नव्या पिढीतल्या तरुणांनी अनेक स्थित्यंतरं पाहिलीयत. ते डिजिटल क्रांतीची साक्षीदार आहेत. म्हणूनच प्रेमाबद्दलची आपली मतं मोकळेपणाने मांडण्याची हिंमत ते ठेवतात. आपल्या आवडत्या व्यक्तीवर जात, धर्म, लिंगाच्या पलिकडे जाऊन प्रेम करण्याचा मोकळेपणा या पिढीकडे आहे. पण त्यात अडकून पडणं त्यांना मान्य नाही. याचा अर्थ ही पिढी कमिटमेंटला घाबरते असा होत नाही.
‘लव आज कल’ या नावाचा एक सिनेमा गेल्यावर्षी येऊन गेला. त्यात एक डायलॉग होता, ‘सिर्फ एक इन्सान के साथ रहके उसके लिये वो फिलिंग लाना नॅचरल थोडी ना है!’ २०२१ च्या जानेवारीमधेच सामाजिक दरी आणि प्रेम यावर भाष्य करणारा ‘सर’ नावाचा सिनेमा आला होता. त्याची टॅगलाईन होती – ‘इज लव इनफ?’
प्रेम पुरेसं आहे का? असं विचारणारे नव्या पिढीचे हे सिनेमे. नेमकं काय वाटतं आम्हा मिलेनिअलना प्रेमाबद्दल? खरंतर या प्रश्नाचं ठाम उत्तर देता येणं तसं कठीण आहे. पण या पिढीचा प्रेमाबद्दलचा दृष्टिकोन समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे.
त्यासाठी आधी 'मिलेनिअल' म्हणजे नेमकं कोण हे समजून घ्यायला हवं. साधारणपणे १९८१-१९९६ मधे जन्मलेले म्हणजे आज साधारण २५-४० या वयोगटातले ते मिलेनिअल आणि १९९६-२०१२ मधे जन्मलेले म्हणजे आज वय वर्ष ९-२४ मधे असलेली ही पिढी जनरेशन वाय म्हणून ओळखली जाते.
तसं बघितलं तर प्रेमाला वयाचं बंधन नाही. पण थोडे मोठे मिलेनिअल आता प्रेम, लग्न या सगळ्यातून पार होऊन पुढे आलेत. सगळ्यात लहान मिलेनिअल आणि सगळ्यात मोठे 'जनरेशन वाय'चे प्रतिनिधी हे सध्या प्रेम, लग्न याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळं आपण या लेखापुरतं त्यांना या सगळ्यांबद्दल काय वाटतं ते समजून घेऊ.
हेही वाचा: छोट्याशा गावातल्या दिशाचा सतरंगी संघर्ष
या पिढीनं मोठं होताना डिजिटल क्रांती बघितली. सोशल मीडिया हा या पिढीच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणूनच कदाचित 'मोबाईलमुळे फुकट जाणारी पिढी' असं त्यांच्याकडे बघितलं जातं. या पिढीला सगळं आयतं, सहज मिळालंय असंही एक मत आहे. मात्र ते पूर्णपणे खरं नाही.
या पिढीपुढेही बेरोजगारी, ग्लोबल वॉर्मिंग यासारखी आव्हानं आहेत. मानसिक आजाराचं वाढतं प्रमाण या पिढीत दिसून येतंय. किंवा ही पिढी ते मोकळेपणाने मान्य करतेय म्हणून आपल्याला कळतंय, असंही म्हणता येईल.
या पिढीची वैशिष्ट्यही आहेत. जगभरातल्या सामाजिक आणि मानसशास्त्रीय संशोधकांच्या मते ही पिढी आत्मविश्वासू, महत्त्वकांक्षी आहे. नव्या, वेगळ्या गोष्टींना स्वीकारण्याचा मोकळेपणा या पिढीकडे आहे. या पिढीची स्वतःची अशी मतं आहेत. मग ते राजकारण असो, धर्म असो किंवा प्रेम असो. प्रेम हा या पिढीच्याही आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. पण प्रेम, लग्न म्हणजे सगळं आयुष्य नाही हे मिलेनिअलनाच समजायला लागलं. आणि 'जनरेशन वाय'ला तर ते पक्क कळलंय.
