अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सुलेमानींच्या मृत्यूने तिसरं महायुद्ध होणार?

११ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, अशी अनेक वर्षांपासून विद्वानांमधे चर्चा सुरू आहे. पाण्यावरून महायुद्ध होईल तेव्हा होईल. पण सध्या कासिम सुलेमानी हा लष्करी अधिकारी अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेल्याने जगावर महायुद्धाचं सावट आलंय. पावसासारखे शेअर बाजार कोसळू लागलेत. जागतिक सत्ता समीकरणांत एवढी उलथापालथ घडवणारे सुलेमानी नेमके आहेत तरी कोण?

३ जानेवारी २०२०. सकाळची वेळ. इराकचं बगदाद शहर झोपेत होतं. बगदादच्या आंतराराष्ट्रीय विमानतळावरुन गाड्यांचा ताफा बाहेर येताना अचानक एअर स्ट्राईक झाला. गाड्यांच्या ताफ्यातल्या दोन कार मिसाईलच्या माऱ्याने हवेत उडाल्या. आणि ही बातमी जगभरातल्या मीडियासाठी ब्रेकिंग न्यूज ठरली. कारणही तसंच होतं. इराणचा एक सैन्य अधिकारी यात मारला गेला. त्याचं नाव आहे कासिम सुलेमान.

ब्रेकिंग न्यूजमागचा इतिहास

इराण आणि अमेरिका यांच्यातला तणाव गेल्या महिनाभरापासून प्रचंड वाढलाय. डिसेंबर २०१९ मधे इराकमधल्या किरकुक भागात इराकच्या मिलिट्री कॅम्पवर ३० पेक्षा जास्त रॉकेट डागण्यात आले. यात अमेरिकेचे चार आणि इराकचे दोन सैनिक जखमी झाले. अमेरिकेचा एक सैनिक ठारही झाला. हा हल्ला हिजबूल या दहशतवादी संघटनेनं केल्याचा दावा अमेरिकेने केला. हिजबूल ही इराण समर्थित ‘इराक मिलिशिया फोर्स’ आहे.

इराणच्या या हल्ल्याचा बदला म्हणून २९ डिसेंबरला अमेरिकेनं हिजबूलच्या पाच ठिकाणांवर हवाई हल्ले केले. त्यात २४ जण मारले गेले. इराणचं म्हणणं होतं यात ३१ जणांचा मृत्यू झालाय. त्यानंतर ३१ डिसेंबरला इराक मिलिशिया फोर्सच्या लोकांनी बगदादमधल्या अमेरिकेच्या दुतावासासमोर निदर्शनं केली. ‘डेथ टू अमेरिका’ अशा घोषणा देण्यात आल्या. दुतावासातल्या अधिकाऱ्यांना तब्बल २४ तास वेठीस धरण्यात आलं.

इराण आणि अमेरिकेतल्या या संघर्षाला काही डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासूनचा किंवा गेल्या चारपाच वर्षांचा इतिहास नाही. सात दशकांचा इतिहास आहे. १९५३ मधे इराणमधलं लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार पाडून सत्ता राजाच्या हातात गेली. यामागे अमेरिकेचा हात होता. यानंतर वेळोवेळी दोन्ही देशांत वादावादी होत आलीय. आणि याला डिसेंबरमधल्या घडामोडींनी एका टोकावर नेऊन ठेवलंय.

हेही वाचाः न्या. लोया मृत्यू प्रकरणाची फेरचौकशी अमित शाहांचं टेन्शन वाढवणार?

तणाव कसा वाढत गेला?

डिसेंबरच्या हल्ला प्रतिहल्ल्याच्या आधीही जुलै २०१८ मधे दोन देशांतल्या राष्ट्रप्रमुखांमधे शाब्दिक हाणामाऱ्या झाल्या. याविषयी लल्लनटॉप या हिंदी वेबसाईटवर एक स्टोरी आलीय. थेट समोरच्याच्या अंगावर धावून जायचं ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्टाईलच आहे. त्यानुसार, जुलै २०१८ मधे इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांना त्यांनी थेट धमकी दिली. त्यावर इराणकडून उत्तर आलं. पण ते रुहानींकडून नाही तर जनरल सुलेमानी यांच्याकडून. त्या उत्तरात अमेरिकी अध्यक्षांना आव्हान देण्याची भाषा होती. ती ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकीच होती.

सुलेमानी आपल्या उत्तरात म्हणाले, ‘तुला उत्तर देणं हे आमच्या राष्ट्राध्यक्षांच्या सन्मान आणि अभिमानाला धरून नाही. मी सैनिक या नात्यानं तुला उत्तर देतो. आम्ही तुझ्या खूप जवळ आहोत. याची तू कल्पनाही करु शकत नाहीस. आम्ही तयार आहोत आणि हो याच मैदानातले लोक आहोत. अमेरिकेनं युद्ध पुकारलं तर इराण तुमच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त करेल. तुम्ही युद्ध सुरू कराल, पण त्याचा शेवट मात्र आम्ही करू.’

