विन्सेंट वॅन गॉघ हा उत्तम चित्रकार होताच, पण निखळ माणूसही होता. भाऊ, मित्र, कलाकार, माणूस म्हणून त्याची गुणवत्ता काळाच्या पुढची होती. त्यानं शब्दांतून त्याचं वास्तविक जगणं रेखाटलंय तर चित्रांमधून त्याची स्वप्नं, त्याचे आदर्श, त्याच्या प्रेरणा चितारल्या आहेत. त्याच्या पत्रांची तुलना दर्जेदार साहित्याशीच होऊ शकते. गॉघच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारी प्रतिक पुरी यांची फेसबुक पोस्ट.
काही कलावंत हे स्थळ-काळाची बंधनं ओलांडून आपल्या काळजात घर करून बसतात. त्याची अनेकानेक कारणं असू शकतात. पण दोन कारणं त्यात प्रमुख असतात. पहिलं म्हणजे, कलावंत आणि माणूस म्हणून ती अतिशय प्रामाणिक असतात आणि दुसरं म्हणजे, ती आपल्या जगण्याचा, विचारांचा आणि प्रेरणेचाही भाग होतात.
डच चित्रकार व्हॅन गॉघ हा असाच माझ्या काळजात घर करून राहिला आहे. माझ्यासाठीही वरची कारणं खरी आहेतच शिवाय त्याची वाचनाची आवड, चालण्याचा छंद आणि निसर्गावरचं प्रेम यामुळे तो अधिक जवळचा वाटतो. माझ्या बोलण्यांत तो असतोच पण माझ्या लिखाणातही गॉघचे उल्लेख अनेकदा आले आहेत. कारण तो माझ्यासाठी अपरिहार्य विचार आहे. एक न विसरता येणारी हळवी आठवण आहे.
चित्रकार हा सुरवातीपासून माझ्या आवडीचा विषय. त्यामुळे त्यांच्याविषयी वाचन सुरू असतांना गॉघ मला कधीतरी भेटला. त्याची पत्रं त्यामानाने उशीरा वाचायला मिळाली. त्यानं लिहिलेलं ते एकमेव साहित्य. त्याच्या पत्रांना मी मुद्दाम साहित्य म्हणतोय. पण मीच नाही तर जगभरातले समीक्षक तसं आधीच म्हणत आलेत. कारण त्याच्या पत्रांची तुलना साहित्याशी आणि तेही उत्तम दर्जेदार साहित्याशीच होऊ शकते. गॉघ जगला असता आणि चित्रकार झाला नसता तर उत्तम लेखक होऊ शकला असता. पण त्याची नियती वेगळी होती.
१८५३ मधे जन्माला आलेल्या गॉघने १८९०ला आत्महत्या करून स्वतःचं आयुष्य संपवलं. म्हणजे फक्त ३७ वर्षांचं आयुष्य. वयाच्या २६ व्या वर्षी त्यानं चित्रकार होण्याचा निर्णय घेतला. इतक्या उशीरा कोणी चित्रकार होण्याची इच्छा धरत नाही. तरीही मरायच्या आधी त्यानं किमान २००० चित्रं काढली होती. त्याच्या हयातीत त्याचं केवळ एकच चित्र विकल्या गेलं. त्याच्या शेवटच्या काळात त्याला वेड लागलं. तरीही शेवटच्या क्षणापर्यंत त्याची चित्रकारी थांबली नव्हती. मानमान्यता मिळू लागत असतानाच त्यानं स्वतःचा जीव घेतला.
त्याचा लहान भाऊ थिओ याला त्यानं ही पत्रं लिहिली आहेत. काही मित्रांना लिहिली. काही बहिणीला. पण थिओला जास्त. कारण लहान असूनही त्यानंच गॉघचा सांभाळ केला. जेव्हा कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हतं तेव्हा थिओनं त्याच्यावर विश्वास ठेवला. दोघा भावांचं प्रेम असं की गॉघ गेल्यानंतर सहा महिन्यांतच थिओही मरण पावला.
