कोरोनातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांमधे काही व्यक्तींंमधे म्युकर मायकोसिस हा गंभीर आजार आढळून येतोय. या बुरशीजन्य आजाराचा शरीरात पसरण्याचा वेग कॅन्सरपेक्षा जवळपास दहा पटींनी अधिक असतो. त्यामुळेच याचं गांभीर्य ओळखायला हवं. आजाराची लक्षण असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
देशभर कोरोनाने अक्षरश: थैमान घातलंय. कोट्यवधी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. लाखो लोक मृत्युमुखी पडलेत. तितक्याच संख्येने कोरोनाचे पेशंट बरेही झाले आहेत. पण कोरोनावर मात करूनही संकटाची तलवार डोक्यावर आहेच. कोरोनातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांमधे काही व्यक्तींमधे गंभीर आजार असलेला म्युकर मायकोसिस आढळून येतोय.
६ मेला दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमधे म्युकर मायकोसिसचे सहा पेशंट सापडले. त्यानंतर लगेच ८ मेला महाराष्ट्रात दोनशे पेशंट असल्याची बातमी आली. नंतर हा आकडा दोन हजारच्या घरात जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला. तिकडे गुजरातमधे शंभर नवे पेशंट सापडले. त्यानंतर कोरोनाबरोबरच म्युकर मायकोसिसच्या पेशंटसाठी वेगळा वॉर्ड असेल, अशी घोषणा सरकारने केली.
हेही वाचा: कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय
आपल्याभोवती जे वेगळ्या प्रकारचे जीवजंतू आहेत, ज्यात वायरस, बॅक्टेरिया, बुरशी, परजीवी जंतू असे अनेक प्रकार आहेत. बुरशीमुळे होणारा आजार म्हणजे म्युकर मायकोसिस. या बुरशीजन्य आजाराला काळी बुरशी असंही म्हटलं जातं.
आपल्या आजूबाजूच्या परिसरात ही बुरशी असते. हवेत या गटातल्या बुरशीचे बीजाणू तरंगत असतात. हे बीजाणू मातीत असतात म्हणजे अर्थातच शेतात असतात. ओलसर जागी असतात. बुरशीयोग्य जागा मिळेल, तिथे ते असतात. आपल्याभोवती ते वर्षानुवर्षे आहेतच, पण हे बीजाणू कधी कधी श्वासावाटे आत घेतले जातात. सर्वसामान्य माणसाला त्याचा काहीही त्रास होत नाही.
परवा-परवापर्यंत म्हणजे कोरोना येईपर्यंत म्युकर मायकोसिसचा बोलबाला नव्हता. कारण वर्षातून एखाद दुसरा पेशंट तोही नाक-कान-घसा किंवा श्वसन विकार तज्ज्ञांकडे यायचा. रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली आहे, अशाच पेशंटमधे तो दिसतो. साधारणपणे या आजाराच्या पेशंटची पूर्ण जगभरातली संख्या दरवर्षी दहा हजारांच्या घरात असते.
म्युकर मायकोसिस हा आजार सर्वसामान्य माणसाला होत नाही. सर्वसामान्य म्हणजे ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे, ज्या व्यक्तीचा डायबेटीस नियंत्रणात आहे, ज्या व्यक्तीला कर्करोगासारखा आजार नाही अशांना धोका नाहीय.
जी व्यक्ती स्टेरॉइड किंवा रोगप्रतिकारक क्षमता कमी करणारी औषधं दीर्घकाळ घेत नाही, अशा कोणत्याही व्यक्तीला म्युकर मायकोसिसचा धोका नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हा आजार एका पेशंटकडून दुसर्या व्यक्तीकडे पसरत नाही. संपर्कात आल्यामुळे हा आजार होत नाही.
