पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना का घाबरतात?

१९ मे २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा चकवा दिला. पत्रकार परिषदेला उपस्थित राहून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं न देण्याचा नवा विक्रम त्यांच्या नावावर झाला. मीडियाला मुलाखतीत देणारे नरेंद्र मोदी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं मात्र टाळतात. आपले पंतप्रधान पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरतात का?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कालचा दिवस अँटी क्लायमॅक्सचा होता. काल १७ मेला लोकसभा प्रचाराची मुदत संपायला अर्धा तास राहिला असताना भाजपने प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यातही भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सरकारच्या योजनांचा विक्रम सांगितला. या प्रेसला हजेरी लावून पंतप्रधान मोदींनीही एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. तो म्हणजे, एकही प्रेस कॉन्फरन्स न घेणारे भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा.

राहुल गांधींचेही मोदींना प्रश्न

महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या प्रेस कॉन्फरन्सवेळीच तिकडे काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं देत होते. त्यांना मोदी प्रेस कॉन्फरन्स घेत असल्याचं पत्रकारांनी सांगितलं. त्यावर, आता पत्रकार परिषद घेतच आहेत, तर त्यांना माझेही प्रश्न विचारा अशा खोचक शब्दांत मोदींना टोला लगावला. पण प्रश्न विचारायला मोदींनी पत्रकारांना चान्सच दिला नाही.

पण मोदींच्या या नव्या रेकॉर्डवर सगळीकडून टीका होतेय. सोशल मीडियावर तर कालपासूनच टीकेची झोड उठलीय.

हेही वाचाः पत्रकारच भाट असतील तर प्रश्न कोण विचारणारः सिद्धार्थ वरदराजन

प्रेस कॉन्फरन्स कशासाठी घ्यायची?

पत्रकार, मीडिया हा लोकशाहीचा चौथा खांब आहे. सरकार आणि लोकांमधला दुवा म्हणून मीडिया काम करतो. लोकांच्या प्रश्नांसाठी मीडिया सरकारला धारेवर धरतो. त्या प्रश्नांवर सरकारने उत्तर देणं अपेक्षित असतं. तसंच प्रेस कॉन्फरन्स हे पारदर्शक शासन व्यवस्थेचं लक्षण आहे. सरकारवरच्या आरोप, आक्षेपांचं प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून निरसन करता येतं. जगभरातले सत्ताधारी आपल्यावरचे आक्षेप, आरोप फेटाळून लावण्यासाठी प्रेसशी बोलतात. प्रश्न, उपप्रश्नांना सामोरे जातात.

गेल्या पाच वर्षांपूर्वीपर्यंत भारतातही ही परंपरा सुरू होती. आणीबाणी लागू करणाऱ्या इंदिरा गांधीही पत्रकारांच्या अडचणीच्या प्रश्नांना सामोरे गेल्या. पण आता नरेंद्र मोदींनी ही परंपरा मोडीत काढत नवा विक्रम केलाय.

गेल्या काही काळात मीडियावरच आरोप होऊ लागलेत. मीडिया सरकारधार्जिणा झाल्याचे थेट थेट आरोप झाले. मीडियातलेच काही जण सरकारधार्जिण्या मीडियावर गोदी मीडिया अशी टीकाही करतात. अशावेळी तर पंतप्रधानांनी स्वतःहून पुढं येतं प्रेस कॉन्फरन्स घेण्याची गरज होती. त्यामुळे लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाची प्रतिष्ठा उंचावण्यास मदत झाली असती.

मनमोहन सिंगांनीही घेतल्या प्रेस कॉन्फरन्स

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर मौनी पंतप्रधान म्हणून टीका झाली. ही टीका करणाऱ्यांत भाजप समर्थकांची चढाओढ असायची. ‘मौनमोहन’ अशा शब्दांत डॉ. सिंग यांची खिल्ली उडवली गेली. पण हेच मनमोहन सिंग प्रेस कॉन्फरन्स घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचे. यूपीए-२ च्या काळात तर सरकार वेळोवेळी अडचणीत आलं. तरीही सिंग यांनी प्रेस कॉन्फरन्स घेण्याची परंपरा चालूच ठेवली.

‘पूर्वी दररोज संध्याकाळी पत्रकारांशी गप्पा मारणं हेच माझं काम होतं. आज खूप दिवसांनी पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलो. त्याचा मला आनंद होतोय,’ अशा शब्दांत मोदींनी पत्रकार परिषदेला सुरवात केली. जवळपास साडेअकरा मिनिटं मनोगत मांडलं. पण जवळपास पन्नासेक मिनिटं चाललेल्या या प्रेसमधे पंतप्रधान आपली मन की बात झाल्यावर मौनात राहणं पसंत केलं. पत्रकारांच्या प्रश्नांची वेळ आल्यावर शेजारी बसलेल्या अमित शहांवर सगळी जबाबदारी ढकलून दिली.

हेही वाचाः नेहरूंशी लढता लढता मोदी हरताहेत

खरंच सबकुछ अमित शहा असं आहे?

पत्रकारांचे प्रश्न टाळत मोदींनी सांगितलं, ‘मी एक शिस्तबद्ध सैनिक आहे. पार्टी अध्यक्ष आमच्यासाठी सर्वकाही आहेत.’ मग अमित शहा यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलं. पण पक्षाध्यक्ष आमच्यासाठी सर्वतोपरी असतात हे मोदींचं म्हणणं ही फसवणूक आहे. उलट शहा हे मोदींचे एकनिष्ठ सैनिक आहेत, हे वेळोवेळी दिसून आलंय.

