आता पूर ओसरतोय, आपण मदत कशी करू शकतो?

११ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


कोल्हापूर, सांगली या दोन्ही जिल्ह्यांतली पूरस्थिती आजही गंभीर आहे. कोल्हापुरात नौदलाची पाच पथकंही दाखल झालीत. पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांनी रौद्ररुप धारण केल्यामुळे शहर, आणि गावांमधे मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. अशावेळी नागरिकांनी, स्वयंसेवी संस्थांनी आणि माध्यमांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे.

गेल्या १०७ वर्षांतला कोल्हापूरमधला हा सर्वाधिक मोठा पूर आहे. कोल्हापूरच्या नदीच्या पातळीची ५५ फुटांची मर्यादा दाखवणारी सीमा या पुराने ओलांडली. पंचगंगेचं पाणी रंकाळा परिसराला भिडू लागलंय. हे सगळं पहिल्यांदाच घडतंय. इतका अभूतपूर्व पाऊस झाल्यामुळे आणि अजूनही सुरू असल्याने इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. निसर्गाचा हा प्रकोप भयंकर आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाचं काम वेगात सुरू आहे.

प्रशासन आपलं काम करतंय

मान्सूनपूर्व काळात महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी जयंती नदीच्या परिसरात सातत्यानं महास्वच्छता अभियान राबवलं. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांत नाला बनलेली जयंती प्रथमच नदीप्रमाणं खळाळत वाहिली. यंदा ती अजिबात न तुंबल्यामुळे खूपच जलद येणारा पूर थोडा का होईना लांबला. तरीही पाणी वाहतं राहिलं. रंकाळ्याच्या स्वच्छतेमुळेही यंदा रंकाळा शहराच्या दिशेनं न ओसंडता त्याच्या सांडव्यातून वाहत राहिला.

दुसरीकडे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचं स्वतःचं कार्यालय पाण्याखाली गेलं. तरी त्याची फिकीर न करता चोवीस तास पाणबोट हेच त्यांनी आपल्या आपत्ती व्यवस्थापनाचं कार्यालय बनवलंय. पुराच्या पाण्याइतक्याच वेगाने त्यांनी आपलं हे काम चालवलंय. या प्रयत्नांमधे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे मोलाची साथ देताहेत. या साऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि मदतीला धावलेल्या एनडीआरएफ, व्हाईट आर्मी आदी पथकांमुळे आपत्ती व्यवस्थापनाचं काम वेगानं सुरू आहे.

लोकांनी काय काळजी घ्यावी

पाऊस थांबल्यानंतर मदत पुनर्वसन कामाला वेग येईल. रस्ते खराब झालेले आहेत. जनजीवन विस्कळीत झालंय. यासाठी पूरस्थिती आटोक्यात यायला हवी. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा. लोक पाण्यासाठी जिकडे तिकडे कॅन घेऊन फिरतायत. इंधनाचीही तीच स्थिती आहे. पूरग्रस्तांसाठी ही मदत जास्तीत जास्त पोचेल ह्याची दक्षता घ्यायला हवी. हौशी लोकांना आवरणं हीसुद्धा समस्या आहे. पोलिस प्रशासन रात्रंदिवस नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करताहेत.

नागरिकांची ही जबाबदारी आहे की त्यांनीही पोलिसांना सहकार्य करावं. आपला जीव धोक्यात घालून ही पूरस्थिती पाहण्यासाठी येऊ नये. नागरिकांनी गर्दी करु नये. पोलिसांना अडथळे निर्माण होतील असं वर्तन करु नये. हौशी लोकांना पोलिसांकडूनही सुचना देण्यात आल्यात. पूर पाहण्याच्या हौसेपायी पोलिस प्रशासनाचं काम अनाठायी वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. पोलिसांना सहकार्य करणं नागरिकांची जबाबदारी आहे.