हेही वाचा: कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
अशा पेशंटमधे बुरशीचे बीजाणू नाकावाटे आत जातात तेव्हा नाकाच्या पोकळीतील श्लेष्मल पटलावर ते आक्रमण करतात. आपल्या नाकाच्या मागे सायनस नावाच्या हाडांच्या पोकळ्या असतात. आपण नाकावाटे श्वास आत घेतो, तेव्हा हवा सायनसमधे जाते. या पेशंटमधे ही बुरशी नाकाच्या पोकळीतून सायनसच्या पोकळीत जाते आणि ही बुरशी वाढू लागते.
या बुरशीचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे, ही बुरशी तातडीने रक्तवाहिन्यांमधे शिरते आणि रक्तवाहिन्यांतून शरीराच्या कोणत्याही भागात वेगाने पसरते. या बुरशीचा शरीरात पसरण्याचा वेग हा कॅन्सरपेक्षा जवळपास दहा पटींनी अधिक असतो. म्हणून याचं गांभीर्य ओळखणं महत्त्वाचं आहे.
या बुरशीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रक्तवाहिन्यांतून जशी ही बुरशी शरीराच्या एखाद्या भागात पसरते, तेव्हा ती रक्तवाहिन्यांवर परिणाम करते आणि रक्तवाहिन्यांमधे ती गुठळी निर्माण करते. परिणामी ज्या भागात ही बुरशी पसरते, त्या अवयवाचा रक्तपुरवठा हळूहळू कमी होतो, मंदावतो आणि बंद पडतो. रक्तपुरवठा बंद पडल्यामुळे तिथल्या पेशी मृत होतात आणि तो भाग निकामी होतो. अशा अवयवात ही बुरशी वेगाने वाढते आणि पसरत राहते.
नाकाच्या पोकळीतून सायनसमध्ये आणि सायनसमधून डोळ्याच्या भागात आणि डोळ्याच्या भागातून डोळ्यांमागे कवटीत असलेल्या मेंदूपर्यंत हा म्युकर मायकोसिस रक्तवाहिन्यांमधून वेगाने पसरतो. नाक, सायनस, डोळा आणि मेंदूचा डोळ्यांमागचा भाग बाधित करतो. थोडक्यात तो एकामागून एक अवयव निकामी करत जातो तेही वेगाने. या प्रवासात तो तोंडाची पोकळी, टाळू आणि दात यांनाही सोडत नाही.
कोरोना हा डायबेटीस व्यक्तींमधे अधिक प्रमाणात आढळतो. ज्यांचा डायबेटीस नियंत्रणात नाही, त्यांच्यात कोरोनाचं प्रमाण अधिक आहे. कोरोना झाल्यानंतर रक्तातली साखर अधिक वेगाने वाढते. डायबेटिक किटोसिडोसिसच्या पुढच्या टप्प्यात पेशंट जातो. कोरोना पेशंटमधे जी औषधं दिली जातात, त्यात स्टेरॉईडचा वापर अधिक प्रमाणात केला जातो आणि त्याचा उपयोगही होतो.
यातला एक महत्त्वाचा तिढा म्हणजे, स्टेरॉईडमुळे रक्तातली साखर वाढते. कोरोनावर उपचार करत असताना स्टेरॉईडचं प्रमाण अधिक झालं किंवा रक्तातली साखर नियंत्रित करण्यात अपयश आलं तर म्युकर मायकोसिसचा धोका वाढतो.
कोरोना पेशंटमधे रक्तातल्या ऑक्सिजनचं प्रमाण दीर्घकाळपर्यंत कमी झालेलं असतं आणि रक्तात पसरण्यासाठी बुरशीला ही संधीच असते. त्यामुळे कोरोना बरा झाल्यानंतर आपल्या रक्तातली साखर नियंत्रणात ठेवणं किती महत्त्वाचं असतं, हे या निमित्ताने लक्षात येईल.
हेही वाचा: डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
म्युकर मायकोसिस झाला आहे का, याची शहानिशा करण्यासाठी डोळ्यांत तेल घालून जागं रहावं. ज्यांना हॉस्पिटलमधे दीर्घकाळ रहावं लागलंय किंवा ज्यांना आयसीयूत दाखल व्हावं लागलं, ऑक्सिजनची गरज दीर्घकाळ लागली, त्यांना तर हा धोका असतोच. पण ज्यांना सौम्य कोरोना झाला, पण रक्तातली साखर मात्र खूप जास्त प्रमाणात होती, डायबेटिक किटोसिडोसिस झाला, ज्यांना डायबेटीस, कर्करोग, यकृताचा किंवा मूत्रपिंडाचा आजार आहे, या सर्वांनी सावध रहायला हवं.
