नरेंद्र मोदींना एवढं घवघवीत यश कशामुळे मिळालं?

२७ मे २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चीत करून फिर एक बार मोदी सरकार सत्तेत आलंय. नरेंद्र मोदींच्या या घवघवीत यशाची जगभरात चर्चा सुरू आहे. पण मोदींना एवढं यश कशामुळे मिळालं? बेरोजगारीने नवा रेकॉर्ड केलेला असतानाही मोदींनी तरुणांना आपल्याकडे खेचलं. मोदींच्या या करिश्म्यावर टाकलेला हा प्रकाश.

मोदींच्या यशाचं आकलन करायचं असेल तर पहिल्यांदा मोदी भक्त किंवा मोदींचे विखारी विरोधक यातून बाहेर पडावं लागेल. गेल्या दोन ते तीन वर्षांत आणि विशेषतः गेल्या चार महिन्यात मोदींच्या कामाचं वस्तूनिष्ठ आकलन करण्याखेरीज सर्वकाही या भक्त आणि विखारी विरोधकांनी केलंय. या दोन्हींच्या मधे येऊन आपण मोदींच्या कामाचं आकलन करु शकू किंवा किमान ते स्वीकारण्याच्या तयारीत तरी राहू.

शेवटी यश हे यश असतं. त्याला कोणतंही परिमाण नसतं. आता कितीही कंठशोष करुन कुणाला काहीही म्टल्यानं मोदींचं यश पुसलं जाणार नाही. मात्र हे यश का मिळालं असावं, याचा विचार होण्याची आणि थोडं आत्मपरीक्षण करण्याचीही गरज आहे.

हेही वाचाः कॉंग्रेसने भाजपकडून शिकाव्यात अशा गोष्टी

जागतिकीकरणानंतरचं बदललेलं राजकारण

नरेंद्र मोदींचा विजय राष्ट्रवाद, पाकिस्तानविरोधी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळं झाला, देशभक्तीवर मिळालेलं हे यश आहे, साध्वी प्रज्ञासिंह यांना दिलेल्या उमेदवारीनं, त्यांनी केलेल्या वक्तव्यानं, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि भाजपमधल्या इतर धुरिणांनी केलेल्या ध्रुवीकरणामुळे हा विजय साकारला, हे सध्या चर्चिलं जातंय. मात्र ही कारणं फारच वरवरची आहेत. त्यातून हे एवढं मोठं यश साकारणं अशक्य आहे.

राष्ट्रवादाचा फायदा मोदींना झाला असला तरी त्याच्या मुळाशी हिंदुत्व आहे, हे पहिल्यांदा स्वीकारायला हवं. कोणताही राष्ट्रवाद हा धर्माशिवाय उभा राहत नाही. त्या त्या देशातल्या बहुसंख्यांकांचा धर्म आणि राष्ट्रवाद हे एकमेकांच्या हातात हात घालून राहतात. त्याचे तसे परिणाम पाहायलाही मिळतात.

जागतिकीकरणानंतर आणि त्याच जोडीला भारतात उभ्या राहिलेल्या राममंदिर आंदोलनानंतर भारताने उजव्या बाजूकडे कूस वळवलीय, हेही यानिमित्तानं स्वीकारायला हवं. स्वातंत्र्योत्तर काळात समाजवादी, डावा असणारा देश अयोध्या प्रकरणानंतर बहुसंख्यांकांचं राजकारण करण्यास तयार झाला. वाजपेयींचं १३ दिवसांचं सरकार असो किंवा एनडीएचं सरकार त्या काळात जनताही संभ्रमात होती.

विकासाच्या पॅकेजिंगमधलं हिंदुत्व

जागतिकीकरणाचे लाभ प्रत्यक्ष मिळायलाही १० वर्ष जावी लागली. जागतिकीकरणाने भारतातल्या अनेकांच्या हातात पैसा आला. त्यातून व्यक्तिस्वातंत्र्याचा परीघही उंचावला. जातीपातीचं, कुटुंबांचं आणि एकूणच वेगळं काहीतरी करण्याचा कल वाढू लागला. अशावेळी मोदींसारखा नेता देशातल्या तरुणांना भावला नसता तरच नवल. त्यात मोदींनीही प्रत्यक्ष हिंदूत्व असा विचार ठेवला नाही. त्याला विकास असं गोंडस नाव दिलं. आणि हे विकासाचं नाणं २०१४ च्या निवडणुकीत चाललं.

भारत महासत्ता करण्याचं, काळा पैसा परत आणण्याचं स्वप्न त्यांनी देशवासियांना दिलं. त्याला जनता भाळली, हिंदुत्वाच्या जोडीनं हे विकासाचं राजकारण तेजीत राहिलं. एक लक्षात घ्यायला हवं की मतदारांना भावलेलं हे हिंदुत्व कपाळावर टिळे लावणाऱ्यांचं, भगवी वस्त्र नेसणाऱ्यांचं हिंदुत्व नाही. दुसऱ्याला मारुन किंवा दंगली करुन काही पदरात पाडणारं हिंदुत्व नाही, तर बहुसंख्यांकांच्या हुंकाराचं हिंदुत्व आहे.

