काँग्रेसवर एका कुटुंबाची मक्तेदारी आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवर होणारी टीका इतरत्र वळवणं सोपं जाईल. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांचं राजकारणात काम करत राहणं हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे, असं काही लोकांना वाटतं. पण खरंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेणं, हेच देशहिताचं ठरेल.
सलग दोनवेळा दारूण पराभव झाल्यानंतर राहूल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. डगमगणारा पक्ष आणि राजकारणातली कारकीर्द संपण्याच्या मार्गावर असताना परिस्थिती सावरण्यासाठी सोनिया गांधी पुन्हा अध्यक्ष पदावर आल्या. पण आता काँग्रेसमधली ही घराणेशाही संपण्याची गरज आहे. साधना साप्ताहिकाच्या ३० नोव्हेंबरच्या अंकात ‘गांधी घराण्याचे नाव आता पुरे!’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्याचा संपादित अंश पुढे देत आहोत-
महात्मा गांधींना एकूण चार मुले होती. स्वातंत्र्य चळवळीत या चौघांनीही तुरुंगवास भोगला. पण या चौघांनीही स्वतंत्र भारतात कोणतेही राजकीय पद धारण केले नाही. गांधींची ही सचोटी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना मात्र अंगी बाणवता आली नाही. जवाहरलाल नेहरूंची कन्या इंदिरा गांधी १९५९ साली काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. हे सगळ्यांना माहितच आहे. पण वल्लभभाई पटेलांच्या मुलाने आणि मुलीने आपल्या वडिलांच्या कर्तृत्वावर स्वार होत खासदारकी मिळवली होती, याची फारच थोड्यांना कल्पना असते.
याचप्रमाणे सी. राजगोपालचारी आणि गोविंद बल्लभ पंत यांच्या मुलांनीदेखील खासदारकी भूषवली होती. वारसा हक्काविषयीची गांधींची तत्त्वे स्वातंत्र्य चळवळीच्या इतर प्रमुख नेत्यांकडून दुर्दैवाने पाळली गेली नाहीत. आपल्या वैयक्तिक प्रभावाचा वापर करून आपल्या मुलाला किंवा मुलीला खासदार बनवणं हे झालं एक टोक. तर आपल्या कुटुंबीयांमार्फत पक्षाचं नियंत्रण करणं आणि त्यावर संपूर्ण पकड मिळवणं हे अर्थातच दुसरं टोक म्हणता येईल.
नेहरू, पटेल, राजाजी आणि पंत या सर्वांचे वर्तन कमी अधिक प्रमाणात घराणेशाहीचे द्योतक होते. पुढे १९७५ मधे इंदिरा गांधींनी आपला मुलगा संजय गांधी यांची आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करून घराणेशाहीची परिसीमाच गाठली. पुढे संजय गांधींच्या अकाली मृत्यूनंतर त्यांनी आपल्या दुसऱ्या पुत्राला अर्थात राजीव गांधींना राजकारणात आणलं. ‘काँग्रेस सत्तेत कायम राहिली तर माझ्यानंतर राजीव गांधी हेच देशाचे प्रधानमंत्री असतील’ असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
सोनिया गांधींना आपल्या सासूबाईंविषयी अतिशय आदर होता. त्यांच्या स्मृतीचं जतन करण्यासाठी सोनियांनी स्वतःला वाहून घेतलंय. त्यामुळेच आणीबाणी विषयी काँग्रेसनं माफी मागायला हवी असं त्यांना वाटत नाही. आपल्या एकुलत्या मुलाने आपल्या पश्चात काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवावे या संबंधीही त्या कमालीच्या आग्रही होत्या. मात्र काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत असताना सलग दोन सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाला अतिशय लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर सोनिया यांच्या मुलानं आपल्या विवेक-बुद्धीला जागून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीची निवड व्हावी असं विधान राहुल गांधी यांनी केलं होतं. अशा परिस्थितीतही उतरती कळा लागलेल्या पक्षावरील सैल होत असलेली गांधी घराण्याची पकड घट्ट करण्यासाठी त्यांच्या मातोश्री पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत.