गॉघची पत्रं खरं तर वाचवत नाहीत. तुमच्यात थोडी जरी माणुसकी असेल, जगण्याचा संघर्ष काय असतो हे तुम्हाला माहिती असेल, तुमच्या कामावर तुमची निष्ठा आणि प्रेम असेल तर गॉघची पत्रं तुम्हाला रडवतात. पुढच्या आयुष्यात त्याचं काय झालं हे माहित असेल तर त्याच्या सुरवातीच्या काळातली पत्रं वाचताना डोळे भरून येतातच. गॉघ हा अस्सल माणूस होता. त्याचं जगणं पाहिलं की मला वसंत बापट यांची 'बाभुळझाड' ही कविता आठवते.
अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा, टणक पाठ
वारा खात, गारा खात, बाभुळझाड उभेच आहे
जगले आहे, जगते आहे
काकुळतीने बघते आहे
आठवते ते भलते आहे
उरांत माझ्या सलते आहे
आत काही कळते आहे, आत फार जळते आहे
हेही वाचा: इरफान खान: त्याला जातानाही चमेलीचा सुगंध हवा होता!
गॉघ जरी सुरवातीपासून चित्रकलेच्या वातावरणात वाढलेला असला तरीही त्यानं लगेच चित्रकार होण्याचा निर्णय घेतला नाही. घरचा तो सर्वांत मोठा मुलगा होता. त्याच्याकडून घरच्यांच्या विशेषतः त्याच्या आईवडलांच्या खूप अपेक्षा होत्या. वडील कर्मठ ख्रिश्चन होते. घरी धार्मिक वातावरण होतं. पण परिस्थिती फार सुखाची नव्हती.
गॉघ फार शिकला नाही. वयाच्या सोळाव्या वर्षीच आपल्या एका काकाच्या मदतीने चित्रकारांची चित्रं विकणाऱ्या एका कंपनीत तो नोकरीला लागला. साल होतं १८६९. वय होतं सोळा. तीन वर्षं काम शिकण्यात घालवल्यानंतर त्याला बढती मिळाली. त्यानंतर त्यानं आपल्या भावाला पत्रं लिहायला सुरवात केली. वर्ष होतं १८७२. गॉघ तेव्हा १९ वर्षांचा होता आणि थिओ होता १५ वर्षांचा. हा पत्रव्यवहार पुढे गॉघच्या मृत्युपर्यंत म्हणजे १८९० पर्यंत सुरू राहिला.
माणसाचं मन कळायचं असेल तर पत्रासारखं दुसरं माध्यम नाही. गॉघचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची पत्रं औपचारिक नाहीत. त्यांना एक शिस्त आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे त्याची वाचनाची आवड. आणि ते वाचन नकळत त्याच्यात झिरपत गेलं. ज्यामुळे तो चांगलं लिहू लागला. वाचनानं तो माणूस म्हणून अधिकाधिक समृद्ध होत गेला. त्याचे स्वतःचे विचारही प्रगल्भ होत गेला. एका प्रतिभावंताचा प्रवास सुरू झाला होता.
१८७९ला गॉघनं चित्रकार होण्याचं ठरवलं तेव्हा तो २६ वर्षांचा होता. त्यामानाने त्यानं बराच उशीर केला होता. या दरम्यानच्या काळात त्याची अनेक प्रेम प्रकरणं अपयशी झाली. त्यानं तो पार खचला. मधल्या काळात त्यानं धर्माच्या प्रांतातही शिरकाव करण्याचा प्रयत्न केला पण तोही फसला. अति धार्मिकतेकडून निधार्मिकतेकडे झालेला त्याचा हा प्रवास अनुभवण्यासारखा आहे.
