यंदाचं आयपीएल कुणाचं- बॉलरचं की बॅट्समनचं?

१८ एप्रिल २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


वानखेडे आणि चिन्नास्वामी स्टेडियमचं पीच बॅट्समनना झुकतं माप देतं. तर बॉलर्सशी दुजाभाव करतं. हे झुकतं माप कमी करून दोघांनाही समान संधी मिळेल, अशी साम्यवादी प्रवृत्ती दाखवायला हवी. तरच क्रिकेटच्या विश्वातला बॉलर आणि बॅट्समन दोघांचाही आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेचा स्तर समान पातळीवर येईल.

मुंबईतल्या वानेखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२१ च्या सुरवातीच्या दोन मॅचमधे ८१६ धावांचा पाऊस पडला. हा पाऊस ७८.४ ओवरमधे पडल्यानं वानखेडेवर धावांचा महापूर आला होता, असं आपण म्हणू शकतो. रन्सची ही आकडेवारी टेस्ट क्रिकेटच्या धर्तीवर तपासून पाहिली तर काय दिसतं?

सर्वसाधारणपणे टेस्टचे ९०-९० ओवरचे चार डाव मिळून जेवढे रन होतील तेवढे रन फक्त ७८.४ ओवरमधे झाल्या. आयपीएलमधल्या दोनच मॅचमधे झालेल्या रनच्या या अवाढव्य आकड्यांकडे पाहून खरंच वाटतं का, की क्रिकेटच्या निर्दयी जंगलात बॉलर नावाचा प्राणी अस्तित्वात आहे?

हेही वाचा: महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

पहिली बॅटिंग फायद्याची नाही?

वानखेडेला आपण भारतातल्या क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखतो. अशा मैदानावर क्रिकेट हे सर्वांगाने फुललं पाहिजे; पण इथं फक्त बॅट्समनच गब्बर होतायत. बॉलरची अवस्था ही वेठबिगारासारखी झालीय. त्यांनी फक्त २० ओवर टाकायची, पीचकडून मदत मिळेल, याची अपेक्षाच करायची नाही.

यावेळच्या आयपीएलमधे वानखेडेवर झालेल्या दोन मॅच पाहून हे क्रिकेट नाही, हे निश्चित होतं. वानखेडेवरची पहिली मॅच झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने मॅचच्या वेळेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या मते, पहिल्यांदा बॅटिंग करणार्‍या टीमला मॅच अर्धा तास लवकर सुरू झाली तर त्याचा फटका बसतो.

कारण, पहिल्यांदा बॅटिंग करणार्‍या टीमला पीचचा फायदा होत नाहीय. तो फायदा दुसर्‍यांदा बॅटिंग करणार्‍या टीमला होतो. त्यामुळे दुसर्‍यांदा बॅटिंग करणार्‍या टीमसमोर कितीही मोठं आव्हान ठेवलं, तरी ते आव्हान सहज पार होऊन जातं.

बॉलर्सचा भाव वाढला

पण, मुद्दा असा आहे की, धोनीनेही फक्त बॅटिंगसाठी पोषक परिस्थिती पाहिली. बॉलरचं काय? जरी मॅच रात्री ८ वाजता सुरू झाली, तरी बॉलरची वेठबिगारी कुठं संपणार आहे? वानखेडेवरचं पीच बॅट्समनला इतकं पोषक आहे की, बॅट्समनचा मिसटाईम झालेला फटकाही सीमापार जातो. म्हणजे बॅट्समनचा फटका मिसटाईम होणं ही बॉलिंगची मॉरल विक्टरी.

बाकी त्याच्या डोक्यावर अजून एक ओझं मात्र कायम असणार. त्यामुळे वानखेडेवर बॉलरांना कुठं बॉलिंग करावं, हे कळतच नाहीय. वानखेडेवर बॉलर जितकं हतबल दिसतात, तितकं कुठंही दिसत नाहीत. भारत-इंग्लंड वनडे वेळी बॉलरच्या दयनीय अवस्थेवर बोट ठेवत गौतम गंभीरनं ट्विट करून आयसीसीला बॉलरांना वाचवण्याची गरज असल्याचं बोलून दाखवलं.

त्याने ‘खेळाचे नियम हे फारच बॅट्समन धार्जिणे झालेत. त्यामुळे बॉलरची गरजच नाही, असं वाटतं. तसंही ते हरल्यासारखेच आहेत. आयसीसीनं लगेच ३० यार्ड सर्कलचे नियम, दोन चेंडूंचा वापर आणि बाऊन्सरवरच्या मर्यादा या नियमांवर पुन्हा विचार करण्याची गरज आहे. नाही तर बॉलर हे प्रोग्राम बॉलिंग मशिन होतील,’ असंही म्हटलं होतं.

हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं

वेगवान बॉलर्सची चलती

आयपीएलचा गेला हंगाम हा यूएईमधे झाला होता. तिथल्या पीच या फिरकीला पोषक असल्याचा इतिहास आहे; पण मागच्या आयपीएलमधे एक वेगळीच गोष्ट घडली. या फिरकीच्या माहेरघरात वेगवान बॉलरनी अक्षरशः धुमाकूळ घातला. दिल्ली कॅपिटलच्या कसिगो रबाडाने १७ मॅचमधे ३० विकेट घेतल्या.