हेही वाचा : आनंद कुंभारः एक क्लार्क शिलालेख अभ्यासक बनतो त्याची गोष्ट
मी स्वतः काँग्रेसमधील गांधी घराण्याचा आजीवन टीकाकार राहिलोय. मात्र मला याचीदेखील कल्पना आहे की, गांधी घराण्याची पाठराखण करणारे सर्वच लोक व्यक्तिगत स्वार्थापायी त्यांची पाठराखण करत नाहीत. फक्त काँग्रेसच देशपातळीवर भाजपला आव्हान देऊ शकते या भावनेने काहीजण गांधी घराण्याची पाठराखण करतात. याचबरोबर फक्त नेहरू-गांधी घराणंच काँग्रेस पक्षाला एकसंध ठेवू शकतं त्यांचा असा दावा असतो. आणि त्यामुळेच पक्षावर या घराण्याचं वर्चस्व असणं गरजेचं आहे, असं ते मानतात. तर दुसरीकडे काही लोकांसाठी फक्त काँग्रेसच नाही तर इतर पक्षांतील प्रमुख नेत्यांची मुले-मुली आमदार, खासदार आणि मंत्रीपदे भूषवतात. त्यामुळे घराणेशाहीसाठी, फक्त काँग्रस पक्षालाच लक्ष्य करणे योग्य नाही.
मला मात्र वरील युक्तिवाद पटत नाहीत. कारण १८८५ ते १९७५ पर्यंत किंवा १९९१ ते १९९८ पर्यंत काँगेस पक्ष घराणेशाहीचा वाहक नव्हता. विशेष म्हणजे अध्यक्षपदाच्या प्रदीर्घ कार्यकाळात सोनिया गांधी देखील काँग्रेस पक्ष एकसंध ठेवू शकलेल्या नाहीत. त्यामुळेच तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वायएसआर काँग्रेस या प्रादेशिक पक्षांचा उदय झाला आहे.
या प्रादेशिक पक्षांकडे मिळून ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ म्हणवणाऱ्या पक्षाइतकेच खासदारांचे संख्याबळ आज तरी आहे. पण कुण्या पक्षाकडे घराणेशाहीचे वाहक असलेले काही खासदार असणं ही बाब एका राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व पालकांकडून आपल्या मुलांकडे जाण्याच्या मानाने अगदीच किरकोळ आहे.
हेही वाचा : महाविकासआघाडीचं नवं सरकार पाच वर्षं चालेल की नाही?
काँग्रेसच्या तुलनेत भाजप कधीही घराणेशाहीचा पक्ष राहिलेला नाही. आणि हीच बाब या पक्षाची ताकदसुद्धा आहे. ती मतदारांना या पक्षाकडे आकर्षितही करते. नरेंद्र मोदी ही पूर्णपणे स्वकर्तृत्वावर मोठी झालेली व्यक्ती आहे. राजकारणात त्यांच्यावर कोणाचाही वरदहस्त नव्हता. याउलट राहुल गांधी आज राजकारणात फक्त कुणाचा मुलगा किंवा नातू किंवा कुणाचा पणतू असल्यामुळेच आहेत. हीच बाब नरेंद्र मोदींना राहुल गांधींपासून वेगळे ठरवते.
आपल्या विरोधकांच्या तुलनेत नरेंद्र मोदींकडे काही जमेच्या बाजू आहेत. उदा. इतरांच्या तुलनेत ते जास्त बुद्धिमान आहेत. ते जास्त कष्ट घेतात. त्यांना वक्तृत्व-शैली लाभली आहे आणि अनेक वर्षांचा प्रशासनाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. कोणतीही सुपरिचित पार्श्वभूमी नसणं विशेष म्हणजे नामदार नसणं ही त्यांची जमेची बाजू.
इथं नमूद केलेले गुण त्यांचं पारडं आणखी मजबूत करतात. १९६८ मधे सोनिया गांधी प्रथम भारतात आल्या, तेव्हा भारत देश ‘जी हुजूर’ आणि श्रेष्ठ-कनिष्ठ या रचनेत जखडलेला होता. तुमचे वडील किंवा आजोबा कोण आहेत, या बाबी तेव्हा अतिशय महत्त्वाच्या होत्या. नंतरच्या पन्नास वर्षांत भारतातील सरंजामशाही वृत्ती अतिशय कमी झाली.
आता जनतेला तुमचे वडील किंवा तुमचे आजोबा कोण होते यापेक्षा, तुमच्या कर्तृत्वामधे जास्त रस आहे. ही बाब फक्त राजकारणातच नाही तर खेळ, व्यापार आणि अन्य क्षेत्रांतही तितक्याच सहजतेने लागू होते. मग एके काळी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या पक्षाची धुरा आजदेखील घराण्याच्या पाचव्या पिढीतल्या सदस्याकडेच का असावी, याचं आजच्या तरुण पिढीला आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही.
हेही वाचा : सुरक्षेची जबाबदारी महिलांवर ढकलून बलात्कार थांबणार का?
