पुन्हा 'बॅक टू बेसिक्स’, २०२३ हे भरडधान्यांचं वर्ष!

०२ डिसेंबर २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


काही दशकांपूर्वी माणूस जी धान्यं खात होता, ती काही आजच्यासारखी पॉलिश केलेली चकाचक धान्यं नव्हती. ती होती जाडीभरडी कठीण सालाची भरडधान्यं. ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी अशी. या अशा भरडधान्यांमधेच खरी ताकद असतेय, असं युनो जगाला पुन्हा एकदा सांगतेय. म्हणूनच तरुणाईची 'बॅक टू बेसिक्स'ची भाषा बोलत, २०२३ हे वर्ष युनोनं 'मिलेट्स वर्ष' म्हणून जाहीर केलंय.

'राकट देशा, कणखर देशा' असं आपल्या रांगड्या महाराष्ट्राचं वर्णन करताना गोविंदाग्रज पुढे लिहितात की, 'तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणीकोंडा'. महाराष्ट्राची भूक भागवणारी ही धान्यं म्हणजे अस्सल मातीतली भरडधान्यं किंवा आजच्या इंटरनेटच्या भाषेतली मिलेट्स. या भरडधान्यांच्या पौष्टिकतेवर पिढ्यानपिढ्या पोसलेल्या आपल्या संस्कृतीचं महत्त्व आता जगाला पटलंय. म्हणूनच संयुक्त राष्ट्र अर्थात युनोनं २०२३ हे वर्ष भरडधान्यांचं वर्ष म्हणून ठरवलंय.

भारताप्रमाणेच जगभरातल्या विविध प्राचीन मानवी संस्कृतींच्या आहारात या भरडधान्यांचं महत्त्व कायमच होतं. पण पुढे औद्योगिकीकरण आणि त्यापाठोपाठ आलेलं शहरीकरण, जागतिकीकरण यामुळे पॉलिश्ड अशा धान्यांची चलती झाली. त्यामुळे आहारात पोषणमुल्यं हरवली आणि चटपटीत चवीसाठी जंकफूड पोटात जाऊ लागलं. त्यामुळे जगाची प्रकृती आता बिघडतेय. हे चक्र पुन्हा उटलं फिरवण्यासाठीच युनोनं हा उपक्रम हाती घेतलाय.

भरडधान्यं म्हणजे काय?

भरडधान्याला इंग्रजीत 'मिलेट' असं म्हणतात. भारतात अशी ९ प्रकारची मिलेट अर्थात भरडधान्यं आहेत. यात ज्वारी, बाजरी, नाचणी अशी रोजच्या आहारातली भरडधान्य आहेतच शिवाय वरई, वरी, राळा, बर्टी, कोदो, ब्राऊनटोप अशी भरडधान्यही यात येतात. ज्वारी, बाजरी ही मोठी धान्यं म्हणजेच 'ग्रेटर मिलेट' तर वरी, राळा, बर्टी, कोदो, ब्राऊनटोप ही भरडधान्य 'मायनर मिलेट' अर्थात बारीक धान्यं म्हणून ओळखली जातात.

बारीक धान्यांवर टरफल किंवा साल असतं. यात मोडणारं वरई महाराष्ट्रातल्या सह्याद्री आणि कोकण भागात घेतलं जातं. तर वरी हे वरईसारखंच दिसणारं भरडधान्य आहे. पूर्वी भादली किंवा कांग या नावाने ओळखलं जाणारं राळा प्रामुख्याने भाद्रपद महिन्यात घेतलं जातं. बर्टी हे अतिशय कमी दिवसात येणारं भरडधान्य आहे. तर कोदो हे त्यावरचं टरफल काढलं नाही तर कितीही वर्ष ठेवता येतं. यातलं ब्राऊनटोप हे भरडधान्य प्रामुख्याने दक्षिण भारतातच घेतलं जातं.

