अमेरिकेत भारतीय वंशाच्या सुपर टॅलेंटची चर्चा

१५ सप्टेंबर २०२२

वाचन वेळ : ४ मिनिटं


महासत्ता असलेल्या अमेरिकेत रोजच्या ब्रिफिंगला फार महत्व असतं. अनेक गोष्टी अगदी तोलून-मापून बोलाव्या लागतात. ६ सप्टेंबरला याच ब्रिफिंगची जबाबदारी पहिल्यांदाच एका भारतीय-अमेरिकन वंशाच्या व्यक्तीकडे आली. ही जबाबदारी खुबीने पार पाडणाऱ्या ३३ वर्षांच्या वेदांत पटेल यांचा जन्म गुजरातमधे झालाय. त्यांच्यातल्या व्यावसायिक मूल्य आणि भाषण कौशल्याचं अमेरिकन अधिकारी कौतुक करतायत.

तारीख होती ६ सप्टेंबर २०२२. अमेरिकेचं स्टेट डिपार्टमेंट म्हणजेच आपल्याकडचं परराष्ट्र खातं. या डिपार्टमेंटचं मुख्यालय फॉगी बॉटममधे नेहमीप्रमाणे मीडियाला संबोधित केलं जाणार होतं. अमेरिकेसारख्या महासत्तेचं परराष्ट्र धोरण हे याच माध्यमातून जगभर पोचत असतं. त्यामुळे या रोजच्या ब्रिफिंगला एक वेगळं महत्व असतं. पण इतर दिवसांपेक्षा ६ सप्टेंबर तारीख थोडी वेगळी आणि भारतीयांसाठी खास होती. कारण अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कुणी भारतीय-अमेरिकन वंशाची व्यक्ती मीडियाला संबोधित करणार होती. वेदांत पटेल असं त्या व्यक्तीचं नाव होतं.

बायडेन यांच्या टीममधे एण्ट्री

३३ वर्षांच्या वेदांत यांचा जन्म गुजरातमधे झाला. १९९१ला वेदांत अमेरिकेत आईवडलांसोबत स्थायिक झाले. कॅलिफोर्नियातल्या सॅन जोस इथं त्यांचं बालपण गेलं. त्यांचं सुरवातीचं शिक्षणही याच भागात झालं. अमेरिकेतली प्रतिष्ठित युनिवर्सिटी असलेल्या 'युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया'मधून २००८ला त्यांनी बायोलॉजीमधे आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे २०१७ला फ्लोरिडा युनिवर्सिटीतून एमबीए केलं. अशाप्रकारे त्यांचा शैक्षणिक आलेख चढता राहिलाय.

वेदांत यांच्यात उपजतच भाषण कौशल्य होतं. त्यामुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात एक एक पायरी वर जायची त्यांना संधी मिळाली. त्यांनी सुरवातीला अमेरिकन काँग्रेसच्या खासदार माइक होंडा यांच्याकडे उपसंपर्क संचालक तर भारतीय वंशाच्या खासदार प्रमिला जयपाल यांच्याकडे संपर्क संचालक म्हणून काम केलं. पुढे त्यांच्याकडे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निवडणूक कॅम्पेनमधे काम करण्याची संधीही चालून आली. त्यातूनच बायडेन यांच्या प्राथमिक आणि सार्वत्रिक निवडणुकांचे 'प्रादेशिक संपर्क संचालक' ही नवी जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडीनंतर पुढच्या समारंभासाठी म्हणून एक उद्घाटन समिती नेमली जाते. जो बायडेन यांच्या निवडीनंतर अशीच एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीचं अतिशय महत्वाचं समजलं जाणारं वरिष्ठ प्रवक्तेपद वेदांत पटेल यांच्याकडे देण्यात आलं होतं. पुढे व्हाईट हाऊसमधे सहाय्यक प्रेस सचिव आणि जो बायडेन यांचे प्रवक्ते अशी दुहेरी जबाबदारीही वेदांत यांच्याकडे आली. ती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पारही पाडली.

हेही वाचा: जो बायडन टीमवर ओबामा काळाचा प्रभाव?

सुपर टॅलेंटेड म्हणून गौरव

वेदांत यांचा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या वर्तुळातला वावर वाढतच होता. अमेरिकेचं स्टेट डिपार्टमेंट हे तिथलं एकप्रकारे परराष्ट्र मंत्रालय असतं. जगातल्या घडामोडींचा केंद्रबिंदू असलेल्या अमेरिका आणि एकूण जगाच्या दृष्टीने या खात्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. याच डिपार्टमेंटच्या माध्यमातून दैनंदिन पत्रकार परिषदा घेतल्या जातात. त्यांना संबोधित करायची जबाबदारी व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरीकडे असते. त्यावेळी ही जबाबदारी जेन साकी यांच्याकडे होती.

