वर्षभरापूर्वी गाजलेल्या ‘यूपी में का बा’ या भोजपुरी लोकगीताचा दुसरा भाग गेल्या आठवड्यातच यूट्यूबवर रिलीज झालाय. नेहा सिंग राठोड या सुप्रसिद्ध लोकगायिकेने गायलेलं हे गाणं तिच्या पहिल्या गाण्यासारखाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवतंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गलथान कारभारावर बोट ठेवणारं हे गाणं आता योगी सरकारच्या डोळ्यात चांगलंच खुपू लागलंय.
‘बाबा के दरबार बा, खत्तम रोजगार बा, हाथरस के निर्णय जोहत लइकी के परिवार बा, कोरोना से लाखन मर गइलन, लाशन से गंगा भर गइलें, टिकठी और कफन नोचत कुकुर और बिलाड़ बा, मंत्री के बेटवा बड़ी रंगदार बा, किसानन के छाती पर रौगत मोटर कार बा, एक चौकीदार, बोलो के जिम्मेदार बा..’
गेल्यावर्षी आलेल्या ‘यूपी में का बा’ या वायरल भोजपुरी लोकगीताचे हे बोल. योगी सरकारच्या मनमर्जी आणि बेजबाबदार कारभाराच्या चिंधड्या उडवणारं हे लोकगीत गाणारी नेहा सिंग राठोड आता योगी सरकारच्या निशाण्यावर आलीय.
याला कारण आहे आठवड्याभरापूर्वी रिलीज झालेलं ‘यूपी में का बा - सीजन २’ हे तिचं नवं गाणं. कानपूर देहात जिल्ह्यातल्या मरौळी गावात जालेल्या जळीतकांडावर हे गाणं भाष्य करतंय. त्यामुळे हे गाणं समाजाच्या भावना दुखावणारं असल्याचं कारण देत योगी सरकारने तिला नोटीस पाठवलीय.
नेहा सिंग राठोड मूळची बिहारच्या कैमुरची. विज्ञान शाखेतल्या उच्चशिक्षणासाठी कानपूर युनिवर्सिटीला आलेल्या नेहाला शिक्षणात फारसा रसच उरला नव्हता. घरच्यांनी बीएड करायचा सल्ला दिला पण त्या बिनपगारी गर्दीचा भाग होणंही नेहाला पटत नव्हतं.
त्यामुळे घरच्यांशी भांडून ती कोलकात्याला संगीत शिकायला गेली. पण तिथलं शास्त्रीय संगीताचं वातावरण तिला विनोदी वाटू लागलं. काही महिन्यातच तिने कोलकात्याला रामराम ठोकला आणि आपल्या गावी परत आली. गावातून तिच्या घराकडे जाणारा रस्ता हा गावासाठी अघोषित हागणदारीचा रस्ता होता. कसाबसा दुर्गंध सहन करत घरी पोचलेल्या नेहाने तोवर राज्यात ठिकठिकाणी ‘स्वच्छ भारत योजने’चा प्रचार पाहिलाच होता.
पण गावातल्या विरोधाभासाने तिच्यातली लोकगायिका जागी केली आणि तिने पहिलं गाणं बनवलं. ‘सौचालय बनाई दो पिया ना’ हे तिचं पहिलं गाणं फेसबुकवर रातोरात हिट झालं. त्यानंतर तिने बरीच गाणी लिहली, ज्यात बेरोजगारी, महागाई असे सामान्य जनतेचे प्रश्न होते.
हेही वाचा: शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास फक्त गायला नाही तर घडवलायही
२०२०च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना तिचं ‘बिहार में का बा’ हे लोकगीत बरंच वायरल झालं. यात घराणेशाही, भ्रष्टाचार, विकास, स्थलांतर अशा मुद्द्यांवरून राज्य सरकारला धारेवर धरण्यात आलं होतं. ‘बिहार में का बा’ हे गाणं रिलीज होण्यापूर्वी बिहारची अस्मिता मिरवणाऱ्या अभिनेता मनोज वाजपेयीने ‘बंबई में का बा’ हे रॅप गायलं होतं.