आपण कलाकार आहोत याची त्याला मात्र पूर्ण जाणीव होती. आपल्या परिस्थितीचीही जाणीव होती. त्याच्या या काळातल्या पत्रांमधून ती दिसून येते. चित्रकार निसर्गाला समजू शकतात आणि त्याच्यावर प्रेम करतात आणि तेच आपल्याला त्यांच्या चित्रांमधून निसर्ग बघायला शिकवतात, असं तो लिहितो. आपण काहीतरी चांगलं काम केलं आहे आणि त्यामुळे काही जणांच्या आठवणींत तरी आपण जीवंत राहू याची जाणीव असेल तर मरणं सोपं जातं असं त्याचं मत होतं. आणि त्याला स्वतःला त्याची प्रखर जाणीव होती.
प्रेम हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय आणि त्याची उणीवही होती. आयुष्यभर त्याला कोणत्याही स्त्रीचं प्रेम लाभलं नाही. थिओचं बंधुप्रेम लाभलं नसतं तर गॉघ जगू शकला नसता, कलाकारही होऊ शकला नसता हे खरं आहे. प्रेमामुळे आपल्याला शक्ती मिळते, आणि जे आधिक्याने प्रेम करतात, ते आयुष्यात खूप काही मिळवतात असं त्याला वाटायचं. प्रेमामुळे केली गेलेली कोणतीही गोष्ट अधिक चांगली होती हा त्याचा विश्वास होता. या विश्वासामुळेच त्यानं स्वतःमधली चित्रकार होण्याची आग कधीच विझू दिली नाही. हाच सल्ला तो आपल्या सर्वांनाच देतो.
अत्यंत हालअपेष्टा भोगत असतानाही त्यानं हा विश्वास कधी ढळू दिला नाही. घरातून जवळपास हाकलला गेल्यानंतर, अत्यंत कठीण परिस्थितीत तो चित्रकार होण्यासाठी साधना करू लागला. त्याला राहण्या जेवण्याची चिंता नव्हती. येण्याजाण्यासाठी भाडं मिळेल की नाही याचीही पर्वा नव्हती. दिवसेंदिवस त्यानं केवळ ब्रेड आणि दारूवर काढले.
आपल्या आवडत्या चित्रकारांना भेटण्यासाठी तो पायीच प्रवास करायचा. कारण प्रवासासाठी पैसे नसायचे. रस्त्यात पडेल ती कामं करून जेवण मिळवायचं. राहण्यासाठी घोड्याचा तबेला किंवा गुराढोरांचा गोठा त्याला पुरायचा. पण त्यानं त्याची कधी तक्रार केली नाही. त्याला चिंता होती ती फक्त त्याच्या चित्रकलेच्या सामानाची.
पैशामुळे मनासारखी चित्रं रंगवता येत नाही हीच त्याची एकमेव तक्रार होती. इतकं असुनही त्याचा आत्मविश्वास किंचीतही ढळत नव्हता. रात्रभर नदीत जाळं टाकून एकही मासा मिळाला नाही म्हणून आपण निराश व्हायचं नसतं तर दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा उमेदीनं जाळं टाकून मासे पकडायचा प्रयत्न करायचा असतो असं तो थिओला सांगतो. संकटं, अडचणी, त्रास, दुःखं, अपयश यामुळे माणसानं खचून न जाता त्यांतूनच नवा जन्म घेण्याची दूर्दम्य इच्छा तो बाळगतो.
हेही वाचा: जावेद अख्तरनी कैफी आझमींवर कविता लिहिलीय
१८७९ला चित्रकार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर गॉघनं त्यात कोणताही चुकारपणा केला नाही. त्याची धार्मिकता तोवर पूर्णपणे नष्ट झाली होती. आता तो कलाकार होता आणि मुख्य म्हणजे एक माणूस. एक जिवंत माणूस. जगण्याचा समरसून आनंद लुटणारा माणूस. आर्यविंग स्टोनने लिहिलेल्या गॉघच्या चरित्रात्मक कादंबरीचं नावच ‘लस्ट फॉर लाईफ’ हे आहे. गॉघनेच त्याच्या एका पत्रात केलेल्या याच उल्लेखावरून हे शीर्षक घेतलेलं आहे.
गॉघची यानंतरची पत्रं ही कला आणि कलाकार यांच्याविषयीच्या सर्वांगीन चर्चेनं भरलेली आहेत. एकीकडे चित्रकलेचे धडे गिरवत असतानाच तो वाचनही करत होता. कलाकाराने वाचन करणं अत्यावश्यक आहे अशी त्याची भावना होती. त्याच्या पत्रांत कित्येक लेखकांचे उल्लेख मिळतात. त्यांच्या पुस्तकातले उतारे मिळतात. ज्यातून तो स्वतः प्रेरणा घेत होता.
गॉघचं वैशिष्ट्य म्हणजे तो स्वतःशी अत्यंत प्रामाणिक होता. अशी माणसं स्पष्टवक्ता असतात. लोक त्यांना उर्मट किंवा फुटक्या तोंडाची म्हणत असली ती कायम खरंच बोलतात जे फारसं कोणाला आवडत नाही. गॉघचा स्पष्टवक्तेपणा, कलेविषयीची निष्ठा आणि त्याचा स्वाभिमान या तीन गोष्टींमुळे तो कायम अडचणीत आला. पण म्हणून त्याने आपल्या तत्वांशी कधी तडजोड केली नाही.
मुख्य म्हणजे हे सारं तो फक्त स्वतःसाठीच करत नव्हता. त्याच्या काळात म्हणजे १९व्या शतकात चित्रकारांना समाजात फार काही मान नव्हता. व्यवहारात त्यांना फार यश मिळत नव्हतं. त्यामुळे ते अत्यंत गरीबीत जगायचे, व्यसनाधिन व्हायचे, निराशेत आयुष्य काढायचे. अनेक गुणी कलाकार अकालीच मरण पावले. गॉघचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला या परिस्थितीची जाणीव होती. तो यावर विचार करत होता.
त्यानं स्वतः कलाक्षेत्रातला व्यवहार जवळून अनुभवला होता. थिओही त्याच वातावरणात होता. त्यामुळे कलाकारांचं दुःख दैन्य दूर करण्यासाठी काही व्यावहारीक उपाय करण्यावर त्याचा भर होता. गॉघची स्वतःची चित्रं विकली जात नसतानाही तो इतर चित्रकारांची चित्रं थिओनं विकावीत म्हणून त्याला सातत्यानं सांगत होता.
कलाकारांची एक संघटना तयार करण्याचाही त्याचा विचार होता. त्यांची एक वेगळी वस्ती असावी असंही त्याला वाटत होतं. या सर्वांतून चित्रकारांची एकी करायची आणि त्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या चित्रांना रास्त किंमत मिळावी यासाठी तो प्रयत्नशील होता. मरेपर्यंत गॉघने या विषयाचा पिच्छा पुरवल्याच्या खुणा त्याच्या पत्रात आढळून येतात. हे केवळ अत्यंत दृढ चारित्र्याचा आणि उमद्या मनाचा माणूसच करू शकतो.
जो स्वतः जातीवंत कलाकार आहे आणि ज्याला कलेविषयी प्रचंड आस्था आहे त्यालाच हे शक्य आहे. गॉघमधे हे सगळे गुण होते. तो त्याच्या कलेनं झपाटलेला होता. त्यामुळे त्यानं स्वतःचा नवा रस्ता शोधून काढला. आपल्या उणीवा त्यानं स्विकारल्या आणि दूर केल्या. आपली शक्ती काय आहे हे त्याला माहित होतं त्यावर विश्वास ठेवला. त्याच्याशी कधी तडजोड केली नाही.
तो उपाशी राहिला पण त्यानं कलेची भूक मात्र भागवली. पैसा ब्रेडवर खर्च करायचा की रंग, ब्रशेस, कॅनवासवर असा प्रश्न जेव्हा जेव्हा त्याच्यासमोर उभा राहिला तेव्हा तेव्हा त्यानं दुसरा पर्याय निवडला. थिओ काही ढीगानं पैसा मिळवत नव्हता. त्याचेही स्वतःचे खर्च होते, आयुष्य होतं. तोही त्रासलेलाच होता. त्याची गॉघला पूर्ण जाणीव होती. यातून त्यांच्यात काही वेळेस वादही झालेत. पण दोन्ही भावांच्या समंजसपणामुळे त्याला कधी वाईट वळण लागलं नाही. गैरसमजाचं मळभ दूर होताच प्रेमाचं उन्हं पुन्हा तळपू लागायचं.
