विराट पोरा, हे वागणं बरं नव्हं!

२६ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


नसीरुद्दीन शाह सध्या चर्चेत आहे. सध्याची भारतातली स्थिती बघून आपल्या मुलांच्या भवितव्याविषयी आपल्याला चिंता वाटते, असं नसीरुद्दीनचं वक्तव्य चर्चेत आहेच. पण त्याआधी त्यांनी विराट कोहलीच्या मैदानातल्या वागण्यावर टीका केली होती. त्यावरही अशीच टीका होतेय. पण तेही तितकंच महत्त्वाचं आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरवातीलाच कॅप्टन विराट कोहलीने शिवराळपणा सोडून देत असल्याचे संकेत दिले. त्यामुळे आपल्या विराटचा आता वाल्याचा वाल्मिकी झाला, असं फॅन्सला वाटलं. आता ऑस्ट्रेलियातील क्रिकेट फिल्डवर शांतता नांदेल. फक्त दर्जेदार क्रिकेट बघायला मिळेल. अशा अपेक्षेने जुने जाणते क्रिकेट चाहते सुखावले होते. कारण त्यांनी त्यांच्या काळात क्रिकेट फिल्डवर फक्त बॅट आणि बॉलच बोलताना बघितलीय.

खटकणारी बॉडी लँग्वेज

पण विराटने काही दिवसांतच आपले मूळ रंग दाखवायला सुरवात केलीय. विराटचा काय वाल्मिकी झाला नाही. टेस्ट मॅचच्या सुरवातीला त्याची बॉडी लॅग्वेज खटकली. तेथेच स्लेजिंग फ्री मालिकेची हाक शिव्यांच्या आवाजात दबली जाणार याची खात्री पटली. तसं झालंही. पण दुसऱ्या टेस्टमधे शिव्यांची पुढची पायरी गाठली गेली. दोन्ही कॅप्टननी आपली ५६ इंची छाती दाखवण्याचा प्रयत्न केला. मॅच संपली त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेनच्याच छातीत दम असल्याचं समोर आलं. पण मैदानावर झालेला हा प्रकार क्रिकेटचे अभ्यासू फॅन नसीरुद्दीन शाह यांच्या काही पचनी पडला नाही.

नसीरुद्दीन शाह यांना भारतीय कॅप्टनचं मैदानावरचं असं वागणं काही बरं वाटलं नाही. त्यांनी थेट विराटला ट्विट करून वडीलकीचा सल्ला दिला, `हे वागणं बरं नव्हं`. नसीरुद्दीन शाह यांची लँग्वेज ही विराटच्या बॉडीलँग्वेजला सूट करणारीच होती. पण विराटची बॉडीलँग्वेज आवडणाऱ्या ‘सोशल’ चाहत्यांना नसीरुद्दीन यांची वडीलकीची ही लँग्वेजच आक्षेपार्ह वाटली. या भाषेचा त्यांना इतका त्रास झाला की त्यांनी शाह यांना सरळ देश सोडा, असं फर्मान कीबोर्डवरुन सोडलं.

आपलं ट्विट देशभक्तांना झोंबणार आणि आपल्याला हे फर्मान मिळणार याची कल्पना शाह यांना होतीच. त्यामुळेच बहुदा त्यांनी विराटचा आधीच्या वक्तव्याचा आधार घेत मी काही देश सोडणार नाही, असंही सांगून टाकलं होतं. तरीही त्यांना पाकिस्तानचं तिकीट काढून दिलं गेलं. आता जिथे विराटच आपल्यावरील टीका खिलाडूवृत्तीने घेत नाही. तिथे आपल्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनाच सल्ला दिला म्हणून देश सोडून जाण्याचं फर्मान सोडत असेल तर मग त्याच्या सर्वसामान्य चाहत्यांकडून कोणती वेगळी अपेक्षा करायची? 

सचिन बोलला तेच नसीर बोलले

सुरवातीपासूनच विराटची मैदानावरच्या बॉडी लँग्वेज वादाचा विषय आहे. सचिनचा विक्रम विराटच मोडणार अशी भविष्यवाणी करण्यात आली. तेव्हापासूनच त्याची आणि सचिन तेंडुलकरची तुलना होत आहे. पण ही तुलना फक्त शतकांच्या आकडेवारीबाबत मर्यादीत राहिली. कारण सचिन तेंडुलकर ही गोष्ट काही निव्वळ क्रिकेट खेळण्यातून तयार झाली नाही. खेळाच्या सोबतीला नम्र वागणुकीचीही जोड होती.

विराट हा फक्त शतकांच्या शर्यतीत सचिनचा पाठलाग करतोय. बाकी रोजच्या वागणुकीबाबत न बोललेलंच बरं. कारण वागणूक सुधारा, असं खुद्द सचिननेच सांगितलं होतं. फक्त वेगळ्या शब्दात. पण, विराटच्या बॉडी लँग्वेजमध्ये काही सुधारणा होत नाही. हे पाहून शाह यांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलं.

