मी देशभक्त का नाही?

२२ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


सध्या देशभक्ती, देशद्रोही असण्याचे सर्टिफिकेट वाटण्याचा धंदा जोरात सुरू आहे. सरकारच्या एखाद्या धोरणाला विरोध म्हणजे थेट देशाला विरोध केल्याचं वातावरण तयार केलं जातंय. देश आणि सरकार या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. पण त्यामधे सरमिसळ करून सर्टिफिकेट वाटले जाताहेत.

२०१४ च्या आधी म्हणजे केंद्रात मोदी सरकार आलं नव्हतं, त्या काळात कुणी मला विचारलं असतं की तू देशभक्त आहेस का? तुझ्यांत देशभक्ती आहे का? तर याचं उत्तर मी निःशंकपणे ‘होय’ असंच दिलं असतं. तुम्हालाही हा प्रश्न विचारला असता तर तुम्हीही हेच उत्तर दिलं असतं याची मला खात्री आहे.

पण आज २०१९ मधे हाच प्रश्न कुणी मला विचारला तर मी याचं उत्तर निःशंकपणे ‘नाही’ असं देईन. याचा अर्थ मी देशद्रोही झालोय असं मात्र नक्कीच नाही. मी आता देशभक्त असण्याऐवजी देशप्रेमी झालोय आणि देशभक्ती करण्याऐवजी मी माझ्या देशावर प्रेम करतोय.

देशभक्ती, देशप्रेमात फरक काय?

आता देशभक्ती आणि देशप्रेम यात फरक काय असा स्वाभाविक प्रश्न येतो. तर यामधे फारसा फरक नाही. निदान पूर्वी तरी नव्हता. पण मोदी सरकार आल्यानंतर देशभक्तिची व्याख्या पूर्णपणे बदललीय. नव्या व्याख्येनुसार, जो मोदींची भक्ती करेल तो देशभक्त ठरतोय. मोदींवर टीका करेल त्याला देशद्रोही ठरवलं जातंय.

माझं मोदींशी शत्रूत्त्व नाही. पण माझी त्यांच्यावर भक्तिही नाही. प्रेम तर नाहीच नाही. त्यामुळे या नव्या व्याख्येनुसार मीही देशद्रोही ठरत असेन तर त्यात नवल नाही. पण मला त्याची काळजी नाही. कारण गेल्या पाच वर्षांच्या काळात मला एक नवीन शोध लागलाय. तो म्हणजे माझं मोदींवर प्रेम नसलं तरी माझ्या देशावर मात्र प्रेम आहे. मी देशाची, मोदींची भक्ती करत नसलो तरीही मी देशप्रेमी मात्र नक्कीच आहे. मग देशभक्ती आणि देशप्रेम यांच्यात नक्की काय फरक आहे?

भक्ती या शब्दामधेच संपूर्ण समर्पणाची, शरणागतीची भावना अंतर्भूत आहे. भक्तीचा संबंध परमेश्वराशी जोडलेला आहे. निदान देवाला मानतात त्यांच्या दृष्टीनं तरी परमेश्वर हीच या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहे. या शक्तींनी विश्वाची सृष्टी केलीय. त्यामुळे अशा परमेश्वराची किंवा त्याच्या निरनिराळ्या रुपांची भक्ती करण्यात लोकांना काही वावगं वाटत नाही.

हेही वाचाः ‘मिशन मंगल’ सिनेमा बघून आपलं मंगलयानही आत्महत्या करेल!

देव मानत नसलो तरी देश मानतो

मी देवभक्त नसलो तरीही इतरांच्या देवभक्तिला माझा काहीच आक्षेप नव्हता. आजही नाही. पण या भक्तिचं एक निराळं स्वरुप म्हणून देशभक्तिकडे बघितलं जातं तेव्हा मात्र मला त्यावर आक्षेप घेतल्यावाचून राहवत नाही. कारण देव नसला, मी तो मानत नसलो तरीही देश आहे आणि त्याला मी मानतोही. हा देश त्याच्या निरनिराळ्या स्वरुपांत मी सर्वकाळ माझ्या अवतीभवती अनुभवत असतो. त्यामुळे देशाला भक्तिशी जोडलं जातं तेव्हा सावध होण्यावाचून गत्यंतर नसतं.

कारण आज देशाचाही संबंध केवळ सत्तेवरच्या एका राजकीय पक्षाशी आणि त्याच्या शीर्ष नेत्याशीच जोडला गेलाय. त्यामुळे त्याच्या भक्तिची चिकित्सा करणं भाग आहे. जे स्वतःला या सार्वभौम देशाचे स्वतंत्र, सुजाण नागरिक समजतात त्या प्रत्येकाचीच ही जबाबदारी आहे. कारण ज्या देशभक्तिचा सध्या प्रचार-प्रसार केला जातोय त्यात आपल्याकडून संपूर्ण शरणागतीची, समर्पणाची अपेक्षा केली जाते.

