वॅलेंटाईन स्पेशल: थोडा हैं, थोडे की जरूरत हैं!

१४ फेब्रुवारी २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज वॅलेंटाईन डे. काळ बदलला तसं प्रेमही बदललं. ते व्यक्त करण्याची साधनं बदलली म्हणून त्याची भाषाही बदलली. प्रेमाची समज, त्याचे आविष्कार, प्रेमातले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आजच्या पिढीकडे जास्त आहे. इंटरनेटनं एक मोठा कॅनवास त्यांच्यासमोर उपलब्ध केलाय. जगभरातलं चांगलं आणि वाईट दोन्ही त्यांच्यासमोर सतत येत असतं. ते मिळवणं, समजून घेणं आजच्या युवा पिढीसाठी फार सोपं आहे.

प्रेमात पडणाऱ्या, पडू पाहणाऱ्या, प्रेम म्हणजे काय समजून घेणाऱ्या आणि त्याचवेळी ते पूर्णपणे उमगलेल्या, मुख्य म्हणजे प्रेमाची वाट पाहणाऱ्या आणि ते समोर दिसलं की बिथरून जाणाऱ्या आजच्या पिढीवर होणारा सगळ्यात मोठा आरोप म्हणजे ‘आजच्या पिढीचं प्रेम म्हणजे नुसता नंगा नाच!’ या पिढीत प्रेम कमी आणि शारीरिक आकर्षण जास्त आहे हे मोठ्या माणसांनी त्यांच्यासकट आम्हा तरूणांच्याही मनावर कोरलेलं वाक्य आहे.

नुसतं आंगचटीला जाऊन एकमेकांशी बोलणं म्हणजे प्रेम नाही आणि प्रेमात किंवा लग्नात तडजोडी या कराव्याच लागतात हे दोन सल्ले आम्हाला सगळ्यात जास्त मिळालेत. आत्ताची मुलं आयुष्यभराचं वचन द्यायला घाबरतात, कुणालाही आय लव यू म्हणतात, जबाबदारी घेत नाहीत, कुटुंबापेक्षा, प्रेमापेक्षा करिअरला जास्त महत्त्व देतात अशा अनेक टोमण्यांना आमच्याकडे काही उत्तरं नसतात.

आमच्या पिढीचं प्रेम सरसच!

पहिलं स्वतःत आणि मग मोबाईलमधे रममाण असणारी ही आजची तरुण पिढी अगदी झोकून देऊन प्रेम करायची क्षमता गमावतेय हे सरसकट बोललं जातं. मोबाईलच्या स्क्रिनवर स्वाईप लेफ्ट आणि स्वाईप राईट करत प्रेमाचा शोध घेणाऱ्या आम्हालाही अनेकदा आमच्या प्रेमाविषयी खात्री वाटत नाही. पण तरीही तरुणांवर आरोप करणाऱ्यांनाही इर्षा वाटावी अशी एक भावना त्यांनी अगदी सहज मिळवलीय हे कुणीही मान्य करेल.

आधीच्या कोणत्याही पिढीकडे अजिबात नव्हता तो नात्यातला मोकळेपणा आजच्या तरुणांकडे अगदी मुबलक प्रमाणात आहे. पोरंपोरी एकत्र कॉलेजला जातात, एका बेंचवर शेजारी बसतात, अभ्यास करतात, गप्पा मारतात, पार्टी करतात, जोक झाल्यावर एकमेकांच्या हातावर टाळ्या देऊन खळखळून हसतात. या वागण्यात कुठलंही अवघडलेपण नसतं. सहजता असते.

मुलीनं सेल्फी काढायला विचारलं तर ती पटली असा विचार आमची मुलंही करत नाहीत. उलट, एकमेकांविषयीचा आकर्षणाचा अंश अतिशय कमी असतो. असला तरी तो कसा हाताळायचा हेही आम्हाला कळतं. निखळ मैत्री वगैरे असतेच. पण मैत्री कुठे संपते, आकर्षण कुठे सुरू होतं आणि प्रेमात कधी पडतो हे आमच्या पिढीला आधीच्या कोणत्याही पिढीपेक्षा जास्त चांगलंच कळतं.

हेही वाचाः छोट्याशा गावातल्या दिशाचा सतरंगी संघर्ष

एकाच स्पर्शात अनेक अर्थ

स्पर्शाची भाषाही या पिढीला कुणीही न शिकवता कळालेली आहे. सेल्फी काढताना खांद्यावर हात ठेवला तरी त्याचा भलता अर्थ आम्ही घेत नाही. वाईट स्पर्श कोणता आणि हवाहवासा चांगला स्पर्श कोणता यासाठी शाळेत गुड टच बॅड टचचे धडेही आम्ही गिरवलेले नाहीत. त्यामुळेच कोणत्याही स्पर्शाचं लैंगिक किंवा अलैंगिक असं सरळसोट वर्गीकरणही या पिढीनं केलेलं नाही.

