भाजप-शिवसेनेकडून युती तोडण्याची अधिकृत घोषणा टाळण्यामागची चार कारणं

१४ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


शिवसेना, भाजपची बोलणी फिस्कटली. तसं तडकाफडकी जाहीरही केलं. दोघांनी आपापले सत्तामार्ग निवडले. पण दोघांपैकी कुणीच आम्ही इन्स्टंट तलाक घेतलाय, असं जाहीर करायला तयार नाही. सगळ्या गोष्टी उघड आहेत, आता तुम्हीच अर्थ काढा, असं सांगत विषयाला बगल देण्याची भूमिका दोन्ही पक्षांकडून घेतली जातेय. अधिकृतपणे घटस्फोट घेण्याचं का टाळलं जातंय?

फिफ्टी फिफ्टीवरून शिवसेना, भाजपमधली बोलणी फिस्कटली. आणि कुणालाच राज्यपालांच्या वेळेत राज्यात सत्ता स्थापन करता न आल्याने राष्ट्रपती राजवट लागू झालीय. आता हा सत्तापेच सोडवण्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून कौल मिळालेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी सुरू केलीय. असं असलं तरी गेली शिवसेना आणि भाजप हे अधिकृतरित्या ब्रेकअप घेतल्याचं सांगयला तयार होईनात.

युती तोडलीय असं कुणीच का बोलत नाही?

युतीच्या स्टेटसवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ८ नोव्हेंबरला आपल्या पत्रकार परिषदेत बोलले. 'केंद्रात आणि राज्यात सरकारमधे राहायचं आणि त्या पक्षाच्या नेत्यांविरोधात टीका करायची हे आम्हाला मान्य नाही. टीका सुरूच राहणार असेल तर असं सरकार कशाला चालवायचं, असा प्रश्न आमच्यासमोर येतो. आमची ही खंत दूर झाली तरच यापुढे चर्चा होईल. मात्र तरीही महायुती कायम असून युती अजूनही तुटलेली नाही,' अशा शब्दांत फडणवीसांनी युतीचं लाईव स्टेटस सांगितलं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही युतीच्या फाटाफुटीवर काही स्पष्ट बोलत नाहीत. ‘परवा भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दाखवली तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी मला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी मित्र मानला नाही तरी आम्ही त्यांना मित्र मानत होतो किंवा आहे. मित्राने जर शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी दाखवलेल्या दिशेनं न जाणं हे मित्रत्वाला कलंक लावणारं आहे’, असं म्हणतं ठाकरेंनी आपल्यासाठी नव्या संधीची दारं किलकिली करून घेतली. १२ तारखेला ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात भाजपविरोधात भूमिका घेतल्याने शिवसेना नेते अरविंद सावंत यांनीही केंद्रातल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. असं असला तरी शिवसेनेने स्वतःहून आपण भाजपच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएतून बाहेर पडतोय असं काही सांगितलं नाही. भाजपच्या नेतृत्वाखालच्या सरकारमधे राहायचं नाही, अशी तडकाफडकी भूमिका जाहीर करणारी शिवसेना एनडीएबाबत मात्र असा काही निर्णय घेताना दिसत नाही. भाजपकडूनही शिवसेनेला काढून टाकलं असं सांगितलं जात नाही.

हेही वाचाः राष्ट्रपती राजवट हे राजकीय पक्षांचं नाही तर राज्यपालांचं अपयश!

१) २५-३० वर्षांचा राजकीय संसार

शिवसेना आणि भाजप यांच्यामधे ३० वर्षांआधी १९८९ मधे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून युती झाली. या रिलेशनशिपला २५ वर्ष होत असतानाच २०१४ मधे ही युती तुटली. पुन्हा सत्तास्थापनेवरून दोघं एकत्र आले. याविषयी झी २४ तासचे आऊटपूट एडिटर विठोबा सावंत सांगतात, ‘२५ वर्षापूसन एकत्र असल्यामुळे दोघांचं मतदारांसोबत एक नातं तयार झालंय. त्यामुळे मतदारांपुढे जाताना युती तोडण्याचं पाप माझ्या माथ्यावर नको, असा प्रयत्न दोघांचाही असतो.’

‘२०१४ मधे विधानसभा निवडणुकीआधी भाजपने युती तोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची घोषणा करायलाही कुणी पुढं येत नव्हतं, अशावेळी आपण ही घोषणा केल्याचं एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं. युती तोडण्याची घोषणा करणाऱ्या खडसेंना शिवसेनेने मतदारांसमोर एखाद्या विलनसारखं उभं केलं. आता जर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली तर भाजपही त्यांच्यावर असेच आरोप करेल.’ 

‘फडणवीसांनीही युतीतल्या तणातणीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना महायुती म्हणून निवडणूक लढवली असताना शिवसेनेने पहिल्या दिवसापासूनच आपले पर्याय खुले असल्याचं सांगितलं. त्यांची आधीच दुसऱ्यांशी बोलणी पक्की झाली होती, हा मुद्दा उचलून धरला,’ या मुद्याकडे विठोबा सावंत लक्ष वेधतात. युती तोडेल तो जनतेमधे विलन ठरतो. अनेक वर्षांच्या नात्यात घटस्फोट घेताना जसं वाटतं तसाच काहीसा प्रकार भाजप, शिवसेनेच्या युतीमधे दिसतोय.

