उर्मिला मातोंडकरसाठी उत्तर मुंबईचा गड अवघडच

२९ मार्च २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतून काँग्रेसची उमेदवार बनलीय. तिची लोकप्रियता पाहता ती जिंकेल असं बाहेरून पाहिल्यावर कुणालाही वाटेल. पण भाजपच्या या बालेकिल्ल्यांने पाचच वर्षांपूर्वी गोपाळ शेट्टींना नरेंद्र मोदींपेक्षाही जास्त आघाडी दिली होती. तिथे असं ऐनवेळेस येऊन लढत देणं हे फारच कठीण आव्हान आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर अखेर उमेदवार बनली. बोरिवलीतून तिचा प्रचारही सुरू झालाय. तिची लढत महाराष्ट्रातल्याच नाही, तर सबंध देशातल्या सर्वात तगड्या उमेदवारांपैकी एक असणाऱ्या गोपाळ शेट्टींशी आहे. गोपाळ शेट्टींना हरवणं अशक्य असल्याचा दावा भाजपवाले करत असले तरी गोविंदाने याच मतदारसंघातून २००४च्या निवडणुकीत राम नाईकांना हरवून चमत्कार घडवला होता.

मोदींपेक्षा जास्त लीड देणारा मतदारसंघ

२०१४च्या निवडणुकीत गोपाळ शेट्टींनी तेव्हाचे खासदार काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांचा दणदणीत पराभव केला होता. एकूण मतांपैकी तब्बल ७० टक्के मतं शेट्टींना मिळाली होती. साक्षात नरेंद्र मोदींचं वाराणसीतलं मताधिक्य पावणेचार लाखांच्या जवळ होतं. तर गोपाळ शेट्टींची लीड होती ४,४६,५८२. अशा उमेदवाराची लीड तोडणं हे फारच कठीण आव्हान आहे.

हेही वाचाः इलेक्शनची गेल्यावेळसारखी हवा यंदा कुठाय?

गोपाळ शेट्टींना जिंकवण्यासाठी भाजपचे या मतदारसंघातले २४ नगरसेवकच पुरेसे आहेत. शिवाय सहापैकी विनोद तावडे, अतुल भातखळकर, योगेश सागर आणि मनिषा चौधरी हे चार आमदार भाजपचे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले हे चौघेही मागे राहण्याची शक्यता कमीच. शिक्षणमंत्री विनोद तावडे बोरिवली मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आलेत. शेट्टी लोकसभेत हरले तर ते त्यांच्या हक्काच्या बोरिवली विधानसभा मतदारसंघावर दावा करू शकतात. त्यामुळे तावडेही जोर लावतीलच.

उर्मिलासमोर मोठं आव्हान

आता उत्तर प्रदेशचे राज्यपाल असणाऱ्या राम नाईकांनी अत्यंत मेहनतीने हा मतदारसंघ बांधलाय. हा मतदारसंघ मुंबईच्या उत्तर टोकावरच्या दहिसर, बोरिवली, कांदिवली आणि मालाड या भागांत पसरलाय. गेल्या वेळच्या भव्य विजयानंतरही गोपाळ शेट्टी गाफील दिसत नाहीत. गेल्या काही महिन्यांत त्यांनी जाहिरातबाजीचा धडाका लावलाय. मतदारसंघात त्यांचे सतत कार्यक्रम सुरू आहेत. विश्व हिंदू परिषदेपासून संघाच्या झाडून सगळ्या केडरलाही त्यांनी कामाला लावलंय. प्रचारात त्यांनी आधीच आघाडी घेतलीय. यावेळेस रेकॉर्डब्रेक मतदान मिळवून गिनीज बुकात नाव नोंदवण्याचं आवाहन ते कार्यकर्त्यांच्या बैठकांत करत आहेत.

