात त्यांनी मुलाला विरोध केला होता. सध्या ते केरळातल्या डाव्यांच्या जवळचे मानले जातात. पण मुळात ते दारूचे व्यापारी आहेत. आणि एखाद्या कसलेल्या बिझनेसमनप्रमाणे ते नेहमीच सत्तेच्या सोबत असतात.

डाव्यांची नाराजी दूर कशी करणार?

राहुल यांनी वायनाड म्हणून उमेदवारी जाहीर केल्याबरोबर माकपचे नेते प्रकाश कारत यांनी आपली नाराजी व्यक्त केली. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दंड थोपटले. आमच्याविरोधात लढून तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता, असा डाव्यांचा राहुलना प्रश्न आहे.

डाव्या आघाडीत वायनाडची जागा सीपीआयला सुटलीय. तिथे त्यांचंही चांगलं प्रभावक्षेत्र आहे. पण मागील काही वर्षांत सत्ताधारी डाव्यांबद्दल नाराजीचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे तसंच राहुल यांचा एकूणच प्रभाव पाहता सीपीआय त्यांना मागच्या निवडणुकीसारखी लढत देऊ शकणार नाही.

हेही वाचाः वर्ध्याच्या सभेत नरेंद्र मोदी शरद पवारांवर का घसरले?

राहुल यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपली भूमिका स्पष्ट केलीय. ते म्हणालेत, केरळमधे काँग्रेसचा सत्तासंघर्ष डाव्यांशी आहे. तो सुरूच राहील. पण ते आमचे वैचारिक शत्रू नाहीत. त्यामुळे मी डाव्यांच्या विरोधात एक शब्दही उच्चारणार नाही.

राहुल यांचा विजय सोपाः वैभव छाया

सोशल मीडियातले तज्ञ आणि कवी वैभव छाया यांनी नुकतीच वायनाडला भेट दिली. त्यांनी कोलाजला सांगितलं, `या मतदारसंघात काँग्रेसची संघटना उत्तम आहे. दिवंगत शानासन यांच्या कुटुंबाचा प्रभाव परिसरावर आहे. ते ठामपणे राहुल यांच्या पाठीशी उभं आहे. इथली सामाजिक रचनाही राहुल यांना मदत करणारी आहे.`

`गेल्या दशकभरात या मतदारसंघाची लोकसंख्या जवळपास दुपटीने वाढलीय. ही वाढ शेजारच्या कर्नाटकातून आलेल्या मजुरांची आहे. हे काँग्रेस तसंच देवेगौडा यांना मानणारे मतदार आहेत. त्याचाही फायदा राहुलना होईल. शिवाय दक्षिण भारतीय महिलांमधे राहुल यांची वाढलेली क्रेझही त्यांच्या पथ्यावर पडेलच.`

`थोडक्यात मला तरी राहुल हरू शकतील, असा कोणताही घटक वायनाडमधे दिसला नाही.`

हेही वाचाः गुजरात भेटीनंतर राज उतरणीला लागले, तेच उद्धव यांचं होणार?