स्पर्शातनं भावभावना समजून घेणारी आम्ही मुलं आहोत. एकाच स्पर्शात अनेक अर्थ असतात, जिव्हाळा असतो, काळजी असतो, आधार असतो. हे सगळे अर्थ आम्हाला समजून घेता येतात. अनेकदा त्यात गोंधळ उडतो हे खरंच. एका स्पर्शाचा दुसराच अर्थ घेतला जातो अशा वेळी काय करायचं हे काही या पिढीला उलगडलेलं नाही हे मान्यच.

प्रेमाची पहिली पायरी

आयुष्याच्या गाडीचं स्टेअरिंग आत्ताच्या पिढीनं स्वतःच्या हाती घेतलंय. त्यात शेजारी कोण बसणार हे ठरवण्याची परवानगी ते कुणालाही देत नाहीत. अगदी, आईवडलांनाही नाही.डेटिंग ऍपच्या कल्चरनं प्रेमात पडण्यासाठीची एक नवी प्रक्रिया त्यांच्या पदरात टाकलीय. डेटिंग या प्रक्रियेतली पहिली पायरी.

शाळा, कॉलेज, नोकरी, शेजारपाजार, मंदिरं, मस्जिदी, मॉल, थिएटर या सगळ्या खऱ्याखुऱ्या जगासोबतच ऍपच्या वर्चुअल जगातही आम्ही आमच्यासाठी ‘डेट’ म्हणजे एखादा पार्टनर शोधतो. त्याच्याशी हितगुज करत आमचे गोड गुलाबी दिवस जातात. तिथं जमलं तर रिलेशनशिप, जमलं तर लिव इन, वाटलं तर लग्न. लग्नासाठी प्रेम नसतं. असलंच तर प्रेमासाठी असतं.

ऑनलाईन असू दे नाहीतर ऑफलाइन प्रेमाच्या सुरवातीला सगळं काही एक्सप्लोर करून पहायची आमच्यातल्या अनेकांची तयारी असते. वय, धर्म, जात अगदी शारीरिक व्यंगही अनेकदा या अनुभव घेण्याच्या मधे येत नाही. रिलेशनशीप किंवा लग्नासाठीची प्राधान्य वेगळी असली तरी अगदी मानसिक आजारही आमच्या डेटिंगच्या मधे येत नाही. पहिल्या पायरीवर सगळ्या जगाला एंट्री असतेच. या पहिल्या पायरीपासूनच नात्यात समताही असते.

हेही वाचाः खलील जिब्रान : प्रेमाची देववाणी सांगणारा प्रॉफेट!

मनाचे संबंध जुळवण्याकडे कल

प्रेमाच्या नात्यात फक्त प्रेम असून चालत नाही, हे या पिढीला चांगलंच उमगलंय. म्हणूनच प्रेमात पडल्यावरही लग्नाचा विचार करताना मूलं, कुटुंब, पैसा, राजकीय विचार, सामाजिक मतं, पैशाचं नियोजन, सेविंगची सोय, लाइफस्टाइल अगदी ‘जे1 झालं का?’ पासून ते आकाशातल्या ग्रह ताऱ्यांवरही चर्चा केल्या जातात. पत्रिकेतल्या ग्रह ताऱ्यांना आमच्या लेखी महत्त्व नसतंच. पत्रिकेतले गुण जुळले, न जुळले तरी मनाचे गुण जुळतायत की नाही हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं.

ओके क्युपिड या डेटिंग ऍपनं २०२१ मधे एक सर्वे केला होता. लॉकडाऊनमधे प्रत्यक्ष भेटीगाठी कमी झालेल्या असल्या तरी ‘तुम्ही लैंगिक संबंध आणि प्रेम यामधल्या कशाला प्राधान्य द्याल?’ असं विचारलं तर ६६ टक्के पुरुषांनी आणि ८६ टक्के मुलींनी प्रेमाच्या बाजुनं उत्तर दिलं. याचा अर्थ शारीरिक संबंध नसतातच असा अजिबात नाही. पण शारीरिक संबंधांच्या आधी मनाचे संबंध जुळवायला आमचा जास्त कल असतो.

अर्थात, लग्नाआधी सेक्स करण्यात आम्हाला काही विशेष वाटत नाही. सेक्सला नैतिकतेच्या चौकटीतून बाहेर काढून पाहण्याची कुवत या पिढीतल्या तरुणांकडे आहे. त्यामुळेच आकर्षण त्यांना चुकीचं वाटत नाही. महत्त्वाचं वाटतं. फ्लर्टिंग करून ते व्यक्त करणंही त्यांना तितकच चांगलं जमतं.

