स्त्रीवाद ही खरंतर एक राजकीय विचारधारा आहे. पण राजकारण म्हटलं की त्यात राजकीय खेळी आलीच. पण ती आयडियालॉंजी असेल तर ही राजकीय खेळी सुद्धा विवेकानेच खेळावी लागते. पण इथे सगळ्यांनाच सोयीचं राजकारण करण्याची सवय लागलीय. त्यामुळे स्त्रीवादही प्रत्येकाने सोयीपुरताच मांडलाय. त्यामागची कारणमीमांसा करणारा हा लेख. महिला दिन विशेष.
खरंतर या अंगाने स्त्रीवादाची चर्चा करण्याचं काही कारण नव्हतं. पण मागे सोशल मीडियावर स्त्रीवादासंदर्भात जे काही वादळ उठलं, त्याचे पडसाद दीर्घकाळ टिकणारे आहेत. इथे स्त्रीवाद्यांचे वेगवेगळे गट पडले. आणि प्रत्येक गटातून स्त्रीवादाची वेगवेगळी मांडणी होऊ लागली. या सगळ्या मांडणीकडे तटस्थपणे पाहणं अवघड होतं. तुम्ही या गटाचं समर्थन केलं नाही तर आपोआप तुम्हाला त्या गटात ढकललं जात होतं. आणि त्या गटाचं समर्थन नाही केलं तर या गटात ढकललं जायचं. तर खरंच स्त्रीवाद असा गटातटात विभागलेलाय काय? प्रत्येक गटाचा स्त्रीवाद वेगवेगळा आहे? या प्रश्नांचा खूप दिवस विचार करत होतो. त्याचंच हे मुक्त चिंतन.
भारताची सामाजिक संरचना फार गुंतागुंतीची आहे. ही गुंतागुंत अनेक गोष्टींच्या मिश्रणातून, परस्परावलंबी प्रभावातून निर्माण झालीय. त्यामुळे कोणत्याही सामाजिक प्रश्नाचा सुटा विचार करता येत नाही. त्याला लगडून आलेल्या इतर प्रश्न, उपप्रश्नांचाही विचार करावा लागतो. स्त्रीवादाचाही असा सुटा विचार करता येत नाही. कारण त्याला जोडून इतर अनेक घटक आलेले असतात.
वरवर पाहता हा केवळ स्त्रीपुरुष सत्तासंबंधांचा लढा दिसत असला तरी त्याला अनेक कंगोरे आहेत. कारण हे स्त्रीपुरुष वेगवेगळ्या सत्तास्थानावर आहेत. ही सत्तास्थानं धर्म, जात, वर्ग आणि लिंग यांवर आधारित आहेत. लिंगभावातली विषमता नष्ट करून समताधिष्टीत समाज निर्मिती हे स्त्रीवादाचं ध्येय आहे. पण म्हणून स्त्रीवाद्यांनी केवळ लिंगभेदावर बोलणं म्हणजे समष्टीचा स्त्रीवाद नाही. हा लिंगभेद धर्म, जात आणि वर्गाने प्रभावित असतो हेही लक्षात घेतलं पाहिजे.
स्त्रियांचं सगळ्यात जास्त शोषण धर्मानेच केलंय. इथल्या सगळ्या भेदाचं मूळ धर्म आहे. पितृसत्ताक समाजव्यवस्थेला सगळ्यात मोठा आधार धर्माचाच आहे. महात्मा फुलेंना प्रत्येक वर्णातली स्त्री शुद्रच वाटत होती. म्हणून समग्र स्त्रीमुक्तीचा मार्ग धर्मचिकित्सा आहे असं ते वारंवार सांगत होते. धर्माची शिकार जशा निम्न जाती वर्गातल्या स्त्रिया आहेत तशाच त्या उच्च जात, वर्गीय स्त्रियाही आहेत. तरीही त्या धर्मचिकित्सा का करत नाहीत?
तथाकथित उच्च जात वर्गीय स्त्रीयांना धर्मापासून तोटे होतात. पण त्याचे फायदेही मिळतात हे वास्तव आहे. धर्मापासून तोटा कोणता होतो? तर धर्मसंमत पितृसत्ताक कुटुंबव्यवस्थेतलं दुय्यमत्व. आणि फायदे कोणते मिळतात तर जन्मजात सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक सुरक्षेचे स्रोत. अशावेळी त्यांनी धर्म नाकारला तर जन्मजात लाभलेली सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक स्रोतही नाकारावे लागतील. त्यापेक्षा घरातल्या घरात पुरुषसत्ता नाकारणं अधिक सोपं आणि सोयीचं होतं.