टी-सिरीजच्या बॅनरखाली रिलीज झालेलं हे गाणं मुंबईतल्या बिहारी स्थलांतरितांची वेदना मांडत होतं. या गाण्याचा बहुतांश भाग हा बिहारचं गुणगान गाण्यात आणि मुंबईतल्या गरिबीला नावं ठेवण्यातच वाया गेला होता. नेहाने मात्र याच धर्तीवर ‘बिहार में का बा’ बनवत राज्य सरकारला जाब विचारला.
बिहारमधून स्थानिक मजुरांचं होणारं पलायन, स्थलांतरानंतर त्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक आणि बेरोजगारीबद्दल जाब विचारल्यानंतर स्थानिक तरुणाईवर फिरणारा सरकारी दंडुकेशाहीचा बडगा हे सगळे विषय या गाण्याच्या केंद्रस्थानी होते.
२०२२च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भोजपुरी सिनेकलाकार आणि खासदार रवी किशन यांनी ‘यूपी में सब बा’ हे गाणं बनवलं होतं. या गाण्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमधे केलेल्या विकासाचं कोडकौतुक केलं होतं. गाणं रिलीज होऊन एक दिवसही उलटत नाही तोच नेहाने ‘यूपी में का बा’ हे नवं गाणं यूट्यूबवर रिलीज केलं.
या गाण्याने योगी सरकारच्या विकासकामाच्या प्रचारांचा फुगाच फोडला. योगींची एकाधिकारशाही, बेरोजगारी, हाथरस दलित अत्याचार प्रकरण, कोरोनातली अनागोंदी, लखीमपूर हिंसाचार प्रकरण अशा योगी सरकारच्या अनेक कृष्णकृत्यांचा पाढाच या गाण्यात वाचला गेला होता. एकीकडे ७५ टक्क्यांहून अधिक भोजपुरी सिनेसृष्टी योगींच्या प्रचारात गुंग असताना नेहाने या गाण्याच्या निमिताने आपला कणा ताठ असल्याचं दाखवून दिलं होतं.
हेही वाचा: पेशवाईच्या स्वैराचाराला 'फटका'वणारा तमासगीर कीर्तनकार
गेल्याच आठवड्यात नेहाने या गाण्याचा दुसरा सीझनही यूट्यूबवर टाकलाय. यावेळी हे गाणं टाकण्याचं कारण म्हणजे १३ फेब्रुवारीला घडलेलं ‘कानपूर देहात’ प्रकरण. गेल्या काही महिन्यांपासून योगी सरकार गुन्हेगारांना अद्दल घडवण्यासाठी ‘मिशन बुलडोझर’ राबवतंय. न्यायालयाचा आदेश, तपास आणि चौकशी प्रक्रियेला फाट्यावर मारून तडकाफडकी निर्णय देत आरोपींच्या घरावर सरकारकडून बुलडोझर चालवला जातोय.
सुरवातीला सोयीस्करपणे फक्त मुसलमान वस्त्यांना आपलं लक्ष्य बनवणारे हे सरकारी बुलडोझर आता बेलगाम झालेत. कानपूर देहात जिल्ह्यातल्या मरौली गावात १३ फेब्रुवारीला सरकारी बुलडोझरचा हाच नंगानाच पाहायला मिळाला. गावातल्या एका सरकारी जमिनीवर दीक्षित परिवाराने ताबा मिळवल्याची तक्रार काही गावकऱ्यांनी केली होती. हा दीक्षित परिवार एक झोपडी बांधून त्या ठिकाणी राहत होता.
१३ फेब्रुवारीच्या संध्याकाळी जिल्हा दंडाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी ती झोपडी पाडायला आले. दीक्षित परिवार त्या पाडावाला विरोध करत असताना अचानक झोपडीने पोट घेतला आणि दीक्षित परिवारातल्या प्रमिला आणि नेहा या मायलेकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. नेहाने बनवलेलं ‘यूपी में का बा - सीझन २’ हे गाणं याच प्रकरणावर आणि बुलडोझर बाबाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करतं.