पुरामुळे घरातून, गावातून कुठंही जाता येत नाही. म्हणून पुराच्या ठिकाणी झुंबड करू नका. आपल्या अशा बेजबाबदार वर्तणुकीमुळे प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदतकार्यावरचा ताण अनावश्यकरित्या वाढवून ठेवतो आहोत, याचं भान राखणं महत्त्वाचं असतं. जे मनुष्यबळ अन्य कामात वापरता येऊ शकतं, ते नागरिकांच्या अशा अतिउत्साहाला आवर घालण्यासाठी वापरावं लागतं. त्यामुळे नागरिकांनी घरी, आपल्या परिसरातच राहून परिस्थितीचा आढावा घ्यायला हवा.

हेही वाचा: गेल्या आठ दिवसात पुराने कोल्हापूरला कसं वेढलं?

अशावेळी स्वयंसेवी संस्थांनी काय करावं?

सेवाभावी व्यक्ती आणि संस्था यांची मदत आणि पुनर्वसनाच्या कामातली भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. किंबहुना, आपत्तीमधून वाचवलेल्या लोकांना दिलाशाची, सहानुभूतीची त्याचप्रमाणं निवारा, अन्न आणि कपड्यालत्त्याची गरज असते. या सगळ्याची पूर्तता सेवाभावी व्यक्ती आणि संस्था करत असतात. आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं निर्माण केलेल्या सिंगल पॉईंट यंत्रणेशी सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांनी संपर्क साधावा.

नेमक्या कोणत्या बाबींची गरज आहे, त्याची माहिती घेऊन अशा वस्तू, खाद्यपदार्थांची मदत करावी. शक्यतो, कोणत्याही प्रकारचा नाशवंत खाद्यपदार्थ देऊ नये. कोरडा खाऊ, बिस्कीटं आणि ती सुद्धा आवश्यकतेनुसार उपलब्ध करावीत. आपत्तीचा क्षण हा अनेक नागरिकांना आपल्या घरातली जुनीपानी, फाटके कपडे ‘दान’ देण्याचा सोहळा वाटत असतो. हे चूक आहे.

अगदी नवेच कपडे द्यावेत, अशातला भाग नाही; मात्र, जे कपडे तुम्ही स्वतः वापरता आहात, वापरू शकता; जे कपडे तुमची मुलंबाळं घालू शकतात, अशाच प्रकारचे चांगले धुतलेले, स्वच्छ कपडे आपद्ग्रस्तांना द्यावेत. ते कपडे घातल्यावर ते देणाऱ्याच्या प्रेमाची, मायेची ऊब त्याला मिळू द्या. अशा मदतीची घृणा त्यांना वाटता नये.

मीडियाने कसं वागावं?

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची भूमिका आपत्तीच्या काळात महत्त्वाची असते. आपत्तीच्या काळात सर्वात मोठा अडथळा निर्माण होतो, तो म्हणजे अफवांचा! अफवांचं पेव फुटून आपत्तीच्या काळात नागरिकांमधे घबराट, अस्वस्थता आणि चिंतेचं वातावरण पसरू शकतं. याला सोशल मीडियाची जोड मिळाल्यानं अफवा वाऱ्यापेक्षाही अधिक वेगाने पसरते. अशावेळी मीडियाने प्रशासनाकडून मिळालेली अधिकृत माहिती लोकांपर्यंत पोचवायला हवी.

कोणत्याही माहितीची शहानिशा करून तिचं प्रसारण करायला हवं. एरवी विरोधी पक्षाची भूमिका बजावणं अभिप्रेत असलेल्या मीडियाने आपत्तीच्या वेळी शासन, प्रशासन यांचा एक भाग म्हणून काम करावं. कारण अशावेळी नागरिक अत्यंत सजगपणे मीडियातून काय माहिती दिली जातेय, त्यावर कधी नाही इतकं लक्ष ठेवून असतात, विसंबून असतात. अधिकृत आणि ताजी माहिती पोचवण्याच्या भूमिकेतून जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त झालेले ताजे अपडेट्स रिलिज करावेत.

