आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारा १९४२ चा लढा नेमका होता कसा?

०९ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


आज ९ ऑगस्ट. ऑगस्ट क्रांती दिन. १९४२ ला याच दिवशी महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळेच निर्णायक वळणावर आला. गांधीजींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला. लाखो लोकांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं.

ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध भारतानं युद्ध पुकारावं ही गांधींची इच्छा होती. या युद्धाची तयारीही ते करत होते. १४ जुलै १९४२ ला काँग्रेस वर्किंग कमिटीनं ‘चले जाव’ चा ठराव संमत केला. जनतेनं स्वातंत्र्यासाठी आणि अंतिम त्यागासाठी तयार व्हावं असं आवाहनही गांधींनी केलेलं होतं. अशा तऱ्हेनं वातावरण तापवल्यामुळे देशात ब्रिटिशांविरुद्ध प्रक्षोभ निर्माण झाला.

गांधीजींच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिला. १९४२ मधे महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशानं लोकांच्या मनात सरकारविषयीचा असंतोष अधिक वाढला होता. लोकांनी उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केलं. याची सुरवात गवालिया टॅंक अर्थात ऑगस्ट क्रांती मैदानातून झाली.

गवालिया टँक बनलं क्रांतिमैदान

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातला ऑगस्ट १९४२ हा महिना ऐतिहासिक आहे. ७ आणि ८ ऑगस्टला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं अधिवेशन भरलं होतं. याच अधिवेशनात स्वातंत्र्यसंग्रामाचं रणशिंग फुंकलं गेलं. असंख्य माणसं मुंबईच्या गवालिया टॅंक मैदानावर जमलेली होती. हा स्वातंत्र्याचा लढा या ऑगस्ट क्रांतीमुळे निर्णायक अवस्थेत आला. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व होतं.

महात्मा गांधी यांनी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर जाहीर सभा घेतली. आलेल्या जमावाला त्यांनी संदेश दिला. गांधीजी आपल्या भाषणात म्हणतात, ‘या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री, पुरुषानं आपण स्वतंत्र झालो असं समजावं. स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागलं पाहिजे. संपूर्ण स्वातंत्र्याशिवाय अन्य कशानंही माझं समाधान होणार नाही.’ या भाषणानं लोकांमधे उत्साह निर्माण केला.

ऑगस्ट महिना ह्या या सगळ्या घडामोडींसाठी महत्त्वाचा ठरला. गवालिया टॅंक अर्थात हे मैदान सगळ्याचं केंद्र होतं. खरंतर स्वातंत्र्यासाठीच्या क्रांतीचं केंद्र बनलं. त्यामुळे याला गवालिया टँक न म्हणता ऑगस्ट क्रांती मैदान असं म्हटल जातं.

करेंगे या मरेंगेचा नारा

गांधीजींच्या भाषणानं लोक भारावलेले होते. याच भाषणाचा लोकांच्या मनावर परिणाम झालेला होता. स्वातंत्र्य मिळण्यासाठी कोणत्याही अग्निदिव्यातून जायला लोक तयार होते. भारत स्वतंत्र व्हायला हवं या ध्यासानं ही मंडळी भारावलेली होती. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी हालअपेष्टा सहन केल्या होत्या. शेकडो लोकांनी मरणाला कवटाळलं. त्यासाठी अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतील याची जाणीवही लोकांना होती.

८ ऑगस्टला टाळ्यांच्या गजरात ‘चले जाव’चा ठराव संमत करण्यात आला. आपण जिवंत असल्याची जाणीव लोकांना होत होती. ९ ऑगस्टला पहाटे महात्मा गांधी, पंडित नेहरु, मौलाना आझाद आणि काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सरकारने अटक केली. भारत संरक्षण कायद्याखाली त्यांना स्थानबद्ध केलं. गांधीजींना पुण्याच्या आगाखान पॅलेसमधे ठेवण्यात आलं. तर नेहरु, पटेल, आझाद आणि इतरांना अहमदनगरला नेलं.