पक्षशिस्तीचं कारणचं द्यायचं असेल तर मग प्रेस कॉन्फरन्सला हजेरी कशाला लावली? सगळेजण पंतप्रधानांच्या प्रेस कॉन्फरन्सची वाट बघताहेत, तिथे निव्वळ मनोगत व्यक्त करून पक्षाध्यक्षाची कोंडी करणं यात कुठली पक्षशिस्त आलीय. मनोगत व्यक्त करण्यासाठी दुसरे प्लॅटफॉर्म होतेच की. कोण कुणाचा बोलविता धनी आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. उगीच पक्षशिस्तीच्या नावाखाली काहीही कारणं देणं ही शुद्ध फसवणूक आहे.

मी आपले आभार मानायला इथे आलोय. आपल्या माध्यमातून देशातल्या नागरिकांचेही मला आभार मानायचे आहेत, अशा शब्दांत मोदींनी आपल्या ११ मिनिटांच्या मनोगताचा शेवट केला. लोकांचे, मीडियाचे आभारच मानायचे होते, तर त्यासाठी मोदींनी गेल्या पाच वर्षांत अनेक नवनवे प्लॅटफॉर्म तयार केलेत. मन की बात करण्यासाठी पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्याची काही गरज नव्हती.

मोदी मुलाखतीसाठी आग्रही

मोदी प्रेस कॉन्फरन्स टाळत असताना वेळोवेळी मीडियाला मुलाखतीत देतात. सोशल मीडियावरही एक्टिव असतात. रेडिओवर मन की बातही करतात. पण त्यांचे संवादाचे हे सगळे फॉर्म एकतर्फी प्रकारात मोडणारे आहेत. इथे प्रश्न निवडण्याची संधी घेता येते. तशी संधी प्रेस कॉन्फरन्समधे मिळत नाही. त्यामुळे मोदी एकतर्फी संवादासाठी आग्रही असल्याचं दिसतं. पण या एकतर्फी संवादामुळे सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहतात.

यंदाच्या निवडणुकीत तर त्यांच्या मुलाखतींची खूप चर्चा झाली. निवडणुकीचा हंगाम सुरू असताना सिनेमात नट असलेल्या अक्षय कुमारला अराजकीय मुलाखत दिली. काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका मुलाखतीतल्या प्रश्नोत्तराचं कागदही कॅमेऱ्यात कैद झालं. त्यावरूनही मोदींवर खूप टीका झाली. त्यांच्या मुलाखतीमधे क्रॉस क्वेश्चन जवळपास नसतात. आणि असलेच तर ते त्यांना अडचणीत पकडणार नसतात. जे काही प्रश्न असतात ते त्यांच्या दिनचर्येशी संबंधित असतात.

पण या मुलाखतीत सर्वसामान्य पत्रकारांना प्रश्न विचारण्याची संधी मिळत नाही. तिथे निवडक लोकांचाच नंबर लागतो. मोदींच्या मुलाखती घेणाऱ्या लोकांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेत.

हेही वाचाः चला आता आपण राज ठाकरेंना प्रश्न विचारुया

टेलिग्राफचा सायलन्स झोन

कोलकात्यावरून निघणाऱ्या द टेलिग्राफ या इंग्लिश न्यूज पेपरने बातमीपुरती जागा रिकामी ठेऊन मोदींचा निषेध केला. टेलिग्राफने आपल्या हेडिंगमधे सायलेन्स झोन दर्शवणारा नो हॉर्न प्लीजचं चिन्ह दिलंय. तर सब हेडिंगमधे लिहिलंय, २८ मे २०१४ ला पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच शुक्रवारी दुपारी प्रेससमोर आले. १८१७ दिवसानंतर झालेल्या या प्रेस कॉन्फरन्सनंतर देशाजवळ त्यांच्यासाठी कुठलाच शब्द नाही.

महत्त्वाचं म्हणजे बातमीत मजकुरासाठीची जागा रिकामा ठेवण्यात आलीय. पंतप्रधान प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रश्नांची उत्तरं देतील तेव्हा ही रिकामी जागा भरण्यात येईल, असं लिहिलंय. तसंच मोदींचे वेगवेगळ्या भावमुद्रेतले फोटो छापलेत. इथे एक गोष्ट नोंदवली पाहिजे. ती म्हणजे, आणीबाणीच्या काळात पेपरातली जागा रिकामी ठेऊन मीडियाने सरकारच्या या कृतीचा निषेध नोंदवला होता.

एबीपी ग्रुपच्या आनंद बझार पत्रिका या बंगाली न्यूजपेपरने ‘नीरव’ मोदी असं हेडिंग देत मोदींच्या प्रेस कॉन्फरन्समधल्या मौनाला अधोरेखित केलंय. 

हेही वाचाः 

पंतप्रधानांचा एक तृतीयांश कार्यकाळ दौऱ्यात गेला वाहून

रमजान विशेषः मक्केतल्या आर्थिक शोषणाविरोधात मोहम्मदी विद्रोह

वर्ल्ड व्हिस्की डेः बसण्याआधी हे वाचायलाच हवं

आपला आपला अंदाजः भाजप २५०+, एनडीए २८०, पंतप्रधानपदी मोदी!