पत्रकार हासुद्धा माणूस आहे. आपत्तीच्या वेळी कित्येक जण स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आपलं कर्तव्य बजावत आहेत, असतात. आपत्तीच्या काळात अडकलेल्या व्यक्तीच्या मदत करायला आपल्यातलं माणूसपण आपल्याला प्रेरित करत असतं. मात्र, आपली ही धडपड आपल्या मूळ कामाच्या, तसेच प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदतकार्याला अडथळा तर होणार नाही ना, याची दक्षताही घेणं गरजेचं आहे.

हेही वाचा: विशेष दर्जा काढल्याने काश्मीरचा प्रश्न सुटला की अधिक गुंतागुंतीचा झाला?

तुम्हाला मदत करायचीय, पण थोडं थांबा

राजाराम बंधाऱ्याची पातळी ही १० ऑगस्टला ५२.१ इंचापर्यंत खाली उतरली होती. पाणी ओसरायलाही सुरवात झाली. सोशल मीडियातून कालपासून आयएफएसी कोड, बॅंक डिटेल, गुगल पे आणि इतर माध्यमांतून पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे मेसेजेस वायरल होताहेत. हे सगळे फेक किंवा सगळेच ऑथेंटिक आहेत अशातलाही भाग नाही. पुरग्रस्तांना मदत हवी आहे ती अन्नधान्य, निवारा यांची. लगेच आर्थिक मदत लागणार आहे, अशातला भाग नाही.

प्रशासन आपल्या पातळीवर हे सगळं करतंय. पुनर्वसनाच्या वेळी हा निधी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना केलीय. मदत करत असताना भावनेपेक्षा प्रॅक्टिकली विचार करण्याची गरज आहे. आर्थिक मदतीसाठी जे मेसेज वायरल होताहेत त्याला बळी पडू नका. प्रशासनानं जे काही सोर्सेस दिलेत त्याठिकाणी संपर्क करा. देणगी आणि निधीचा योग्य विनियोग होईल, असं वाटतं असेल तरच मदत पाठवा.

विश्वास असेल तिथं ही मदत आवर्जून द्या. वाटलं तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तुम्ही तुमची मदत देऊ शकता. त्यातूनही चांगलं काम होऊ शकतं. आणि मदत पोचू शकते. खरंच गरज आहे त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. आजघडीला कोल्हापुरात हॉटेल मालक संघ असेल किंवा सेवाभावी संस्था असतील त्यांच्याकडूनही मदत पोचत आहे.

मदत करण्यासाठी इथे संपर्क साधा

जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्हास्तरीय पूरग्रस्त मदत सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी या कक्षाकडे पूरग्रस्तांसाठी मदत करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

या कक्षाच्या सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे (मोबाईल नंबर 9623389673) आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ (मोबाईल नंबर 9923009444) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा कक्ष सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर इथे सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचा फोन नंबर 02312655416, वॉट्सॲप नंबर 9130059542 तर मोबाईल नंबर 9403145611, ई-मेल  floodreliefkolhapur@gmail.com असा आहे. 

दानशूर व्यक्ती आणि संस्थांना पूरग्रस्तांसाठी मदत करावयाची असल्यास त्यांनी जिल्हास्तरीय पूरग्रस्त मदत सनियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहनही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. या कक्षामार्फत पूरग्रस्त गावांची माहिती घेऊन त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्याचं वितरण करण्यात येईल.

हेही वाचा: 

नोबेल विजेती मलाला यूसुफजई काश्मीरवर काय म्हणाली?

सुपरहिरो खूप आहेत, पण ओबामांनाही आवडतो केवळ स्पायडर मॅनच!

नरेंद्र मोदींच्या मॅन वर्सेस वाईल्डच्या ट्रेलरपेक्षा मिम्स जास्त इंटरेस्टिंग

(लेखासाठी आलोक जत्राटकर यांच्या फेसबुक पेज तसंच त्यांच्या ब्लॉगचा आधार घेण्यात आलाय)