एप्रिल २०२२ पर्यंत वेदांत पटेल हे जेन साकी यांचे सहाय्यक होते. एप्रिल महिन्यात एकेदिवशी जेन साकी माध्यमांशी बोलत अर्थात ब्रिफिंग करत असताना एक महत्वाची गोष्ट घडली. वेदांत हे जेन साकी यांच्या मागेच उभे होते. त्यावरून तिथं उपस्थित पत्रकारांनी मागे उभी असलेली व्यक्ती कोण असा प्रश्न विचारायला सुरवात केली. त्यावेळी वेदांत यांचा 'सुपर टॅलेंटेड' असा उल्लेख करत जेन साकी यांनी त्यांच्या प्रतिभेचा एकप्रकारे गौरव केला.

एप्रिलमधेच अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटच्या प्रमुख उपप्रवक्ते पदाची धुरा वेदांत पटेल यांच्याकडे आली. ६ सप्टेंबर २०२२ला नवे प्रवक्ते नेड प्राइस रजेवर होते. त्यामुळे अमेरिकन इतिहासात पहिल्यांदाच प्रेस ब्रिफिंगची जबाबदारी भारतीय-अमेरिकन व्यक्तीकडे आली होती. आपल्यासाठी हा गौरवाचा क्षण होता. वेदांत यांनी इंग्लंडच्या नव्या पंतप्रधानांची निवड, रशिया आणि युक्रेन युद्ध, इराण न्यूक्लिअर डिल अशा महत्वाच्या मुद्यावर उपस्थित पत्रकारांना माहिती दिली. कुण्या भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या बाबतीत ही गोष्ट पहिल्यांदाच घडत होती.

भारतीय वंशांच्या व्यक्तींचा बोलबाला

वेदांत यांच्याकडे नवी जबाबदारी आल्यावर व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या टॅलेंटचं कौतुक केलंय. या संदर्भात व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ सहाय्यक संचालक मॅट हिल यांचं त्यांच्या निवडीनंतरचं ट्विट पुरेसं बोलकं आहे. 'जागतिक मंचावर अमेरिकेचं प्रतिनिधित्व करणं ही मोठी जबाबदारी आहे. वेदांत यांच्याकडे असलेली व्यावसायिक मूल्य आणि संवाद कौशल्याच्या जोरावर ते ती पार पाडतील.' असं म्हणत मॅट हिल यांनी वेदांत यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा गौरव केलाय.

व्हाईट हाऊसच्या माजी उपसंपर्क संचालक पिली तोबर यांनीही 'आश्चर्यकारक सुरवात' असल्याचं म्हणत त्यांचं अभिनंदन केलंय. इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं कौतुक केलंय. एकप्रकारे अमेरिकन अधिकाऱ्यांवर छाप पाडण्यात वेदांत यांना यश आलं असंच म्हणता येईल. अवघ्या तिशीत त्यांनी पार पाडलेल्या महत्वाच्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्या याच कामाचा बोलबाला त्यांना सुपर टॅलेंटेड ठरवून गेलाय. ते चांगले लेखकही असल्याचा उल्लेख जेन साकी यांनी केला होता.

जगभरात भारतीय वंशाचे लोक आपल्या टॅलेंटच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण करतायत. अमेरिकेचं उदाहरण घ्यायचं तर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड झाली होती. भारताच्या लेकीची ही निवडही अभिमानास्पद होती. तिकडे इंग्लंडच्या पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतही भारतीय वंशाच्या ऋषी सूनक यांनी कडवी टक्कर दिली. तर आयर्लंडच्या पंतप्रधानपदावर लिओ वराडकर विराजमान आहेत. वराडकर यांचं महाराष्ट्र आणि कोकणशी खास नातं आहे. त्यामुळे जगभर भारतीय वंशांच्या व्यक्तींचा हा बोलबाला असाच कायम रहायला हवा.

हेही वाचा: 

ट्रम्प हरलेत, ट्रम्पवाद अमेरिकेत बोकाळलेला आहेच

चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण

भारतानं आधी आर्थिक युद्धाच्या सीमेवर लढायला हवं!

प्रिय मोदीजी, आम्ही देशाच्या भविष्याबद्दल चिंतेत आहोत