गांधीजींना आपला संदेश लिहून ठेवला होता. त्यात ते म्हणाले, स्वातंत्र्यासाठी संप, सरकारी यंत्रणा बंद पाडणं अशा अहिंसक मार्गाने जायचंही स्वातंत्र्य आहे. सरकारला निर्भयपणे सामोरे जा, असं सांगताना करेंगे या मरेंगेचा नारा दिला. नेत्यांच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मुंबईमधे लाखोंनी लोक जमले. त्यांनी ब्रिटीश सरकारविरोधात मिरवणुका, मोर्चे काढले. सरकारनं प्रतिकार केला. पोलिसांनी गोळीबारही केला. पण लोक बधले नाहीत.

हेही वाचा: रसुलन बीबी या वीरपत्नीने सैनिकांच्या सन्मानासाठी आयुष्य वेचलं

बंदुकांसमोर कुणी झुकलं नाही

या चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं. भूमिगत झालेले नेते आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याआधी चळवळीत नसलेल्या तरुणांनी हा संघर्ष चालवण्याचा निर्धार केला. अनेक ठिकाणी हिंसक निदर्शनं झाली. पोस्ट ऑफिसं, रेल्वे स्टेशनं आणि सरकारी ऑफिसांवर लोकांनी हल्ले केले. सरकारविरोधी असंतोष वाढत होता. चले जाव, क्विट इंडिया या घोषणा भारताच्या कानाकोपऱ्यात पोचल्या.

अनेक शांततापूर्ण चाललेल्या मिरवणुकांवर सरकारनं लाठीमार, गोळीबार केला. महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यातल्या नंदुरबारमधे विद्यार्थ्यांनी तिरंगा घेतला आणि मिरवणूक काढली. वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. यात शिरीषकुमार आणि इतर चौघांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. कराचीमधेही हेमू कलानी या तरुणाला असंच ठार करण्यात आलं.

भारतातल्या सगळ्या प्रमुख शहरांमधे हरताळ पाळण्यात आला. अहमदाबादमधे गिरणी कामगार संपावर गेले. गोळीबारामुळे कुणी घाबरलं नाही. बनारस, अलाहाबाद, मथुरा, मीरतमधे ९ ऑगस्टला मोठ्या सभा भरवण्यात आल्या. मद्रासमधे शाळा आणि कॉलेज अनेक दिवस बंद होती. पंजाब आणि बंगालमधे निदर्शनं आणि दंगे झाले. कलेक्टर ऑफिसं जाळण्यात आली. चळवळीच्या या पहिल्या अवस्थेत जनतेने उत्स्फूर्त उठाव केले.

हेही वाचा: कलम ३७० रद्द होणं हा राजकीय इच्छाशक्‍तीचा विजय

लोकच बनले स्वातंत्र्यलढ्याचे नेते

९ ऑगस्टला अनेक नेत्यांची धरपकड झालेली होती. त्यानंतर पंधरा दिवसांनी भूमिगत झालेल्या समाजवादी आणि काँग्रेसमधल्या काही जहाल नेत्यांनी एकसूत्री यंत्रणा उभारली. देशभरातल्या कार्यकर्त्यांना सूचना पाठवण्यात आल्या. त्यासाठी अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफअली, डॉ. राम मनोहर लोहिया आणि सुचेता कृपलानी यांनी एक डिरेक्टरेट मध्यवर्ती समिती बनवली. मुंबईतल्या कॅथड्रल स्ट्रीटवरच्या एका इमारतीतून भूमिगत कार्यकर्त्यांचा एक गट अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं कार्यालय गुप्तपणे चालवतं होता.