सिनेमा हा समाजाचा आरसा असतो असं म्हणतात. तुम्ही काही वर्षांपूर्वीच्या चित्रपटातल्या प्रेमकहाण्या आठवून बघा. ‘एक दुजे के लिये’, 'कयामत से कयामत तक' त्यातल्या मुख्य पात्रांचं शिक्षण, काम यासंदर्भातला कुठलाच ठोस उल्लेख सिनेमात दिसत नाही.
याउलट गेल्या काही वर्षातल्या प्रेमकथा बघा. 'जब वी मेट' मधल्या शाहिदला संगीतात रस होता. 'टू स्टेट्स'मधले हिरो हिरोईन मॅनेजमेंट शिकत होते. 'यह जवानी है दिवानी' मधली दीपिका डॉक्टर होती. हे या पिढीचं प्रतिबिंब आहे. या पिढीला स्वतःची ओळख आहे. त्यांना स्वतःचे छंद आहेत. करिअर आहे. आणि हे सगळंही त्यांच्यासाठी प्रेमाइतकंच महत्त्वाचं आहे.
हेही वाचा: लिंगभेदापलीकडची प्रेमाची वर्च्युअल पायवाट
या संदर्भात या पिढीच्या काही जणांना त्यांचं मत विचारलं. २४ वर्षाची लेक्चरर सानिका म्हणते, ‘प्रेमाची सक्ती होऊ शकत नाही. त्यामुळे प्रेमात नकार स्वीकारायचीही तयारी हवी. 'मुलीचा नकार म्हणजे खरंतर होकार' हा जमाना गेला.’
सीए झालेल्या सुमेशला वाटतं, ‘ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे त्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवणं छानच आहे. पण या निर्णयासाठी पुरेसा वेळ घेतला गेला पाहिजे.’ तर संस्कृत शिकणारी अनुश्री म्हणते की ‘प्रेम म्हणजे फक्त एकमेकांचा सहवास छान वाटणं नाही. एकमेकांबद्दल सन्मान असणंही तितकंच महत्वाचं आहे.’
ही मतं ऐकली की लक्षात येतं की या पिढीलाही प्रेमात रस आहे. त्यांचा त्यावर विश्वास आहे. प्रेम असेल तर आणि तेव्हा ही पिढी जबाबदारी घ्यायला किंवा त्यांच्याच भाषेत 'कमिट' करायला तयार आहे. पण कमिटमेंट केली म्हणून आता प्रेम करायला शिकूया हा फंडा या पिढीला मान्य नाही.
'ओके क्युपिड' नावाचं एक डेटिंग अॅप आहे. त्यांनी २०१९ मधे भारतातल्या तरुणांमधे प्रेम या संकल्पनेबद्दल काय मतमतांतरं आहेत हे जाणून घेण्यासाठी एक सर्वे केला. त्यात आढळून आलं की, या पिढीतले ६७ टक्के तरुण आणि ८६ टक्के तरुणी या शारीरिक जवळीकीपेक्षा भावनिक जवळीकीला प्राधान्य देतात. म्हणजेच ‘ही पिढी खूप उथळ आहे’ किंवा ‘यांच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त शरीर संबंध’ अशी जी मतं ऐकू येतात त्यात फार काही तथ्य दिसत नाही.
या सर्वेक्षणात अजून एक गोष्ट समोर आली की, ७२ टक्के तरुण-तरुणी पारंपरिक आणि साचेबद्ध स्त्री पुरुष भूमिकांना पाठिंबा देत नाहीत. नात्यात पुरुषाने कमवावं आणि बाईनं घर सांभाळावं हे या पिढीला पटत नाही. लग्नाबद्दल मात्र ही पिढी फारशी उत्सुक दिसत नाही. या सर्वेनुसार ६८ टक्के तरुण-तरुणींना लग्न केलंच पाहिजे, असं वाटतं नाही.