रबाडा हा एकटाच वेगवान बॉलर नाही ज्याने बक्कळ विकेट आपल्या नावावर केल्या. या यादीत दुसर्‍या क्रमांकावर २७ विकेट घेणारा मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह आणि २५ विकेट घेणारा ट्रेंट बोल्ट तिसर्‍या क्रमांकावर होता. त्यापाठोपाठ १६ मॅचमधे २२ विकेट घेऊन दिल्लीचा नॉर्खिया चौथ्या क्रमांकावर होता.

गुंतवणूक फायद्याची कारण

फिरकीला साथ देणार्‍या पीचवर वेगवान बॉलरची आकडेवारी पाहिली, तर वेगवान बॉलरनी बदलत्या क्रिकेटप्रमाणं आपल्या शैलीत बदल करत आपल्या भात्यात अनेक नवनवीन अस्त्रं जमा केलीत. वेगवाग बॉलरच्या दमदार कामगिरीमुळेच काहीसं अडगळीत गेलेल्या या जमातीला २०२१ च्या आयपीएलमधे बक्कळ कमाई करण्याची संधी मिळाली.

इतिहासात सर्वाधिक बोली लागलेला ख्रिस मॉरिस स्पीड बॉलरच आहे. त्यानंतर २०२१ च्या यादीतल्या पहिल्या पाचमधे तीन स्पीड बॉलर आहेत. तर या पाचात एकूण चार बॉलर आहेत. त्यांना जवळपास १० कोटी किंवा त्याच्यावरची बोली लागलीय. काईल जेमिसन आणि झाय रिचर्डसन या नवख्या स्पीड बॉलरनी १५ आणि १४ कोटी आपल्या खिशात टाकलेत.

फ्रेंचायजींनी एवढी मोठी रक्कम बॉलरवर खर्च केली; कारण त्यांना आयपीएलच्या २०२० च्या हंगामात या बॉलर्समधे केलेली गुंतवणूक फायद्याची दिसली. त्यामुळे त्यांनी बॅट्समनना सोडून बॉलरना मालामाल केलं. त्यांची अपेक्षा होती की, हे बॉलर आपल्याला २०२१ च्या हंगामात आपल्या या मोठ्या गुंतवणुकीचे फायदे देतील.

हेही वाचा: आयपीएलच्या तपाची कहाणी : थोडी मिठी, जास्त खट्टी

वानखेडे, चिन्नास्वामीचं पीच तोट्याचं?

आयपीएलच्या १४ व्या हंगामाची सुरवात झाली त्यावेळी मात्र पहिल्याच सत्रात वानेखेडे स्टेडियमनं त्यांची निराशा केलीय. आयपीएलच्या पहिल्या सत्रात जवळपास पहिल्या २० मॅच मुंबईच्या वानखेडेवर आणि चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडियमवर होत आहेत. चेन्नईचं पीच कायम बॉलरसाठी मदतीचा हात देतं; पण वानखेडेचं पीच बॉलरना सवतीचं पोर असल्याप्रमाणं वागणूक देतं.

कितीही चांगला बॉलर असला, तरी वानखेडे त्याला बॅट्समनसमोर हतबल होण्यास भाग पाडतंच. त्यातही काही अपवाद असतातच ते या पीचवरही आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवतात; पण सर्वसाधारण वानखेडेचं पीच कायम बॅट्समनला झुकतं माप देतं. आता पहिल्याच सत्रातल्या १० मॅच या वानखेडेवर होतायत. त्यामुळे बॉलरची धुलाई नक्की आहे.

त्यानंतर हंगामातल्या शेवटच्या मॅचेस हे बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहेत. इथली पीच म्हणजे वानखेडेला झाकावं आणि चिन्नास्वामीला काढावं. वानखेडेप्रमाणेच चिन्नास्वामीही बॉलरवर विशेष प्रेम दाखवतं. इथल्या मॅचमधे बॉलरचं मरण हे अटळ असतं. त्यामुळे ही दोन मैदानं फ्रेंचायजींनी कोट्यवधी खर्चून केलेली बॉलरमधली गुंतवणूक डब्यात घावलणार, अशी मोठी भीती आहे.

क्रिकेटमधली बॉलिंगची कला कायम ठेवायची असेल, तर वानखेडे आणि चिन्नास्वामी स्टेडियममधल्या पीचनी बॅट्समनला पोषक असलेली प्रवृत्ती कमी करून दोघांनाही समान संधी मिळेल, अशी साम्यवादी प्रवृत्ती दाखवायला हवी. तरच क्रिकेट जगतात बॅट्समन आणि बॉलर दोघांचाही आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेचा स्तर समान पातळीवर उंचावेल. नाही तर बॉलरची दिवाळी करणारा २०२१ चा लिलाव हा अखेरचा लिलाव ठरेल.

हेही वाचा: 

अली अख्तर : टेनिस हाच त्यांचा विश्वास होता

कॉमेंट्रीटर असे अतिशहाण्यांसारखे का वागतात?

रवीचंद्रन अश्विन : फॉरमॅटप्रमाणे रंग बदलणारा सरडा

महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का?

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)