मतदार जहाल हिंदुत्वाला नाही तर मोदींच्या मवाळ हिंदुत्वाला भाळलेत. सर्वसमावेशक, कुणावरही अतिक्रमण न करणारं, वसुधैव कुटुंबकम, जीवे जीवस्य जीवनम हे मानणारं हिंदू तत्वज्ञान याच्या मुळाशी आहे, हे महत्त्वाचं आहे.

बहुसंख्यांकांच्या राजकारणात विरोधक मागे

राममंदिराचा मुद्दा जितका १९९४ च्या निवडणुकात चालला तितका तो २०१४ काय किंवा २०१९ काय, यात चालला नाही, चालणार नाही, हे भाजप, संघ धुरिणांच्या आधीच लक्षात आलं होतं. २०१४ आधी रामसेतूवर राममंदिरासारखंचं आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न संघाकडून झाला. मात्र जागतिकीकरणानंतरच्या भारतात या अतिधार्मिक मुद्द्यांचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र त्याचबरोबर बहुसंख्यांकांचा हुंकार कायम होता. त्याला तीव्र स्वरुप देणं गरजेचं नव्हतं.

विकसनशील, हिंदुत्त्ववादी नेता या मोदींच्या प्रतिमेची भुरळ जनतेला पडतेय, हे भाजपच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्यांचा रस्ता बदलला. बहुसंख्यांकांचं राजकारण नाकारत आलेल्या काँग्रेसला, डाव्यांना, देश हिंदुत्वाकडे झुकतोय, हे मान्य करायलाच वेळ गेला. त्यामुळे विरोधक फारच मागे पडले.

मतदारांच्या मनात मोदींचं हिंदुत्व हे जास्त मोलाचं आहे, हे आपण कायम ध्यानात घ्यायला हवं. गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठली. मात्र त्यानंतरच्या १०-१५ वर्षांच्या राजकारणात त्यांनी विकासाचं गुजरात मॉडेल नावारूपाला आणलं. किमान असं काहीतरी मॉडेल आहे, असा किमान भास तरी तयार केला. त्याचा फायदा त्यांना झाला. बदल करु पाहणारा, बदल करणारा नेता असं चित्र उभं केलं.

हेही वाचाः भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाचं विश्लेषण

प्रचाराचं गुजरात मॉडेल कामी 

२०१३ च्या गुजरात निवडणुकीनंतर त्यांचं हे विकासाचं मॉडेल देशपातळीवर यावं, ते देशाला खंबीर नेतृत्व ठरु पाहतील, या चर्चा सुरु झाल्या. तरी कट्टर हिंदुत्व समर्थक अशीच त्यांची प्रतिमा प्रत्येकाच्या मनामनात होती. त्यांनीही थेट हिंदुत्वाचा उल्लेख टाळला. मात्र लोकसभेच्या दोन्ही निवडणुकीत त्यांच्या पक्षाकडून, त्यांच्या आजूबाजूच्या नेत्यांकडून हिंदुत्व हाच अजेंडा असल्याचं सातत्यानं ठसवण्यात आलं.

एकाही मुस्लिम उमेदवाराला भाजपने तिकिट दिलं नाही. मोदींनी जाहीरपणे मुस्लिम टोपी घालण्यास नकार दिला. तसंच साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी दिली. ही गेल्या काही वर्षांतली काही ठळक उदाहरणं म्हणून बघितली तरी आपल्या मोदींचा अजेंडा लक्षात येईल. २०१४ मधे विकसनशील नेता तसंच हिंदुत्ववादी नेता या न्यायानेच त्यांना मतदान झालं, हेही विसरता कामा नये.

२०१४ नंतरच्या काळात मोदींनी नोटाबंदी असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या भेटीगाठी असोत किंवा दहशतवाद, सर्जिकल स्ट्राईक असोत यातून मोदींची प्रतिमा एक खंबीर नेतृत्व अशी उभी राहिलीय. नरेंद्र मोदींमुळे आम्ही सुरक्षित आहोत, अशी भावना सामान्य मतदारांच्या मनात उभी करण्यात मोदींना यश आलंय. राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य न करणारे मोदी केदारनाथ, काशी विश्वेश्वराचं दर्शन, गंगा आरती करतात, यातून त्यांना द्यायचा असतो तो हिंदुत्वाचा संदेश आपोआप मतदारांपर्यंत पोचत राहतो, हे आपल्याकडच्या धुरिणांच्या लक्षात येत नाही.

हेही वाचाः खरंच वंचित आघाडीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचा पराभव झाला?

लोकभावना स्वतःकडे वळवण्यात यश

२०१९ ची निवडणूक ही मोदी हवेत की मोदी नकोत, या एकमेव मुद्द्यावर झाली. त्यात राष्ट्रवाद, सर्जिकल स्ट्राईक हे मुद्दे असले तरी ते नंतर नंतरच्या टप्प्यात क्षीण होत गेले. मोदी हाच एकमेव पर्याय आहे. विरोधकांकडे असा कोणताही सक्षम नेता नाही, हे जनतेच्या मनात अगदी घर करुन राहिलं. कदाचित प्रचार सुरु होण्यापूर्वीच पुन्हा एक संधी नरेंद्र मोदी यांना द्यायला हवी, हे मतदारांच्या मनात अगदी घट्ट रुजलेलं होतं.