कोरोना बरा झाल्यानंतर साधारण दहा ते पंधरा दिवसांपासून दीड महिन्यांपर्यंत म्युकर मायकोसिसची लक्षणं आढळू लागतात. सर्दी, नाकातून पाणी गळणं, नाकातून लालसर किंवा काळसर स्राव येणं हे म्युकर मायकोसिसचे महत्त्वाचं लक्षण आहे. काही लोकांना तोंडावर विशेषत: नाक किंवा ओठाजवळ बारीकसा काळा डाग किंवा चट्टा दिसतो. तोंडावर सूज येते, ती काही वेळा चेहर्याच्या एका बाजूला येते. चेहर्याची एक बाजू खूप दुखते;ती इतकी की, पेनकिलर घेऊनसुद्धा कमी येत नाही.
तीव्र डोकेदुखी, डोळे दुखणं, डोळे मोठे दिसणं, डोळ्यांभोवती सूज, डोळ्यांची हालचाल कमी होणं, दिसणं कमी होणं, डोळ्यांतून पू येणं, डोळ्याच्या मागच्या बाजूला डोक्यात खूप कळा येणं ही म्युकर मायकोसिसची वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहेत. काही वेळा त्वचेवर लालसर चट्टा उठून तिथं अल्सर होतो. या अल्सरच्या मध्यभागी पिवळसर किंवा काळसर रंग येतो. अशाच प्रकारचा चट्टा तोंडाच्या आत विशेषत: टाळूवर येतो.
दात दुखणं, दात हलणं, दात - हिरड्या - तोंडातून पू येणं, तोंडात - टाळूवर किंवा हिरड्यांवर पुरळ उठणं किंवा चट्टे उठणं, त्यात काळा किंवा पिवळसर डाग दिसणं, जबडा दुखणं अशा तक्रारी काही व्यक्तींमधे आढळतात. आजार तीव्र झाला तर आतली हाड दिसू लागतं. पुढे टाळूला किंवा हिरड्याला भोक पडू शकतं. अंग दुखणं, वारंवार ताप येणं अशाही तक्रारी यात दिसून येतात. याच टप्प्यात जर काळजी घेतली तर म्युकर मायकोसिसवर आपण मात करू शकतो.
नाकाच्या आत किंवा तोंडात खपली येते तो आजाराचा पहिला टप्पा असतो. या टप्प्यात जर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला तर नाकाच्या आतल्या भागाची तपासणी करून ती खपली म्युकर मायकोसिसची आहे की नाही, याचा अंदाज बांधता येतो. संसर्ग झालेल्या भागाचा तुकडा काढून लगेच म्युकर मायकोसिसचं निदान करता येतं. याच टप्प्यात जर औषधोपचार सुरू केले, अँटिफंगल प्रकारची औषधं दिली तर आजार आटोक्यात येतो.
याच वेळी नाक-कान-घसा तज्ज्ञांकडून नाकाची पोकळी आणि सायनसची पोकळी औषधोपचाराने साफ करून घेता येते. म्युकर मायकोसिस झालेला भाग काही वेळा शस्त्रक्रियेने काढून टाकावा लागतो. जर असा भाग दाताजवळ किंवा जबड्यात असेल तोही भाग काढून टाकावा लागतो. आजाराच्या सुरवातीच्या टप्प्यात रक्तवाहिन्या पूर्णपणे बंद झालेल्या नसल्यामुळे इंजेक्शनद्वारे दिली जाणारी अँटिफंगल औषधे लगेच उपयोगी पडतात.
