आता मोबाईलला रेंज नसलेल्या जागेवरूनही कॉल करता येणार

२२ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


पाण्याशिवाय मासा तसं नेटवर्कशिवाय मोबाईल काही कामाचा नाही. कारण नेटवर्क नसलेला मोबाईल काही कामाचा नाही. नेटवर्कशिवायचा मोबाईल म्हणजे निव्वळ वैताग. पण आता या वैतागवाण्या अनुभवाला बायबाय करायची वेळ आलीय. मोबाईल कंपन्यांनीच यावर एक भन्नाट, जालिम तोडगा काढलाय. तो तोडगा म्हणजे वायफाय कॉलिंग. काय आहे हे वायफाय कॉलिंग, ते कसं वापरायचं, यासाठी पैसे लागतात का?

नव्या आणि वर्षाच्या सुरवातीलाच एअरटेल आणि जिओ या टेलिकॉम क्षेत्रातल्या दोन बड्या प्लेअर्सनी आपल्या ग्राहकांना वायफाय कॉलिंग सर्विसची भेट दिलीय. ही सर्विस युजर्सचा स्मार्टफोन वापराचा एक्सपिरिअन्स अधिक समृद्ध करणारी ठरणार आहे. म्हणूनच या सर्विसबद्दल तपशीलवारपणे जाणून घेणं महत्वाचं ठरतं.

आपलं कॉलिंग कल्चर बदलणार

तंत्रज्ञान झपाट्याने बदलतंय. आणि बदलतं तंत्रज्ञान आपलं जगणं अधिक सुकर करतंय. नव्या वर्षांत ५ जी येणार असल्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे. पण ५ जी च्या चर्चेवर कडी करणारी एक बातमी आलीय. ती म्हणजे ‘वायफाय कॉलिंग’ सर्विसची. काहींनी या सर्विसचा वापर सुरु केलाय आणि त्यांचा अनुभवसुद्धा चांगला आहे. अनेकांसाठी ही वायफाय कॉलिंग नेमकी काय भानगड आहे आणि या सर्विसमुळे स्मार्टफोन वापराचा एक्स्पेरिअन्स नेमका कसा बदलणार, याविषयी अनेक शंका कुशंका आहेत.

आपल्यापैकी बहुतेकांना फोन वापरताना मोठ्या प्रमाणात ‘कॉल ड्रॉप’च्या प्रॉब्लेमचा सामना करावा लागतो. नेटवर्कमधलं कंजेशन असेल किंवा अजून काही, कुठल्याही कारणाने कॉल ड्रॉप होतो, तेव्हा ते मनस्ताप देणारं, वैताग वाढवणारं असतं. अनेकदा अनेक ठिकाणी आपल्या फोनला नेटवर्कचं उपलब्ध नसतं किंवा असलं तरी ते खूपच वीक असतं.

म्हणजे नेटवर्क उपलब्ध असून नसल्यात जमा. मग ते घर असो, मॉल असो, जिम असो, मुवी थिएटर असो किंवा आपलं ऑफिस. सगळीकडे नेटवर्कची बोंबच होते. अशावेळी कॉल ड्रॉप होणं ठरलेलंच. तुमचा हा प्रॉब्लेम काही प्रमाणात वाय फाय कॉलिंगच्या फिचरमुळे दूर होऊ शकतो.

हेही वाचाः स्मार्टफोनच्या जमान्यातही लोकांना फीचर फोनचा नाद का सोडवत नाही?

वायफाय कॉलिंग म्हणजे काय?

वायफाय कॉलिंग सर्विसला ‘कॉलिंग ओवर वाय फाय’ किंवा वीओ वायफाय असंदेखील म्हटलं जातं. या सर्विसमुळे आपण वायफायच्या माध्यमातून कॉल करू शकतो किंवा कॉल रिसिव करू शकतो. याचाच अर्थ असा की आपला स्मार्टफोन ब्रॉडबँड नेटवर्कशी म्हणजेच वायफायशी कनेक्ट असेल तर आपला फोन कॉल वायफायच्या माध्यमातूनच जोडला जाईल. फक्त कॉलिंगचं नाही, तर आपले टेक्स्ट मेसेजेससुद्धा वायफायच्याच माध्यमातून पाठवले जातात.

एका अर्थाने या सर्विसमुळे आपलं कॉलिंग, मेसेजिंगसाठीचं सेल्युलर नेटवर्कवरच अवलंबित्वच काही अंशी संपुष्टात येणार आहे. आपल्या स्मार्टफोनमधे ही सर्विस सुरु असेल आणि फोन वायफायशी कनेक्टे असेल तर अशावेळी मोबाईलमधे नेटवर्क नसलं तरीही आपण कॉल करू शकतो किंवा आलेला कॉल उचलू शकतो. सध्या अनेकजण नेटवर्क नसलेल्या, कमजोर असलेल्या ठिकाणी सेलफोन वायफायला जोडून वॉट्सअप कॉलचा पर्याय वापरतात. वायफाय कॉलिंग हे एका अर्थाने वॉट्सअप कॉलचंच एक्सटेंशन म्हणता येईल.

सेलफोनच्या सेटिंग्जमधे जाऊन, वायफाय कॉलिंग हा ऑप्शन एनेबल करून आपण या सर्विसचा वापर करू शकता. वायफाय सर्विस वापरून कॉल केल्यास आपल्या स्मार्टफोन स्क्रीनवर वायफायचा लोगो दिसतो. या लोगोचा अर्थ असा की फोनवर ही सर्विस यशस्वीरीत्या सुरु झालीय. ही सर्विस वापरण्यासाठी एक गोष्ट मात्र अनिवार्य आहे. ती म्हणजे आपला फोन वायफायशी कनेक्ट असायला हवा. म्हणजेच सेलफोन वायफायशी कनेक्ट नसेल, तर मात्र ही सर्विस वापरता येणार नाही.