म्हणून उच्चवर्णीय स्त्रीवादी बऱ्याचदा फक्त पितृसत्ता नाकारतात. धर्म, जात, वर्ग, वर्ण नाकारत नाहीत. मराठी साहित्यातला स्त्रीवाद हा असा आहे. अर्थात तो चुकीचा किंवा टाकाऊ आहे असं नाही. फक्त तो समष्टीच्या न्यायाचा नाही एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि हा स्त्रीवाद फक्त लैंगिक स्वातंत्र्याचा उद्घोष करण्यापुरताच सीमित आहे असा त्यांच्यावर आरोप केला जातो. या विधानात काही अंशी तथ्य असलं तरी त्यामागची कारणमीमांसा जाणून न घेता त्यांची टिंगल करणं चूक आहे.
मुळात धर्म, जात, वर्णाचं प्रवेशद्वार स्त्री असल्यामुळे तिच्या लैंगिकतेवर नियंत्रण आणलं गेलं. बहुतेक सर्वच धर्मांनी स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य नाकारलंय. स्त्री ही पुरुषांना लैंगिक उत्तेजन देवून बिघडवते, म्हणून ती अध्यात्म मार्गातला धोंड आहे असं म्हणून तिची हेटाळणी केली. धर्माच्या नावाखाली त्यांचं प्रचंड लैंगिक शोषण आणि दमण केलं गेलं. त्यामुळे त्याविरुध्द स्त्रीवाद्यांनी आवाज उठवणं साहजिकच आहे. अर्थात पुन्हा ते पुरुषी क्रियेला प्रतिक्रिया या पातळीवरच उरतं का? हेही तपासून घेतलं पाहिजे.
एकाच धर्मातल्या सगळ्या स्त्रियांना समान स्थान, समान अधिकार नाहीत. जातीच्या उतरंडीनुसार त्यांचं स्थान आणि अधिकार ठरलेले असतात. ही उतरंड नीटपणे समजून घेतली तर स्त्रीवादाचा तिढा सुटू शकतो. चातुवर्ण्य व्यवस्थेअंतर्गत जातीव्यवस्थेची उतरंड असल्याने एकाखाली एक अशा चार स्त्रीपुरुषाच्या जोड्या कल्पू.
पहिली जोडी आहे ती उच्चजातीय स्त्री-पुरुषांची. यातला पुरुष त्यांच्या स्त्रीच्या डोक्यावर पाय देऊन उभा आहे. म्हणजे या स्त्रीला त्या पुरुषाचं ओझं वाहावं लागतं. दुसरी जोडी आहे ती मध्यम जातीय स्त्री पुरुषांची. यातल्या पुरुषाच्या डोक्यावर उच्चजातीय स्त्री आणि पुरुष दोघं उभं आहेत आणि तो त्याच्या स्त्रीच्या डोक्यावर उभा आहे. म्हणजेच या स्त्रीला उच्चजातीय स्त्रीपुरुष आणि स्वजातीय पुरुष अशा तिघांचं ओझं वाहावं लागतं.
तिसरी जोडी आहे ती मागास जातीय स्त्री पुरुषाची. यातल्या पुरुषाच्या डोक्यावर वरील उच्चजातीय आणि मध्यम जातीय स्त्री पुरुष उभे आहेत आणि तो एवढं वजन घेऊन आपल्या स्त्रीच्या डोक्यावर उभा आहे. म्हणजे तिच्या डोक्यावर उच्चजातीय स्त्री पुरुष, मध्यम जातीय स्त्री पुरुष आणि स्वजातीय पुरुष अशा पाच जणांचं ओझं आहे. सगळ्यात शेवटची जोडी आहे ती अति मागास स्त्री पुरुषांची. या पुरुषाच्या डोक्यावर वरच्या तीन जातींचं ओझं आहे आणि त्या ओझ्यासाहित तो स्वतः आपल्या स्त्रीच्या डोक्यावर उभा आहे.
म्हणजेच या स्त्रीला उच्चजातीय स्त्री पुरुष, मध्यमजातीय स्त्री पुरुष, मागास जातीय स्त्री पुरुष आणि स्वजातीय पुरुष अशा सात जणांचं ओझं वाहावं लागतं. म्हणून सगळ्यात जास्त ओझं तिच्यावरच आहे.
चातुर्वण्याच्या भाषेत बोलायचं झाल्यास ब्राम्हण स्त्रियांवर लैंगिक अधिकार फक्त ब्राम्हणांचाच असतो. क्षत्रिय स्त्रियांवर ब्राम्हण आणि क्षत्रिय अशा दोघांचा असतो. वैश्य स्त्रियांवर ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य अशा तिघांचा असतो आणि शुद्र स्त्रीवर ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र अशा सगळ्या वर्णातील पुरुषांचा असतो. म्हणजेच शुद्र स्त्री ही इथली सगळ्यात शोषित घटक आहे. तिला सगळ्यात जास्त लैंगिक हिंसेला समोरं जावं लागतं. तिच्या लढण्याच्या प्रायोरिटीज आणि ब्राम्हण स्त्रीच्या किंवा इतर स्त्रियांच्या लढण्याच्या प्रायोरिटीज यात फरक असणारच ना!
म्हणून ब्राम्हणी स्त्रीवाद हा सगळ्या स्त्रियांचा स्त्रीवाद असू शकत नाही. पण ज्या स्त्रिया स्त्री जात्यंतक चळवळीत सक्रीय सहभागी आहेत आणि समग्र स्त्री शोषणाच्या विरोधात ठामपणे उभ्या आहेत त्यांची केवळ ब्राम्हण म्हणून हेटाळणी करणं हाही एकप्रकारचा ब्राम्हण्यवादच झाला. त्यालाही आपण सिलेक्टिव स्त्रीवाद म्हणू शकतो.
आधुनिक भांडवली जगात जातीअंतर्गत एक नवी वर्गव्यवस्था उदयाला आलीय. या वर्गव्यवस्थेतल्या उच्चवर्गीय स्त्रियांचा स्त्रीवादही ब्राम्हणी स्त्रीवाद म्हणता येईल. त्यांच्याकडून जातीचा आधार फक्त आयडेंटीटीसाठी घेतला जातो. बाकी वैयक्तिक वर्तन आणि साहित्यिक धारणा सगळ्या ब्राम्हणी स्त्रीवाद्यांच्याच असतात. त्यामुळे त्यांचाही स्त्रीवाद अखिल स्त्रीमुक्तीचा नसतो.
शिवाय वेगवेगळ्या स्थानावर असणाऱ्या पुरुषांचा स्त्रीवादसुध्दा बराच सोयीचा आढळतो. पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या बऱ्याच पुरुषांना स्त्रीवादाची लढाई दुय्यम वाटते. अर्थात यालाही अपवाद आहेत. पण आपापल्या स्त्रियांना किती आणि कुठलं स्वातंत्र्य द्यायचं याच्या मर्यादा त्यांनी घालून दिलेल्या आहेत. स्वतःच्या पुरुषी भानावर आच येईल इतकं स्वातंत्र्य द्यायला कुणी धजत नाही. स्त्रीवादाचा सत्तासबंध हा असा एकमेकांनी प्रभावित झालेला आहे.
या सत्तेला बाधा उत्पन्न झाली की पुरुष बलात्काराचं अस्त्र उपसतो. शिवाय बलात्कार ही संकल्पना बरीचशी पौरुषेय आहे. त्याला इज्जत लूटणं असंही म्हटलं जातं. आता ही इज्जत म्हणजे असते तरी काय? ती फक्त स्त्रियांचीच असते का? तर नाही, ती स्त्रियांपेक्षा जास्त पुरुषांची, त्या त्या जातीची आणि त्या त्या धर्माची असते. ती सुरक्षित रहावी म्हणून मोठ्या शिताफीने पुरुषांनी तिला स्त्रियांच्या योनीत ठेवून दिलंय.
अर्थात त्या योनीवर ज्यांची मालकी असते, तेच तिच्यावर पहारेकरी असतात. या पहारेकऱ्यांचा अत्याचार बलात्कार समजला जात नाही. उलट तो त्यांचा हक्कच समजला जातो. पण यदाकदाचित पहारेकऱ्यांचा डोळा चुकवून तिच्या संमतीने ते योनीतलं घबाड दुसऱ्या कुणी लुटून नेलं तर त्याची परिणती खर्ड्यात होते अन् तिच्या मनाविरुध्द झालं तर कोपर्डीचा उद्रेक होतो.
