वेगन म्हणजे वेजिटेरीअन नाही, त्यापेक्षा बरंच काही

२९ जून २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


वेगन हे फक्त डाएट नाही. वेगनिझम ही एक जीवनशैली आहे. ही जीवनशैली जगभरातल्या अनेक लोकांनी तसंच स्टार्सनी अवलंबलीय. त्यामुळे सगळ्यांनाच त्याबद्दल कुतुहल निर्माण झालंय. आता भारतातही वेगन डाएटचं फॅड आलंय. पण वेगन डाएट करताना आपल्याला नेलपेंट, लिपस्टीकपासून अगदी कंडोमही वापरता येणार नाहीय.

वेगन व्हायचंय किंवा वेगन लाईफस्टाईलने जगायचंय असं आपण हल्ली सर्रास ऐकतो. ऑनलाईन तर आपल्याला वेगवेगळ्या वेगन रेसिपीजचे वीडियोही सापडतात. मध्यंतरी अभिनेत्री आयेशा टाकीयाचा वेगन लाईफस्टाईलवरचा वीडियो युट्युबवर ट्रेडींग झाला होता. आता तर आपल्या आजूबाजूला सहज एखाद वेगन कॅफे किंवा रेस्टॉरंट दिसतं.

वेगन म्हणजे नेमकं काय?

इन शॉर्ट वेगन म्हणजे वेजिटेरीअन. पण ही वेजिटेरीअनमधली म्हणजे शाकाहारातली पुढची पायरी आहे. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की वेगनमधे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत. पण कोणत्याही प्राणी किंवा पक्ष्याचा अंश असलेले पदार्थ वेगन लोक खात नाहीत. तसंच वेगन लाईफस्टाईल आत्मसात करणारे लोक वेनगनीझमबद्दल खूप कट्टर असतात. ते पाणी आणि पक्ष्यांच्या अंशापासून तयार करण्यात आलेल्या वस्तूही वापरत नाहीत.

इंग्लंडमधील काही लोक प्राण्यांचा अंश असलेले पदार्थ, कपडे वापरत नव्हते. ही गोष्ट १८०६ मधे डोनाल्ड वॉटसन यांच्या लक्षात आलं. मग त्यांनीच सगळ्यात पहिल्यांदा १९४४ ला वेगन ही संकल्पना जगासमोर आणली. त्यावेळी फक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ न खाणं म्हणजे वेगन मानलं जायचं. नंतर १९४९ मधे प्राण्यांच्या हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते लेस्ली क्रॉस यांनी वेगनिझम ही संकल्पना मांडली. यात प्राणी किंवा पक्ष्यांपासून बनलेल्या कोणत्याही वस्तू, पदार्थ आणि इतर कोणत्याही स्वरुपात न वापरणं अशी व्याख्या केली.

वॉटसन यांनी १९५० ला इंग्लंडमधे वेगन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. आणि यात वेगन ही फक्त आहारपद्धती नसून जीवनशैली असल्याचं सांगितलं. पुढे त्यांनी जगभरात वेगनिझमचा प्रचार सुरु केला.

हेही वाचा: आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?

वेगन डाएट ट्रेंडमधे

वेगन ही संकल्पना नक्कीच जुनी आहे. पण अचानक वेगन डाएट किंवा वेगनिझम हे ट्रेंडमधे का आलं? संपूर्ण जगात पर्यावरण, आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यावर नेमका उपाय शोधण्यासाठी गेल्या ८ ते १० वर्षांपासून बऱ्याच संकल्पनांवर अभ्यास करताहेत.

त्यामुळे डाएटमधे वेगवेगळे ट्रेंड आल्याचंही आपण पाहिलंय. २०१७ वर्षाच्या शेवटी लंडनमधे वेगन डे, वेगन वीक असे प्रकार आले. तिथल्या आहारतज्ज्ञांनी वेगन डाएट लोकांना देण्यास सुरु केलं. त्यातून वेगन पिझ्झा हा प्रकार सगळ्यात आधी आला. मग २०१८ मधे युरोपातल्या इतर भागांत आणि अमेरिकेत ही गोष्ट पोचली. आणि २०१९ च्या सुरवातीपासूनच संपूर्ण जगात वेगन डाएटच नाही तर वेगन लाईफस्टाईलसुद्धा ट्रेंड होऊ लागलं.

भारतातही वेगन कॅफे, रेस्टॉरंट आपल्याला दिसू लागलेत. वजन घटवण्यासाठी अनेकांनी वेगन डाएट सुरु केलंय. तसंच पाश्चात्य देशातला ट्रेंड बघून अनेकांनी लाईफस्टाईलसुद्धा आत्मसात केलीय. याला अनेक प्राणी बचाव आणि प्राणी कल्याण संघटनांनी समर्थन दिलं.

हेही वाचा: आयोडीनयुक्त मिठामुळे आपण आजारी पडतोय का?

वेगन डाएट म्हणजे सामाजकार्य

आता डाएट तर सगळ्या प्रकारचे असतात. मग वेगन डाएट आपण का करावं? याबद्दल ब्रिटीश डाएटिक असोसिएशन आणि द वेगन सोसायटी यांनी अभ्यास केला. त्यात असं लिहिलं आहे की, वेगनिझम किंवा वेगन डाएट हे कोणत्याही वयात करता येतं. आणि ते आयुष्यभरासाठी सुरु ठेवता येतं. त्याने कोणतंच शारिरीक नुकसान होत नाही. तसंच वजन घटवण्यास, वजन मेनटेंन ठेवण्यास मदत होते. आपली एकूणच लाईफस्टाईल हेल्दी होते.

आपण वेगन झाल्यावर सर्वाधिक भाज्या, फळ, धान्य, कडधान्य खातो. त्यामुळे या पदार्थांची मागणी वाढते आणि शेतकरी वेगवेगळ्या गोष्टी पिकवतात त्यामुळे जमिनीची गुणवत्ता टीकून राहते आणि शेतकऱ्यांना फायदा होतो. तसंच एकप्रकारे आपण प्राण्याचं होणारं शोषण थांबवतो, असा प्रचार या वेगनिझम पंथातल्या लोकांकडून केला जातो.

जे प्राणी खाल्ले जातात त्यांना धष्टपुष्ट करण्यासाठी आणि चांगल्या भावाने विकण्यासाठी त्यांना चांगलं खाद्य द्यावं लागतं. ते खाद्य पिकवण्यासाठी जगातल्या कित्येक लाख एकर जमिनी वापरल्या जातात. याच जमिनीचा वापर जगातलं कुपोषण दूर करण्यासाठी आपण वापरू शकतो, असं वेगन पंथातले लोक सांगतात.

हेही वाचा: हवामान बदल हे मानवजातीच्या अस्तित्वासमोरचं मोठं आव्हान

वेगन डाएट फायद्याचं की तोट्याचं?

वेगन डाएट करणं म्हणजे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेच. पण त्याचबरोबर यात समाजकार्याचाही भाग असल्याचं वेगनिझम स्वीकारणारे लोक सांगतात. वेगन डाएटमुळे आपल्याकडून हेल्दी नाही तर हेल्थियर कोलेस्ट्रॉल खाल्लं जातं. त्यामुळे आजार आपल्यापासून दूर होतात. त्याचबरोबर अमेरिकेतल्या अकॅडमी ऑफ न्युट्रीशिअन अँड डाएटिकने वेगन डाएट आपल्याला कॅन्सर होण्यापासून रोखू शकतं असं लिहिलंय.

जगातले इतर काही आहारतज्ज्ञ म्हणतात की, लोह, कॅल्शिअम, प्रोटीन, झिंक, ब १२ आणि ड जीवनसत्त्व इत्यादींची कमतरता वेगन डाएटमुळे भासू शकते. कारण शाकाहारी जेवणातले दूध आणि दुग्धजन्य पदार्थ टाळल्यास इतर पदार्थांमधे हे घटक अगदी कमी प्रमाणात असतात. त्यामुळे वेगन डाएट नक्की चांगलं की वाईट यावर अजूनही वाद आहे.

हेही वाचा: पावसात भिजावं की नाही?

वेगन व्हायचं असेल तर हे सोडावं लागेल

ट्रेंड म्हणून किंवा आपल्या शरीराला चांगल्या सवयी लावण्याच्या दृष्टीने आपल्यालाही वेगनिझम स्वीकारून एक वेगळा प्रयोग करावासा वाटू शकतो. पण त्यासाठी आपल्याला आपल्या अनेक गोष्टी बदलाव्या लागणार आहेत. त्यात सगळ्यात पहिलं दूध. पण आपण म्हणाल आम्ही दूध कुठे पितो. पण चहा, कॉफी, मिल्कशेक, मेयोनिज हे सगळं बंद म्हणजे बंद करावं लागेल. त्याचबरोबर इतर दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दही, पनीर आणि त्यापासून बनवलेले यम्मी यम्मी पदार्थही सोडावे लागणार.

तसंच मधही सोडावं लागणार. आणि हो साखरही खाता येणार नाही. कारण साखर शुद्ध किंवा चमकदार करण्यासाठी प्राण्यांच्या हाडांचा भाग वापरला जातो. जीवनसत्त्वांच्या कमतरेमुळे खात असलेली औषधं, जिलेटीन कोट असलेल्या गोळ्या, च्विंगम इत्यादी पदार्थ टाळावे लागतील.

आपल्याला लिपस्टीक, नेलपेंट, शॅम्पू, कंडीशनर, परफ्युम, रेझर, प्लॅस्टीक, टुथपेस्ट इत्यादी वस्तू वापरता येणार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंडोम वापरता येणार नाही. कारण प्राण्याच्या चरबीचा वापर हे बनवण्यासाठी केला जातो. पण या सेम वस्तू वेगनमधेही मिळतात. त्या केमिकलपासून बनवलेल्या असतात. त्यामुळे विकत घेताना थोडा वेळ काढावा लागेल. वस्तूच्या पाकिटावरची माहिती वाचून आपण वेगन वस्तू सहज विकत घेऊ शकतो. त्याचबरोबर फोटो पेपर, एलसीडी स्क्रिन, पत्ते, टॅटू, हस्तकलेला वापरला जाणार गम इत्यादी वस्तूंमधेसुद्धा प्राण्यांचे अंश असतात. त्यामुळे टॅटू काढण्यापासून ते इतर सगळ्या वस्तू वापरता येणार नाहीत.

वेगनचं सध्या फॅड असलं तरी जगानं वेगन मानवी शरीराला फायदेशीर असल्याचं सांगितलंय. पण हे डाएट किती यशस्वी होतं हेसुद्धा बघावं लागेल.

हेही वाचा: 

आज रात्री गुड नाईटचा मेसेज पाठवण्याआधी हे वाचा

योग दिवस २१ जूनला साजरा करण्यामागची दोन कारणं