खलिस्तानी दहशतवाद म्हणजे नेमकं काय रे दोस्ता?

२८ मार्च २०२३

वाचन वेळ : १५ मिनिटं


भारतात खलिस्तानच्या मागणीनं पुन्हा एकदा जोर धरलाय. धर्मांध शीखांनी उभारलेली ही चळवळ मध्यंतरी सुप्तावस्थेत गेल्यासारखी वाटत असली तरी त्यात तथ्य नाही. परदेशातून मिळत असलेल्या आर्थिक मदतीच्या जोरावर हा दहशतवाद धुमसतच राहिला. या खलिस्तानी दहशतवादाचा आजवरचा मागोवा घेणारी संजय सोनवणी यांची ही फेसबुक पोस्ट.

आजच्या पिढीला खलिस्तानी शीख दहशतवादाच्या झळा लागल्या नसल्यानं आणि आता जवळपास तो सुप्तावस्थेत गेला असल्यानं विशेष माहिती नाही. त्याला सुप्तावस्थेत म्हटलंय याचाच दुसरा अर्थ असा की तो पुन्हा कधीच उफाळून येणार नाही असं नाही. या दहशतवादानं ८०-९०च्या दशकात सारा भारतीय उपखंड हिंसेच्या तांडवाखाली आणला होता.

या दहशतवादानं भारताच्या आजवरच्या सगळ्यात समर्थ प्रधानमंत्री इंदिराजींचा जसा बळी घेतला तसाच निवृत्त जनरल वैद्यांचाही बळी घेतला. हजारो निष्पाप नागरिक मारले गेले ते वेगळंच. या दहशतवादाचा सखोल अभ्यास होणं जरुरीचं आहे. आपलं स्वतंत्र राष्ट्र असावं यासाठी जी खलिस्तानी चळवळ सुरु झाली तिची पाळं-मुळं स्वातंत्र्यपूर्व काळात जातात.

सारं काही धर्मासाठी

१९०९ मधेच मोर्ले-मिंटो सुधारकार्यक्रमाच्या वेळीस मुसलमानांनी जसं स्वतंत्र प्रतिनिधित्व मागितलं तसंच शीखांनीही मागितलं. पुढे जेव्हा स्वातंत्र्य दृष्टीपथात येऊ लागलं तसं मुसलमानांचा पाकिस्तान तसाच शीखधर्मीयांचा खलिस्तान असावा अशी मागणी जोर धरू लागली होती.

याचं कारण म्हणजे शीख हा स्वतंत्र धर्म असून जर धर्माधारित पाकिस्तानची निर्मिती होवू शकते तर शीखांच्या खलिस्तानची का नाही? शीख हा धर्म हिंदू धर्मांतर्गत आहे अशी बव्हंशी हिंदूंची समजूत आहे. पण ती शीखांनाच मान्य नाही.

मुसलमानांशी त्यांचं हाडवैर जगजाहीर आहे. १८५७ च्या उठावात शीखांनी इंग्रजांची बाजू घेवून उटाव दडपून टाकण्यात जी मोलाची कामगिरी बाजावली याला कारण हेच होतं की उठाव यशस्वी झाला तर दिल्लीचं इस्लामी तख्त त्यांच्यावर राज्य करणार होतं आणि मुसलमानांकडून त्यांनी अपरंपार छ्ळ सोसला असल्यानं ते तसं घडू देणं अशक्यच होतं.

गांधी-नेहरूंचा हस्तक्षेप

१९४०मधे सत्ताप्राप्तीसाठी आतुर अशा हिंदू, मुसलमान आणि शीखांशी इंग्रजांनी वाटाघाटी सुरु केल्या होत्या. महात्मा गांधींनी शीखांना समजावून शांत केलं. एवढंच नाही तर नेहरुंनी १९४६मधे कोलकात्यात भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात ठराव पास करवून शीखांसाठी पुरेशी स्वायत्तता दिली जाईल असं महात्मा गांधींच्या मतानुसार घोषित केलं. तशा आशयाचा ठरावही ९ डिसेंबर १९४६ला घटना समितीत पास करुन घेतला.