आकर्षण अनेक भावनांचं मिश्रण

आकर्षण ही त्यांच्या नात्याची सुरवात असते. फक्त सुरवात. पुढं एकत्र बोलणं, भेटणं, काम करणं, मतं, भूमिका समजून घेणं, स्वप्न पाहणं, आयुष्याचं नियोजन, आवडी निवडी असा सगळा लेखाजोखा पाहूनच नातं आणखी रूजतं. अनेकदा बिघडतं. या बिघडण्याकडेही आम्ही वाईट गोष्ट म्हणून पहात नाही. ब्रेकअप आम्हाला पचवता येतो. एकाची जगण्याची पद्धत, मूल्य, विचार वेगवेगळे असतील किंवा एकमेकांच्या अगदी विरोधी असतील तर फक्त आकर्षणावर निभावून नेण्याचा प्रयत्न आमची पिढी करत नाही, हे चांगलंच म्हणायला हवं, नाही का?

एखाद्यावर प्रेम करणं म्हणजे एकचएक भावना असत नाही, हे आम्हाला माहिती आहे. प्रेमात आकर्षणासोबतच विश्वास, काळजी, आधार, पारदर्शकता, स्पेस, समजूतदारपणा, मोकळीकता अशा अनेक भावनांचं मिश्रण असतं हा या पिढीनं आपल्याला दिलेला धडा आहे. असा प्रेमाचा पुष्पगुच्छ, साध्या  मराठीत बुके, तरुण मुलंमुली एकमेकांना देत असतात. यातल्या काही किंवा थोड्या भावना ज्या ज्या व्यक्तीविषयी वाटतात त्यांच्याविषयी लैंगिक आकर्षण वाटो न वाटो आम्ही त्यांना ‘आय लव यू’ म्हणतो.

हेही वाचाः ‘वाकड्या तिकड्या’ लोकांचं प्रेम

प्रेमालाही ग्रे शेड्स

आधीच्या कोणत्याही पिढीपेक्षा प्रेमाची समज, त्याचे अविष्कार, प्रेमातले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य या पिढीकडे जास्त आहे. इंटरनेटनं एक मोठा कॅनवास त्यांच्यासमोर उपलब्ध केलाय. जगभरातलं चांगलं आणि वाईट दोन्ही त्यांच्यासमोर येत सतत असतं. ते मिळवणं, समजून घेणं त्यांच्यासाठी फार सोपं आहे. तसंच त्यातलं चांगलंच निवडण्याची अक्कलही त्यांच्याकडे बऱ्यापैकी आहे. पण म्हणून सगळं आदर्शवादी आहे, असं ही पिढी स्वतःही समजत नाही.

आत्ताची पिढी सगळं तपासून, अनुभव घेऊन मगच जोडीदार निवडते. लोक काय म्हणतीलचा विचार करून आधीच्या पिढ्यांसारखी हिंसा, फसवणूक आणि बेजबाबदारपणाही पोटात घालण्याच्या तडजोडी आम्ही करत नाही, हे खरंच आहे. प्रेमातले ग्रे शेड्स आम्हाला सहनच होत नाहीत. हीच आमच्या प्रेमाची सकारात्मक बाजू आहे आणि नकारात्मक बाजूही तीच आहे.

जमत नसेल, पटत नसेल तर तोडता येतं हे आम्हाला माहितीय. म्हणूनच आम्ही जमवून घेण्याचा प्रयत्नच करणं थांबवलंय. नात्यातली ग्रे शेड कधीतरी जाते, आकाश पुन्हा मोकळं, निरभ्र होतं हे आमच्यातल्या अनेकांना कळत नाही. ग्रे शेड घालवण्यासाठी काही प्रयत्न करण्याची, संवाद सुरू करण्याची आमची तयारीही नाही.

आमची अशीही शोकांतिका

तिकडून मेसेज पाठवला की इकडून दोन मिनिटांत रिप्लाय देण्याची सोय असणाऱ्या वॉट्सअपनं आमचे पेशन्स कमी केलेत. ऑनलाईन फोटो टाकला तरी त्यातून आम्हाला ताबडतोब मिळणारा आनंद हवा असतो. हा आनंद लगेचच मिळत असला तरी क्षणिक असतो हे आम्हाला उलगडतच नाही.

सोशल मीडिया वापरणारे आम्ही ‘सामाजिक प्राणी आहोत.’ एकाच माणसाशी तास न् तास गप्पा मारत बसण्यापेक्षा प्रत्येक तासाला नवा माणूस असेल तर जास्त कूल वाटतं. एकाच माणसानं सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात अशी आमची अपेक्षा असते. आमच्या जोडीदारानं सगळ्या गोष्टीत चांगलं असायला हवंय. पण जोडीदारातली एकच सगळ्यात चांगलं बघायला आम्ही तयार नाहीय एवढीच आमची शोकांतिका आहे.

हेही वाचाः 

तुमचं आमचं सेमच असतं

समलैंगितकेलाही आपलंसं करणारं प्लेटोनिक लव

‘हो, मी गे पॉर्न स्टार आहे, आणि मला त्याचा गर्व वाटतो!’

आपण स्वतःवर प्रेम करायला कधी आणि कसं शिकणार?

लवमंत्रः मुलीने दिलेला प्रेमाचा नकार मुलानं कसा पचवावा?

एखाद्या प्रेमाच्या नात्यात काय काय हवं बरं, सांगता येईल तुम्हाला?