सुलेमानी नेमकं आहेत तरी कोण?

११ मार्च १९५७ ला इराणच्या कर्मन प्रांतातल्या शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले कासिम सुलेमानी हे इराणी सैन्यातले टॉपचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. ८० च्या दशकात इराण आणि इराक यांच्यातल्या युद्धावेळी त्यांनी आपल्या करिअरला सुरवात केली. या युद्धात त्यांनी इराणच्या पुर्वेला असलेल्या एका तुकडीचं नेतृत्व केलं. दहा वर्ष चाललेल्या या युद्धात इराणला विजय मिळवून देणारे सुलेमानी एका रात्रीत इराणी लोकांचे आयडॉल झाले.

पुढे १९९८ मधे सुलेमानींच्या हातात इराणच्या कुड्स सेनेचं नेतृत्व आलं. या फोर्सकडे परदेशात गुप्त मोहिमा पार पाडण्याची जबाबदारी असते. या फोर्सच्या माध्यमातून सुलेमानींनी येमेन, इराक, सीरिया सारख्या देशांमधे आपलं स्वतःचं नेटवर्क उभं केलं. यातून सुलेमानींचं मध्यपूर्व आशियात प्रचंड प्रभावक्षेत्र तयार झालं.

हेही वाचाः एनआरसी, सीएएः माणूस महत्त्वाचा की माणसानं तयार केलेल्या संस्था?

अयातोल्ला खोमेनींचे वारसदार

कासिम सुलेमानी हे इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अल खोमेनी यांचे अत्यंत विश्वासू मानले जायचे. निव्वळ विश्वासूच नाही तर लोक त्यांना खोमेनींचा वारसदार म्हणूनही ओळखायचे. ६२ वर्षांचे सुलेमानी हे इराणच्या कुड्स सेनेचेही प्रमुख होते. गेल्याच वर्षी त्यांना ‘ऑर्डर ऑफ जुल्फिकार’ हा इराणचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार देण्यात आला होता. १९७९ नंतर हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले इराणी ठरले.

इराणमधे त्यांचं स्थान हे दोन नंबरचं होतं. इराणमधे खोमेनी यांच्यानंतरचा सगळ्यात शक्तिशाली नेता अशी त्यांची ओळख होती. एवढंच नाही तर त्यांचं नाव अनेकदा इराणचे अध्यक्षपदाचं संभाव्य उमेदवार म्हणूनही चर्चेत आलं.

सारा वाद मध्यपूर्वेवर वर्चस्वाचा

इराणमधे मोठ्या प्रमाणात खनिज तेलाचे साठे आहेत. त्यामुळे अमेरिकेसारख्या देशांसाठी इथलं राजकारण तसं महत्वाचं. इथल्या राजकारणावरही आंतराष्ट्रीय दबाव असतो. इथली सत्ता दोघांभोवती फिरत असते. धर्माचा प्रमुख असलेला इमाम हा सर्वोच्च नेता असतो. तर सोबत लोकशाही मार्गानं निवडलेला एक राष्ट्राध्यक्ष असतो. अर्थात हा राष्ट्राध्यक्ष इमामांच्याच पसंतीचा असतो.

सध्याच्या तणावामागे तेल साठ्यांनी संपन्न मध्यपूर्वेवर वर्चस्व कुणाचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. गेल्या दहाएक वर्षांपासून इराक आणि सीरिया हे दोन देश अमेरिकेच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे युद्धात ढकलले गेलेत. या युद्धात सुलेमानी यांनी दोन्ही देशांसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे मध्य पूर्वेत इराणचं वर्चस्व वाढू लागलं.

इराणचं वर्चस्व वाढू नये म्हणून सुन्नीबहुल सौदी अरेबिया आणि इस्त्रायल यांचे प्रयत्न सुरू होते. या दोघांनाही अमेरिकेचं बळ होतं. अशा स्थितीतही सुलेमानी यांनी इराणचा प्रभाव कायम राखण्यात कळीची भूमिका बजावत होते. यातूनच अमेरिकेच्या नेतृत्वात  तिन्ही देशांनी ‘कुड्स फोर्स’चं नेतृत्व करणाऱ्या सुलेमानींचा काटा काढण्याचे कट रचले. पण ते वेळोवेळी फेल गेले.

हेही वाचाः पाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारं गाणं हिंदूविरोधी का ठरवलं जातंय?

कुड्स सेनेचा इराणमधे वाढता प्रभाव

इस्लामिक रेवॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात आयआरजीपी हे इराणमधलं सैन्यदल आहे. या सैन्यासोबत ‘कुड्स फोर्स’ नावाची एक स्वतंत्र यंत्रणाही उभी करण्यात आलीय. कुड्स हा पर्शियन शब्द आहे. त्याचा अर्थ जेरुसलेम असा आहे. ‘जेरुसलेम’ला मुक्त करणं हे त्यांचं अंतिम ध्येय आहे. इराणमधल्या इस्लामिक क्रांतीनंतर बनलेल्या ‘कुड्स फोर्स’ला मध्य पूर्व आशियात आपलं वर्चस्व निर्माण करायचंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या एप्रिलमधेच अमेरिकेने या फोर्सला दहशतवादी संघटनेचा दर्जा दिलाय.