यामुळे शीखांचं तात्पुरतं समाधान झालं. असं घडलं नसतं तर कदाचित पाकिस्तानबरोबरच खलिस्तानचीही मागणी इंग्रजांनी मान्य केली असती हे गांधीद्वेष्टे विसरतात. पुढे नेहरुंनी आपली भुमिका बदलली आणि मुंबईत १० जुलै १९४७ला संघराज्याचं नेमकं स्वरुप स्वातंत्र्यानंतर वेगळं असू शकतं असं घोषित केलं. यामुळे बहुतेक शीखांना आपण फसवलो जातोय याची जाणीव झाली.

हेही वाचाः तुमचं जळकं हिंदुराष्ट्र नको, असं प्रबोधनकारांचा वारसदार का म्हणतोय?

फाळणीनं बदललं गणित

पण फाळणीपूर्व पंजाबमधे तेव्हा शीख हे अल्पसंख्यच होते. फाळणीनं सारीच समीकरणं बदलून टाकली. फाळणीनंतर बव्हंशी शीखांना भारतात यावं लागल्यानं पाकिस्तानातल्या पंजाबमधल्या शीखांची संख्या १९ टक्क्यांवरुन ०.१ टक्क्यांवर आली तर भारतातल्या पंजाबमधे ती भरघोस वाढली. त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न उग्र स्वरुपाचे होते.

त्यात घटनासमितीनं शीखांसाठी कसलाही स्वायतत्तेचा प्रबंध न केल्यानं घटना समितीवरचे शीख प्रतिनिधी श्री. हुकूमसिंग यांनी घोषित केलं की शीखांना घटना मान्य आहे या गैरसमजात राहू नका. आमची घोर फसवणूक झालेली असून आमच्याशी दुजाभाव केला जातोय.

यात अजून तेल ओतलं गेलं आणि शीखांना रानटी, गुन्हेगार जमात ठरवण्याचा हिंदू शासन प्रयत्न करतंय आणि शीखांचा संपूर्ण विनाश केला जाईल अशी निवेदनं प्रितमसिंग गिलसारख्या शिक्षणतज्ञानं प्रसिद्ध केली. अर्थात त्यात तथ्य नव्हतं. पण विद्वेषाची पाळंमुळं रोवली जात होती, ज्याचा फार मोठा झटका भविष्यात भारतीय उपखंडाला बसणार होता.

शीख धर्माचा इतिहास

खरं तर याला स्वतंत्र धर्म मानावं की पंथ असा वाद जुनाच आहे. पण स्वतंत्र धर्मग्रंथ, उपासना पद्धती आणि तत्वज्ञानाच्या आधारावर हा स्वतंत्र धर्म आहे असं म्हणता येतं. या धर्माला जातीभेद मान्य नसले तरी ते प्रत्यक्षात अस्तित्त्वात आहेत. गुरू नानक ते गुरु गोविंदसिंग या १० गुरूंच्या शिकवणुकीचा पूर्ण पगडा या धर्मावर आहे.

या धर्माची स्थापना १५व्या शतकात झाली. त्या अर्थानं हा फारच तरुण धर्म आहे. कोणीही हिंदू नाही की कोणी मुसलमान नाही या तत्वावर गुरुनानकांनी या शांतताप्रिय धर्माची सुरवात केली. शीखांमधे पराकोटीची स्वातंत्र्य भावना असल्यानं त्यांनी त्या काळात आपली राजकीय अस्मिता जपण्यासही सुरवात केली. गुरु तेगबहादूर आणि गोविंदसिंगांनी त्यासाठी शीखांचं एका लढवैय्या समाजात रुपांतर केलं.

खालसा पंथाची मुलतत्वेच मुळात लढवय्ये अनुयायी बनवण्यासाठी असल्यानं दहशतवाद हा या पंथाचा एक पाया आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. धर्मांनी दहशतवादाचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थनच केलं असल्यानं राजकीय किंवा आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी धर्माचा कसा वापर केला जातो हे आपण इतर धर्मांच्या बाबतीत पाहिलंच आहे. शीख धर्मातला खालसा पंथ त्याला अपवाद राहिला नाही. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हा पंथ निर्माण झाला असं म्हणणाऱ्यांनी पुन्हा विचार केला पाहिजे.