थिओही स्वतः कलासक्त, विचारी, साहित्यकलाप्रेमी होता. त्यानंही चित्रकार व्हावं यासाठी गॉघनं अनेकदा त्याची मनधरणी केली. ते शक्य झालं नाही. तेव्हा थिओनं स्वतः चित्रकलेच्या व्यवहाराला नवं वळण देण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी गॉघ प्रयत्न करत राहिला. कलेच्या व्यवहाराची, चित्रकारांच्या अवस्थेची, सामाजिक अनास्थेची गॉघला पूर्ण जाणीव होती.
समाज, कलेला आणि कलाकारांना समजू शकत नाही हे त्यानं फार आधीच ओळखलं होतं. पण त्याचवेळी येणारा काळ वेगळा असेल याचीही आशा त्याला होती. आपलं काम चांगलं असेल, ते करण्याचा आपला उद्देश शुद्ध असेल तर ते काम आपल्यानंतरही टिकून राहतं याचा त्याला विश्वास होता. त्याच विश्वासाच्या बळावर तो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही काम करत राहिला.
हेही वाचा: ‘बॉम्बे सुपरस्टार’ म्हणजे राजेश खन्नाला दिलेली सलामी
सततची उपासमार, आई-वडलांनी केलेली उपेक्षा, प्रेमातलं अपयश, आणि यांच्या सोबतच त्याच्या चित्रांची होत नसलेली विक्री या गोष्टी गॉघच्या शरीरावर आणि मनावरही प्रचंड आघात करत होते. त्यातूनच त्याला फेफरे येवू लागले. त्याच्या काळात या रोगाची फारशी माहिती नव्हती. त्यावर उपचारही नव्हते. अशांना समाजात वेडा म्हणूनच ओळखलं जायचं आणि त्यांच्याकडून सामाजिक धोका आहे म्हणून त्यांना वेड्यांच्या रुग्णालयात डांबलं जायचं.
गॉघवरही ही पाळी आलीच. पण त्याचं वैशिष्ट्य हे की त्यानं आपल्या या अवस्थेसाठी इतर कोणाला जबाबदार ठरवलं नाही की त्यानं तो खचूनही गेला नाही. उलट त्याच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे त्यानं आपल्या रोगाची शांतपणे चिकित्सा केली. त्याच्यावर उपचार करण्यासाठी कुठे जायचं हे त्यानं स्वतःच ठरवलं. आपल्याला मेंदूचा आजार झाला आहे, आपण वेडे नाही आहोत याची त्याला पूर्ण जाणीव होती. पण आपली परिस्थितीच अशी आहे की यातून वाचण्याची शक्यता फार नाही हेही त्याला माहित होतं. त्यामुळे त्यानं आपला पूर्ण भर चित्रकारीवरच दिला.
त्याच्या शेवटच्या दोन वर्षांच्या काळातच जेव्हा तो शारिरीक आणि मानसिक यातना भोगत होता त्यानं आपलं सर्वोत्कृष्ट काम केलं आहे. मुख्य म्हणजे एखाद्या मानसिक रुग्णाची ही चित्रं आहेत असं चुकूनही वाटत नाही. कारण त्याच्या चित्रांत आहे ती निव्वळ उर्जा, उत्साह, प्रेरणा देणारा त्याचा अत्यंत आवडीचा पिवळा रंग. आत्महत्या करण्याच्या काही मिनिटं आधीही तो याच रंगात चित्र रंगवत होता.
गॉघला जाऊन आता साधारण १३२ वर्ष उलटली आहेत. तो मूळचा हॉलँडचा. चित्रकार. तरीही तो मला माझा आप्त, सखा, जीवलग वाटतो. हा माणूस आपल्या आयुष्यात असता तर किती बरं झालं असतं असं मला कायम वाटतं. तो अर्थात आहेच. त्याच्या चित्रांच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून.
गॉघ उत्तम चित्रकार होताच, पण निखळ माणूसही होता. भाऊ, मित्र, कलाकार, माणूस म्हणून त्याची गुणवत्ता काळाच्या पुढची होती. एक लेखक म्हणूनही तो मला भावतो. एक वाचक म्हणूनही तो आवडतो. आयुष्यात कधीही निराशा आली तर गॉघची ही पत्रं वाचताना वेगळा आधार लाभतो. जगण्याचं बळ मिळतं. आयुष्य कसं समरसून जगावं हे गॉघकडूनच शिकावं.
गॉघनं शब्दांतून त्याचं वास्तविक जगणं रेखाटलं आहे तर चित्रांमधून त्याची स्वप्नं, त्याचे आदर्श, त्याच्या प्रेरणा चितारल्या आहेत.
आत्महत्या केल्यानंतर तो तात्काळ गेला नाही. हॉस्पिटलमधे त्याला भरती करण्यात आलं तेव्हा तो स्वतःच चालत गेला होता. त्यामुळे डॉक्टरांचा गैरसमज झाला की त्याला गंभीर जखम झाली नाही. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. थिओ त्याला भेटायला आला तेव्हा तो आपल्या बिछाण्यावर शांतपणे पाईप ओढत पहुडला होता. पण दुसऱ्याच दिवशी त्याची तब्येत बिघडली, तो कोमात गेला आणि थिओच्या मिठीत असतानाच त्याचा मृत्यु झाला.
सहा महिन्यांनी थिओही आजारपणाने गेला. गॉघशिवाय जगणं त्यालाही अशक्यच झालं असणार. आणखी काही वर्षांनी थिओच्या पत्नीने थिओलाही गॉघच्या समाधीशेजारीच समाधी दिली. मृत्युनंतरही त्यांची ताटातूट होणार नाही याची तिने काळजी घेतली. तिच्यामुळेच गॉघची पत्रं जगासमोर आली आहेत. ही सारी विलक्षण माणसं होती. त्यांच्या त्यांच्या गुणदोषांसहीत ती जगली मेली. पण ती अजरामरही झाली. कारण ती अत्यंत उत्कटपणे आयुष्य जगली.
गॉघच्या जगण्याला त्याच्या मृत्युनंतरच सुरवात झाली असं म्हणता येईल. त्याच्या चित्रांना मान्यता मिळाली, मुख्य म्हणजे किंमतही मिळाली. त्याची कित्येक चित्रं शंभर कोटींपेक्षाही जास्त किंमतीला विकली गेली आहेत. गॉघला हे सारं पाहून आनंद होईल का? होईल पण समाधान होणार नाही. कारण कलेचा जो बाजार मांडण्यात आला आहे त्यामुळे त्याला निराशा जास्त होईल. आपल्या कलेतून आनंद समाधान मिळत असेल तरच आपण योग्य मार्गावर आहोत असं त्याचं मत होतं.
आज कलेतून केवळ पैसा मिळतो. जो त्या कलाकाराला आणि तिच्या कलेलाही शेवटी मारक ठरतो. तुम्ही गॉघ वाचला तरच या गोष्टी तुम्हाला समजू शकतात की एखादा कलाकार आपल्या कलेप्रती किती एकनिष्ठ असू शकतो. आपल्या जगण्यात त्यामुळेच गॉघ असलाच पाहिजे. त्याशिवाय ते अपूर्ण राहिल. माझ्या आयुष्यात तो आहे याचं मला त्यामुळेच नितांत समाधान आहे.
हेही वाचा:
इथे रस्त्यावरच उलगडतात विज्ञानातली रहस्यं
महात्मा गांधी प्रत्येकाला वेगवेगळे उमगतात, त्याची गोष्ट
ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे अक्किथम नेमके आहेत कोण?