२००९च्या निवडणुकांत भाजपच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकीटावर जवळपास दीड लाख मतं मिळवणारे शिरीष पारकर सांगतात, `मी विरोधात निवडणूक लढवली असली तरी हे मान्यच करावं लागेल की या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेची संघटनात्मक बांधणी उत्तम आहे. त्यामुळे इथे उर्मिला मातोंडकरांना पराभव टाळता येईल, अशी परिस्थिती नाही. त्या चांगली लढत मात्र देतील. निवडणुकीनंतरही मी राजकारणात असेन, असं त्या पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाल्यात. आपण निवडणूक हरणार, हे त्यांना माहीत असल्याचं यातून दिसलं.`

तरीही उर्मिलाकडे प्रकाशझोत आला

असं असलं तरी उर्मिला मातोंडकर यांच्यामुळे मुंबईतल्या काँग्रेसची मीडियात पहिल्यांदाच पॉझिटीव बातमीसाठी चर्चा होतेय. पंतप्रधानांनी मंगळवारी अंतराळ संशोधनातल्या नव्या यशाची घोषणा केली. तेव्हाही सगळ्या टीवी चॅनलवर उर्मिला मातोंडकरच्या बातमीने आघाडी घेतली होती. गेले दोन दिवस उर्मिला टीवीवर गाजतेय. त्यामुळे मुंबई काँग्रेसमधली भांडणं मागं पडलीत.

हेही वाचाः लोकसभेच्या रिंगणात कोण, किती पाण्यात हे सांगणारे कालचे निकाल

उर्मिला राजकारणात नवीन आहे. टीवीवरच्या मुलाखतींत आणि पहिल्या भाषणातही उर्मिलाने आपला ठसका दाखवून दिलाय. आपली जडणघडण राष्ट्र सेवा दलात झालीय. आणि काँग्रेसच्या विचारांमुळे आपण पक्षात आलोय. हे ती ठामपणाने सांगतेय. तिच्या याच तिखट ठसक्यामुळे तिने बॉलीवूड गाजवलं.

एका पिढीवर आपला प्रभाव टाकलाय. कोणतंही बॅक्ग्राऊंड नसताना केवळ स्वतःच्या टॅलेंटवर मोठं यश मिळवून दाखवलंय. त्यामुळे तिच्याविषयी आकर्षण आहेच. ती कसं बोलते, कशी भेटते, याची उत्तर मुंबईतल्या मतदारांत उत्सुकता आहेच. त्यामुळे अगदी परवापर्यंत गोपाळ शेट्टींच्या भोवती फिरणारी निवडणुकीची चर्चा उर्मिलाने अचानक आपल्याकडे खेचून आणलीय.

उर्मिला म्हणजे गोविंदा नाही

उत्तर मुंबईतच राहणारे ज्येष्ठ पत्रकार प्रसाद काथे मात्र सांगतात, `२००४च्या निवडणुकीत गोविंदाने राम नाईकांना हरवण्याचा चमत्कार केला. तसाच उर्मिला करेल असं वाटत नाही. तेव्हा गोविंदाला मदत करणारे हितेंद्र ठाकूर मतदारसंघाचा आकार बदलल्याने शेजारच्या पालघर मतदारसंघात संघर्ष करताहेत. उर्मिलाला मातोंडकर म्हणून किंवा मराठी म्हणून मराठी मतदारांचा आपलेपणा मिळेल असंही वाटत नाही. कारण मराठीपणा ही तिची ओळख नाहीच. शिवाय तिने मोहसीन अख्तर मीर या मुस्लिम उद्योजकाशी लग्न केलंय. त्यामुळे इथल्या मराठी मतदारांची मानसिकता पाहता तिला मराठी म्हणून मतदान होईल असं वाटत नाही.`

प्रसाद काथे म्हणतात ते खरंच आहे उर्मिला म्हणजे गोविंदा नाही. गोविंदाची इमेज ‘विरार का छोरा’ अशी होती. त्यामुळे त्याने मतदारसंघातल्या गोरगरिबांना, निम्न मध्यमवर्गीयांना जिंकून घेतलं. सर्व समाजघटकांतून मतं मिळवली. त्यासाठी अवाढव्य पसरलेल्या मतदारसंघात दिवसरात्र फिरून मतं मागितली. उर्मिलाला चांगली लढत द्यायची झाली तरी गोविंदासारखी मेहनत घ्यावी लागेल. लोकांशी जोडून घ्यावं लागेल.

काँग्रेसच्या पारंपरिक मतांवर भर

काँग्रेसचा सगळा भरवसा काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांवर दिसतो. संजय निरुपमना २००९ च्या निवडणुकीत २ लाख ४९ हजार मतं मिळाली होती. २०१४ ला ती मतं २ लाख १७ हजारांवर आली. याचा अर्थ काँग्रेसची किमान सव्वा दोन लाख मतं कायम राहतील, असा विश्वास काँग्रेसला आहे. पण हे गणित करताना ते लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठी गळती लागल्याचं नजरेआड करतात. विशेषतः सध्याचे आमदार प्रकाश सुर्वे आणि माजी आमदार रमेशसिंह ठाकूर यांच्या शिवसेना आणि भाजपमधे जाण्याने काँग्रेसच्या मतांत मोठा खड्डा झालाय.

