महागुरू सचिन पिळगावकरांना लोक शिव्या का घालतायंत?

२८ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ७ मिनिटं


‘महाहाग्रू नाही सुधारणार. एक तर हा थेरडा नाटकी वागतो, नाटकी बोलतो, नाटकी अभिनय करतो. हे कमी की काय म्हणून इतकी वर्ष 'एकापेक्षा एक' घाणेरडे विग घालून फिरतो.’ ही युट्यूबवरची एक कमेंट आहे. महागुरू सचिन पिळगावकर यांच्या 'लव्ह यू जिंदगी' नावाच्या एका सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे महागुरू ट्रोल होतायंत. असं पुन्हा पुन्हा घडतंय. एवढ्या ज्येष्ठ अभिनेत्यासोबत हे असं का घडतंय?

‘महाहाग्रू नाही सुधारणार. एक तर हा थेरडा नाटकी वागतो, नाटकी बोलतो, नाटकी अभिनय करतो. हे कमी की काय म्हणून इतकी वर्ष 'एकापेक्षा एक' घाणेरडे विग घालून फिरतो.’

हे काही माझं मत नाही. युट्यूबवर माइक सावंत नावाच्या एका माणसाने हे कमेंट बॉक्समध्ये लिहिलंय. महागुरू सचिन पिळगावकर यांचा 'लव्ह यू जिंदगी' नावाचा सिनेमा येणार आहे. त्या सिनेमाचा एक ट्रेलर आताच रिलीज झालाय. त्या ट्रेलरखाली ही कमेंट सापडली. बरं, अशी कमेंट करणारा माइक हा काही एकटाच नाही. अजून असे शंभर एक 'माइक' आहेत. जणू काही पिळगावकर त्यांच्या आ़डीतले आंबे चोरून पळालेत, अशा अविर्भावात त्यांना शिव्या घातल्यात.

'याच्या अंगावर राखी सावंत सोडा रे'

तुम्हाला उगाच युट्यूबर जाऊन कमेंट वाचाव्या लागू नयेत, म्हणून मोजक्या कमेंट इथे देतोय.

आकाश शिंदे नावाच्या एका युजरने कमेंट केलीय. तो लिहतोय, ‘या ट्रेलरला डिस्लाईक करा, म्हणजे त्या म्हाताऱ्याला कळेल, की तो खरंच म्हातारा झालाय!’ प्रथमेश सावंत नावाच्या एका व्यक्तीने तर महागुरूंची दीपक कलालशी तुलना केलीय. दीपक कलाल म्हणजे राखी सावंत ज्याच्याशी लग्न करणार होती, तो नमुना. प्रथमेशने महागुरूंना, मराठीतला दीपक कलाल, असं म्हटलंय. आणि वरुन खट्ट्याळपणे 'फ्रेण्ड्स मुजे टाटा किजो!' असंही सांगितलंय. 

कमेंट बॉक्समध्ये दीपक कलाल आला आणि त्याच्या पाठोपाठ सचिनजींचा अष्टविनायक सिनेमा पाहून 'ओह गॉड गणपती बाप्पा'वर श्रद्धा बसलेली राखी सावंतही आली. अँडी मरे नावाच्या एका व्यक्तीने तर भयंकर कमेंट केलीय, ‘हा लफंगेपणाचा कळस आहे. कुणीतरी याच्या अंगावर राखी सावंत सोडा रे’ .

काही लोक तर महागुरूंच्या जिवावरच उठलेत. मंजुळा एदलाबादकर नावाच्या एका बाईने तर चक्क ‘सचिन पिळगावकरने आता आत्महत्या करुन महाराष्ट्रावर उपकार करावेत आणि पृथ्वीवरचं ओझं कमी करावं’, असंच लिहलंय. आता हे सगळं विकृतीचं दर्शन घडवणारंच आहे. याचं समर्थन करता येत नाही.

