नरेंद्र मोदींनी सफाई कामगारांची पाद्यपूजा का केली?

२६ फेब्रुवारी २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


कुंभमेळ्यात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच सफाई कामगारांची पाद्यपूजा केली. सगळीकडे बातम्यांना युद्धज्वर चढलेला असल्यामुळे सोशल मीडियाच्या पलीकडे त्यावर चर्चा झाली नाही. सफाई कामगारांसाठी खूप काही करता येणं शक्य असूनही फक्त पाद्यपूजेसारख्या दिखाऊ आणि प्रचारकी गोष्टी मोदी का करत राहतात, हे समजून घ्यायला हवं.

महाराष्ट्राचे पहिले सहकारमंत्री बाळासाहेब भारदे यांनी भारतीय राजकारणाविषयी केलेलं एक विधान प्रसिद्ध आहे, 'काँग्रेस म्हणजे खुर्च्या, समाजवादी म्हणजे चर्चा, कम्युनिस्ट म्हणजे मोर्चा आणि संघ म्हणजे पूजाअर्चा'. यात जनसंघ किंवा भाजपचं नाव नसून संघाचं नाव आहे याची एक वेगळी नोंद घ्यायला हवी. त्यांचं हे निरीक्षण मार्मिक असलं तरी आजच्या संदर्भात पाहता 'भाजप म्हणजे खुर्च्या' असा बदल करणं अवाजवी ठरणार नाही.

हे तर निषेधार्ह

विविध पक्षांचं राजकारण कुठल्या अंगाने पुढे सरकतं, त्यातलं चूक बरोबर काय, राजकीय अपरिहार्यता आणि नैतिक पेच यांच्यातील संघर्षाचं काय याविषयी आपण विचार करू लागलो तर एक मोठाच 'डिस्कोर्स' उभा राहतो. राजकीय अभ्यासक त्याची मांडणी करतच असतात. परंतु गेल्या काही वर्षात उजव्या विचारसरणीचा वाढलेला प्रभाव, केंद्रातील भाजप सरकारवर आणि विशेषतः नरेंद्र मोदींवर होणारी टीका आणि दुसऱ्या बाजूला त्यांना मिळत असलेला जनाधार या पार्श्वभूमीवर उजव्या विचारसरणीच्या विविध पैलूंवर सातत्याने चर्चा होते.

याच मालिकेतला एक ताजा मुद्दा आहे, नरेंद्र मोदींनी कुंभमेळ्यातल्या पाच सफाई कर्मचाऱ्यांची केलेली पाद्यपूजा. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार नरेंद्र मोदींनी पाच कामगारांचे पाय धुतले आणि त्यांना 'कर्मयोगी' असं संबोधलं. त्यानंतर ते म्हणाले, 'सफाई कामगार हे खरे सेवक आणि तपस्वी आहेत'.

यानंतर समाजमाध्यमांवर आणि इतरत्र अपेक्षेप्रमाणे चर्चा सुरू झालीच. त्यात अर्थातच टीका आणि समर्थन दोन्ही सूर होते. मला व्यक्तिशः हे कृत्य देशातील हजारो सफाई कामगारांच्या मूलभूत प्रश्नांची क्रूर खिल्ली उडवणारं वाटलं. निषेधार्ह वाटलं. सफाई कामगारांची, हाताने मैला वाहणाऱ्यांची अवस्था कुणापासून लपून राहिलेली नाही. गटारातील विषारी वायूमुळे देशात गेल्या वर्षी शंभरच्या वर सफाई कामगारांचे मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काही कामगारांचे पाय धुऊन पंतप्रधान काय सुचवू पाहतात?

फक्त प्रतीकांनाच महत्त्व

परंपराप्रिय आणि भावनाप्रधान अशा बहुसंख्य भारतीय जनतेला भारावून टाकण्याचा हा प्रयत्न नक्की कुठल्या चौकटीत टाकायचा असा प्रश्न पडतो. तो राजकारणाच्या चौकटीत घालणं भाजप समर्थकांना मान्य होणार नाही. त्याला खरोखरीचा उमाळा, खरोखरीच सद्गदित होऊन केलेलं कृत्य म्हणावं तर अशा प्रतीकात्मक कृतीपेक्षा बरंच काही करण्याचं सामर्थ्य तुमच्या पदाने तुम्हाला दिलेलं असताना एखाद्या सर्वसामान्य, दुर्बल, श्रद्धाळू माणसासारखं मन उचंबळून आणून केवळ एका भावनिक कृतीत समाधान का मानून घ्यायचं?