या केंद्राकडून स्वातंत्र्य चळवळीचं प्रचारसाहित्य वाटलं जात होतं. टेलिग्राफचे खांब आणि तारा तोडणं, पूल उडवणं, रेल्वे मार्गावरच्या फिश प्लेट काढणे यासारखे कार्यक्रम ठरवण्यात आले. जिल्ह्याच्या प्रमुख केंद्रांशी असलेलं दळणवळण थांबवणं, सरकारची निरोप यंत्रणा खिळखिळी करणं आणि प्रतिसरकार स्थापन करणं, अशी योजना आखण्यात आली.

भूमिगत चळवळीच्या मध्यवर्ती केंद्रात जी पत्रक असायची त्यात वेगवेगळ्या जनआंदोलनांची माहिती असायची. मोर्चे, आंदोलनं, कोण हुतात्मा झालं, कुठं गोळीबार झाला हे सगळं त्यात तपशीलवार असायचं. अनेक ठिकाणी तरुणांचे गट एकत्रित येतं आणि सरकारविरोधात काय करायला हवं, याचं नियोजन करत. लोकांनी ही चळवळ आपल्या खांद्यावर घेतलेली होती.

महाराष्ट्र लढ्याचं केंद्र बनलं

महाराष्ट्रातले समाजवादी नेते अच्युतराव पटवर्धन यांनी भूमिगत चळवळ अखिल भारतीय पातळीवर नेली. ते अगदी आधुनिक पोषाखात वावरत होते. त्यांना साहेब या टोपणनावाने ओळखलं जायचं. तर अनेक वर्ष क्रांतिकारकांच्या चळवळीत वावरलेले समाजवादी कार्यकर्ते शिरुभाऊ लिमये यांनी महाराष्ट्रात ही चळवळ संघटित करण्यात पुढाकार घेतला. सातारा जिल्ह्यातलं प्रतिसरकारही यात आघाडीवर होतं. ज्याचं नेतृत्व क्रांतिसिंह नाना पाटील करत होते. त्यांचे कार्यकर्ते गनिमी काव्याचा वापर करत होते.

या चळवळीत एकसूत्रीपणा आणण्याचं काम एस. एम. जोशींनी केलं. ते उर्दू भाषा सफाईनं बोलत. दाढी वाढवून आणि मौलवीसारखा पोषाख करुन इमाम अल्ली यावानं वावरत. दिल्ली, पेशावर आणि उत्तर भारतात त्यांनी चळवळीचं काम वाढवलं. ना. ग. गोरे हे समाजवादी नेते चले जाव चळवळ सुरु झाली तेव्हा हैद्राबादच्या निजामाच्या तुरुंगात होते. १९४२ च्या डिसेंबरमधे त्यांची सुटका झाली. लगेच भूमिगत चळवळीत सामील झाले. राष्ट्र सेवा दलातल्या तरुणांना त्यांनी या चळवळीकडे ओढलं.

याच काळात पुण्यातल्या दारुगोळ्याच्या फॅक्टरीमधे काम करणारे अनेक तरुण चळवळीकडे ओढले गेले. स्फोटक द्रव्य, डिटोनेटर्स वगैरे सामान त्यांनी चळवळीसाठी पुरवलं. पुढे यातला कर्णिक नावाच्या कार्यकर्त्याला पकडण्यात आलं. त्याचा छळ झाला. इतरांची नाव बाहेर येऊन चळवळ थंड पडू नये, यासाठी त्याने विष घेतलं आणि आत्महत्या केली. अण्णासाहेब सहस्रबुद्धे या ज्येष्ठ गांधीवादी नेत्याच्या घरी स्फोटकांचं कोठार सापडलं. या चळवळीत त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या.

हेही वाचा: पॉलिटिकल इस्लामप्रणित इस्लामी समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज

गांधीजींच्या उपोषणासमोर सरकार नतमस्तक

१ फेब्रुवारी १९४३ मधे व्हाइसरॉय लॉर्ड लिनलिथगोनी एक ८६ पानांची पुस्तिका काढली. त्यात देशामधल्या अशांततेसाठी काँग्रेसला जबाबदार धरलं. गांधीजींनी पत्र लिहिलं आणि सडेतोडपणे आपली भूमिका मांडली. त्यांनी गांधीजींचं म्हणणं नाकारलं. गांधीजींनी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या सदस्यांना भेटण्याची विनंती केली. ती अमान्य करण्यात आली. १० फेब्रुवारी १९४३ ला गांधीजी उपोषणाला बसले. ब्रिटीश राज्यकर्त्यांनी कठोर भूमिका घेतली. एकवीस दिवसानंतर त्यांनी उपोषण सोडलं.