बाबा के डी एम तो बड़ी रंगबाज बा
कानपुर देहात में ले आइल रामराज बा
बुल्डोजर से रौंदत दीक्षित के घरवा आज बा
अरे ए ही बुल्डोजरवा पे बाबा के नाज बा
का बा? यूपी में का बा?
योगींना ‘मिशन बुलडोजर’वर गर्व आहे. त्यांना लाडाने ‘बुलडोझर बाबा’ही म्हणतात. मुसलमानांची घरं जमीनदोस्त करणारा हा बुलडोझर योगींच्या भक्तांना रामराज्याची निशाणी वाटतो. आता याच बुलडोझरने ब्राम्हण कुटुंबाचं घर तुडवलंय. महिलांच्या सुरक्षेची हमी देतादेता दोन बळी घेतलेत. त्यामुळे नेहा विचारत असलेला ‘हेच का योगींचं रामराज्य’ हा प्रश्न फक्त सरकारच नाही तर मतदारांसाठीही तेवढाच महत्त्वाचा आहे.
नेहा स्वतःचा उल्लेख ‘लोकगायिका’ असाच करते. तिला या पदवीचा असलेला अभिमान ती तिच्या गाण्यांमधूनही दाखवत असते. कारण लोकगीतं ही फक्त भाषिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक अस्मितेमागे धावणाऱ्या लोकांचीच नसतात, तर महागाई, बेरोजगारीने त्रस्त असलेल्या सामान्य लोकांचीही असतात असं तिचं ठाम मत आहे. त्यामुळेच नेहाची गाणी अधिक लोकप्रिय ठरतात.
महागाई, बेरोजगारीच्या बरोबरीनेच नेहाने भोजपुरी संस्कृतीचं नवं रूप मुख्य प्रवाहात आणण्याचा विडा उचललाय. अश्लील आणि द्विअर्थी गाणी ही भोजपुरी संगीतविश्वाची संकुचित ओळख ती बदलू पाहतेय. नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळी गाणी गाणं ही तिची खासियत आहे. त्याने भोजपुरी संगीतविश्वात होणारे बदल सध्यातरी अगदीच लहान वाटत असले तरी ते क्रांतिकारी आणि आश्वासक आहेत.
याचंच एक उदाहरण म्हणजे तिने कोरोना काळात गायलेलं सोहर. सोहर म्हणजे पाळणागीत. सामान्यतः हे मुलांसाठी गायलं जातं. पण नेहाने एका मुलीसाठी ते गायलं. कोरोनामधे सरकारी नाकर्तेपणामुळे एका महिलेला रस्त्यावरच प्रसूत व्हावं लागलं. तिने जन्म दिलेल्या मुलीसाठी नेहाने जे सोहर गायलं ते पिडीतेच्या वेदनेबरोबरच आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या गलथान कारभारावरही बोट ठेवतं.
‘यूपी में का बा - सीझन २’ या नव्या गाण्यामुळे पुन्हा एकदा योगी सरकारचा रोख तिच्याकडे वळलाय. मध्यंतरी नेहा ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाल्याने योगींच्या हातातलं बाहुलं बनलेली भोजपुरी सिनेसृष्टी तिच्यावर आगपाखड करतेय. दुसरीकडे, अखिलेश यादवांसारख्या राजकारण्यांनी तिला पाठींबा दर्शवलाय. सध्या ती राजकारणात जायला उत्सुक नसली तरी, समाजाचे प्रश्न मांडणारी तिची लोकगीतं मात्र भविष्यातल्या राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहेत, असं दिसतंय.
हेही वाचा:
प्रा. यशवंत सुमंत: कृतिशील समन्वयी विचारवंत
विचारवंतांचं लेटर वॉर हे लोकशाहीचं विदारक वास्तव
शंकर भाऊ साठे : १६ पुस्तकं लिहणारे अण्णाभाऊंचे भाऊ
सगळ्या उत्सवी वातावरणामधे अण्णा भाऊ समजून घेणं राहू नये!
जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचलं असतं पण?