या प्रश्नातच एक मेख आहे. उजव्या विचारांचा एकूण आवाका आणि या विचाराने प्रेरित कार्यपद्धती पाहिली तर असं दिसेल की इथे प्रतीकांना अतिशय महत्त्व आहे. ते करताना आपण हे लक्षात ठेवूया की आपल्या चर्चेत उजव्या विचाराचा धार्मिक-सांस्कृतिक पैलू अभिप्रेत आहे. सरसकट डावं आणि उजवं अशी विभागणी करणं ढोबळ वर्गीकरणासाठी उपयोगी ठरत असलं तरी त्यात बरेच तपशील निसटून जातात. वर्गीकरण किंवा व्याख्या करणं हे बरेचदा आकलनाला मर्यादा घालणारं ठरतं हे आपण  लक्षात ठेवूया.

उजव्या विचारसरणीने कायमच लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रतीकांचा, कर्मकांडांचा, भावनिक आव्हानांचा वापर केलाय. अर्थात यातून आपल्याला दिसतंच की काही लोक एकत्र येऊन इतर काहींच्या विरुद्ध उभे राहतात. पण विचार म्हणून तो एकत्रीकरणाचाच प्रयत्न असतो, असं त्यांचं प्रतिपादन असतं. गेल्या वर्षी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थींची कलशयात्रा सगळ्या राज्यांमध्ये काढण्यात आली होती. अगदी २०१४ पर्यंत मागे गेलो तर संसदेत प्रवेश करताना नरेंद्र मोदींनी संसदेच्या पायऱ्यांवर डोकं टेकवण्याचा प्रसंगही आपल्याला आठवेल.

संघाच्या विविध कार्यक्रमांपैकी शस्त्रपूजा हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो. नवीन लोकांशी जोडून घेण्याकरता संघ स्वयंसेवक त्यांना राख्या बांधतात. प्रतीकात्मक मूल्य असलेले असे बरेच कार्यक्रम सांगता येतील. अशा प्रतीकात्मक गोष्टी संघटना बांधणीकरता, कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मकता, उत्साह निर्माण करण्याकरता आवश्यक आहेत म्हणून त्यांचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. उजव्या विचारसरणीतील ही प्रतीकात्मता खरं तर भारतीय परंपरेतूनच आलेली आहे आणि त्यामुळे ती स्वीकारणं लोकांनाही जड जात नाही.

मूळ प्रश्न तसेच

इथवर सगळं ठीक असलं तरी गडबड अशी होते की या प्रतीकात्मतेलाच असाधारण महत्त्व प्राप्त होऊ लागतं. प्रतीकात्मक कृत्य केलं की झालं, पुढे जाऊन मूळ, अवघड प्रश्नाला भिडलो नाही तरी चालेल अशी एक विपरीत मानसिकता तयार होऊ लागते. उजव्या विचारसरणीचे बरेच कार्यकर्ते, समर्थक अशा मानसिकतेचे बळी असलेले दिसतात. हे कुणाचे दोष दाखवण्यासाठी नाही. तर आज आपण ज्या ध्रुवीकरणात जगतो आहोत ते आपल्या सामाजिक स्वास्थ्यासाठी चांगलं नाही, हे सांगण्यासाठी आहे.

खरं तर कुठल्याही संघटनेत, राजकीय पक्षात असणारे लोक विविध स्वभाववैशिष्टयांनी युक्त असतातच. डाव्या पुरोगामी चळवळीत देखील वैचारिक खुलेपणा नसणारे लोक असतात. याचं एक साधं कारण हे आहे की आपल्या 'विचारसरणीवर आधारित' ओळखीआधीची आपली ओळख 'माणूस' ही आहे आणि माणूस हा अनेक भल्याबुऱ्या गुणधर्मांचं गाठोडं आहे. परंतु असं असलं तरी विचारकलहाच्या पलीकडे जाऊन, आपल्या विचारसरणीशी तीव्र निष्ठा बाळगणारे 'कडवे' कार्यकर्ते तयार करण्यात संख्यात्मक दृष्ट्या उजव्या विचारसरणीला तुलनेने चांगलं यश मिळालेलं आहे.