लुटियन्स दिल्लीच्या केंद्रस्थानी असल्यामुळे असेल किंवा भोवती स्तुती करणाऱ्या चमच्यांचा कोंडाळा तयार झाल्यामुळे असेल भारतीय जनतेच्या विचार करण्याच्या पद्धतीत झालेले अमुलाग्र बदल सोनिया गांधी टिपू शकलेल्या नाहीत. आता कळूनही उपयोग नाही, कारण वेळ कधीच निघून गेली आहे.
हिंदुत्व किंवा विद्यमान सरकाराविषयी कसलीच सहानभूती नसलेली माझ्यासारखी एक व्यक्ती हे सर्व लिहिते आहे. कारण साडेपाच वर्षांच्या सत्ताकाळात नरेंद्र मोदींच्या शासनाने बहुसंख्यांकवादालाच चालना दिलीय. स्वायत सरकारी संस्थांचा पाया डळमळीत केलाय. विज्ञान आणि विद्वतेवर हल्ला केलाय. अर्थव्यवस्थेचंही अतोनात नुकसान केलंय.
एका व्यक्तिमत्त्वाभोवती निर्माण झालेले वलय आणि निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान कार्यालयात एकवटणं असले प्रकार आपली वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होत असलेल्याचंच द्योतक आहे. त्यामुळे आपल्या लोकशाही मूल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आणि सामाजिक एकता पूर्वपदावर आणण्यासाठी एका मजबूत आणि विश्वासार्ह विरोधी पक्षाची तातडीने गरज आहे. सोनिया गांधी आणि त्यांची मुले ती गरज पूर्ण करू शकतील याची शक्यता अतिशय धूसर आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रातल्या अपयशानंतर भाजपला झारखंड जिंकावंच लागणार!
मात्र भाजप हा काही अभेद्य असा पक्ष नाही. अलीकडील एक-दोन वर्षांत अनेक महत्त्वाच्या राज्यांतील निवडणुकांमधे भाजपचा पराभव झाला आहे. सलग दोनदा सार्वत्रिक निवडणुका भाजपने जिंकल्या. कारण या निवडणुका मुळात अध्यक्षीय निवडणुकीत परावर्तीत झाल्या होत्या. शिवाय, नरेंद्र मोदी हे प्रमुख आव्हान जिच्यासमोर होते, ती व्यक्ती घराण्याच्या वारसा आणि राजकीय बुद्धिमत्तेचा अभाव या प्रमुख कारणांमुळे अगोदरच गलितगात्र झाली होती.
राहुल यांनी चालवलेल्या निवडणूक प्रचारात आपल्याला याचीच झलक दिसली. रोजगार निर्माण करण्यात आलेलं अपयश आणि कृषी क्षेत्रावर ओढवलेलं संकट अशा मुद्यांवर पंतप्रधानांना घेरण्याऐवजी राहुल यांनी मोदींवर व्यक्तिगत भ्रष्टाचाराचा आरोप केला. एकूणच काँग्रेसची भूतकाळातली याबाबतची कामगिरी पाहता, हा मुद्दा मतदारांना आकर्षित करण्यापेक्षा काँग्रेसच्या अंगलटच येणार होता.
आजचा काँग्रेस पक्ष उतरत्या काळातल्या मुघल सत्ताधीशांची आठवण करून देतो. राजवाड्यात विराजमान असलेले सम्राट आणि सम्राज्ञी, यांच्याभोवती सतत स्तुती करणाऱ्या राजदरबाऱ्यांचा कोंडाळा तर बाहेर मुघलांशी निष्ठावान असणारा प्रदेश दिवसागणिक आकुंचन पावत अस्तित्वहीन होऊ लागला होता. आज आपल्या समोरील काँग्रेसची परिस्थिती शोकात्म नसती तर नक्कीच हास्यास्पद वाटली असती.
सारांश, जोवर काँग्रेस पक्षावर एका कुटुंबाची मक्तेदारी आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवर होणारी टीका इतरत्र वळवणे आणखीच सोपे असणार आहे. इतकेच नाही तर, मोदींना सत्तेत टिकून राहणे आणि राजकीय चर्चेचा आखाडा आपल्या सोयीचा ठेवणेदेखील अतिशय सोपे जाणार आहे. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांना वाटत असेल की, त्यांचे राजकारणात कार्यरत राहणे हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे; परंतु खरे पाहता त्यांनी राजकारणातून संन्यास घेणे, हेच देशहिताचे ठरणार आहे.
हेही वाचा :
फक्त राजाचा बेटाच राजा बनणार का?
उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची
(अनुवाद : साजिद इनामदार)