या धान्यप्रकारांचेही वेगवेगळे प्रकार आहेत. आजच्या घडीला ज्वारीच्या ३४ हजारांपेक्षा अधिक वाणांची नोंद असल्याची माहिती केंद्रीय शेती खात्याच्या वेबसाईटवर वाचायला मिळते. तर वरीचे जवळपास १६, राळ्याचे २९, नाचणीचे ३९ प्रकार आढळून येतात. या सगळ्या भरडधान्यांचा म्होरक्या म्हणजे नाचणी. मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, लोह अशी खनिजं आढळून येणारं नाचणी सुपरफूड म्हणून ओळखलं जातं.

हेही वाचा: रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना!

कधीकाळी आहाराचा मुख्य भाग

काळ बदलला. काळाप्रमाणे आपली जीवनशैलीही बदलली. तशी शेतीही बदलली. हरितक्रांतीनंतर गहू, तांदूळ अशी पिकं आली. आपला रोजचा आहार गहू, तांदूळनं व्यापून टाकला. भातावर कधी दूध वगैरे टाकून खाल्लं जायचं. अर्थात ही चैनीची गोष्ट समजली जायची. गव्हाची गोष्टही अगदी तशीच. त्यातूनच भरडधान्याच्या पारंपरिक शेतीला वेगळा पर्याय उभा राहिला.

गहू, तांदूळ येण्याआधी भरडधान्यं इथल्या सर्वसामान्यांच्या रोजच्या आहाराचा भाग होती. ग्रामीण भागात तर ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी दोन वेळच्या जेवणात असायचीच. तर बारीक धान्यं महाराष्ट्रात तरी प्रामुख्याने आदिवासी भागांमधे घेतली जायची. त्यामुळे ही भरडधान्य त्यांच्या आहाराचा भाग झाली. गहू, तांदूळानं त्यांचं अस्तित्व मर्यादित राहिलं.

अस्सल जगण्याचं भरणपोषण करणारी ही भरडधान्य आजही तितकीच महत्वाची आहेत. त्यामुळेच या भरडधान्यांना संरक्षण मिळावं तसंच जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी भारताने पुढाकार घेतला. त्या दिशेनं पाऊल पडलं. आणि आज याच भरडधान्यांची दखल थेट युनोनं घेतलीय.

कर्नाटकची कल्पना केंद्रानं उचलली

मार्च २०२१ला भरडधान्याच्या दृष्टीने युनोच्या सर्वसाधारण सभेत भारतानं एक ठराव मांडला. २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित करण्याचा हा ठराव होता. त्याला संयुक्त राष्ट्राने संमती दिली. त्यावेळी जवळपास ७०पेक्षा अधिक देशांनी या ठरावाला अनुमोदन दिलं होतं. तर १९३ देशांनी या प्रस्तावाचं स्वागत केलं. भारताने २०२२च्या केंद्रीय अर्थसंकल्पातही भरडधान्याच्या प्रसार, प्रचारासंबंधीची घोषणा केली होती.

युनोमधे हा ठराव पास झाल्यानंतर आता सदस्य देशांनी त्यादिशेनं पावलं टाकायला सुरवात केलीय. जागतिक फूड रेटिंग सिस्टीममधेही भरडधान्य चांगलं असल्याचं मानांकन मिळालंय. भरडधान्याच्या लागवडीचं क्षेत्र वाढावं आणि लोकांनाही याबद्दलची माहिती मिळावी म्हणून भारताने पुढाकार घेतलाय. ५ सप्टेंबर २०२२ला केंद्र सरकारनं 'इंडियाज वेल्थ, मिलेट फॉर हेल्थ'च्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांची घोषणाही केली.

भरडधान्याची कल्पना पहिल्यांदा मांडली ती कर्नाटकचे माजी शेती मंत्री कृष्णा बायरे गौडा यांनी. भरडधान्याच्या लागवडीला प्रोत्साहन मिळावं म्हणून राज्यांतर्गत वेगवेगळ्या मेळाव्यांचं त्यांनी आयोजन केलं होतं. त्याची दखल केंद्रीय शेती आणि शेतकरी कल्याण खात्याने घेऊन सर्व राज्यांना त्यादृष्टीने पावलं टाकायला सांगितली होती.

हेही वाचा: पंच्याहत्तरीतही दिमाखात उभा हावडा ब्रिज

सुदृढ आरोग्यासाठी भरडधान्य

एखादी ओली बाळंतीण असेल तर तिला बाजरीची पेज करून दिली जाते. ताप आला असेल तर आजही कोकण पट्ट्यात उकडे तांदूळ भरडून त्याची पेज केली जाते. सोबतच ज्वारी, बाजरीची पेजही खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. तसंच त्याची खीरही केली जाते. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ही भरडधान्य पचायला हलकी असणं. शरीराला आवश्यक पोषकतत्वं आपल्याला भरडधान्याच्या माध्यमातून मिळतात.

रोजच्या आहारातल्या गहू, तांदळात मोठ्या प्रमाणात कर्बोदकं असतात. ग्लूटेनयुक्त चिकट पदार्थांचा आपल्या शरीरावरही विपरीत परिणाम होतोय. अशावेळी अगदी चविष्ट आणि पौष्टिक भरडधान्य आपल्या रोजच्या आहाराचा भाग बनायला हवीत. ज्वारी, बाजरी, नाचणीच्या भाकरी हा आजही आपल्या ग्रामीण भागातला अस्सल आहार समजला जातो. भरपूर ऊर्जा देणाऱ्या या भरडधान्यांनी खरंतर आपलं यथायोग्य भरणपोषण केलंय.

आता गहू आणि भात या पिकांना पर्याय म्हणून भरडधान्याकडे बघायला हवं. त्याला विशेष कारणंही आहेत. महत्वाचं म्हणजे अगदी कमी पाऊस असला तरीही ही पिकं घेता येतात. डोंगर उतारावरही ही पिकं चांगली येत असल्यामुळे जमिनीचा योग्य तो वापर करणं शक्य होतं. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कोरडवाहू जमीन आहे. अशावेळी या पिकांचा पर्याय आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

शेती संकटाचा मुख्य आधार

वाढती लोकसंख्या म्हणजे अन्नाची सतत वाढणारी मागणी. त्यामुळे भविष्यात अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ शकते. अशावेळी आपण दरवर्षी तांदूळ, गहू अशी जी काही ठराविक पिकं घेतो. त्याला काहीएक पर्याय उभा रहायला हवा. आज भरडधान्य हा महत्वाचा पर्याय ठरतोय. जागतिक अन्न असुरक्षितता कमी करण्यासाठी या पर्यायाचा विचार आता जगभरात होतोय.

हवामान बदलाचा आपल्या शेती क्षेत्राला मोठा फटका बसतोय. शेतीवर अचानक आलेल्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झालाय. शेतीच संकटात आली तर भविष्यात मोठं संकट उभं राहू शकतं. याचा तांदूळ, गहू आणि मका यासारख्या प्रमुख तृणधान्यांवर परिणाम होत असल्याचं 'भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानक प्राधिकरणा'नं म्हटलंय. ही संस्था भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या अंतर्गत येते.

आज शेतीमधे वेगवेगळे प्रयोग केले जातायत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. त्याचा परिणाम हा अंतिमतः आपल्या शेत जमिनीवर होतो. त्यामुळे जमिनीचा कस कमी होतोय. त्याचा उत्पादन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. अशावेळी ही भरडधान्य आपल्या जमिनीचा कस वाढवण्यामधे मोलाची कामगिरी बजावू शकतात. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखता येईल आणि निसर्गस्नेही अशा शाश्वत शेतीकडेही वळता येईल.

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

सुपरहिरो मरत नाहीत आणि त्यांचा बापही!

कोल्हापूर ते ऑस्करः भानू अथैय्या यांचा ९० वा वाढदिवस

एका नाटकाचा प्रवासः सिंधुदुर्गातलं सरमळे ते न्यूयॉर्कचं ब्रॉडवे

अमिताभलाही न कळालेला अॅवेंजर समजून घेण्यासाठीचा क्रॅश कोर्स