एकसुरी देशभक्तीचा आग्रह

आपण कोणताही प्रश्न विचारू नये, कोणत्याही शंका काढू नये, कोणतीही चिकित्सा करू नये हे यांत अंतर्भूत आहे. शीर्ष नेता जे काही करेल त्याचं कौतुक करायचं. तो जे काय म्हणेल त्याला अनुमोदन द्यायचं. तो जे काही करायला सांगेल ते मुकाट्यानं करायचं. त्याच्या चुका नजरेआड करायच्या. त्याच्या अपयशावर पांघरूण घालायचं. ही देशभक्तिची नवीन व्याख्या आहे आणि ही मला संपूर्णतः अमान्य आहे.

कारण ही देशभक्ती नसून दास्यत्त्व आहे. ज्यात तुम्हाला समोरच्याला जाब विचारता येत नाही. त्याला त्याच्या चुकांसाठी उत्तरदायी ठरवता येत नाही. त्याहून वाईट म्हणजे एखाद्या देशभक्ताला उद्या पश्चाताप झालाच आणि त्याला आपली चूक कळून आलीच तरीही त्याला ती गोष्ट मान्य करता येत नाही. कारण इतरांप्रमाणे त्याच्यावरही लगेच देशद्रोही असण्याचा शिक्का मारला जातो.

देशाची अशी भक्ती आज सर्वांनीच करावी असा आग्रह धरला जातोय. जे तसं करणार नाहीत त्यांना सरसकट देशद्रोही म्हणून संबोधलं जातंय. त्यांची टर उडवली जातेय. अशा काळात या देशाचा बचाव करायचा असेल तर आपल्याला देशप्रेमी होण्यावाचून गत्यंतर नाही.

हेही वाचाः लोकांनी अंडरवेयरची खरेदी थांबवण्यामागे खरंच मंदीचं कारण आहे?

गुणांवर प्रेम करतो तसं चुकांवरही

जो प्रेम करतो तो समोरच्या व्यक्तिच्या गुणांवर जसा प्रेम करतो तसाच तिच्या चुकांवरही करतो. त्या चुका कमी करण्याचा, सुधारण्याचाही तो सातत्यानं प्रयत्न करतो. त्या व्यक्तीने तसं करण्यास मनाई केली तर तिच्यावर रागावण्याचा आपल्याला हक्क असतो. कारण आपलं तिच्यावर मनापासून प्रेम असतं. तिच्यासाठी काहीही करण्याची आपली तयारी असली तरी त्याचा अर्थ आपण तिच्या सुखासाठी स्वतःचा किंवा इतरांचा बळी देऊ असं मात्र नसतं.

कारण मग तो भक्तिचाच प्रकार ठरतो. तिथं प्रेम उरत नाही. एका व्यक्तिवरचं, वस्तुवरचं, विचारावरचं आंधळं प्रेम ही भक्तिच असते. असलं विध्वंसक प्रेम आपल्याला नको आहे. आपल्याला सकारात्मक, विधायक प्रेम हवंय. जे प्रश्न विचारतं. जे जाब विचारतं. जे स्वतः जबाबदारी घेतं, आणि समोरच्याला जबाबदारी घ्यायला भाग पाडतं. जे स्वतः आपल्या कृत्यांसाठी उत्तरदायी असतं आणि समोरच्यालाही उत्तरदायीत्त्व स्विकारायला सांगतं. 

प्रेमात मोकळेपणा असतो. भक्तिमधे बंदिस्तपणा असतो. प्रेम स्वातंत्र्य देतं. भक्ती केवळ दास्य देते. प्रेम तुम्हाला पुढे नेतं. भक्ती तुम्हाला मागे फरफटवत नेते. आम्हाला असली भक्ती नकोय. आम्हाला प्रेम हवंय. कारण माझ्या देशाचं काही वाईट होत असेल, कोणी ते करत असेल तर त्याला जाब विचारण्याचा अधिकार मला हवाय. आणि आज हा अधिकार नाकारला जातोय.

तुम्ही कोण आहात?

कुणी प्रश्न विचारताना दिसलं की त्याला सरसकटपणे देशद्रोही ठरवलं जातंय. देशाच्या संविधानापेक्षा मोदींच्या वक्तव्याला मोल दिलं जातंय. देशाचं भलं करण्याची इच्छा, शक्ती आणि क्षमता ही केवळ मोदी, भाजप आणि संघामधेच आहे असं ठासून सांगितलं जातंय. अशा काळांत शांतपणे हे सारं मी सोसत असेन तर मी भक्त ठरेन. पण मी तसं करू शकत नाही. कारण मी देशप्रेमी आहे. देशभक्त नाही. तुम्ही यापैकी कोण आहात हे आता तुम्हीही ठरवावं लागणार आहे.

हेही वाचाः 

सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर

खुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग!

मोहन भागवत आरक्षणावर बोलल्यावर वाद का होतो?

मोदींचा नवा भारत आणि आमचा नवा भारत वेगळा, कारण

टॉलस्टॉयची बायको मेल्यावर आपल्या डायरीमुळे झाली लोकप्रिय

(लेखक हे मुक्त पत्रकार असून तरुण लेखक आहेत.)