असे बलात्कार दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार हा कुटुंबांतर्गत बलात्काराचा असतो. त्यात कुटुंबातल्या, नात्यातल्या, किंवा जातीतल्या पुरुषांनी केलेले बलात्कार हे गुन्हा म्हणून नोंदवलेच जात नाहीत. उलट असं प्रकरण दाबण्याकडेच कुटुंब किंवा समाजाचा कल असतो. अशा बलात्कारामुळे दलित किंवा सवर्ण रस्त्यावर उतरलेत, मोर्चे, आंदोलनं झालीत असं माझ्या तरी पाहण्या, ऐकण्यात नाही.
दुसऱ्या प्रकारात उच्चजातीय, उच्चवर्गीय किंवा सत्ताधारी पुरुषांकडून खालच्या जातीतल्या किंवा वर्गातल्या स्त्रियांवर होणारे बलात्कार. हे बलात्कारही फारसे उजेडात येत नाहीत. पण अलिकडे दलित चळवळींच्या सक्रियतेमुळे खैरलांजी, सोनई, खर्डा अशा तुरळक घटनांची नोंद घेतली जाते. मात्र न्यायालयात पीडिताच चारित्र्यहीन असल्याचे दावे मांडले जातात आणि इथेही पितृसत्ताक विचारप्रणाली अस्तित्वात असल्याने तिला दीर्घ अग्निपरिक्षेतून जावंच लागतं.
बलात्काराची मूळं इथल्या समाजव्यवस्थेमधे आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. शिक्षेने बलात्काराचा प्रश्न कायमचाच सुटेल असं नाही. स्त्री पुरुषात शारीरिक भेद वगळता इतर कुठलेही भेद नैसर्गिक नाहीत. ते सर्व मानवनिर्मित आहेत. म्हणून लिंगावर आधारलेल्या समाजाच्या भावना आणि दृष्टिकोन बदलले की हे भेद आपोआपच मिटून जातील हे सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे.
या भेदाचं मूळ इथली प्रचलित विवाह संस्था आहे. आणि या विवाह संस्थेनेच स्त्रियांना पुरुषांची खासगी मालमत्ता म्हणून मान्यता दिलेली असते. पुरुषांच्या या मालकी हक्काला धार्मिक अधिष्ठानही आहे. शिवाय कुटुंब प्रमुखपद पुरुषाकडे असल्यामुळे पुरुषात आपण मालक आणि स्त्रिया गुलाम, आपण शक्तिमान आणि स्त्रिया दुर्बल हा लिंगभाव बळावत जातो. या लिंगभावामुळेच पुरुषत्वाचा अहंकार हिमालयासारखा वाढत जातो.
बऱ्याचदा केवळ लैंगिक सुखासाठी बलात्कार होत नाहीत, तर या दुर्बळ स्त्री गुलामाने पुरुष मालकाला नकार दिला की आपोआप त्याच्या पुरुषी अहंकाराला धक्का लागतो आणि चिडून अशा हिंसक पध्दतीने बलात्कार केले जातात. कुठल्याही जातीतली स्त्री ही शुद्रच असते. मग ती दलित असो की मराठा, ब्राम्हण असो की मारवाडी.
कोपर्डी किंवा यापूर्वीच्या सगळ्या बलात्काराच्या घटनेत 'आपल्या' समूहातली स्त्री 'परक्या' समुहातल्या पुरुषाने भोगली म्हणून रस्त्यावर उतरणाऱ्यांनी आपल्या स्त्रियांना स्वातंत्र्य दिलंय का? त्यांना बरोबरीने वागवताहेत का? सर्व प्रकारचे अत्याचार थांबवलेत का? की फक्त आपली जागा परक्याने घेतलीये एवढाच आक्रोश आहे हे जरा तपासलं पाहिजे.
कारण युध्दात किंवा दंगलीत पुरुष एकमेकांना नामोहरम करण्यासाठी, अपमानित करण्यासाठी एकमेकांच्या इज्जतीवर हल्ला करतात. अर्थात हा हल्ला थेट स्त्रियांच्या योनीवरच होत असतो. म्हणून युध्द किंवा दंगलीत सगळ्यात जास्त अत्याचार स्त्रियांवर होतात.