याबरोबरच मिंट, यू गव्ह नावाच्या एक संशोधन संस्थेनं केलेल्या एका सर्वेतही लग्न कराण्याची आणि मुलं होऊ देण्याची इच्छा असणाऱ्यांमधे घट झाल्याचं दिसून आलंय. मिलेनिअलमधे ६५ टक्के असलेलं हे प्रमाण मिलेनिअलच्या पुढच्या पिढीत ५७ टक्के वर आल्याचं दिसून आलं. याचाच अर्थ प्रेम असणं आणि लग्न करणं या नव्या पिढीसाठी दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
हेही वाचा: ‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम
शेवटी प्रेम ही एक भावना आहे. पिढी बदलली तरी प्रेम वाटणं काही बदलत नाही. पण पिढीनुसार त्याबद्दलचे सामाजिक, वर्तनविषयक, आर्थिक, कौटुंबिक संदर्भ मात्र बदलत जातात. ही पिढी विचारी आहे, स्वतःची मतं मांडण्यासाठी लागणारा आत्मविश्वासही त्यांच्याकडे आहे आणि सोशल मीडियासारखं व्यासपीठही आहे. त्यामुळे त्यांची मतं सर्वांसमोर येत राहतात.
आपल्या आवडत्या व्यक्तीवर, अगदी समलिंगीसुद्धा, प्रेम करण्याचा मोकळेपणा या पिढीकडे आहे. पण त्यात अडकून पडणं त्यांना मान्य नाही. आपण वर्षानुवर्ष प्रेम केलं की पुढे जाऊन लग्न करायचं हेच ऐकत आलोय. त्याबरोबर त्यात येणाऱ्या अडचणीसुद्धा. आईवडलांचा विरोध, प्रेमात धोका वगैरे अशाच असतात असं सगळं बघत आलोय.
पण मिलेनिअल या आधीच्या पिढ्यांपेक्षा थोडे वेगळे आहेत. प्रेम आहे म्हणून लग्न केलंच पाहिजे असं आम्हाला आणि आमच्या पुढच्या पिढीला वाटत नाही. याचा अर्थ ही पिढी कमिटमेंटला घाबरते असा होत नाही. उलट ही पिढी प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारून ती व्यवस्था तपासून बघतेय.
आईवडलांचा विरोध होता म्हणून टिकलं नाही ते प्रेम ‘उदात्त’ आणि त्या दोघांमधे वाद होते म्हणून किंवा ‘त्या दोघांच्या आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा वेगळ्या होत्या’ म्हणून ते वेगळे झाले तर त्यांचं प्रेम ‘कमी प्रतीचं’ असे शिक्के मारायचं काही कारण नाही.
प्रेम ही इतकी नैसर्गिक आणि आदिम भावना आहे की ती कायम राहणारच. या पिढीसोबत तिच्या व्यक्त व्हायच्या पद्धती, तिचे सामाजिक संदर्भही बदलतायत. विकसित होतायत. हे चांगलंच आहे.
प्रेमाबद्दलचा गालिबचा एक खूपच प्रसिद्ध शेर आहे.
‘यह इश्क नहीं आसां, बस इतना समझ लीजिये
एक आग का दरिया है, और डूब के जाना है!’
हा शेर प्रेम करणाऱ्यांइतकाच 'प्रेम' या संकल्पेनालाही लागू होतो. पिढ्यानपिढ्या चाललेला हा प्रवास इतका सोपा नाहीय. परिस्थिती बदलतेय तर बदलू दे! प्रेम या संकल्पनेचाही कस लागू दे!
हेही वाचा:
लवमंत्रः मुलीने दिलेला प्रेमाचा नकार मुलानं कसा पचवावा?
कुणाला फासावर न चढवताही प्रेमाशी संबंधित गुन्हे रोखता येतात!
एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय हवं बरं, सांगता येईल तुम्हाला?
(लेखक मानसोपचारतज्ञ असून पुढारीच्या बहार पुरवणीमधून हा लेख घेण्यात आलाय)