गोविंदसिंगांनी १६९९मधे शीखांच्या पहिल्या स्वतंत्र राज्याची निर्मिती केली. औरंगजेबाशी झालेल्या अपरिहार्य संघर्षात शीखांची अपरिमित हानी झाली खरी पण शीख त्यामुळे अधिकच आक्रमक झाले. गुरु बंदासिंग बहादूरांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोगलांशी पराकोटीचा संघर्ष केला. शेवटी मोगल सम्राट जहांदरशहानं बंदासिंगाची अमानुष हत्या केली. शीख ही गोष्ट कधीच विसरु शकले नाहीत. ते आपली सैनिकी शक्ती वाढवतच राहिले.

लढवैय्या शीखांच्या अस्मितेचा इतिहास

पुढे महाराजा रणजितसिंगांनी शीखांचं स्वतंत्र राज्य निर्माण केलं. शीखांची स्वतंत्र अस्मिता अशा रितीनं सिद्ध झाली. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हा पंथ स्थापन झाला अशी समजूत आहे पण ती खरी नाही. हिंदूंचे शत्रू मुसलमान हेच त्यांचेही शत्रू असल्यानं असा समज होतो खरा, पण त्या जागी इतर कोणत्याही धर्मीयांचं राज्य असतं तर शीखांनी त्यांचाही तेवढाच कडवा विरोध केला असता.

त्यात मुसलमानांनी त्यांच्या गुरुच्या अमानुष हत्या केल्यानं द्वेषात अधिकच भर पडली. पण त्याचा फायदा हिंदू राज्यकर्त्यांनी कधी करुन घेतला असल्याचं इतिहासात अगदी पानिपत प्रकरणीही दिसत नाही. आज जगात जवळपास २. ७५ कोटी शीख असून त्यापैकी जवळपास व्यापार-उद्योगाच्या निमित्तानं २५ टक्के शीख जगभर पसरलेत. अत्यंत कडवी धार्मिकता आणि लढवय्येपणा यासाठी ते प्रसिद्ध आहेत.

स्वतंत्र धर्म आणि स्वतःची अशी विशिष्ट संस्कृती त्यांनी गेल्या ५०० वर्षांत विकसित केली असल्यानं स्वतंत्र राष्ट्राचं स्वप्न त्यांना पडणं हे काही मानवी स्वभाव पहाता अस्वाभाविक नव्हतं. प्रत्येक धर्मात कडवे धर्मांध असतातच. ते अशा सुप्त भावना भडकावण्यात नेहमीच अग्रेसर राहत असतात हा जगाचा इतिहास आहे. ही जागा लोंगोवाल आणि भिंद्रनवाले यांनी भरुन काढली.

हेही वाचाः शहीद हेमराजच्या बायकोला न्याय मिळाला?

अकाली दलाच्या मागण्या

१९५०-६०च्या दरम्यान पंजाबची राजधानी सिमला ही होती. पण भाषावार प्रांतरचनेसाठी हिमाचल प्रदेश आणि हरियाना ही राज्ये वगळून स्वतंत्र पंजाब राज्याची मागणी जोर धरु लागली. यामुळे पंजाब राज्यात शीख हे अल्पसंख्य न ठरता बहुसंख्य होणार होते. अकाली दलानं पंजाबी सुभ्याची मागणी नेटानं पुढे रेटली. यासाठी खूप शांततामय आंदोलनं केली गेली. हजारोंना अटक करण्यात आली.

या आंदोलनाला अकाल तख्तानं सक्रिय पाठिंबा दिला. शेवटी सरकार नमलं आणि १९६६ला भाषावार विभाजन होवून आताचा पंजाब अस्तित्वात आला. त्यातूनच पंजाबनं पाणीवाटपात पंजाबवर अन्याय होतोय अशी हाकाटी सुरु केली. पंजाबी लोक शेतीवरच अवलंबून असल्यानं या तक्रारीला अर्थातच व्यापक जनसमर्थन मिळालं. त्यामुळेच की काय अकाली दलानं आधी शांततामय मार्गानं अनेक मागण्या पुढे करायला सुरवात केली. अर्थात त्यातच विभाजनवादाची मुळे दडलेली होती. या मागण्या अशा होत्या:

१. केंद्रशासित चंदीगढ शहराला पंजाबमधे सामील करणं. 
२. पंजाबी भाषा बोलणाऱ्या आसपासच्या सर्वच भागांचं पंजाबमधे विलिनीकरण करणं.
३. केंद्र सरकारनं स्वतःचं नियंत्रण कमी करुन राज्यांना स्वायतत्ता देणं. 
४. शीखांची सैन्यात भरती वाढवणं. 
५. अखिल भारतीय गुरुद्वारा कायद्याला मंजुरी देणं

