उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची

२९ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदापर्यंतचा प्रवास सोपा नव्हताच. प्रत्येक वळणावर एक नवं आव्हान त्यांच्यासाठी उभं असायचं. ते सारे चढउतार पार करत एक प्रगल्भ आणि प्रयोगशील राजकारणी म्हणून ते मुख्यमंत्रीपदाच्या आव्हानाला सामोरे जात आहेत. आता पुन्हा त्यांच्या क्षमतेवर नेहमीसारखीच प्रश्नचिन्हं उभी केली जात आहेत. पण त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड सांगतो, ते हे आव्हानही पेलू शकतील.

बहुदा ते २००९ची लोकसभा निवडणूक असावी. `कर्जमुक्ती देता की जाता` असा सवाल विचारत उद्धव ठाकरे शिवसंवाद यात्रेतून महाराष्ट्र पिंजून काढत होते. दुष्काळ पडला होता. उद्धव ठाकरेंच्या लाखालाखाच्या सभा होत होत्या.

पण शेतकरी जगायला हवा

उस्मानाबादची सभा सुरू होती. समोर प्रचंड गर्दी होती. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. सभा भिजून गेली. उद्धव ठाकरेंच्या मागे उभे असलेले आमदार अनिल परब अस्वस्थ झाले. निवडणुकीच्या राजकारणात तरबेज असणाऱ्या परबांनी हळूच उद्धव यांच्या कानात म्हटलं, `साहेब, निवडणूक गेली हातातून.' एका क्षणाचाही वेळ न लावता उद्धव म्हणाले, `निवडणूक गेली तरी चालेल. पण पाऊस पडायला हवा. शेतकरी जगायला हवा.`

 हेही वाचा : महाविकासआघाडीचं नवं सरकार पाच वर्षं चालेल की नाही?

उद्धव यांच्या संवेदनशीलतेच्या अशा किश्श्यांची चर्चा मीडियात मात्र कधीच झाली नाही. कारण ते आम्हा पत्रकारांसाठी कायम घराणेशाहीचे लाभार्थी होते. एकलव्य आणि कर्णावर झालेल्या अन्यायाचं खापर अर्जुनावर फोडलं जातं. तसंच अधिक गुणवान आणि कर्तृत्ववान मानल्या गेलेल्या वारसदारांना बाळासाहेबांनी डावलल्याचा सल मीडियामधेही व्यक्त होत राहिली. वर्गातली मुलं आदर्श विद्यार्थ्याकडे असूयेने पाहतं, तसं जग उद्धव यांच्याकडे पाहात राहिलं.

पुतण्यांसमोर काकांचा आदर्श 

तसे उद्धव लहानपणापासून आदर्श मुलासारखेच होते. इतर भावंडांच्या तुलनेत खूपच शांत. वडिलांचे भक्त. आईचे सर्वात लाडके. ज्ञानेश महाराव लिखित `ठाकरे फॅमिली` या पुस्तकात श्रीकांत ठाकरेंनी आठवण सांगितलीय. पहाटे उठून शाळेत जाताना उद्धवने इतर भावंडांसारखं कधी आईला उठवलं नाही. स्वतःच तयारी करून, दूध ओतून घेऊन उद्धव शाळेत जायचा.

आज श्रीकांत ठाकरे यांची ओळख बाळासाहेबांचे भाऊ आणि राज ठाकरेंचे वडील इतकीच आहे. पण संगीतकार, वादक, कार्टूनिस्ट, चित्रकार, संपादक, लेखक म्हणून ठसा उमटवणाऱ्या श्रीकांतजींनी शिवसेनेच्या उभारणीतही मोलाचा वाटा उचललाय. पण ते सत्तेपासून, सत्तेच्या लाभांपासून कायम अलिप्त राहिले. 

उद्धव श्रीकांतजींचे खूपच लाडके होते. उद्धव एक वर्षाचे असताना अतिशय आजारी होते. डॉक्टरांनी हात टेकले. त्यामुळे बाळासाहेब इतके रागावले की त्यांनी घरातला देव्हाराच फोडून टाकला. श्रीकांतजींनी लहानग्या उद्धवची दिवसरात्र काळजी घेतली आणि त्याला बरं केलं. श्रीकांतजींच्या `जसं घडलं तसं` या आत्मचरित्रात हा प्रसंग आहे.

एकीकडे राज ठाकरेंनी काका बाळासाहेबांकडून व्यंगचित्रकला, वक्तृत्व आणि राजकारण घेतलं. तर दुसरीकडे उद्धवनी काका श्रीकांतजींकडून फोटोग्राफी घेतली. श्रीकांतजींनी पडद्यामागे राहून `मार्मिक` घडवलं. उद्धव यांनी `सामना`च्या जडणघडणीत योगदान दिलं. श्रीकांतजी राजकारणापासून दूर राहिले. तोच मनसुबा उद्धव यांचाही होता. म्हणूनच जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वतःची `चौरंग` नावाची जाहिरात एजन्सी सुरू केली.

 हेही वाचा : अमित शाहांनी फडणवीसांचा, शरद पवारांनी अजितदादांचा केला गेम?

सामना ते शिवसेना

१९८८ ला `सामना` सुरू झाला. त्यात लक्ष घालण्यासाठी बाळासाहेबांना कुणीतरी विश्वासू हवा होता. राज, उद्धव आणि सुभाष देसाई यांच्यावर `सामना`ची जबाबदारी आली. पुढे उद्धव आणि देसाई यांनी ती अत्यंत आस्थेने पार पाडली. दोघांनी मिळून राज यांना बाजूला केलं. किंवा असंही म्हणता येईल की तशी संधी राज यांनी आपल्या वागण्याने मिळवून दिली.

त्याच काळात सुभाष देसाई भगवा सप्ताहाच्या माध्यमातून राज्यभर शिवसेनेचं संघटन बांधण्याच्या कामात गुंतले होते. उद्धवही त्यात गुरफटत गेले असावेत. राज ठाकरेही त्याच वर्षी भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख बनले. पुढच्या काळात त्यांची लोकप्रियता वाढत गेली. पण त्यांच्यामुळे सेनेचे जुने नेते दुखावत होते. त्यांनी उद्धवना पुढे करायला सुरवात केली. १९९०च्या विधानसभा निवडणुकीत  उद्धव यांनी मुलुंडमधून आणि नंतर परळमधून निवडणूक लढवावी, अशी मागणी नेत्यांनी केली. पण बाळासाहेब आणि उद्धव या दोघांनीही ती धुडकावून लावली.

कासवाने स्पर्धा जिंकली 

उद्धवना राजकारणात येण्यात फार रस नव्हता. पण सेना नेत्यांच्या आग्रहाबरोबरच उद्धव यांच्या आई मीनाताई यांचं प्रेम आणि पत्नी रश्मी ठाकरे यांचा पुढाकार यामुळे उद्धव बाळासाहेबांचा वारसा सांभाळण्यासाठी सरसावले. आता त्यांची स्पर्धा थेट राज यांच्याशी होती. १९९४च्या नाशिक अधिवेशनात राज आणि उद्धव यांना शिवसेनेचे युवा नेते बनवण्यात आलं. तेव्हा ती स्पर्धा अधोरेखित झाली.

 हेही वाचा : हिंदूहृदयसम्राटांच्या भूमिकेत एक मुसलमान कसा स्वीकारला गेला?

राज यांच्याशी होणाऱ्या स्पर्धेत उद्धव टिकू शकतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. ती तर ससा आणि कासवाची स्पर्धा होती. पण युतीच्या सत्ताकाळात उद्धव राज यांच्या पुढे जाऊ लागले होते. २००२च्या महापालिका निवडणुकीपर्यंत कासव जिंकलंय हे सगळ्यांच्या लक्षात आलं. उद्धव यांनी ती निवडणूक एकहाती लढवली. यश मिळवलं. त्याआधीच नव्या विभागप्रमुखांच्या नियुक्ती करून मुंबई ठाण्यातल्या शिवसेना संघटनेवर आपलं वर्चस्व निर्माण केलं. उद्धवने शिवसेना या संघटनेला राजकीय पक्षाची शिस्त लावली, असं बाळासाहेब नेहमी कौतुकाने सांगायचे.

पडलो तरी उठून उभा राहीन 

धवल कुलकर्णी यांच्या `द कझिन्स ठाकरे` या पुस्तकात एक प्रसंग आहे. राज आणि त्यांच्या मित्रांबरोबर बॅडमिंटन खेळण्यासाठी उद्धव नेहमी दादरला येत. एकदा खेळता खेळता उद्धव पडले. तेव्हा सगळे हसले. त्यानंतर त्यांचं दादरला येणं अचानक थांबलं. त्यांनी वांद्र्याच्या एमआयजी क्लबमधे त्यांनी बॅडमिंटनचं रीतसर प्रशिक्षण घेतलं. सहा महिन्यांनंतर ते पुन्हा खेळायला आले, ते चॅम्पियन बनूनच.

राजकारणाच्या खेळातही तेच घडत गेलं. २००३च्या महाबळेश्वर अधिवेशनात उद्धव ठाकरे यांना कार्यकारी प्रमुख बनवण्याचा अधिकृत ठराव संमत झाला. तो ठराव राज यांनाच मांडवा लागला होता. त्यानंतर उद्धव यांचा संघर्ष सुरू झाला. सलग दोन विधानसभा निवडणुकांतला पराभव, आमदार संख्येचा नीचांक, नारायण राणे आणि राज ठाकरेंचं बंड, बाळासाहेबांचं निधन, हार्टचं ऑपरेशन असे एकामागून एक धक्के त्यांना पचवावे लागले. 

पण त्यांचा संयम कधीच ढळला नाही. उलट हे धक्के पचवत ते राजकारणी म्हणून अतिशय प्रगल्भ झाले. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेनेची शकलं होतील, असा त्यांच्या मित्रपक्षालाच विश्वास होता. पण तसं झालं नाही. आज शिवसेना राज्याच्या सर्वोच्च स्थानावर पोचलीय. याचं श्रेय उद्धव यांनाच द्यायला हवं.

हेही वाचा : कॉमन मिनिमम प्रोग्रामः सत्तेसाठी एकत्र यायचं की विकासासाठी?

मी कॉपी करणार नाही

पडझडीच्या काळात उद्धव ठाकरेंनी बाळसाहेबांसारखं आक्रमक व्हावं आणि राज ठाकरेंना उत्तर द्यावं, असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांनी धरला होता. त्याला उत्तर देताना उद्धव यांनी आपला एक अनुभव सांगितला. बाळासाहेबांनी त्यांना कार्टून शिकायला एका मोठ्या कार्टूनिस्टकडे पाठवलं होतं. वर्षभराच्या शिकवणीत उद्धव चांगली कार्टून काढूही लागले. मार्मिकमधे ती प्रसिद्धही होत. पण वर्षभरानंतर शिक्षकाने बाळासाहेबांना सांगितलं की आपण थांबुया, कारण उद्धव कॉपी करू लागलाय. जोवर त्याच्या ओरिजिनल आयडिया येत नाहीत, तोवर कार्टूनना काही अर्थ नाही. त्यानंतर उद्धवनी नेत्यांना सांगितलं, मी आहे तसा वागेन. मग मला यश मिळो किंवा अपयश. मी कॉपी करणार नाही. 

याच काळात उद्धवनी आपली ओरिजिनल कामं करून दाखवली. शिवसेनेच्या पठडीच्या बाहेर जाऊन केलेले प्रयोग ही त्यांची ओळख बनली. मराठी भाषकांचा कट्टर पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या शिवसेनेला त्यांनी `मी मुंबईकर` मोहिमेमधून हिंदी भाषकांमधे घुसवलं. शहरी तोंडवळ्याच्या शिवसैनिकांना मुंबईत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनं करायला लावली. शेतकरी नेत्यांनी आक्षेप घेतला, तेव्हा हिंदुत्ववादही बाजूला ठेवला. रामदास आठवले यांच्यासोबत शिवशक्ती भीमशक्ती युती करण्याचे शिल्पकारही तेच होते. त्यांचे हे प्रयोग मतांच्या राजकारणात फारसे यशस्वी ठरले नाहीत. पण त्यातून शिवसेनेला एक विधायक दृष्टिकोन मिळाला. हे सारे प्रयोग करण्यात मोठ्या धाडसाची गरज होती. 

भाजपसोबत युतीला सुरवातीपासूनच विरोध

असाच वेगळा धाडसी विचार त्यांनी खरं तर ८९ मधेच मांडला होता. त्या वर्षी शिवसेना भाजपची युती झाली. शिवसेनेने ही युती करू नये आणि एकट्याच्या बळावरच वाटचाल करावी, असं तेव्हा उद्धव यांनी बाळासाहेबांना सांगितलं होतं. २०१७च्या महापालिका निवडणुकीच्या आधी एका मुलाखतीत त्यांनी हे सांगितलं होतं.

पण हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना खूप थांबावं लागलं. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर युतीत सडावं लागलं. त्यात त्यांना हा संयम उपयोगी ठरला. त्यांच्या शांत स्वभावाची गेल्या पाच वर्षांत आणि त्यातही मागच्या एका महिन्यात कसोटी पाहिली गेली. आता ते तप फळाला आलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनत आहेत. त्यात ते यशस्वी झाले तर ममता बनर्जी, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, नवीन पटनायक, अशोक गेहलोत यांच्या उंचीवर पोहचू शकतात. 

साधेपणा, सच्चाई आणि संवेदनशीलतेच्या जोरावर उद्धव यांनी शिवसैनिकांचा विश्वास मिळवला. शिवसेनेसारख्या संघटनेवर घट्ट पकड ठेवली. त्याच जोरावर त्यांनी शरद पवारांसह काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही विश्वास कमावलाय. पक्षातल्या प्रतिस्पर्ध्यांना संपवताना हवे नको ते डावपेच खेळल्यानंतर आणि राजकारणासाठी गरजेचा असलेला धूर्तपणा वारंवार वापरूनही ती संवेदनशीलता अजूनपर्यंत तरी टिकल्यासारखी वाटतेय. आता खरी परीक्षा यापुढे आहे. सरकार टिकवण्यापेक्षाही कलावंताची संवेदनशीलता टिकवण्याचं आव्हान जास्त कठीण आहे.

हेही वाचा : 

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचं ऐतिहासिक महाभारत

बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती

अमित शाहांनी फडणवीसांचा, शरद पवारांनी अजितदादांचा केला गेम?

प्रोटेम स्पीकरच्या नेमणुकीने फडणवीसांचे सत्तास्थापनेचे मनसुबे उधळले