राफेल प्रकरणातल्या आरोपानंतरही भ्रष्टाचारविरहीत नरेंद्र मोदींची प्रतिमा जनतेच्या मनात रुजली आणि कायम राहिली. पहिल्यांदाच या निवडणुकीत महागाई आणि भ्रष्टाचार हे प्रचाराचे महत्त्वाचे मुद्दे नव्हते. मोदींच्या कारभारावर, त्यांच्या हुकुमशाहीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र जनतेला ते भावले नाहीत. विरोधकांच्या प्रचाराला, सगळ्या जातीपातींना मोडीत काढत मतदारांनी मोदींना मतदान केलं.

सरकारविरोधात नाराजी नव्हती का, तर असंही नाही. जनता टीकाही करत होती. मात्र मोदींना पुन्हा एक संधी द्यायला हवी, हेच सर्वसाधारण मत होतं. नोटाबंदीच्या निर्णयाने काय मिळवलं, काय गमावलं, याची चर्चा आर्थिक स्तरावर होत राहिल. पण भ्रष्टाचार, काळा पैसा रोखण्यासाठी हे उचललेलं मोठं पाऊल आहे, असा मेसेज देशवासियांत गेला.

या बरोबरच मोदी सरकारच्या स्वच्छ भारतसारख्या योजनांचाही हातभार लागला. घराघरात संडास बांधण्याच्या सरकारच्या निर्णयाचाही परिणाम पहायला मिळाला. घराघरात सिलिंडर, वीज पोचवण्याच्या योजनाही लोकांना आशादायी वाटल्या. नितीन गडकरींच्या रस्तेबांधणी खात्याने गेल्या पाच वर्षांत देशभरात रस्त्यांचं जाळं उभं करणं सुरु केलंय. त्यामुळे प्रत्यक्ष बदल होतोय हे मतदारांपर्यंत पोचवण्यात मोदी यशस्वी ठरले.

विकासाच्या स्वप्नांवर शिक्कामोर्तब

लोकसहभागातून केलेला विकास राष्ट्रवाद असं त्याचं वर्णन भाजपातली मंडळी करताहेत. डिजिटल व्यवहार करुन थेट लाभार्थ्याला फायदा मिळू लागल्याने याचाही फायदा झालाच. मोदींनी निवडणुकीसाठी केलेला आक्रमक प्रचार याचाही या विजयात मोठा वाटा आहे. हे सर्व सुरु असताना निवडणुकांसाठी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी दोन वर्षांपासून संघटनेची केलेली बांधणी, हे त्यातलं आणखी एक मोठं काम आहे.

ज्या ज्या राज्यात स्थानिक पक्षांना सोबत घेण्याची गरज आहे, त्या ठिकाणी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. भाजपनं प्रत्येक जिल्ह्यात नेमलेले विस्तारक, बूथनिहाय केलेली कार्यकर्त्यांची रचना, सरकारची कामं घराघरात पोचवण्यासाठी राबवलेली यंत्रणा, उभारलेली कॉल सेंटर्स, प्रचाराची अजस्त्र यंत्रणा, सोशल मीडियावर सातत्याने केलेला प्रचार हीसुध्दा या यशामागची कारणं आहेतच.

संघाच्या मुशीत तयार झालेले अनेक कार्यकर्ते ते प्रसिद्धीपासून आणि माध्यमांपासून कोसो दूर आहेत अशी अनेक माणसं या निवडणुकीत त्या त्या भागात सक्रिय राहिली. मोदी हे चेहरा असले, तरी प्रत्यक्ष जनमानसात पोचण्याचं काम या संघटनेच्या जोरावर करण्यात आलं. त्याचा फायदा अनेक ठिकाणी झाला. या सगळ्यांचा मतदानाची टक्केवारी वाढण्यासही काहीअंशी हातभार लागला.

नरेंद्र मोदींचं हे घवघवीत यश मवाळ हिंदुत्ववाद, राष्ट्रवाद, खंबीर नेतृत्व, सुरक्षिततेची भावना, त्यांनी दाखवलेली विकासाची स्वप्नं या सगळ्याचा एकत्रित परिणाम आहे. त्याचबरोबर सरकारच्या काही योजना आणि सर्वात महत्त्वाचं संघटनात्मक काम, याचं फलित आहे.

हेही वाचाः 

एफडी : रिस्क फ्री गुंतवणूकीचा बेस्ट पर्याय

यूपीत महागठबंधनचं राजकारण फेल गेलं, त्याची दोन कारणं

शस्त्र घेऊन गुंडागिरीचा सामना करायला सांगणारे गांधीजी माहीत आहेत?

वर्ल्डकपमधे तगड्या टीमना, लहान टीमने हरवण्याचा इतिहास भारताने सुरु केला