इराणची सगळी कुटनीती कुड्स फोर्स बनवते. हमास, हिजबूलसारख्या दहशतवादी संघटनांना बाहेरच्या देशांमधे उभं करणं, शस्त्र पुरवणं यात ‘कुड्स फोर्स’चा मोठा वाटा आहे. इथूनच त्यांना रसद पुरवण्याचं काम होतं. इराणच्या हितसंबंधांविरोधात काम करणाऱ्या सगळ्यांना संपवणं हे त्यांचं अजून एक काम. आजूबाजूच्या देशांमधे आपलं प्रभावक्षेत्र वाढवण्याचं काम कुड्स फोर्स करतेय.

या फोर्सचं नेतृत्व कासिम सुलेमानी करत होते. इतकंच नाही तर अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्तीशी दोन हात करण्यात सुलेमानी आघाडीवर होते. गेल्या काही दशकांपासून इराणमधे अमेरिकेला विरोध करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. इराणमधे त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. त्यामुळेच अमेरिकेच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या सुलेमानींच्या जनाज्यात लाखोंच्या संख्येने लोक आले होते. गर्दीचे उच्चांक मोडणाऱ्या या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी होऊन तब्बल ५६ जणांचा बळी गेला.

आता ट्रम्प यांचं म्हणणं काय?

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुलेमानी यांना ठार मारण्याचं समर्थन केलंय. ‘अमेरिकेला घाबरवण्याचा प्रयत्न कुणी करु नये. आमच्याकडे टार्गेट लिस्ट तयार आहे. गरज पडेल तेव्हा त्यावर कारवाई करत राहू. सुलेमानी आमच्या सैन्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे हे पाऊल उचलावं लागलं,’ असं म्हणत ट्रम्प यांनी थेट इराणला इशाराही दिलाय.

ट्रम्प पुढे म्हणाले, ‘जनरल सुलेमानी यांच्या दहशतवादी कारवाया वाढत होत्या. त्यामुळे अमेरिकन सैन्यानं जे केलंय ते न्यायाला धरून आहे. खरंतर हे याआधीच व्हायला हवं होतं. सुलेनानीनं इराणमधल्या अनेकांना अगदी क्रूर पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न केलाय. सरकारनं अनेकांना मारलंय. इराणी लोकांविषयी माझ्या मनात सन्मान आहे. इराणमधे सत्ता परिवर्तन व्हावं, हा माझा हेतू नाही,’ असं म्हणत ट्रम्प सहानूभूतीही मिळवण्याचा प्रयत्न करताहेत.

हेही वाचाः मोदींच्या स्टेजवर ट्रम्पतात्या आले, त्याचा देशाला काय फायदा झाला?

जगावर काय परिणाम होणार?

आंतरराष्ट्रीय बाजारामधे तेलाच्या किंमतीत वाढ झालीय. मध्यपूर्व आशियाला याचा सर्वाधिक फटका बसेल. ‘अरामको’ ही सौदी अरेबियातली सगळ्यात मोठी तेल कंपनी आहे. अरामकोवर २०१९ च्या सप्टेंबरमधे मिसाईल आणि ड्रोननं हल्ला करण्यात आला. हा हल्ला इराणने केल्याचा आरोप झाला. अमेरिकेनंही या आरोपाला दुजोरा देत सौदी अरेबियाला मदतीचा हात दिला. या सगळ्याचा तेलाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला.

तेलाच्या किंमतीमधे वाढ झालीय. इतर देशांमधे होणारी तेलाची वाहतूक मुख्यत: समुद्रमार्गेच होते. युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालेला हा भाग अरब आणि ओमान खाडींदरम्यान आहे. बहरीन, कतार, कुवैत, सौदी अरब या देशांकडून येणारी जहाजं ओमानची खाडी आणि नंतर अरबी समुद्रातून पुढे मार्गस्थ होतात. या मार्गाने दररोज १ कोटी ८० लाख बॅरल इतक्या तेलाची निर्यात होत असते. इथंच इराणचं होर्मूज नावाचं बेट आहे. मध्यंतरी इथंही तेलाच्या टॅंकर्सवर हल्ला करण्यात आला. आताच्या तणावाला या हल्ल्याचीही पार्श्वभूमी आहे.

हेही वाचाः 

अराजकतेच्या उंबरठ्यावरचा अस्वस्थ पाकिस्तान

साहित्य संमेलनात आहात, तर तेरला जाऊन याच! 

क्युबन मिसाईल क्रायसिस : जगाला नवा जन्म देणारे तेरा दिवस

आपल्याच देशातल्या आठ राज्यांत मोदी, शाह का जात नाहीत?

संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो