नरेंद्र मोदींची शेवटची प्रचारसभा रंगली नाहीच

२० ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हजेरीत काल भाजप, शिवसेना महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा झाली. त्यासाठी महायुतीने या सभेसाठी सारी शक्ती पणाला लावली होती. पण सभा काही गाजली नाही. गर्दीही कमी झाली. खुर्च्या रिकाम्या राहिल्या. श्रोतेही मोदींचं भाषण सुरू असतानाच जाताना दिसले. त्याचा आंखो देखा हाल.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना महायुतीची शेवटची संयुक्त प्रचारसभा काल शुक्रवारी मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्पेक्स इथल्या मैदानावर झाली.  भाजपच्या प्रचाराची तोफ असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सभेला मित्रपक्षांचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनीही हजेरी लावली.

महायुतीच्या संयुक्त सांगता सभेसाठी वांद्रे स्टेशनवरून दुपारी चारलाच रिक्षाने निघालो. रिक्षावाल्याने सांगितलं की वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्सच्या एमएमआरडीए मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा असल्याने तिकडे खूप गर्दी असल्याचं सांगितलं. गाड्यांपेक्षा माणसांच्या गर्दीने तिकडे ट्रॅफिक जाम असल्याचंही तो म्हणाला. पुढे गर्दी असल्याचं सांगून रिक्षावाल्याने आम्हाला मैदानापासून जवळपास एक किलोमीटर लांब अंतरावरच सोडलं.

तिथून चालत मैदानाच्या दिशेने निघालो. रस्त्यात कुठे कुठे कार्यकर्ते आणि पोलिस दिसत होते. त्यांना विचारतच सभेच्या एंट्री गेटकडे गेलो. तिथे पोचेपर्यंत पाच वाजले. सातच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरू होती. सभेला पंतप्रधानच येणार असल्यामुळे पोलिस बंदोबस्तही तगडा होता. सभेची वेळ सायंकाळी सातची होती. पण कार्यकर्त्यांसोबतच सभा ऐकायला येणाऱ्यांची गर्दी जमायला सव्वासातला सुरवात झाली. 

आठवलेंना भाषण लांबवण्याची सूचना

मैदानावरच्या अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या असतानाच भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या भाषणाने सभेला सव्वासातला सुरवात झाली. त्यानंतर विधानसभेचं तिकीट कापलं ते विद्यमान मंत्री विनोद तावडे, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, विनायक मेटे, रामदास आठवले यांनी भाषणं केली.

आठ वाजले तरी पंतप्रधान आले नाहीत. त्यामुळे आपली बॅटिंग करून माघारी फिरण्याच्या तयारीत असताना आठवले यांना स्टेजवरूनच भाषण लांबवण्याची सूचना करण्यात आली. मैदानाच्या चार बाजूंनी आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आजच्या सभेचे बॅनर्स लावले होते. आठवलेंशिवाय महायुतीतल्या कुठल्याच पक्षाने बॅनर लावण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसलं नाही. सगळीकडे भाजपच्या पुढाकाराने लागलेले बॅनर्स होते.

हेही वाचाः शरद पवार पावसात भिजल्यानं भाजपचे डोळे ओले होणार?

मोदी आल्यावरही मैदानावरच्या खुर्च्या रिकाम्याच

सव्वाआठच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी आले. डीजेवर तुतारी वाजवून त्यांचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. त्यांच्यासोबत स्टेजवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. पंतप्रधानांच्या उपस्थितीत फडणवीस यांच्या भाषणाला सुरवात झाली. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झाल्यावरही सभास्थळी लोकांचं येणं चालूच होतं. मैदानावरच्या अर्ध्याअधिक खुर्च्या रिकाम्याच होत्या.

फडणवीस म्हणाले, ‘आम्ही लहान लोकांशी लढत नाही. लहान मुलांशी लढत नाही. खरंय पवार साहेब! आम्ही लहान आहोत. पण एक गोष्ट तुम्हाला विचारतो. पाच वर्षे पदोपदी तुम्ही आमच्याशी सामना केलात. आम्ही तुमच्याशी लढलो. मात्र या लहान मुलांनीच तुमच्या पक्षाला चारीमुंड्या चित्त केलंय. काही लोक नखं कापून जखमी झाल्याचा आव आणतात. नखं कापून शहीद झाल्याचा आव आणतात आणि म्हणतात आम्ही ईडीला घाबरत नाही. पण आम्हाला ईडीची गरजच नाही.’

हेही वाचाः आश्चर्यच, मुंबईत काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढू शकेल

ठाकरेंकडून राम मंदिराची हवा

उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात काँग्रेस, राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली. पंतप्रधान मोदींनी महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत अयोध्येतल्या राम मंदिरावर बोलणाऱ्यांना बोलघेवडं म्हणून टोला लगावला होता. हा टोला ठाकरेंनाच होता असं म्हटलं गेलं. आजच्या भाषणातही ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीतच राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला.

ठाकरे म्हणाले, ‘एका महिन्यात दोन विजयादशमी आहेत. पहिली ८ ऑक्टोबरला झाली, दुसरी २४ तारखेला निवडणुकीच्या निकालादिवशी साजरी होईल. एवढंच नाही तर या महिन्यात दोन दिवाळी आहेत. दुसरी दिवाळी अयोध्येची. राम मंदिराची.’ मैदानावर एका कोपऱ्यात बसलेले शिवसैनिक ठाकरे यांच्या भाषणाला जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते.