हेट यू महागुरू, पण प्राऊड ऑफ यू कविता

पण पुन्हा प्रश्न हाच आहे, की हे सगळं का? महागुरू सचिन पिळगावकरांना लोक शिव्या का घालतात? त्यांनी तर नसीरुद्दीन शहा अथवा आमीर खानसारखी धाडसी विधानंही केलेली नाहीत. मग तरीही महागुरूंच्या नशिबी हा द्वेष का? याचं उत्तर एका शब्दात 'स्वभाव' असं मिळतं. आता हा स्वभाव लोकांचा की महागुरूंचा, हे तुमचं तुम्हीच ठरवावं.

याबद्दल लिहायला घेतलं तेव्हा महागुरूंच्या 'लव्ह यू जिंदगी' सिनेमाच्या ट्रेलरवर १८९ कमेंट्स होत्या. बहुतांश कमेंट्स शिव्या देणाऱ्याच आढळतात. दहा एक कमेंट्स प्रार्थना बेहरेच्या फॅन्सच्या आणि तितक्याच कविता लाड मेढेकर यांच्या चाहत्यांच्या. बाकी सगळं 'हेट यू महागुरू'च सुरू होतं.

पण या सगळ्यातही काही लोकांनी सचिनजी यू आर बेस्ट, बेस्ट अॅक्टर, सैराटचा रेकॉर्ड मोडा वगैरेही लिहिलं होतं. आता हे वाचून मला कळलंच नाही, की या माणसांना महागुरूंचे फॅन्स म्हणून मोजायचं की पराकोटीची उपरोधिक माणसं वगैरे. पण आपण यांना फॅन्सच म्हणू. सगळंच कसं अगदी वाईट वाईट असेल. त्यातूनही एका कमेंटने विशेष लक्ष वेधलं. ती कमेंट होती.

यूं ही कोई पिळगावकर का फॅन नही होता

‘शाहरुख, सलमान हीरो म्हणून चालतात. मग आपले मराठी पिळगावकर का नाही? सचिन सर, तुम्ही बेस्ट आहात. आणि राहणार! ऑल द बेस्ट. मराठी माणसांनी आता पाय खेचणे बंद करा.’ बाप रे! शिव्यांनी भरलेल्या कमेंट बॉक्समध्ये कौतुक करणारी ही एकमेव इतकी मोठी कमेंट होती. तीही देवनागरी मराठीत वगैरे. म्हणून जरा शंकाच आली. कमेंट करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं सचिन बामगुडे.

मग लक्षात आलं, हा या सिनेमाचा प्रोड्युसर आहे. ते म्हणतात ना, कुछ तो मजबुरिया रही होंगी, यूं ही कोई पिळगावकर का फॅन नही होता. याचा प्रत्यय आला. बाबा रे, तू ज्यांना 'बेस्ट' म्हणतोयस त्यांची सध्याची अवस्था खरंच मुंबईतल्या ‘बेस्ट’ प्रशासनासारखी आहे, असं सांगावंसं वाटलं. तुझ्याही तिजोरीत खडखडाट होईल आणि लोकांचे पेमेंट थकतील, असं सांगण्याचा उद्दामपणाही करावासा वाटला. पण ही कमेंट करणं म्हणजे महागुरूंचा मुंबई अँथम विडिओ पाहण्यासारखं आहे, असं समजून स्वतःला आवरलं.

पण वाटलं की, या निमित्ताने आपण या बहुआयामी अभिनेत्याच्या अधोगतीमागच्या कारणांचा विचार करायला हवा. कारण नुसतंच घालून पाडून किती बोलणार? पिळगावकरांपेक्षा आपण काहीतरी प्रोडक्टिव करतोय, असं किमान आपल्याला तरी नको का वाटायला?

लोक म्हणाले, हा तर लाल गंधर्व

हा प्रकार अभिजात मराठी भाषेचं मूळ शोधण्याइतकाच कठीण आहे. अनेकांची यात मतमतांतरं आहेत. काही लोक म्हणतात की ते टीवीवर परीक्षक म्हणून बसले आणि 'महागुरू' झाले तेव्हापासूनच या कॅम्पेनची सुरवात झाली. तर काही जण या कॅम्पेनला त्यांच्या एका गाजलेल्या मुलाखतीशी जोडतात.