आता नाव नसीरुद्दीन असल्याने त्यांना या वक्तव्यावर पाकिस्तानचे तिकिट काढून देण्यात आलं असावं. कारण शाह यांच्या वक्तव्यात आक्षेपार्ह असं काय होतं हेच कळत नाही. बरं या राष्ट्रप्रेमींना वाटतं, की नसीरुद्दीन शाह यांचं वक्तव्य हे चुकीचं आहे. आपलं सद्गुणी बाळ विराट, असं काही करतच नाही आहे.

टीवीवाल्यांनीही नसीरुद्दीन शाह यांच्या वीडियोशी छेडछाड केलीय. प्रत्यक्षात असं काही नाही, हे दाखवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं तिकिट काढून देणं अपेक्षित आहे. पण  ज्या देशप्रेमी भक्तांच्या प्रत्येक वाक्यात दोन चार वेळातरी पाकिस्तानचा उल्लेख असतो त्यांना नसीरुद्दीन पाकिस्तान असा संदर्भ जोडला.

नसीरुद्दीन यांच्या वक्तव्याला महत्व का?

नसीरुद्दीन शाह सिनेमाच्या क्षेत्रातले आहेत. आपल्या क्षेत्रात त्यांनी बरीच उंची गाठलीय. त्यामुळे सिनेमावाला हा माणूस क्रिकेटवर कशाला बोलतोय, असा प्रश्न काहींना पडलाय. त्याला काय कळणार की स्लेजिंग हा क्रिकेटचाच भाग आहे. सगळेच ते करत असतात. त्यात काहीही गैर नसल्याचंही सांगातायंत. पण विराटचा विषय हा स्लेजिंगपुरता मर्यादित नाही.

शाह यांचं वक्तव्य काळजीपूर्वक ऐकलं तर आपल्याला समजेल की शाह स्लेजिंगवर नाही तर मैदानावरील त्याच्या बॉडी लँग्वेजवर बोलत होते. ते विराटला शिवराळ नाही तर मैदानवर सर्वात खराब वागणूक करणारा खेळाडू म्हणाले होते. आता त्यांना असं वक्तव्य करण्याची गरज का वाटली? याचं उत्तर आहे भारतीय क्रिकेट संस्कृतीशी विराटचं हे वागणं विसंगत आहे.

नसीरुद्दीन शाह हे फक्त फिल्म प्रमोशन पुरते आणि विजयी झाल्यावर गोडगोड शुभेच्छा देणारे गुडबुक्समधले क्रिकेट फॅन नाहीत. ते क्रिकेटचे पूर्वीपासून निस्सीम चाहते आहेत. इतकेच नाही तर त्यांना आताच्याच नाही तर पूर्वीच्या खेळाडूंचे आणि कॅप्टनचे रेकॉर्ड्स, स्वभाव आणि बारकावे चांगलेच माहीत आहेत. कारण त्यांनी टीम इंडियाची पन्नासेक वर्षांची जडणघडण बघितलीय.

असहिष्णुतेचा विराट आदर्श

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात विराटच्या नावावर एक चांगलाच रेकॉर्ड आहे. तो म्हणजे मैदानावर प्रत्येक सिरीजमधे आपल्या गैरवर्तणुकीने होणारी भारतीय कॅप्टनच्या नावाची चर्चा. अशा प्रकरणात चर्चेत राहणारा विराट हा एकमेव भारतीय कॅप्टन असेल. तो भारतीय क्रिकेट परंपरेच्या चिंधड्या उडवत आहे. भारतीय संघाला नवाब अली खान पतौडींपासून ते कूल कॅप्टन धोनीपर्यंत अनेक नामी कॅप्टन लाभलेत. यातील एकाही कॅप्टनने आक्रमकतेच्या नावाखाली मैदानावर विराटसारखी धुडगूस घातलेली नाही. विराट भारतीय कॅप्टनशीपची परंपरा खंडीत करतोय. नसीरुद्दीन शाह यांनी हेच तर सांगण्याचा प्रयत्न केलाय.

सध्याच्या भारतीय संघातल्या खेळाडूंना एका ओळीत उभं करुन तुमचा आदर्श कोण, असं विचारलं तर बहुतांश जण सचिनचं नाव घेतील. हाच प्रश्न आपण एखाद्या शाळेतल्या क्रिकेट टीमला विचारला तर ते नाव घेतील विराटचं. आता जर लहान मुलं विराटचा आदर्श घेणार असतील, तर त्याने कसं वागलं पाहिजे? विराटच्या बॉडी लँग्वेजने चुकीची परंपरा तयार होत असेल तर तसं सांगणं नसीरुद्दीन शाह यांच्यासारख्या वडीलधाऱ्यांचं कर्तव्यच आहे. आणि बाबा तुझं हे वागणं बरं नव्हं, असं सांगून त्यांनी आपलं कर्तव्यच पार पाडलंय.