आपल्यातला कृत्रिमपणा घालवून 'बी रियल' रहायचा संदेश देणारा ऍप

०१ सप्टेंबर २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


'बी रियल' नावाचं एक नवं फोटो शेयरिंग ऍप आलंय. इतर ऍपपेक्षा हे थोडं हटके आहे. इथं कोणत्याही फिल्टर किंवा एडिटिंगशिवाय स्वतःच स्वतःला आजमावता येतंय. सोशल मीडियातल्या कृत्रिमपणाच्या काळात 'बी रियल' होण्याचा हा संदेश लाखमोलाचा आहे. त्यामुळे हा ऍप वापरायची शिफारस खुद्द 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'नं केलीय.

वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे आपल्या हक्काचे दोस्त बनलेत. फेसबुक, ट्विटर ते अगदी व्हाट्सऍपपर्यंत कितीतरी ऍपनी रोजचा दिवस व्यापून टाकलाय. टिकटॉक, यिकयाक, स्नॅपचॅट, इन्स्टाग्रामनं मनोरंजनाचा एक खुला प्लॅटफॉर्म दिला. त्यावरून रोज कित्येक फोटो, वीडियो आपण शेअर करतो. आपली ओळख जगाला व्हावी म्हणून धडपडत असतो. अशाच एका फोटो शेयरिंग ऍपची, त्याच्या हटके कारणासाठी जगभरात चर्चा होतेय.

हेही वाचा: रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना!

हटके ऍपची रियल स्टोरी

'बी रियल - युवर फ्रेंड फॉर रियल' असं या ऍपचं नाव आहे. हे ऍप फ्रान्सच्या अॅलेक्सिस बॅरेट यांनी तयार केलंय. २०२०ला आलेलं हे ऍप यावर्षी खूपच लोकप्रिय झालंय. अॅपल आणि गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येणारं हे ऍप एप्रिल २०२२पर्यंत जवळपास ६.८ मिलियन लोकांनी डाउनलोड केलं. तर जुलैपर्यंत हा आकडा २० मिलियनपर्यंत पोचला. २५ ऑगस्टला तर १० मिलियनपेक्षा अधिक लोकांकडून एकाच दिवशी हे ऍप वापरलं गेल्यामुळे नवाच रेकॉर्ड बनला.

डाउनलोड केल्यावर फक्त नाव आणि मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकला की, ऍप सुरू होतं. त्यासाठी एक युजर आयडी बनवावा लागतो. तुमच्या परवानगीने मोबाईलचे बॅक आणि फ्रंट असे दोन्ही कॅमेरा एकाचवेळी खुलजा सिमसीमसारखे उघडतात. फोटोसाठी तुम्हाला फक्त दोन मिनिटं मिळतात. त्यात जे आजूबाजूला असेल तेच क्लिक होतं. ना कोणतं फिल्टर, ना एडिटिंग. जे असेल ते अगदी रियल.

ऍप वापरण्यासाठी फार काही डोकं लावावं लागत नाही. इथं फ्रंट आणि बॅक कॅमेऱ्यातून जो फोटो आलाय तो जोडून एकच फोटो तयार केला जातो. त्यामुळे थेट फोटो काढायचा आणि तोच शेअर करायचा असं या ऍपचं गणित आहे. महत्वाचं म्हणजे दिवसातून एकदाच तुम्हाला फोटो टाकायची संधी मिळते. लोकांचा त्यांच्या आयुष्यातला एखादा 'रियल टाईम' टिपण्याचा आणि तोच शेअर करायची ही उत्तम संधी आहे.

एकदाच नोटिफिकेशन, एकदाच संधी

कुठं पार्टी असेल तर आपण नटून थटून जातो. तिथं फोटो, सेल्फी काढणं हे हक्काचं बनलेलं असतं. थोडी चमकोगिरी करण्यासाठी यातले काही फोटो आपण सोशल मीडियावर टाकतो. एखादा फोटो, सेल्फी टाकायला बरा वाटला नाही तर एडिट, फिल्टरही करतो. 'बी रियल'मधे अशी कोणती भानगडच ठेवण्यात आलेली नाही.

इथं तुम्हाला हजार सेल्फी काढता येत नाहीत. एकदाच नोटिफिकेशन आणि एकदाच संधी. संधी हुकली की, पुन्हा थेट दुसऱ्या दिवसाची वाट पहायची. फेसबुक, इन्स्टावर आपले हजारो फॉलोअर्स असतात. तसंही काही या ऍपमधे नाही. फक्त आपल्या मित्रांसोबत हे फोटो आपल्याला शेअर करता येतात. अर्थात त्यासाठी तुमच्या मित्रांकडे हे ऍप असायला हवं.

तसंच यात भल्यामोठ्या जाहिराती नाहीत. ना तुम्हाला सातासमुद्रापार पोचवण्यासाठी कुठल्या क्लुप्त्या लढवल्या जातायत. असं काहीच ऍपमधून केलेलं नाहीय. पण एखादी व्यक्ती आक्षेपार्ह फोटो पोस्ट करत असेल तर त्यावर इतर युजर्सना नक्कीच तक्रार करण्याची मुभा देण्यात आलीय.

हेही वाचा: पंच्याहत्तरीतही दिमाखात उभा हावडा ब्रिज

फेसबुक, इन्स्टाला घाम फोडला

सध्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेसबुक आणि फोटो शेअरिंग ऍप असलेल्या इन्स्टाग्रामची हवा आहे. पण मागच्या आठवड्यात या दोन्ही दादांना 'बी रियल'नं चांगलाच घाम फोडला होता. १९ ऑगस्टला हे ऍप 'अॅपल प्ले स्टोअर'वर रेटींगमधे पहिल्या क्रमांकावर होतं. त्यावेळी इथं पहिल्या दहामधून फेसबुक बाहेर होतं. तर प्ले स्टोअरवरही 'बी रियल' पहिल्यांदाच ११ व्या क्रमांकावरून थेट ७व्या क्रमांकावर पोचलं.

हे ऍप इन्स्टाग्रामचं तर पूर्ण मार्केट खाईल की काय अशीही वेळ आली होती. लगोलग इन्स्टाग्रामनं 'बी रियल' सारखंच नवं ड्युअल कॅमेऱ्याचं फिचर आणायची घोषणा केली. त्यातून वीडियोही काढता येतील. तसंच पुढच्या काळात इन्स्टाग्रामवरच्या युजर्सनी आपले फोटो नीट टाकावेत म्हणून 'कँडिड चॅलेंज' नावाचं एक नवं फिचर आणायचीही योजना आखलीय. त्यांनाही फोटो टाकण्यासाठी दोन मिनिटांचा वेळ मिळेल. अशाप्रकारे एका छोट्या ऍपनं इन्स्टाग्रामला धडकी भरवली.

असा ऍप काही पहिल्यांदा येत नाहीय. कॅसी निस्टॅट हा अमेरिकन सिनेनिर्माता आणि प्रसिद्ध युट्यूबर आहे. बेमे नावाच्या मल्टिमीडिया कंपनीचा तो सहसंस्थापक होता. याच कंपनीनं बेमे नावाच्या एका मोबाईल ऍपची निर्मिती केली होती. 'बी रियल'सारखाच हा ऍप होता. त्याची लोकप्रियता इतकी वाढली की, २८ नोव्हेंबर २०१६ला थेट बेमे ही कंपनीच आंतरराष्ट्रीय न्यूज नेटवर्क असलेल्या सीएनएननं विकत घेतली.

जगभर 'बी रियल'ची चर्चा

सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं हे ऍप सध्या जगभरात लोकप्रिय होतंय. या ऍपनं एक वेगळा दृष्टिकोन दिलाय. सोशल मीडिया हे एक व्यावसायिक जग झालंय. इथं पैसा बोलू लागलाय. अशा काळात या ऍपचं वेगळं म्हणणं फार महत्वाचं आणि तितकंच मोलाचं आहे. त्यामुळेच या ऍपची जगभर चर्चा होऊ लागली.

इतरांच्या जीवनशैलीतून मिळणारी खरेपणाची जाणीव कदाचित आपलं नैराश्य आणि एकाकीपण घालवू शकते. त्यामुळेच या ऍपची दखल थेट जगातली एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्था असलेल्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'नं घेतली. त्यांनी मानसिक आरोग्य आणि सोशल मीडियाच्या दबावाला मूठमाती देत हे ऍप वापरण्याचं आवाहन जगभरातल्या तरुणाईला केलंय. कृत्रिमपणा घालवून आपण जसे आहोत तसंच रहायचा यातून संदेश दिला जातोय.

असं असलं तरी या ऍपच्या काही कमतरताही आहेत. म्हणजे तुम्ही एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेलात. तिथल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला 'बी रियल'मधून कॅमेऱ्यात कैद करायची इच्छा असेल तर यातल्या दोन मिनिटांच्या टायमिंगनं ते साध्य होणं अवघड आहे. तसंच या आभासी 'रियल टाईम'सारखंच प्रत्यक्षातला वेळही तुम्ही तुमच्या मित्रांना द्यायला हवा. आजच्या घडीला तो संवादही तितकाच महत्वाचा आहे.

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

सुपरहिरो मरत नाहीत आणि त्यांचा बापही!

कोल्हापूर ते ऑस्करः भानू अथैय्या यांचा ९० वा वाढदिवस

एका नाटकाचा प्रवासः सिंधुदुर्गातलं सरमळे ते न्यूयॉर्कचं ब्रॉडवे

अमिताभलाही न कळालेला अॅवेंजर समजून घेण्यासाठीचा क्रॅश कोर्स