युक्रेनची ड्रोन आर्मी रशियाला टक्कर देईल?

१६ ऑगस्ट २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध गेले सहा महिने सुरू आहे. वेगवेगळ्या आघाड्यांवर युक्रेनला नामोहरम करायचा प्रयत्न रशिया करतोय. पण त्याला जशास तसं उत्तर देण्याचं युक्रेननं ठरवलंय. त्याचाच एक भाग म्हणून युक्रेननं 'आर्मी ऑफ ड्रोन' नावाचा उपक्रम सुरू केलाय. ड्रोनसाठी जगभरातल्या देशांना आवाहन केलं जातंय. युक्रेनियन सैन्याचा जीव वाचावा आणि रशियाला टक्कर देता यावी हा त्यामागचा उद्देश आहे.

रशिया-युक्रेनमधल्या युद्धाला अद्यापही पूर्णविराम मिळालेला नाही. गेली सहा महिने युक्रेनची अनेक शहरं रशियाकडून लक्ष्य करून बेचिराख केली जातायत. हल्ले होत आहेत. युक्रेनियनही लढत देतायत. रशियाला जशास तसं उत्तर देण्याची तयारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनीही केलीय. झेलेन्स्की स्वतः आपल्या सैनिकांसोबत युद्धभूमीवर उतरून त्यांना आत्मविश्वास आणि बळ देण्याचा प्रयत्न करतायत.

रशियासारख्या महाशक्तीशी दोन हात करणं साधी गोष्ट नाहीय. युक्रेनची संसाधनं कमी करण्यासाठी रशियाकडून प्रयत्न होतायत. दुसरीकडे युद्ध जिंकण्यासाठी युक्रेनही अनेक देशांची मदत घेत आहे. लष्करी पातळीवरही ती घेतली जातेय. अशाच एका मदतीसाठी सध्या युक्रेननं जगभरातल्या देशांना आवाहन केलंय. त्यांच्याकडून आर्थिक मदत आणि जुने ड्रोन घेण्याची ही योजना आहे. त्यातून युक्रेनला ड्रोन आर्मी उभी करायचीय.

हेही वाचा: उत्तर कोरिया आतून नेमका दिसतो कसा?

युक्रेनची आर्मी ऑफ ड्रोन

२५ जुलै २०२२ला युक्रेनचे उपपंतप्रधान आणि सरकारमधे मंत्री असलेल्या मायखाइलो फेडोरोव यांनी ७.१ मिलियन डॉलरच्या करारावर सही केली. 'आर्मी ऑफ ड्रोन' नावाचा हा प्रकल्प असेल. याची घोषणा स्वतः युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी केली होती. त्यासाठी 'ग्लोबल डोनेशन एनिशिएटिव' या नावाखाली जगभरातल्या देशांना मदतीचं आवाहन करण्यात आलंय.

या देणग्या जमा करण्यासाठी युक्रेनच्या संरक्षण खात्याने 'युनायटेड २४' नावाची स्वतंत्र वेबसाईटही बनवलीय. तिथल्या देणग्या थेट 'नॅशनल बँक ऑफ युक्रेन'मधल्या संरक्षण खात्यात हस्तांतरित केल्या जातील. मदतीचं आवाहन केल्यावर पहिल्याच दिवशी २.३ मिलियन डॉलरची मदत झाली. पुढच्या दोन आठवड्यात ही रक्कम १०.९ मिलियन डॉलरवर पोचल्याचं युक्रेनच्या संरक्षण खात्याची आकडेवारी सांगते.

या आंतरराष्ट्रीय देणग्यांच्या माध्यमातून ड्रोनची देखभाल आणि पायलट प्रशिक्षणाच्या खर्चाचं नियोजन करण्यात येतंय. आलेले हजारो ड्रोन हाताळण्यासाठी सैन्याची ऑपरेटिंग यंत्रणाही युक्रेनकडून उभी केली जातेय. १५० लोकांना ड्रोन हाताळण्याचं प्रशिक्षणही दिलं जातंय. हा आकडा लवकरच ५००पर्यंत घेऊन जायचं सरकारचं लक्ष्य आहे. त्यासाठी प्रशिक्षण केंद्रही उभं करण्यात आलंय.

ड्रोनसाठी मदतीचा ओघ

२५ जुलैला युक्रेननं पोलंडशी काही करार केलेत. मानवरहित हवाई वाहनं खरेदी करणं हा त्यामागचा उद्देश होता. त्यासाठी ७.१ मिलियन डॉलर इतका खर्चही करण्यात आलाय. त्यातून 'मॅट्रिस ३०० आरटीके' सारखा व्यावसायिक ड्रोन खरेदी करण्यात आलाय. ज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अगदी तपशीलवार माहिती मिळवणारे थर्मल कॅमेराही आहेत. टेहळणी करण्यासाठी म्हणून सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या '२० फ्लाय आय' या ड्रोनचा समावेशही यात आहे.

पोलंडसोबतच्या करारातून 'वॉर्मेट लोइटरिंग' युद्धसामग्री आणि नेमकं लक्ष्यभेद करू शकणारे २० ड्रोनही खरेदी करण्यात आलेत. यात सेन्सर आणि वेगवेगळे सॉफ्टवेअरही टाकण्यात आले आहेत. हे ड्रोन ५ ते १६० किलोमीटरपर्यंत उडू शकतील. त्यामुळे या ड्रोनच्या मदतीने रशियन सैन्याचा नेमका शोध घेणं शक्य होईल. तसंच ही माहिती आपल्या लष्करी अधिकाऱ्यांपर्यंतही सहजपणे पोचवता येईल. त्यामुळे पुढचं संकट टळेल.

याशिवाय अमेरिकेने युक्रेनला सहजपणे मारा करता येतील असे ७०० 'स्विचब्लेड ड्रोन' दिलेत. तसंच दीर्घकाळ हवेत राहू शकतील असे ५८० 'फिनिक्स घोस्ट ड्रोन' देण्याचीही अमेरिकेची योजना आहे. तसंच काही किलोमीटरपर्यंत सहजपणे मारा करू शकतील अशा छोट्या ड्रोनच्या शोधात युक्रेन आहे. त्यासाठी पोलंड, नॉर्वे, कॅनडा अशा देशांची मदत घेतली जातेय.

युक्रेनियन सैन्याला मदत करणाऱ्या 'कम बॅक अलाइव फाउंडेशन'नंही ३०० ड्रोनची खरेदी केलीय. आपण स्वदेशी ड्रोन बनवत असल्याचं सरकारने संरक्षण खात्याच्या वेबसाईटवरून जाहीर केलंय. त्यात जमिनीवरचा लक्ष्यभेद करू शकणारे पनीशरसारखे ड्रोन असतील. तसंच ए१-एसएम फूरिया आणि स्पेक्टेटर-एम१ हे स्वदेशी बनावटीचे ड्रोनही बनवले जातील.

हेही वाचा: वीस वर्ष सत्ता भोगणाऱ्या पुतिन यांना का बदलायचंय रशियन संविधान?

अशी होईल ड्रोनची मदत

सध्यातरी युक्रेनला थेट हल्ला करू शकतील असे हजारो ड्रोन घ्यायचेत. त्यातून रशियन सैन्याशी थेट भिडणं, आपल्या सैन्याचा जीव वाचवणं, हजारो किलोमीटर दूरपर्यंत लक्ष ठेवणं शक्य होईल. रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे युक्रेनला मोठ्या प्रमाणात महागडी मिसाइल आणि शस्त्रास्त्रं घेणं शक्य नाही. अशावेळी हे ड्रोन युक्रेनसाठी फायद्याचे ठरतील.

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पहिल्या टप्प्यात तुर्कस्थाननं दिलेला 'बायरॅक्टर टीबी २' हा ड्रोन युक्रेनसाठी फार फायदेशीर ठरला होता. या ड्रोनच्या मदतीने रशियाचे तोफखाने, बोटी, वाहनं लक्ष्य करण्यात आली होती. त्यामुळे रशियाचं १ बिलियन डॉलरचं नुकसान झाल्याचं युक्रेननं म्हटलं होतं. अशाच प्रकारचे ड्रोन मिळवण्यासाठी युक्रेन प्रयत्नशील आहे.

ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रशियाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणं युक्रेनला शक्य आहे. त्यासाठी 'बायकर माकिना' सारख्या ड्रोन बनवणाऱ्या कंपन्या पुढे आल्यात. त्यांच्या अत्याधुनिक ड्रोनमुळे जीवितहानीही थोड्या फरकाने का होईना टाळता येईल. होणारं नुकसानही त्यामुळे कमी होईल.

युक्रेन रशियाला टक्कर देईल?

रशियासोबतच्या युद्धात युक्रेनचे हजारो सैनिक मारले गेलेत. अशावेळी या बलाढ्य शक्तीशी लढण्यासाठी ड्रोनची अत्याधुनिक यंत्रणा महत्वाची ठरेल. दुसरीकडे काही समस्याही येऊ शकतात. विशेषतः नीट सिग्नल न मिळणं ही ड्रोन हाताळणाऱ्या ऑपरेटर समोरची मोठी समस्या असू शकते. शिवाय हे ड्रोन हाताळणारा प्रशिक्षित वर्गही कुशल असायला हवा. होणारं नुकसान हे आर्थिक आघाड्यांवर परवडणारं नसेल. त्यामुळे ड्रोन हाताळताना पुरेशी काळजी घ्यायला हवी.

गेले सहा महिने रशिया-युक्रेनचं युद्ध चालू आहे. युक्रेन नाटोकडे झुकल्यामुळे मागच्या तीन दशकांपासून त्यांच्यातले संबंध बिघडलेत. एका प्रबळ आणि शक्तिशाली राष्ट्राशी दोन हात करायची भूमिका युक्रेननं घेतलीय. जगातल्या अनेक देशांची युक्रेनला मदत मिळतेय. विशेषतः अमेरिकेसारखे देश मदत करतायत. तर रशियाच्या लष्करी सामर्थ्याचीही जोरदार चर्चा आहे. याच बळावर चहुबाजूंनी युक्रेनला कोंडीत पकडायचा प्रयत्न रशिया करतंय.

दोन्ही देशांच्या लष्करी सामर्थ्याची तुलना केली तर रशिया आपल्या लष्करावर ६१.७ बिलियन डॉलर इतका खर्च करते. युक्रेनचं संरक्षण बजेट हे ५.४ बिलियन डॉलर इतकं आहे. आजच्या घडीला रशियाकडे ९ लाख तर युक्रेनकडे २.१० लाख इतके सैनिक आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीतही रशियाच्या तुलनेत युक्रेन फार कमकुवत आहे. त्यामुळे  रशियाला टक्कर देण्यासाठी युक्रेननं उतरवलेली ड्रोन आर्मी कितपत चालते हे येणाऱ्या काळात कळेल.

हेही वाचा: 

लोकशाहीमुळे आर्थिक विकास खुंटतो?

लोकशाही वाचवण्याचा वीस कलमी कृतीक्रार्यक्रम

चीनने धोका दिल्यानंतर नेहरूंनी आपली युद्धनीति कशी बदलली?

बहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज

या बाळंतपणाने सरकारी आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास जन्माला घातलाय