या मागण्या मान्य होणं शक्यच नव्हतं. तेही इंदिराजींसारख्या कर्तव्यकठोर पंतप्रधान सर्वेसर्वा असतांना. १९७१ला सर्वप्रथम अकाली दलाचे महासचिव जगजितसिंग चौहान यांनी स्वतंत्र खलिस्तानची जाहीर मागणी केली. यामुळे त्यांना पक्षातून हाकललं गेलं. त्यांनी परदेशात जावून शीखांवर होत असलेल्या अन्यायाचे पाढे वाचायला सुरवात केली. सुरवातीला जरी ते स्वतंत्र खलिस्तान हा शांततामय आंदोलनांतून प्राप्त व्हावा असं म्हणत असले तरी त्यांची कृती तशी नव्हती असं दिसतं.

ब्राम्हण आणि बनियांशी शत्रुत्व

याच काळात खलिस्तानवादी दहशतवादी संघटनांची स्थापना होवू लागली होती. त्यांचं ध्येय स्पष्ट होतं. त्यांचं तत्वज्ञानही सुस्पष्ट होतं. ‘आमचा संघर्ष कोणत्याही जाती-जमातीच्या धर्माच्या विरुद्ध किंवा ब्राह्मण-बनियांनी आपलं तत्वज्ञान लादलेल्या गोरगरीबांशी नाही.’ असं खालसा राजनं घोषित केलं होतं. ‘आम्हाला जिथं वेदना आणि हाल होणार नाहीत असं आदर्श राष्ट्र निर्माण करायचंय.’ असंही घोषित केलं गेलं. 

ब्राह्मण आणि बनिया हे खालसा नष्ट करण्याच्या प्रयत्नांत असल्यानं त्यांच्याशी संघर्ष करु अशीही घोषणा होती. ब्राह्मण आणि बनिया हेच आपले शत्रू मानून शीखांनी आपली सामाजिक रणनीती आखल्याचं यावरुन दिसतं. खलिस्तान कमांडो फोर्सचा नेता वासनसिंग जफरवाल यानेही असंच वक्तव्य पुढे केलं आणि ब्राम्हणांशी आम्ही कसलीही तडजोड करणार नाही असं घोषित केलं.

थोडक्यात शीख दहशतवादाला ब्राह्मण-बनिया द्वेषाचीही धार होती हे स्पष्ट दिसतं. बहुदा हा वर्ग त्यांना स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देत नसल्यानं अशी तीव्र प्रतिक्रिया उमटली असावी. यामुळेच की काय बौध, जैन आणि शीख हे हिंदू कायद्यांतर्गत आणल्याचाही तीव्र निषेध शीख नेतृत्त्वानं केला होता. शीख हा सर्वस्वी स्वतंत्र धर्म आहे अशी त्यांची मान्यता आहे आणि त्यात तथ्यही आहे हेही खरं.

आपलं नकळत हिंदुत्वीकरण केलं जातंय असा त्यांचा समज होण्यामागे हेही एक कारण होतं. ‘आम्ही ब्राह्मण-बनियांकडून खलिस्तान झाल्यावर जबरी कर वसूल करु कारण ब्राह्मण आणि बनिया हेच गरीबांचे राजकीय आणि आर्थिक शोषण करतायत.’ असं पाच सदस्यीय पंथिक समितीनं म्हटलंय. यावरुन खलिस्तानसाठी ब्राह्मण-बनिया द्वेषाचा उपयोग करुन घेण्याची दहशतवादी आणि राजकीय संघटनांची पुरेपुर तयारी झाली होती हे उघड आहे.

या द्वेषाचं कारण म्हणजे फाळणीपूर्व पंजाबमधे शीख तुलनेनं अल्पसंख्यच होते. फाळणीनंतर असंख्य शीख जे विस्थापित झाले त्यांची आर्थिक स्थिती पूर्णपणे तळाला पोहोचली होती. त्यांचं सर्वस्व हरपलं होतं. या स्थितीचा पंजाबमधील फायदा बनिया आणि धनाढ्य ब्राहमण वर्गानं घेतला. त्याशिवाय ब्राम्हण वर्गानं वारंवार शीख समुदायाचं हिंदुत्वीकरण करण्याचा चंग बांधल्यानेही ही प्रतिक्रिया उमटत होती.

लाला जगतनारायण यांची हत्या

पंजाबमधले हिंद समाचार समूहाचे संस्थापक, पंजाबमधलं सर्वाधिक खपाचं वर्तमानपत्र ‘पंजाब केसरी’चे संपादक आणि स्वातंत्र्यसेनानी असलेले, काँग्रेसचे सदस्य लाला जगतनारायण हे भिंद्रनवालेचे कट्टर टीकाकार होते. जर्नलसिंग भिंद्रनवाले हा अत्यंत कट्टरपंथी होता. भिंद्रनवालेनं १९८०च्या निवडणुकीत चक्क काँग्रेसचा प्रचार केला होता. बहुदा त्यामुळे भिंद्रनवाले हे इंदिराजींनीच निर्माण केलेलं विनाशक तांडव होतं असं म्हटलं जातं.

बब्बर खलसा, शिरोमनि गुरुद्वारा प्रबंध समिती, अखंड किर्तनी जत्था, निरंकारी अशा शीखांच्या अनेक उपपंथांतही वाद होतेच. निरंकारींचा नेता गुरुबचन सिंग यानं १९७८मधे अखंड किर्तनी जथ्याच्या १३ निदर्शकांना ठार मारलं. त्याला अटक झाली. पण त्याला पुढे दुसऱ्याच वर्षी सोडून दिलं गेलं. यामुळे विभाजनवादी अजूनच आक्रमक व्हायला लागले.

गुरुबचन सिंगला १९८० साली गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. भिंद्रनवालेनं त्याचा जाहीर जल्लोष केला. जे संशयित अटक झाले ते भिंद्रनवालेचे निकटतम होते. त्यामुळे भिंद्रनवाले संशयाच्या भोवऱ्यात सापडला. लाला जगतराम यांनी भिंद्रनवालेवर जाहीर टीका सुरु केली.

त्याची परिणती १९८१मधे लाला जगतराम यांची त्यांच्याच कार्यालयात अतिरेक्यांनी गोळ्या घालून हत्या करण्यात झाली. इथं हे नमूद करणं आवश्यक आहे की पंजाब केसरीनं आणि त्यांच्या पत्रकारांनी खलिस्तानवादी दहशतवादाच्या भीषण रक्तरंजित काळात जे अलौकिक, साहसी आणि निर्भीड पत्रकारितेचं दर्शन दिलं त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.

हेही वाचाः खुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग!

भिंद्रनवालेचा रक्तरंजित दहशतवाद

भिंद्रनवालेला अटक झाली खरं. पण त्यामुळे जो क्षोभ उठला आणि हिंसा होऊ लागली त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री ग्यानी झैलसिंग यांना भिंद्रनवालेची जामीनावर मुक्तता करावी लागली. भिंद्रनवाले रातोरात हिरो बनला. शीख तरुणांनी सशस्त्र बनावं अशी उघड आवाहनं तो करु लागला. लोंगोवालनं त्याला त्याच्या कडव्या सशस्त्र अनुयायांसह सुवर्ण मंदिरात रहाण्यास अनुमती दिली. सुवर्ण मंदिर हा एक अभेद्य किल्लाच बनून गेला.

बहुसंख्य शीख अतिरेक्यांना सीमेलगत पाकिस्तानी आयएसआयकडून प्रशिक्षण दिलं जात होतंच. धनाची गरज पुरवण्यासाठी बँक लुटण्याच्या योजना तयार होत्याच. त्यातच पुन्हा धार्मिक वाद उफाळून आला. घटनेतली शीखांना हिंदू कायद्यात खेचण्याची तरतुद अमान्य करत शीख हा स्वतंत्र धर्म असल्यानं त्यांच्या जन्म आणि विवाहाच्या नोंदी शीख म्हणूनच केल्या जाव्यात अशी मागणी अकाली दलानं केली.

तोवर पंजाबमधलं वातावरण पूर्ण तापलं होतं आणि स्वतंत्र खलिस्तान हीच काय ती मागणी उरली होती. निष्पाप हिंदूंच्या हत्या बेसुमार वाढल्या होत्या. लुटालूट, बलात्कार, खंडण्या वसुलींना उत आला होता. राष्ट्रवादी शीखही या हिंसेच्या तांडवातून सुटले नाहीत.

एकदा भिंद्रनवालेनं आपली माणसं आणण्यासाठी एक बस पाठवली होती. ती पोलिसांनी अडवल्यावर, ‘पाच वाजेपर्यंत बस सोडली नाही तर मी एका तासात ५००० हिंदूंना ठार मारेल’ अशी धमकी त्यानं दिली होती. तसं करण्यास तो खरोखर समर्थ होता. तेवढा क्रूरही होता. या हिंसाचारात एकूण २०,०००पेक्षा जास्त लोक ठार मारले गेले यावरून या दहशतवादाच्या भीषणतेची कल्पना यावी.

आॅपरेशन ब्ल्यू स्टार

सुवर्ण मंदिर हा दहशतवाद्यांचा मोठा अड्डा आणि मुख्य केंद्र बनल्यानं केंद्र सरकारचा तो मोठा चिंतेचा विषय बनला होता. विभाजनवाद कोणत्या पातळीवर जाऊन ठेपेल याचा नेम नव्हता. राज्य सरकारची यंत्रणा खुद्द दहशतवाद्यांच्या आहारी गेली होती. कोणत्याही क्षणी स्वतंत्र खलिस्तान होईल असं दिसू लागलं होतं.

पण सुवर्ण मंदिर हे सर्वच शीखांच्या दृष्टीनं सर्वात पवित्र धर्मस्थान असल्यानं त्यावर हल्ला करुन अतिरेक्यांचा खात्मा करण्याचा विचारही कोणाच्या मनात आला नसता. किंबहूना भिंद्रनवालेचीही हीच अटकळ असावी. पण इंदिराजींनी ते धाडस केलं. ३ जून १९८४ला जनरल अरुण वैद्यांच्या देखरेखीखाली ले. जनरल कुलदिपसिंग ब्रार यांनी या कारवाईचं नेतृत्व केलं. मंदिराला वेढा घातला गेला.

वाटाघाटी करण्याचाही प्रयत्न झाला. दहशतवाद्यांना शरण येण्याचं आवाहन केलं गेलं. मंदिरात असलेल्या शेकडो निष्पाप भाविकांना बाहेर पाठवण्याच्या विनंत्या केल्या गेल्या. शे-सव्वाशे वृद्ध आणि आजारी भाविकांचीच तेवढी सुटका झाली. नंतर जवळपास २४ तास युद्ध झालं. दहशतवादी अत्याधुनिक शस्त्रसामग्रीसह जोरदार प्रतिकार करत होते. शेकडो जवान आणि दहशतवादी यात मारले गेले. या गोळीबारात मंदिरातले निष्पाप भाविकही ठार झाले.

महत्वाचं म्हणजे भिंद्रनवालेही यात ठार झाला. सुवर्ण मंदिर दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्त झालं. पण इथंच नव्या विनाशकारी हिंसाचाराची नांदी झाली. ती पुढे अनेक वर्षं हजारोंचा बळी घेवूनच तात्पुरती थांबली. यामुळे शीख पराकोटीचे संतप्त झाले होते. हा त्यांच्या धर्मश्रद्धेवर मोठा आघात होता. भिंद्रनवाले हा बहुतांश शीखांच्या नवीन श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरला.

‘ब्ल्यू स्टार’नंतरच्या दंगली

इंदिराजींनी सर्व धोक्यांची पूर्वकल्पना असूनही आपले शीख शरीररक्षक होते तसेच ठेवले. हा निर्णय त्यांच्या बलिदानास कारणीभूत ठरला. ३१ ऑक्टोबर १९८४च्या सकाळी सतवंत सिंग आणि बेअंतसिंग यांनी गोळ्या घालून इंदिराजीची हत्या केली. सारा देश सुन्न झाला. बधीर झाला. मग उठली संतापाची लाट. शीखविरोधी हिंसक दंगली काँग्रेसनं जाणीवपूर्वक घडवल्या की ती लोकांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती?

खरं तर यात दोन्ही गोष्टींचा समावेश होता. शेकडो निष्पाप शीखांची हत्या केली गेली आणि ही नक्कीच मानवतेला काळीमा फासणारी गोष्ट होती. द्वेषाचं उत्तर प्रतिद्वेषानं द्यायचं ही मानवी आदिम भावना आजही नष्ट झालेली नाही हेच खरं. भारतात हिंदू-मुसलमान दंगे होतात हे आपल्याला माहित आहे, पण दहशतवादी म्हणता येतील अशा कारवाया बाबरी मशिद उध्वस्त करेपर्यंत मुसलमान दहशतवाद आपल्याला माहितही नव्हता.

दहशतवाद म्हणजे काय असतो हे भारतीयांना शिकवलं ते शीख दहशतवाद्यांनी. खलिस्तानवाद्यांनी. स्वतंत्र देश हवा ही शीखांची भावना चुकीची आहे असं मानता येत नाही. धार्मिक आधारावर एक फाळणी झालीच होती त्यामुळे शीखांनाही तशी स्वप्नं पडणं वावगं नव्हतं. कदाचित त्यांनी आपल्या मागण्या रेटण्यासाठी घटनात्मक पद्धतीनं आंदोलनं केली असती.

पण त्याच वेळीस चुकीचं राजकारण आणि प्रश्नांवर तात्पुरतं उत्तर शोधणं या भारतीय राजनैतिक वृत्तींमुळे शीखांना भडकावलं गेलं आणि दहशतवादाचा आश्रय घेणं भाग पडलं असं आता स्पष्टपणे म्हणता येऊ शकतं. म्हणजे एका राजकीय दहशतवादाला शीखांनी हिंसक दहशतवादानं उत्तर दिलं. एका परीनं विचार केला तर दोन्ही बाजू अन्याय्य आणि मानवताविरोधी होत्या असं आपल्या लक्षात येईल.

हेही वाचाः मोदींचा नवा भारत आणि आमचा नवा भारत वेगळा, कारण

पोलिसांचं एन्काउंटर सत्र

खलिस्तानवादी दहशतवादी फक्त भारतातच नाही तर युरोप-अमेरिका आणि कॅनडातही होते. २३ जून १९८५ला एयर इंडियाचं एक विमान आयर्लंडच्या किनाऱ्यालगत आकाशातच उडवलं गेलं. यात ३२९ प्रवासी ठार झाले. त्यात कॅनेडीयन नागरीकच जास्त होते. शीख दहशतवादाचे पडसाद यामुळे जगभर उमटले. भारतात सर्वत्रच हिंसेचं थैमान उठलं. कोणतंही शहर त्याला अपवाद राहिलं नाही.

खुद्द पुण्यात शीख दहशतवाद्यानी अनेक दिवस ठाण मांडून बँक लुटणं, सर्रास गोळीबार करत दहशत माजवणं असे प्रकार तर केलेच पण निवृत्त जनरल अरुणकुमार वैद्य यांचीही हत्या केली. पंजाबमधे तर हिंसेचं तांडव उठलं होतं. २९ एप्रिल १९८६ला स्वतंत्र खलिस्तानची घॊषणाही करण्यात आली.

खलिस्तानचं भूत भारताच्या मानगुटीवरुन उतरायला तयारच नव्हतं. शेवटी पोलिसांना एन्काउंटरचाच आश्रय घ्यावा लागला. शेकडो दहशतवादी आणि काही निष्पापही पोलिसांनी खऱ्या-खोट्या एन्काउंटरमधे ठार मारले. पोलिसांचा हा पवित्रा दहशतवाद्यांना अपेक्षित नव्हता, त्यामुळे ते अक्षरश: हबकून गेले.

खलिस्तानी चळवळ १९९४-९५ पर्यंत संपत गेली ती केवळ या एन्काउंटरमुळे असं आता सारेच मान्य करतात. अर्थात स्व. राजीव गांधी यांनीही शांततामय मार्गानं हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. राजीव-लोंगोवाल यांच्यात तसा करारही झाला. पण काही महिन्यांत लोंगोवालांचीच हत्या झाल्यानं पुन्हा अडसर निर्माण झाला.

खलिस्तानी चळवळ सुप्तावस्थेत?

इथं मराठी माणसांना अभिमान वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे वंदे मातरम संघटनेचे संस्थापक श्री. संजय नहार यांनी मराठी तरुणांना सोबत घेत पंजाबमधे जीवाचा धोका पत्करत अनेक पदयात्रा केल्या. तिथल्या लोकांचे अश्रू पुसत ऐक्याची-स्नेहाची ग्वाही दिली. एक मराठी तरुण तिथंच एका अभियानात शहीदही झाला. पंजाब केसरी दैनिकानं तर जे कार्य बजावलं त्याला तोडच नाही.

हळूहळू खलिस्तानी दहशतवाद मवाळ होत संपला हे खरं. पण तो तात्पुरत्या स्वरुपाच्या आहे. कारण सध्या विखुरलेल्या खलिस्तानवादी संघटना पुन्हा बळ धरण्याचा, एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत. जगभरचे शीख अजूनही भिंद्रनवालेला विसरले नाहीत. त्यांच्या दृष्टीनं तो हुतात्मा आहे. ‘पिण्याच्या पाण्यापेक्षा खलिस्तान आस्तित्वात येणं आवश्यक आहे.’ असा प्रचार हे घटक जगभर करत असतात.

मुसलमान-शीखांत भांडण लावण्यासाठी रॉ ही गुप्तचर संघटना कार्यरत आहे अशा अफवाही ते पसरवतायत. आज पाकिस्तान स्वत:च दहशतवादाच्या भीषण छायेत आहे. नाहीतर कदाचित खलिस्तानी दहशतवादाचं पुनरुज्जीवन कधीच झालं असतं असं म्हणता येईल अशी स्थिती आहे. म्हणजेच सध्या ही चळवळ किंवा दहशतवाद सुप्तावस्थेत आहे असं वाटत असलं तरी ते वास्तव नाही. 

एक रक्तरंजित इतिहास

धर्मच शेवटी जागतिक दहशतवादाला कसे जबाबदार आहेत हे आपण सर्वधर्मीयांच्या दहशतवादांवरुन पाहिलंच आहे. शीख हा स्वतंत्र धर्म नसून हिंदू धर्माचाच एक भाग आहे असा प्रचार करत, कायदे-प्रणालीही वापरत शीखांचं स्वतंत्र अस्तित्व पुसण्याचा हिंदूंनी जो अविरत प्रयत्न केला त्यातून हिंदूधर्मीयांबद्दल. विशेषता: ब्राह्मणांबद्दल त्यांच्या मनात राग भरायला सुरवात झाली हे स्पष्ट दिसतं. बनियांमुळे त्यांचं आर्थिक शोषण होत होतं ते वेगळंच.

धर्म वाढवण्याच्या सुरवातीच्या काळात जरी आधीच्या गुरुंनी हिंदूशी जुळवून घेतलं असलं तरी पुढे तशी स्थिती उरली नाही. आधी हिंदू घरातील एक तरी मुलगा शीख होण्यासाठी द्यावा असा आग्रह असायचा. पण तेही पुढे थांबलं. राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या ते आपलं वेगळेपण ठळक करत गेले. हिंदूंमधे एरवी क्वचित असणारी कट्टरता ते जोपासत गेले.

खरं तर स्वतंत्रधर्मीय म्हणून त्यांनी स्वत:ची अस्मिता जोपासली होतीच. त्यामुळेच इंग्रजांनी हिंदू-मुसलमानांबरोबरच शीखांनाही स्वातंत्र्याआधी चर्चेस बोलावलं होतेच. म. गांधी आणि नेहरुंनी त्यांना काही प्रमाणातल्या स्वयत्ततेची आश्वासनं दिली नसती तर कदाचित पाकिस्तानबरोबरच खलिस्तानही अस्तित्वात आलं असतं. आणि ते अन्याय्य म्हणता आलं नसतं कारण जो नियम मुसलमानांना तोच शीखांना लागला असता.

पण स्वतंत्र भारतानं आपलं आश्वासन पाळलं नाही त्यामुळे ‘हिंदू’ सरकारनं शीखांना फसवलं असाच त्यांचा समज झाला. त्यात तत्कालीन अनेक अन्यायांचीही भर पडली. त्यातून शीख दुखावत जात धर्माच्या नावाखाली एक होऊ लागला आणि एक रक्तरंजित इतिहास लिहिला गेला.

हेही वाचाः 

नरेंद्र मोदी खरंच ओबीसी आहेत?

पेशवाईला वंदा किंवा निंदा, त्याआधी हे वाचा

भीमा कोरेगावमधे २०१ वर्षांपूर्वी नेमकं घडलं काय?

बायकांच्या सणात पुरुषी विचारांची लुडबूड कशाला?

पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?

नवऱ्याची बायको कुटणाऱ्या राधिकापेक्षा अरुंधती वेगळी का ठरते?