हेही वाचाः जेसिंडा अर्डेन, यू आर माय लीडर

पण काँग्रेसचे मालाडमधले आमदार अस्लम शेख यांनी आपला मुस्लिमबहुल मतदारसंघ ताकदीने बांधलाय. उत्तर मुंबईत मुस्लिम, ख्रिश्चन आणि दलितांचे छोटे छोटे पॉकेट आहेत. त्यांचं मतदान उर्मिलाला मिळेल, असं काँग्रेसला वाटतंय. त्याशिवाय काँग्रेस उत्तर भारतीयांच्या मतांत फूट पाडण्याचा प्रयत्नही करेलच. पण इथे बहुसंख्येने असणारी गुजराती, मारवाडी मतं तर भाजपकडे एकगठ्ठा जातातच. त्यांच्यावर उर्मिलाच्या ग्लॅमरची जादू चालण्याची शक्यता कमीच.

गोपाळ शेट्टींकडे ग्लॅमर शून्य

याचा अर्थ गोपाळ शेट्टींच्या विरोधात काहीच नाही, असंही नाही. हा मतदारसंघच गुजरातीबहुल असल्याने तिथे गुजराती किंवा जैन उमेदवाराची मागणी हलक्या आवाजात कायम सुरू असते. झोपडपट्टीत राहणारे शेट्टी आता राजेशाही टॉवरमधे राहायला गेलेत. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क पूर्वीसारखा तडाखेबंद राहिलेला नाही. काही एसआरए प्रकल्पांमधेही त्यांच्याविषयी नाराजी आहे. मैदानं आणि बागा ताब्यात घेऊन क्लब उभारण्याचं वेड शेट्टींना आहे. त्याविषयीही लोकांचं मत चांगलं नाही.

अर्थातच यापैकी कुठलीही नाराजी शेट्टींना हरवण्याइतकी मोठी नाही. पण उमेदवार म्हणून उर्मिलाचं ग्लॅमर शेट्टींपेक्षा फारच मोठं आहे. शेट्टी चांगले वक्ते नाहीत. उलट उर्मिला फारच उत्तम बोलतेय. कार्यकर्त्यांच्या पलीकडे शेट्टींना ओळख नाही. उर्मिलाचं गारूड जातीपातीच्या पलीकडे जाऊ शकतं. मात्र तिला त्याच्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं लागेल. त्यासाठी तिच्याकडे वेळ मात्र फार नाही.

मराठी मतं ठरणार निर्णायक

या सगळ्यात निर्णायक ठरू शकतात ती मराठी मतं. मनसेची किमान पन्नासेक हजार मतं या मतदारसंघात असावीत. राज ठाकरेंची सभा झाल्यास मनसेची मतं उर्मिलाकडे सहज जाऊ शकतील. पण उर्मिलाने मराठी मुलगी असल्याची इमेज उभी केली, तर त्याचा फायदा शिवसेनेचीही मतं खेचण्यात होऊ शकतो.

टीवीबरोबरच सोशल मीडियावरही उर्मिला मातोंडकर सध्या चर्चेत आहे. तिचे फॅन तिचं स्वागत करताहेत. दुसरीकडे मुसलमान मुलाशी लग्न केल्यामुळे तिला ट्रोल केलं जातंय. तिसरीकडे ती सरसंघचालक मोहन भागवतांची भाची असल्याची अफवाही जोरात आहे. या सगळ्यातून तिला कुंपणावरची मतं खेचून आणावी लागतील. आणि विशेषतः पहिल्या दुसऱ्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांची तसंच बायकांची मतं जिंकण्यात उर्मिला यशस्वी ठरली तरच तिच्या जिंकण्याच्या शक्यता आहेत.

उर्मिलाचं ग्लॅमर आणि भाजपची संघटनात्मक बांधणी अशी ही लढाई आहे. त्यात संघटनेचं पारडं सध्या तरी खूप जड आहे.

हेही वाचाः महाराष्ट्रात काँग्रेसचं घोडं कुठं अडतंय?