पैसे लागणार का आणि कसं सुरू करायचं?

वायफाय वापरून कॉल केला किंवा कॉल घेतला तर त्यासाठी जो काही डेटा वापरात येईल तेवढाच या सेवेसाठीचा खर्च. याशिवाय या सर्विससाठी कुठलेही वेगळे चार्जेस आकारले जात नाहीत. एखाद्या कॉलवर आपण १० मिनिटं असाल, तर या कॉलसाठी साधारणतः १० एमबी डेटा लागू शकेल. अर्थात सेल्युलर नेटवर्कचे जे काही ठरलेले कॉल रेट असतील ते आपल्याला द्यावे लागतील. त्यापासून आपली सुटका नाही.

अजून एक महत्वाची गोष्ट अशी की या सर्विसच्या वापरासाठी आपल्याला सेलफोनमधे कुठलंही एक्स्टर्नल सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायची गरज नाही. फक्त आपला सेलफोन या सर्विसच्या वापरासाठी एनेबल असणं आवश्यक आहे. अर्थात एक्स्टर्नल सॉफ्टवेअर घ्यावं लागणार नाही, हे जसं फायद्याचं आहे तसंच ते तोट्याचंही आहे. कारण आपला फोन एनेबल नसेल तर मग आपल्या ही सर्विस वापरात येणार नाही, हेदेखील ओघानं आलंच.

आपण आपल्या मोबाईलच्या सेटिंगमधे जाऊन मोबाईल वायफाय कॉल सर्विससाठी पात्र आहे किंवा नाही हे बघू शकतो. त्यासाठी मोबाईलच्या सेटिंगमधे वायफाय कॉलिंग हा ऑप्शन असल्यास तो ऑन करावा लागेल. त्यानंतर आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकतो.

हेही वाचाः तरुणांनो, आपण आईवडलांना वॉट्सअप युनिवर्सिटीतून बाहेर काढू शकतो?

खरंच कॉल क्वालिटी सुधारणार?

वाय फाय कॉलिंगच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कॉलची क्वालिटी ही आपला फोन ज्या वायफाय नेटवर्कशी कनेक्ट आहे, त्या वायफाय नेटवर्कच्या स्पीडवर अवलंबून असेल. म्हणजेच वायफाय नेटवर्कचा स्पीड जितकी चांगली, तितकीच कॉलिंगची क्वालिटीसुद्धा चांगली.

याचाच अर्थ असाही की वायफाय स्लो असेल तर कॉलिंगची क्वालिटीसुद्धा खराब असेल. काहीवेळा तर ती आपल्या सर्वसाधारण कॉलिंगच्या अनुभवाहूनही खराब असू शकते. त्यामुळे वायफाय कॉलची क्वालिटी चांगलीच असेल याची खात्री देता येत नाही. ती त्या त्या वेळच्या वायफाय नेटवर्कच्या क्वालिटीवर अवलंबून आहे.

ही सर्विस वापरताना एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवावी लागणार आहे. आपल्या सेलफोनमधले वायफाय कॉलिंग आणि रेग्युलर कॉलिंग म्हणजेच वोल्ट कॉलिंग असे दोन्हीही ऑप्शन सुरु ठेवावे लागणार आहेत. कारण त्यामुळे वायफायमधे काही प्रॉब्लेम झाला तर चालू कॉल ड्रॉप न होता तो आपल्या सेल्युलर नेटवर्कवर शिफ्ट होईल. वोल्ट कॉलिंगचा ऑप्शन बंद असेल तर मात्र कॉल ड्रॉप होईल.

कधीपासून झाली ही सर्विस?

भारतात एअरटेलने सगळ्यात आधी म्हणजेच डिसेंबर २०१९ मधे वायफाय कॉलिंग सर्विस लाँच केली. घोषणेवेळी फक्त दिल्ली आणि दिल्ली एनसीआर या टेलिकॉम क्षेत्रातल्या ग्राहकांपुरतीच ही सर्विस मर्यादित होती. नंतर एअरटेलने मुंबई, कोलकाता, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमधे ही सर्विस सुरु केली. आता एअरटेलकडून देशभरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय.

वेगवेगळ्या १६ ब्रँड्सच्या जवळपास १०० स्मार्टफोन डिवाइसवर ही सर्विस उपलब्ध आहे. वायफाय कॉल सर्विस सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच एअरटेलने जवळपास १ मिलिअन युजर्सचा टप्पा पूर्ण केला. भारती एअरटेलचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर रणदीप शेखोन यांनी ट्विटरवर ही माहिती दिली.

एअरटेल पाठोपाठ जिओनेदेखील ८ जानेवारी २०२०२ ला देशभरात वायकॉलिंगची सर्विस लाँच केली. जिओकडून देशभरातल्या आपल्या सर्वच ग्राहकांसाठी ही सर्विस सुरु करण्यात आलीय. जिओची ही सेवा जवळपास १५० हँडसेट्सना सपोर्ट करणार असल्याची माहिती जिओने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिलीय.

हेही वाचाः 

फाईव जीचा पाळणा कोण हलवणार?

कॅमेरा विकत घेताय, मग हे नक्की वाचा

तान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं?

२०१९ चा निरोपः आपला मोबाईल कसा बदलला?

नव्याकोऱ्या चार सिनेमांसोबत नेटफ्लिक्स आणतंय नवं कल्चर

वीस वर्ष सत्ता भोगणाऱ्या पुतिन यांना का बदलायचंय रशियन संविधान?