या यशाचा एक आधार 'सहज, सोपं आव्हान' हा आहे. आता सहज-सोपं म्हणजे काय हे थोडं समजावून घेऊ. सामाजिक आणि राजकीय आघाडीवर संघ, भाजपने केलेलं काम अगदी सोपं होतं, असा याचा अर्थ नाही. परंतु हे यश मिळवण्याकरता जो आधार घेतला गेला आणि घेतला जातो, तो सोपा होता. माणसांना विशिष्ट दिशेने कार्यप्रवण करण्यासाठी धर्म, संस्कृती, राष्ट्र हे अमूर्त आणि एका अर्थी 'रेडिमेड' आधार जेव्हा घेतले जातात तेव्हा माणूस कार्यप्रवण होतो, कष्टाने कार्यही करतो. पण सामाजिक, वर्गीय, जातीय रचनांची गुंतागुंत समजून घेऊन मुळातून काही बदल घडवण्याची मानसिकता वाढीला लागत नाही. यातून कार्य उभं राहतंच, पण मानसिकता मात्र ठराविक साच्यातलीच राहते.

विश्लेषणापेक्षा सुलभीकरणालाच वाव

नरेंद्र मोदींनी केलेली पाद्यपूजा अशा मानसिकतेकडे निर्देश करते. यात व्यक्तिविशिष्ट गुणधर्माचाही भाग आहेच. ज्याला साध्या भाषेत नाटकीपणा म्हटलं जातं, तो नरेंद्र मोदींच्या स्वभावाचा एक भाग आहे. निवडणूकपूर्व काळातील प्रचार भाषणांपासून सत्तेवर आल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणांमधूनही तो दिसतो. त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्यामुळे त्यांनी केलेल्या प्रतीकात्मक कृतीला धार चढतेच.

आपल्या भाषणांमधून 'देशाचा पंतप्रधान' बोलतो आहे असं जाणवून देण्याऐवजी 'पक्षाचा प्रचारक' बोलतो आहे असंच वरचेवर जाणवतं. त्यातून प्रतिक्रियावादी, आक्रमक, भावनिक राजकारणाला त्यांनी अग्रस्थान दिल्याने त्यांच्या स्वतःच्याही उक्ती आणि कृतीचे पडसाद उमटणं स्वाभाविक झालंय. नरेंद्र मोदींनी स्वतःच 'नरेंद्र मोदी' हा नायक आणि खलनायक दोन्ही निर्माण केलेत!

प्रतीकात्मक कृत्यांना भावनिक महत्त्व देऊन त्यांची गरज प्रस्थापित करणं, हा उजव्या विचारसरणीत खोलवर रूजलेला विचार आहे. त्याचे आविष्कार बेगडी वाटले तरी विचारसरणीसाठी त्यांचं धोरणात्मक महत्त्व फार आहे. आज उजव्या विचारसरणीचे लोक देशभक्त कोण आणि देशद्रोही कोण, हे ठरवताना दिसतात. यातून विश्लेषणाची स्पेस नष्ट होत जाते आणि सुलभीकरणाची स्पेस वाढत जाते.

खेद अशा गोष्टीचा होतो की नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात काय काय चांगले बदल झाले हे मोदींचे समर्थक आपल्या फेसबुक पोस्ट्समधून सांगतात, पण प्रत्यक्ष पंतप्रधान एखाद्या शांत, गंभीर, पंतप्रधानपदाचा आब राखणाऱ्या भाषणातून ते का सांगत नाहीत असा प्रश्न पडतो! नरेंद्र मोदींनी जनहिताचा एकही निर्णय घेतला नाही असं नाहीच. पण प्रतीकात्मतेचा अतिरिक्त सोस बाळगल्याने आपण स्वतःदेखील एक 'नकारात्मक प्रतीक' होतो आणि आपल्या कार्यापेक्षा आपली विचारसरणी पृष्ठभागावर येत राहते, हे त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी लक्षात घेतलं तर बरं होईल. 

 

(लेखक विविध विषयांवर नियतकालिकांमधे सातत्याने लिहितात.)