वर्षभरापूर्वी एका मराठी न्यूज चॅनेलला महागुरूंनी मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी कम्युनिस्टांनाही लाजवेल इतकी लाल रंगांची उधळण केली. यानंतर प्रेक्षकही, 'हा तर लाल गंधर्व!' म्हणायला मजबूर झाले. माझ्या अंदाजाने तरी तेव्हापासूनच सोशल मीडियावर सचिन खऱ्या अर्थाने 'पीळ-गावकर' झाले. त्यांचे मीम्स आले. पेजेस आले. वीडियो बनले. वगैरे वगैरे शक्य, अशक्य तितक्या सगळ्या गोष्टी घडल्या.

'सचिन पीळ-गांवकर' असं स्वतंत्र ट्रोलिंग पेज त्यांच्यावर काढलं गेलं. या वर्षभरात महागुरूंनीही या पेजला पुष्कळ खाद्य पुरवलं. मुंबई अँथममुळे अमराठी लोकांमध्येही 'हेट यू महागुरू' ट्रेण्ड रुजला. वाढला. 'त्या' सचिनने शेन वॉर्नला धुवावं तसं या सचिनला लोकांनी धुतलं. इतकं की महागुरू सचिन यांना भली मोठी पोस्ट लिहून खुलासा करावा लागला. युट्यूबवरुन विडिओ हटवून पुन्हा टाकावा लागला.

मग त्यांचं ते बी ग्रेड म्युझिक विडिओच्या जवळ जाणारं 'दिमाग में भुसा' वगैरे शब्द असलेलं गाणं प्रदर्शित झालं. लोक अजूनच संतापले. महागुरू पुन्हा ट्रोल झाले. होतंच राहिले.

हा माझा मार्ग चुकला

अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, निर्माते, गायक, संगीतकार, वगैरे वगैरे असलेले महागुरू मराठी चित्रपट सृष्टीसाठी एखाद्या वटवृक्षासारखेच आहेत. मात्र हा वटवृक्ष दोरे बांधून पुजण्याच्या लायकीचा नाही, तर सुतळी बांधून झाकण्याच्या लायकीचा झालाय, असं लोकांना का वाटू लागलं? हे आपण समजून घ्यायला हवं.

'हा माझा मार्ग एकला ते हा माझा मार्ग चुकला', असं महागुरू पिळगावकरांच्या सिनेमातल्या कारकीर्दीचे एका वाक्यात वर्णन करता येईल आणि पुढे निघून जाता येईल. मात्र असं करणं फारच उथळ ठरेल. या माणसाने आपल्याला खूप एंटरटेन केलंय, हे विसरून चालणार नाही. लक्ष्या, महेश कोठारे, अशोक सराफ या धडाकेबाज त्रिकोणाचा हा चौथा कोन. जो कधीच त्यांच्यातला वाटला नाही. 

किंबहुना या अभिनेत्यांना मिळालेलं ज्येष्ठत्व आणि श्रेष्ठत्व पिळगावकरांच्या नशिबी आल्याचं काही दिसत नाही. ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘गंमत जंमत’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनावबनवी’, ‘आयत्या घरात घरोबा’ ते ‘नवरा माझा नवसाचा’ सारख्या सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मोक्कार मनोरंजन केलं. जे स्थान हिंदीत 'अंदाज अपना अपना'ला आहे, तेच स्थान मराठीत पिळगावकरांच्या 'अशी ही बनवाबनवी'ला आहे.

चेतन शर्माचं झालं तसंच पिळगावकरांचं होतंय

सिनेमा हा डायरेक्टरचा असतो, असं म्हणतात. म्हणजे हे श्रेय पिळगावकरांचंच. मात्र ते त्यांच्याकडे जात नाही. लक्ष्या आणि अशोक सराफ यांची जोडी प्रेक्षकांची सगळी शाब्बासकी घेऊन जाते आणि महागुरू केवळ 'मुंबई अँथम' आणि 'दिमाग में भूसा'साठीच लक्षात राहतात. तुमचं एक चुकीचं पाऊल तुमच्या अख्ख्या कारकीर्दीची अखेर करु शकतं, याचंच हे उदाहरण.