२) काँग्रेस, राष्ट्रवादीसारखा मामला नाही

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमधून एका झटक्यात काडीमोड घेऊ शकतात. तशी घोषणा कुणीही कधीही करू शकतो. अगदी इन्स्टंट तलाकसारखं. पण तसा काही इन्स्टंट तलाक भाजप, शिवसेनेमधे कुणी तडकाफडकी जाहीर करू शकत नाही, असं सावंत यांना वाटतं.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणतात, ‘शिवसेना, भाजप हे मतदारांशी भावनेच्या आधारावर जवळिकता साधतात. त्यांच्या मतदारांचा माईंडसेटही तसा आहे. थोडासा हिंदुत्ववादी, थोडासा कौटुंबिक अशा स्वरुपाचा हा मतदार आहे. इथे विचारापेक्षा भावनेच्या नात्याला खूप महत्त्व आहे. युतीच्या नात्याला भावनिक किनार असून त्यातच त्यांचं राजकारण दडलंय.’

हेही वाचाः स्वबळावर सत्तेसाठी भाजपने हा फॉर्म्युला वापरल्यास शिवसेनेला बसणार झटका

३) युती तोडणं म्हणजे पाप

युती हा जसा भावनेचा मुद्दा आहे तसाच तो पापपुण्याशी, धर्मअधर्माशी जोडला गेलाय. दोघांनी मिळून हे जोडाजोडीचं राजकारण केलंय. त्यामुळे आता युती तोडायचं पाप मी माझ्या नावावर येऊ देणार नाही, अशीच भूमिका दोन्ही पक्षांकडून घेतली जातेय, असं सावंत यांना वाटतं.

शिवसेना आमदारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मला स्वत:हून युती तोडायची नाही. युती तोडण्याचं पाप मला करायचं नाही. त्यामुळे जे काही ठरलं असेल ते सगळं गोडीने व्हावं. समसमान वाटप आधीच ठरलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासह समान वाटप झालं पाहिजे. युती कायम राहावी हीच माझी देखील इच्छा आहे. पण आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो भाजपने घ्यायचा आहे.’

‘मतदारांसमोर जाताना मी अधिक नैतिक आहे, हे सांगता यावं म्हणून कुणीच युती तोडायची भाषा करत नाही. या नैतिक अनैतिकतेच्या मुद्द्यामुळे यावेळीही युतीची बोलणी फिस्कटण्यात पुन्हा नैतिकतेचा मुद्दाच कळीचा झाला. तो मुद्दा म्हणजे, ‘ठरल्याप्रमाणे करा.’ पण दोघांकडूनही मीच खरं असल्याचं सांगत एकमेकांवर खोटेपणाची जबाबदारी ढकलण्याचा जोरदार प्रयत्न होतोय,’ असं विठोबा सावंत सांगतात.

४) दारं बंद, भविष्यासाठी खिडक्या चालू

रिलेशनमधे रक्ताच्या नात्याला खूप महत्त्व असतं. तसंच ऐनवेळी काही गोष्टी घडल्या तर दोघंही आपल्या जुन्या रिलेशनशिपला जागून एकत्र येऊ शकतात. त्यासाठीच दोघं सध्या ती स्पेस ठेऊनच वागताना दिसताहेत, असंही सावंत यांना वाटतं. ज्येष्ठ राजकीय पत्रकार धवल कुलकर्णी हे शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या सध्याच्या आरोप-प्रत्यारोपांचं वर्णन ‘दारं बंद, खिडक्या सुरू’ अशा शब्दांत करतात.

धवल कुलकर्णी सांगतात, ‘दोघांनी एकमेकांची दारं बंद केलीत. पण खिडक्या मात्र उघड्या ठेवल्यात. खिडक्यांमधून अजूनही कुणी येऊ शकतं. शिवसेनेची काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतची बोलणी फिस्कटलीच तर अशावेळी युती तोडल्याची घोषणा न करण्याची भूमिका फायदेशीर ठरू शकते. त्यामुळेच दोघंही आतापर्यंत युती तोडल्याची, तुटल्याची भूमिका मांडताना दिसत नाहीत. दोघांकडूनही येत्या काळात परतीचा रस्ता कायम ठेवण्याचीच भूमिका घेतल्याचं दिसतंय,’ असं कुलकर्णी यांना वाटतं.

‘फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युल्यावरून दोन्हीकडचे इगो खूप ताणले गेलेत. अशावेळी कुणीतरी आईस ब्रेकरच्या भूमिकेत राहायला हवं. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भूमिका घेऊ शकतं. तसं प्रयत्न सुरू असल्याचंही दोन्ही पक्षांतच्या नेत्यांकडून नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं जातंय. हिंदुत्व किंवा दुसऱ्या कुठल्या विषयावर एकत्र यावं. त्यासाठी परिस्थितीनुसार काहीतरी फॉर्म्युला काढला जाऊ शकतो. त्यासाठी खुष्कीचा मार्ग म्हणून युती तोडण्याची अधिकृत भूमिका जाहीर न करण्याचं दोघांकडून टाळलं जात असेल,’ असंही कुलकर्णी सांगतात.

हेही वाचाः 

१९५१ च्या निवडणुकीत कसा होता जवाहरलाल नेहरूंचा प्रचार?

शिवसेना-भाजपमधला सध्याचा पेच निव्वळ सत्तेपुरता नाही, तर

शिवसेनेची संधी हुकल्याने हा असेल सत्तेचा सगळ्यात सोप्पा फॉर्म्युला

मुख्यमंत्री कोणः राज्यपाल फक्त घोड्याला विहिरीपर्यंत नेऊ शकतात

२२० पारचा नारा देणाऱ्या भाजपला अपयशाचं तोंड का बघावं लागलं?