युनोनं २०२१ फळं, भाजीपाल्यांचं वर्ष जाहीर का केलंय?

२८ फेब्रुवारी २०२१

वाचन वेळ : ६ मिनिटं


आज २८ फेब्रुवारी. राष्ट्रीय विज्ञान दिवस. २०२१ हे वर्ष युनायटेड नेशन्सनं आंतरराष्ट्रीय फळं आणि भाजीपाल्यांचं वर्ष म्हणून साजरं करायचं ठरवलंय. निरोगी शरीरासाठी फळं आणि भाज्या किती आवश्यक आहेत, हे सर्वसामान्यांना कळावं, त्याचा प्रचार व्हावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आलाय.

सजीवांना जगण्यासाठी चांगलं अन्न, शुद्ध पाणी आणि हवेची गरज असते. माणसाच्या या मूलभूत गरजा आहेत. यातलं अन्न हे पोषक असावं लागतं. म्हणजेच अन्न म्हणजे केवळ पोट भरणं नाही. आहारातून आवश्यक घटक शरीराला मिळायला हवेत. सर्व प्राणी त्यांना आवश्यक असणारे घटक निसर्गातून घेतात. वनस्पती हे घटक जमीन आणि हवेतून मिळवतात.

सर्व सजीवांमधल्या एखाद्या सजीवाचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढू लागलं की, निसर्गातले इतर घटक त्याला नियंत्रित करतात. माणसांबद्दलही असंच घडतं. अनेक आजार, रोग, नैसर्गिक आपत्ती आल्या आणि त्यांनी मानव प्राण्यांची संख्याही मर्यादित ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र, मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर या सगळ्या आपत्तींवर मात केलीय.

आजारांवर औषधं शोधली. आपलं आयुष्य वाढवलं. दुसरीकडे, आपली संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवली. त्याला आवश्यक असणारे घटक निसर्गत: उपलब्ध होणं कठीण होऊ लागलं. अन्न कमी पडू लागलं, तेव्हा अशा अन्नपदार्थांची निर्मिती स्वत: तयार करायला सुरवात केली.

हेही वाचा: वेगन म्हणजे वेजिटेरीअन नाही, त्यापेक्षा बरंच काही

शरीरातल्या गरजांचं द्वंद्व

शेतीची सुरवात हा माणसाने आपली अन्नाची गरज भागवण्यासाठी निसर्गात केलेला पहिला हस्तक्षेप होता. त्यानंतर तो वाढत गेला. त्याने आपलं आयुष्य जास्तीत जास्त वाढवण्याचा आणि निरोगी जगण्याचे मार्ग शोधले. आजारी पडल्यानंतर जीवाणू, विषाणू इत्यादींना मारणारी औषधं बनवली. आपण आजारी पडू नये म्हणून काय खावं, हेही शोधून काढलं.

या संशोधनातून माणसाला निरामय जीवन जगण्यासाठी विटॅमिन, क्षार, प्रथिनं इत्यादी सगळे घटक किती आणि कोणत्या प्रमाणात आवश्यक असतात, हे शोधलं. हे घटक निसर्गातल्या, आहारातल्या कोणत्या पदार्थात उपलब्ध असतात, हे शोधलं. त्यातूनच लक्षात आलेली गोष्ट म्हणजे, माणसाला सशक्त आणि निरोगी ठेवण्यात फळं आणि भाजीपाल्यांचं खूप महत्त्वाचं स्थान आहे.

इथंच शरीरातल्या गरजांचं द्वंद्व सुरू झालं. अनेकांना फळं, भाजीपाला खाण्यापेक्षा कृत्रिम रसायनांचा मारा केलेले ‘फास्टफूड’ आवडायला लागले. यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या. या सर्व गोष्टींचा विचार करून २०२१ वर्ष हे ‘आंतरराष्ट्रीय फळ आणि भाजीपाला वर्ष’ म्हणून साजरं करावं, असं यूएनने जाहीर केलंय. निरोगी शरीरासाठी फळं आणि भाज्या किती आवश्यक आहेत, हे सर्वसामान्यांना कळावं, प्रचार व्हावा, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजीपाला म्हणजे नेमकं काय?

हिरव्या पालेभाज्यांमधे सर्वाधिक पोषण घटक असतात. भारतात सर्वाधिक पालेभाज्या खाल्ल्या जातात. यात सर्वाधिक पसंतीच्या पालक, माठ, अंबाडी, करडई, पुदिना, कोथिंबीर, शेवग्याची पानं, शेपू, तांदुळसा, चुका, चाकवत, राजगिरा, अळू, कडिपत्ता, घोळ, हादग्याची पाने, रानभाज्या जेवणात वापरल्या जातात. रोजच्या जेवणात अशा भाज्या घेतल्या तर अशक्तपणा टाळला जातो.

हिरव्या भाज्यांमधे कॅल्शियम, बीट कॅरोटिन, ‘क’ विटॅमिन, प्रथिनं, लोह, थियामीन, रायबोफ्लेविन हे घटक असतात. भारतात पाच वर्षांखालच्या अंदाजे तीस हजार बालकांना ‘अ’ विटॅमिनच्या अभावामुळे अंधत्व येतं. हिरव्या भाज्यांमधलं कॅरोटिन ‘अ’ विटॅमिनमधे येतं आणि अंधत्व टाळता येतं. मानवी शरीरासाठी आवश्यक असणार्‍या ताज्या आणि खाद्य भागाला भाजीपाला म्हणतात.

यात मूळ, खोड, पानं, फळं आणि फुलं यांचा समावेश होतो. मुळा, रताळं, गाजर, बीट, सुरण, बटाटा, कांदा, लसूण इत्यादी खोड, मुळंही भाजीपाल्यांचा भाग आहेत. भाजीपाला आहे त्या स्थितीत किंवा शिजवून खाल्ला जातो. भारतात २.५ टक्के शेती भाजीपाल्याची होते. महाराष्ट्रात हे प्रमाण १.६ टक्के आहे. नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यात भाजीपाला शेती मोठ्या प्रमाणात होते.

हेही वाचा: गुड फॅट आणि बॅड फॅट ही नेमकी भानगड काय?

ऍसिडिटीवरचा उपाय

भाजीपाल्याच्या शेतीत कष्ट जास्त असले, तरी उत्पन्नही जास्त मिळतं. मांसाहार हा मानवी शरीरासाठीचा आहार नाही. उलट मांसाहारामुळे निर्माण होणारी ऍसिडिटी भाजीपाल्यामुळे नष्ट होते. अन्न पचायला मदत होते. हिरव्या आणि पिवळ्या पालेभाज्यामधे ‘अ’ आणि ‘क’ विटॅमिन मोठ्या प्रमाणात असतात. काही भाज्यांमधे ‘ब’ विटॅमिनही असतात.

हिरव्या भाज्यांविषयी अनेक गैरसमज आहेत. हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्या तर पोटाचा त्रास होतो, हाही एक गैरसमज. पालेभाज्या जमिनीच्या जवळ असतात. या भाज्यांवर जगणारे इतर जीव, जंतू, किडे हे त्यावर असतात. त्यांच्यामुळे हा त्रास होतो. तो टाळण्यासाठी या पालेभाज्या स्वच्छ वाहत्या पाण्याने चांगल्या धुऊन घेणं आवश्यक असतं.

पालेभाजी रोज किती खावी?

बरेच लोक भाज्या शिजवतात आणि त्यानंतर त्यातलं पाणी टाकून देतात. मात्र, यामुळे त्यातून मिळणारी पोषणमूल्यं कमी मिळतात. हिरव्या पालेभाज्या जास्त शिजवल्या, तर त्यातले अन्न घटक कमी होतात. पोषणमूल्य कमी होतं. भाजी शिजवल्यानंतर त्यातलं पाणी टाकून दिल्यानं पोषणमूल्य वाया जातात.

उलट हिरव्या भाज्या शिजवताना त्यावर झाकण ठेवून शिजवायला हव्यात. भाज्या उन्हात वाळवल्या तर त्यातलं कॅरोटिन उडून जातं. महाग भाज्यांमधे जास्त पोषणमूल्य असतात, असंही नाही. परसात, कुंड्यांत लावलेल्या भाज्यांमधलं पोषणमूल्यही तितकंच असतं.

उलट ताज्या पालेभाज्या खाणं शरीरासाठी आवश्यक असतं. माणसाच्या शरीराला ४० ते ५० ग्रॅम हिरव्या पालेभाज्या प्रत्येक दिवशी खाणं आवश्यक असतं. प्रत्यक्षात मात्र या प्रमाणात पालेभाज्या खाल्ल्या जात नाही.

हेही वाचा: आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?

उत्साह वाढवणारी फळं

मानवी शरीराला निरोगी ठेवण्यात फळांचं महत्त्वही भरपूर आहे. फळांमधे ९० ते ९५ टक्के शुद्ध पाणी असतं. फळांमुळे रक्ताचं शुद्धीकरण होतं. पचनसंस्था सुरळीत ठेवण्याचं काम फळं करतात. फळातल्या तंतुमय पदार्थांमुळे आतड्यांचं आकुंचन आणि प्रसरण चांगलं होतं. त्यामुळे लघवी, संडास सुरळीत होतो. फळं मानवी शरीराला अपचन, पोटात दुखणं, संडासला साफ न होणं यापासून लांब ठेवतात.

आवळा, संत्री, मोसंबी, लिंबू या पदार्थांमधे ‘क’ विटॅमिन असतं. सर्दी कमी करायला ही फळं मदत करतात. केळी, बोर, आंबा, जांभूळ, चिंच, सीताफळ, रामफळ, चिकू, डाळिंब ही फळं खाण्यासाठी वापरली जातात. फळांमधे विटॅमिन, आम्ल, संप्लवनशील फॅट्स असतात. त्यामुळे भूक चांगली लागते. आंबा, कलिंगड, चेरी अशा फळांमध्ये बीटा कॅरोटिन असतं. यामुळे डोळे चांगले राहतात. कर्करोगापासूनही बचाव होतो.

फळांमधे १० ते १५ टक्के क्षार असतं. यात कॅल्शियम, सोडियम, पॉटेशियम, मॅग्नेशियम, सल्फर, फॉस्फरस, लोह क्षार असतात. कॅल्शियममुळे हाडं बळकट होतात. दातांचं आरोग्य चांगलं राहतं. रक्तातलं कॅल्शियम कमी झालं तर माणसाचा चिडका स्वभाव उफाळून येतो. चिडचिड वाढते. फळातून मिळणारं मॅग्नेशियम मेंदूचं काम सुरळीत ठेवतं. रक्तातलं लोहाचं प्रमाण कमी झालं की, माणसाचा उत्साह कमी होतो.

फळं खायचंही टायमिंग

फॉस्फरसचं प्रमाण कमी, जास्त झालं तर हाडांचं आरोग्य बिघडतं. पॉटेशियमचं प्रमाण कमी झालं तर रक्त गोठत नाही. यकृत उत्तेजना हे पॉटेशियमचं दुसरं महत्त्वाचं काम आहे. फळांचं निसर्गात उपलब्ध होणं त्या त्या ऋतूमधे मानवी शरीराला निरोगी ठेवण्याच्या दृष्टीने असतं. ज्या त्या ऋतूत पिकणारी फळं पुरेशा प्रमाणात खाणं मानवी आरोग्यासाठी चांगलं असतं.

आयोडिनमुळे थॉयरॉईड ग्रंथीचं काम चांगलं राहतं. काही फळं वाळवून किंवा सुकलेल्या अवस्थेत असतात. खारीक, खोबरं, पिस्ता, बदाम, अक्रोड, चारोळी, काजू, बिबा फळं सुकलेली असतात. त्यांना सुका मेवा म्हणतात. फळं ही वरदान आहेत. फलाहार उत्तम आहार आहे. मात्र, फळं जेवणापूर्वी खाणं चांगलं असतं.

हेही वाचा: आयोडीनयुक्त मिठामुळे आपण आजारी पडतोय का?

सेंद्रिय पद्धत वापरायचं कारण

मानवी शरीरासाठी आवश्यक फळं, भाजीपाला आवश्यक आहे तसंच शुद्ध पर्यावरणाची गरज आहे. शेतीतून फळं आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकवण्यासाठी रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

त्यांचा मारा मोठ्या प्रमाणात असल्याने, न वापरली जाणारी खतं आणि रसायनं पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रदूषण होतंय. त्याचबरोबर वनस्पतींच्या फुलांचं परागीभवन करणारे कीटक मोठ्या प्रमाणात मरतायत. मधमाश्याही बळी पडतात.

फळं आणि भाजीपाला जसा माणसाच्या आयुष्यात आवश्यक आहेत, तसंच निसर्गातले कीटक आणि इतर जीवांचं अस्तित्वही आवश्यक आहे. यासाठी आपण फळांचं आणि भाजीपाल्यांचं सेंद्रिय पद्धतीने उत्पादन करणं आवश्यक आहे.

ही पृथ्वी सर्वांसाठी आहे. माणूस त्याचा एक घटक आहे. त्याने स्वत:ला पृथ्वीचा मालक न मानता सहजीवन स्वीकारलं पाहिजे. तरच आपल्या मूलभूत गरजा अन्न, पाणी आणि हवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील.

हेही वाचा: 

सदा डुम्बरे : चेहरा असलेला संपादक

इश्क मजहब, इश्क मेरी जात बन गई

कुणा एकाच्याच मालकीची आहे का ही भाषिक संस्कृती?

मराठीला ज्ञान विज्ञानाची भाषा बनवावी लागेल : रंगनाथ पठारे

गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी खाताय, पण तुम्हाला त्याविषयी काय माहितीय?

(डॉ. व्ही. एन. शिंदे यांचा लेख दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून घेतलाय )