जे स्थान चेतन शर्माच्या आयुष्यात जावेद मियांदादला टाकेलल्या फुलटॉसचं असेल, तेच पिळगावकरांच्या आयुष्यात मुंबई अँथमचं असेल, यात शंका नाही. फक्त इथे झोडणारे मियादाद बरेच झालेत, हेच काय ते अधिकचं दुःख. पण केवळ एका विडिओचं हे फलित नाही. त्याला अजून एक गोष्ट प्रामुख्याने जबाबदार वाटते, ती म्हणजे त्यांचा 'स्वभाव'.

म्हणजे बघा ना, ९० च्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या नशिबी बऱ्याच फुटकळ भूमिकादेखील आल्या. त्यासाठी ते कधी ट्रोल झाले नाहीत. मात्र महागुरूंच्या बाबतीत अगदी उलट घडलं. त्यांनी त्यातल्या त्यात बऱ्या भूमिका केल्या. म्हणजे उद्योगपती, संगीतकार, वगैरेही झाले. पण या सगळ्यात एक फरक जाणवतो तो म्हणजे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या भूमिका कायमच विनम्रतेने साकारलेल्या वाटल्या.

पिळगावकरांचा मूळ स्वभाव ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिनही लपला नाही. किंबहुना तो त्यांना लपवता आला नाही. स्वभावाचा पीळ कायम राहिला. जसं काशिनाथ घाणेकर यांचा घात 'आणि' या शब्दाने आणि त्याभोवतीच्या वलयाने केला असावा. तसाच सचिन पिळगावकर या कलाकाराचा घात 'मी' या शब्दाने आणि त्याभोवतच्या अहंकाराने केला, असं राहून राहून वाटतं.

लहानपणीची गोष्ट आठवून बघा

महागुरू सचिन पिळगावकर त्यांच्या करियरच्या शेवटाकडे आहेत, असं वाटायचं कारण नाही. त्यांची मेहनती वृत्ती पाहता, ते केव्हाही उभारी घेऊ शकतात, असा आशावाद वाटतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना दर निवडणुकीत वाटतो ना, अगदी तसाच.या ट्रेलरला डिस्लाईक करा, म्हणजे त्या म्हाताऱ्याला कळेल, की तो खरंच म्हातारा झालाय!’ ही त्या विडिओवरची कमेंट मला महत्वाची वाटते.

इथे म्हातारपण कसं वाईट वगैरे आहे, असा अर्थ घ्यायला नको. तर त्या म्हातारपणाची जाणीव न होणं हे कसं वाईट आहे, हे समजून घेणं महत्वाचं वाटतं. आपण जसे आहोत, तसे स्वतःला स्वीकारायला हवंय. त्यानुसार रोल निवडायला हवा. सचिन पिळगावकर ज्यांचा उल्लेख 'त्यांचे ज्युनिअर' असा करतात, त्या अमिताभ बच्चन यांच्याकडून त्यांनी म्हातारपण मिरवणं शिकायला हवंय.

आपलं टक्कल लपवताना नसीरुद्दीन शहाने अनेक वर्ष मिरवलेला डोक्यावरचा पांढरा अनुभव लक्षात घ्यायला हवा. ते करिअरच्या या टप्प्यावरही काहीतरी बरं करू शकतील अशी आशा आहे. त्यासाठी त्यांनी फक्त 'मी मी' ऐवजी 'आपण आपण' वृत्तीकडे वळण्याची गरज आहे. पण आपण सगळ्यांनी लहानपणी एका पाईपमध्ये घातलेल्या शेपटीची गोष्ट वाचलेली असते. तीही विसरता येत नाही. कदाचित म्हणूनच लोक महागुरू सचिन पिळगावकरांना शिव्या घालत असावेत.