याच काळात भूमिगत गांधीवादी नेत्यांमधे दोन गट पडले. गांधीजींच्या उपोषणानंतर नेत्यांनी आपले आक्षेप गांधींसमोर मांडले होते. जयप्रकाश नारायण आणि डॉ. राम मनोहर लोहिया यांनी मात्र अशी फूट पडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. भूमिगत चळवळीतले त्यांचे अनेक साथी पकडले गेले होते. या दोनही नेत्यांना ब्रिटिशांच्या विरोधातली चळवळीची आग कायम ठेवायची होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

६ मे १९४४ ला गांधीजींना स्थानबद्धतेतून सोडण्यात आलं. त्यानंतर ४ जुलैला त्यांनी न्यूज क्रॉनिकल या लंडनच्या वृत्तपत्राचे प्रतिनिधी स्टुअर्ट गेल्डर यांना मुलाखत दिली. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर भारताकडे राज्य सोपवलं जाईल असं ब्रिटीश सरकारनं ताबडतोब जाहीर करावं असा इशाराच त्यांनी दिला. चलेजाव चळवळीचं वातावरण गांधीजींनी तयार केलं. लोकांनी मनं चेतवली. जयप्राकाश नारायण आणि अन्य भूमिगत नेत्यांनी ब्रिटिश सरकारविरोधी ही चळवळ दीर्घ काळ चालवली.

चलेजाव चळवळ हे जनआंदोलन होतं

‘चलेजाव’ चळवळीचं वातावरण गांधीजींनी तयार केलं. असं म्हटलं जातं की त्यांनी चले जाव हा नाराचं दिला नव्हता. त्यांनी काही मागण्या केल्या आणि त्या सरकारसमोर ठेवल्या. त्या पूर्ण झाल्या नाहीत तर लोकांनी सरकारला सळो की पळो करुन सोडावं असं म्हटलं. पण लोकांमधे असंतोष होता. ब्रिटिशांबद्दल प्रचंड चीड होती. ती व्यक्त करायला त्यांना एक माध्यम हवं होतं. त्यामुळेच चलेजाव चळवळ हे देशव्यापी आंदोलन बनलं.

गांधीजी आणि अनेक नेते तुरुंगात गेल्यावर या आंदोलनाला कुणी नेतृत्वही नव्हतं. चळवळ अहिंसक व्हावी असं गांधीजींना वाटत होतं. त्यांच्या अटकेनंतर मात्र जनतेनं आणि भूमिगत चळवळीतल्या नेत्यांनी आवश्यकता होती तिथं शस्त्रांचा वापर केला. ब्रिटिशांकडून भारतातल्या श्रमजीवी वर्गाचं आर्थिक शोषणही होत होतं. या आर्थिक आणि राजकीय गुलामगिरीतूनही त्यांना मुक्त व्हायचं होतं. होणारं शोषण आणि असंतोष हा या चळवळीच्या मुळाशी होता. त्यामुळेच हे आंदोलन उभं राहीलं.

हेही वाचा: 

सुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एका शस्त्रासारखा वापर केला

खरोखरचा फुन्सुक वांगडू सांगतोय, लडाखमधे बाहेरचे लोक नकोतच

काश्मीरच्या निमित्ताने द्वेषाचं कोडिंग करुन आपल्या मेंदूचं प्रोग्रामिंग सेट होतंय

(विशेष संदर्भ: साधना प्रकाशनाचं ग. प्र. प्रधान लिखित ‘स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत’ हे पुस्तक)