कोपर्डी बलात्कारानंतर मराठ्यांचे जे लाखोंचे निषेध मोर्चे निघताहेत ते स्त्री अत्याचार विरोधात आहेत असं अजिबात नाही. फक्त पीडिता जातीने मराठा होती म्हणून हे मोर्चे निघत आहेत, हे त्यामागचं वास्तव आहे. कदाचित ती भटक्या, आदिवासी अशा छोट्या असंघटित समूहापैकी असती, तर या गुन्ह्याला वाचाही फुटली असती की नाही कुणास ठाऊक? मग स्त्रीवाद म्हणून आपण या घटनांकडे कसं पाहणार आहोत?
स्त्रीवाद ही खरंतर एक राजकीय विचारधारा आहे. पण राजकारण म्हटलं की त्यात राजकीय खेळी आलीच. पण ती आयडियालॉंजी असेल तर ही राजकीय खेळी सुद्धा विवेकानेच खेळावी लागते. पण इथे सगळ्यांनाच सोयीचं राजकारण करण्याची सवय लागलीय. त्यामुळे स्त्रीवादही प्रत्येकाने सोयीपुरताच मांडलाय.
स्त्री आणि पुरुषाने एकमेकांचं सहअस्तित्व मान्य करून, एकमेकांच्या बरोबरीने, एकमेकांचं शोषण न करता, एकमेकांच्या स्वातंत्र्याला नख न लावता, एकमेकांचा आदर ठेवून केलेला समतामुलक व्यवहार म्हणजे स्त्रीवाद! स्त्रीवाद हा पुरुषांच्या विरोधात नाही हे एकमेकांना शत्रू समजून आखाड्यात दंड थोपटणाऱ्या स्त्री आणि पुरुष दोघांनी समजून घ्यायला हवं.
स्त्रीवाद पितृसत्तेच्या विरोधात आहे. पितृसत्तेला बळकट करणाऱ्या धर्म, जात, वर्ग, वर्ण आणि लिंगभावाच्या विरोधात आहे. शोषणमुक्त समतामुलक समाजव्यवस्था उभी करण्यात जे जे अडथळे आहेत त्या सगळ्यांच्या विरोधात स्त्रीवाद उभा आहे. निव्वळ पुरुषांना शिव्या देऊन कुणी स्त्रीवादी बनू शकत नाही आणि स्त्रियांची टिंगल टवाळी करून पुरोगामी बनत नाही.
स्त्रीवाद हा फक्त विचार नाही तर तो आचार आहे. असं आचारण असणाऱ्या स्त्रियांना मी स्त्रीवादी आहे असं सांगण्याची गरज नाही. ते आपोआपच त्यांच्या जगण्यातून, लेखनातून दिसत असतं. स्त्रीवाद हा केवळ स्त्रियांसाठी नाही. तो पुरुषांसाठीही आहे. जो पुरुष पितृसत्तेचे जन्मजात फायदे नाकारून त्याचे तोटे स्त्रियांना होऊ नये याची काळजी घेतो, त्यासाठी प्रयत्न करतो तो पुरुषही स्त्रीवादी असू शकतो.
उच्चजातीयांना जातीचे जन्मजात फायदे नाकारणं जेवढं जड जातं तेवढंच जड पुरुषांना पुरुष म्हणून मिळाले जन्मजात फायदे नाकारताना जातं. हे दलित पुरुषांना अधिक व्यवस्थित समजू शकेल.
शेवटी समष्टीचा स्त्रीवाद कसा असेल? तर सगळ्या स्त्रियांना जात, धर्म, वर्ग, वर्णाची सत्ता बाजूला ठेवून एकमेकांच्या डोक्यावरून खाली उतरावं लागेल. स्त्रीवादी पुरुषांनीही आपणहून खाली उतरून त्यांच्या सोबतीने एका समान रेषेत उभं राहावं लागेल. आणि मग एकत्रितपणे डोक्यावरच्या पितृसत्तेला खाली ढकलावं लागेल. तरच समष्टीचा स्त्रीवाद फळू शकेल. नाहीतर आपापले छोटे छोटे गट तयार करून हितसबंधी स्त्रीवादाचा खेळ खेळता येईल. सध्या तेच तर सुरु आहे.
.
(लेखक हे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव इथल्या मविप्र समाजाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागप्रमूख आहेत. हा लेख २०१८ च्या पृथा दिवाळी अंकात छापून आलाय. )