पुढच्या टप्प्यात जर आजार गेला तर तो डोळ्यांपर्यंत पसरतो आणि दृष्टी जाण्याची शक्यता निर्माण होते. म्युकर मायकोसिसमुळे दृष्टी गेल्याच्या - अंधत्व आल्याच्या अनेक केसेस आहेत. या आजारात ९० टक्के पेशंटमधे एकाच डोळ्यावर परिणाम होतो. पण दुर्लक्ष केल्यास दोन्ही डोळे निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा: १०२ वर्षांपूर्वी पहिल्या महायुद्धात धुमाकूळ घातलेल्या वायरसचा धडा काय?
आजाराचं लवकर निदान झालं नाही किंवा उपचार लवकर झाले नाहीत तर डोळ्याच्या पोकळीतून आजार मेंदूपर्यंत जातो आणि मेंदूचा तो भाग निकामी होतो. मेंदूवर परिणाम झाल्यामुळे मेंदूच्या त्या भागाच्या कामावर परिणाम होतो आणि मग हा आजार मेंदूत पसरला तर काही वेळा जीवही गमवावा लागतो.
म्युकर मायकोसिस या प्रकारातल्या पेशंटमधे मृत्यूचं प्रमाण ३० ते ७० टक्के इतकं आहे. या टप्प्यात डोळा आणि मेंदू या अवयवांपर्यंत आजार पसरल्यास शस्त्रक्रिया करणं अवघड होतं आणि केल्यास ती १०० टक्के यशस्वी होणं कुणाच्या हातात नसतं कारण म्युकर मायकोसिसने आपले हात-पाय वेगाने पसरलेले असतात. म्हणून म्युकर मायकोसिसच्या पहिल्या टप्प्यात तो ओळखणे आणि डॉक्टरांचा तातडीने सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही म्युकर मायकोसिसमधून बाहेर पडला तरी पुढचे काही दिवस - काही महिने या लक्षणांवर पुन्हा बारीक लक्ष ठेवावं लागतं. डॉक्टरांकडून वारंवार तपासून घ्यावं लागतं. कारण म्युकर मायकोसिस पुन्हा तोंड वर काढू शकतो. फुफ्फुसांचा म्युकर मायकोसिस हा मोठ्या प्रमाणावर आढळत नाही; पण येत्या काही काळात सावध राहणं महत्त्वाचं आहे.
त्वचेचा म्युकर मायकोसिस झाला तर, त्वचेच्या त्या भागाचा तुकडा काढून त्याचे निदान करता येते. जेव्हा नाकातून सायनसची पोकळी आणि तिथून डोळा आणि मेंदू बाधित झाला असेल अशी शंका येते तेव्हा अशा पेशंटचा एमआरआय स्कॅन करून म्युकर मायकोसिसचं निदान करता येतं. क्वचित प्रसंगी सीटी स्कॅनचाही फायदा होतो.
कोरोना बरा झाल्यानंतरही जबाबदारी संपत नाही. कोरोनानंतर तीन ते सहा महिने नियमित उपचार घ्यावे लागतात. घरातलं वातावरण स्वच्छ ठेवावं लागतं. घरात हवा खेळती आहे की नाही यावर लक्ष ठेवावं लागतं. कमी सूर्यप्रकाश, ओलसर भिंती, दमट हवा, कोंदट वातावरण या गोष्टी बुरशीच्या वाढीसाठी पोषक असतात. चेहर्याची आणि एकंदर शरीराची स्वच्छता याकडे दुर्लक्ष नको.
कोरोना आहे तोपर्यंत जागरूकता हवीच. एखाद्याला म्युकर मायकोसिस झाला म्हणून घरातल्या इतर व्यक्तींनी घाबरून जायचं बिलकुल कारण नाही. त्यांनी अशा पेशंटची नीट काळजी घ्यावी. त्या व्यक्तीचा आहार-विहार याकडे इतरांनी लक्ष द्यावं. आणि अशा व्यक्तीला मानसिक आधार द्यावा. अर्थात कोरोना संपेपर्यंत ‘एसएमएस’ म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर ही त्रिसूत्री कुणीही विसरायची नाही.
हेही वाचा:
एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?
कोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं?