अंगाची लाहीलाही करणाऱ्या ‘हीटवेव’ची गोष्ट

०४ मे २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


प्रचलित ऋतुचक्रानुसार भारतात सध्या उन्हाळ्याचा हंगाम चालू आहे. पण या वर्षीचा उन्हाळा मात्र वेगळाच आहे. गेल्या कित्येक वर्षांत न जाणवलेल्या हीटवेवचा म्हणजेच उन्हाच्या लाटेचा तडाखा भारतीयांना बसतोय. नेहमी एप्रिल-मेच्या आसपास येणारी ही हीटवेव यावर्षी मात्र मार्चपासूनच जाणवू लागलीय.

भारतात उन्हाचा जोर दिवसेंदिवस वाढत चाललाय. अशात भारतीय हवामान खात्याकडून येणारी आकडेवारी अधिकच तापदायक ठरताना दिसतेय. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, गेल्या १२२ वर्षांमधे पहिल्यांदाच भारतीयांना इतक्या गरम मार्च महिन्याला सामोरं जावं लागलंय. यावर्षीच्या मार्च महिन्याची सगळ्यात उष्ण मार्च महिना म्हणून नोंद केली गेलीय. या सगळ्याला वाढती हीटवेव म्हणजेच उष्णतेची लाट कारणीभूत आहे.

काय आहे हीटवेव?

हवामान खात्यानुसार, मानवी शरीराला घातक अशा हवेतल्या तापमानाला हीटवेव म्हणजेच उष्णतेची लाट असं म्हणलं जातं. ही व्याख्या प्रत्येक भौगोलिक क्षेत्रागणिक बदलत राहते. मैदानी भागात ४० अंश सेल्सिअस,  डोंगराळ प्रदेशात ३० अंश सेल्सिअस तसंच किनारी भागात हा आकडा ३७ अंश सेल्सिअस म्हणून जाहीर केला गेलाय. जेव्हा हवेतलं साधारण तापमान या आकड्यांपर्यंत वाढतं, तेव्हा हीटवेव आल्याची नोंद केली जाते.

तसंच एखाद्या भौगोलिक क्षेत्राच्या साधारण तापमानात जर ४.५ ते ६.४ अंश सेल्सिअसनं वाढ आढळून आली तर त्या क्षेत्रात हीटवेव आल्याची नोंद होते. तसंच जेव्हा तापमान ४५ अंशाहून अधिक होतं, तेव्हा हीटवेव तर ४७ अंशाहून अधिक झाल्यास तीव्र हीटवेव म्हणून नोंद केली जाते. जर सलग दोन दिवसांसाठी एकाच भौगोलिक विभागातल्या दोन वेगवेगळ्या स्थानकांवरून वर सांगितलेली निरीक्षणं नोंदवली गेली तरच दुसऱ्या दिवशी हीटवेव आल्याचं जाहीर केलं जातं.

त्याचबरोबर हवामान खात्यानं दररोजच्या उन्हाची तीव्रता ठरवण्यासाठी काही कलर कोड ठरवलेले आहेत. त्यानुसार हिरवा रंग सौम्य तर पिवळा रंग हा वाढत्या उन्हाची ताकीद देणारा असतो. केशरी रंग जास्तीत जास्त दोन दिवसांच्या तर लाल रंग जास्तीत जास्त सहा दिवसांच्या कडक उन्हाळ्यासाठी वापरला जातो. केशरी आणि लाल रंगानं दाखवलेल्या दिवसांत उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांचं प्रमाण अधिक असतं.

हेही वाचा: इतिहास सांगतो, निसर्गातलं वैविध्य संपत असल्यानं जगावर वायरस संकट

मार्चमधे रेकॉर्ड ब्रेक उष्णता

विज्ञान आणि पर्यावरण केंद्राच्या संचालिका अवंतिका गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार अशी शेवटची उष्णतेची लाट २०१९मधे आली होती. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, २०२१ हे गेल्या नव्वद वर्षांतलं सगळ्यात उष्ण वर्ष म्हणून नोंदवलं गेलंय आणि या वर्षी उन्हाचा तडाखा आणखीनच वाढणार असल्याचं दिसतंय. जागतिक हवामान संघटनेनं यावर्षीच्या तापमानात ११ अंशानं वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय.

या वर्षीचा मार्च महिना हा गेल्या १२२ वर्षांमधला सगळ्यात उष्ण मार्च म्हणून नोंदवला गेलाय. हा सगळा राजस्थानच्या पश्चिमेकडे आलेल्या प्रतिचक्रीवादळाचा परिणाम असल्याचं गोस्वामी यांनी ‘फॅक्टचेकर’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय. प्रतिचक्रीवादळ हे नेहमीच्या चक्रीवादळाच्या उलट परिस्थिती निर्माण करतं. अशा वेळी वातावरण अधिक कोरडं आणि उष्ण बनत जातं.

सहसा मे-जूनमधे येणाऱ्या उष्णतेच्या लाटा मार्चपासूनच जाणवू लागल्या आहेत. विज्ञान आणि पर्यावरण केंद्राच्या माहितीनुसार, मार्च महिन्यात तब्बल १५ राज्यांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागला. यात थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेला हिमाचल प्रदेशसारखा डोंगराळ भागही होता, हे विशेष! दरवर्षीसारखा मध्य आणि वायव्य भारतात पाऊस न पडल्यानं प्रतिचक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

यावर्षीच्या एप्रिलपासून मैदानी प्रदेशाबरोबरच किनारी प्रदेशातलं तापमानही वाढत असल्याचं निरीक्षण हवामान खात्यानं नोंदवलंय. समुद्रकिनाऱ्यांवरून येणाऱ्या वाऱ्यांना दीर्घकाळ अडथळा निर्माण होत असल्यानं किनारी प्रदेशात उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. अर्थात, इथं वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमधे आर्द्रताही सामावलेली असल्यानं मैदानी प्रदेशातल्या कोरड्या वाऱ्यांइतकी घातक उष्णतेची लाट किनारी प्रदेशात नोंदवली जात नाही.

आरोग्य कसं सांभाळायचं?

गोस्वामी यांनी ५ मे पासून जूनच्या सुरवातीपर्यंत उष्णतेची लाट कमीजास्त होत राहील, असा अंदाज व्यक्त केलाय. काही ठिकाणी वळवाच्या पावसाची शक्यता असली तरी त्यानं उन्हापासून दिलासा मिळणार नसल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. अशावेळी उन्हाचा त्रास होणाऱ्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणं आवश्यक आहे.

महाराष्ट्रात उष्माघातानं आजारी पडलेल्यांचा आकडा ३७०हून अधिक असून २५हून अधिक जणांना उष्माघातामुळे आपला जीव गमवावा लागलाय. वाढत्या उन्हानं अंगावर चट्टे, पुरळ, घामोळ्या येण्याबरोबरच शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्यानं पक्षाघाताचा झटका येण्याच्या केसेसही वाढल्याचं दिसून आलंय.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना आरोग्य केंद्रात आवश्यक असलेल्या औषधांची तसंच साधनांची उपलब्धी वाढवण्याचे आदेश दिले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा, तातडीच्या कामाशिवाय घराबाहेर न निघण्याचा तसंच दीर्घकाळ उन्हात काम न करण्याचा सल्लाही भूषण यांनी राज्यांना लिहलेल्या पत्रात दिलाय. त्याचबरोबर सौर उर्जेचा वापर वाढवणं, संवेदनशील भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणं अशाही सूचना त्या पत्रात केल्या आहेत.

हेही वाचा: 

एका झाडाची किंमत शोधली कशी?

‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?

डळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)

रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली

एका शिक्षकाला बियरने चीनमधला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं, त्याची गोष्ट