ठाकरे यांनी आपल्या भाषणात एक चिंता बोलून दाखवली. बेमोसमी पावसामुळे आपल्याला काही सभा रद्द कराव्या लागल्यात. अशीच भीती आजच्या सभेबद्दलही होती. पण आता सभा सुरळीत सुरू असल्याचं ठाकरे म्हणाले. ठाकरे यांचं भाषण संपताच मैदानावरचे शिवसैनिकांचे छोटेछोटे जत्थे बाहेर पडू लागले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणाला उठल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी मोदी मोदी असा घोष करत त्यांचं स्वागत केलं. मोदींनीही समोर लावलेल्या स्क्रीनवर वाचून कसे आहात मुंबईकर असं विचारत उपस्थितांना साद घातली. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यासोबतच केंद्र सरकारने केलेल्या वेगवेगळ्या कामांचा लेखाजोखा मांडला. 

विरोधकांवर सडकून टीका

मोदी म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांत मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला का, असं विचारत पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका केली. तसंच याआधी हल्ले कुणी केले हे माहीत असूनही सरकारने त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली. हल्ल्याच्या मास्टरमाईंडला काहीच केलं नाही. कलम ३७० आणि ३५ए याच लोकांमुळे इतके दिवस अस्तित्वात राहिलंय. याचमुळे काश्मीर खोऱ्यातला दहशतवाद वाढत गेला. भ्रष्टाचार वाढला. अनेकांना अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलं. पण काँग्रेसने फक्त आपल्या स्वार्थाचं राजकारण केलं.’

काँग्रेसने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर काहीच केलं नाही असा आरोप करताना मोदी म्हणाले, ‘आम्ही कलम ३७० आणि ३५ ए हटवलं. जम्मू काश्मीर, लडाखसोबत एकजुटीने उभं राहण्यापेक्षा विरोधक कुणासोबत उभं आहेत, ते कुणाची वकिली करताहेत? पीडितांना न्याय देण्याची भाषा सुरू होते तेव्हा काँग्रेस आणि त्यांचे सहकारी दहशतवाद्यांचा बचाव करू लागलात, असं का होतं?’

‘१९९३ च्या दहशतवादी हल्ल्यांचे घाव मुंबईकर कधीच विसरू शकत नाहीत. या हल्ल्याचे सूत्रधार देशातून पळून गेले. आरोपींना पकडण्याऐवजी हे लोक त्यांच्यासोबत व्यापार करताहेत.’ मोदींनी आपल्या सगळ्या सभांप्रमाणेच महायुतीच्या सांगता सभेतही काश्मीरच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यावरूनही विरोधकांवर टीका केली. 

मोदींनी आतापर्यंतच्या प्रचारात मांडलेले मुद्देच थोड्याफार फरकाने मुंबईतही सांगितले. पण मोदी मोदी मोदी असा जयघोष करत नरेंद्र मोदींचं भाषण डोक्यावर घेणारा आवाज ऐकायला मिळाला नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा असली तरी इथे कार्यकर्ते मात्र भाजपचेच दिसत होते. काही छोटे जत्थे वगळता शिवसैनिक दिसले नाहीत.

हेही वाचाः मोदी-राहुल यांची महाराष्ट्रातल्या प्रचाराची बोहनी काय सांगते?

गर्दी जमवताना नाकीनऊ

मोदींनी महाराष्ट्रातल्या प्रचार सभांमधे आपल्या भाषणासाठी सरासरी ५० मिनिटं घेतली. या सभांमधून त्यांनी विरोधकांवर सविस्तर टीका केली. पण मोदींनी बीकेसीवरचं आपलं भाषण ३० मिनिटांतच आटोपलं.

मोदींचं भाषण सुरू असतानाही लोकांची मैदानावर येजा सुरूच होती. शेकडो खुर्च्या रिकाम्याच राहिल्या. सभेच्या सुरवातीपासूनच मैदानावर मागच्या बाजूने ठेवलेल्या खुर्च्या रिकाम्याच होत्या. कलम ३७०, बालाकोट सर्जिकल स्ट्राईक यासारख्या मुद्द्यांनाही उपस्थितांमधून विशेष प्रतिसाद मिळताना दिसला नाही.

मुंबईतल्या सहाही जागा भाजप, शिवसेनेकडे आहेत. मुंबई महापालिकेवरही दोन्ही पक्षांची एकहाती सत्ता आहे. ज्या वांद्रे पूर्व मतदारसंघात ही सभा होती, त्या भागातच उद्धव ठाकरेंचा मातोश्री बंगला आहे. असं सगळं असतानाही भाजप, शिवसेना महायुतीला सभेसाठी गर्दी जमवताना नाकीनऊ आले. तरीही शेवटपर्यंत मैदान अर्ध्याहून अधिक रिकामंच राहिलं. टीवीवर दिसणारे मोदी मोदी मोदीचे नारेही सभेत फारसे ऐकायला मिळाले नाहीत.

हेही वाचाः 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं वेगळेपण काय?

विदर्भातील दहा हाय व्होल्टेज लढतीकडे राज्याचं लक्ष

आपण तरुणांनी मतदान करताना काय विचार करायला पाहिजे? 

डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रश्नांची नरेंद्र मोदींकडे उत्तरं आहेत का?

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या भाषणातल्या चार महत्त्वाच्या गोष्टी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार या पाच मुद्द्यांभोवती फिरणार