अमेरिकन राजकारणाचा किस पाडणारी निवडणूक

०७ ऑक्टोबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


प्रतिस्पर्ध्यांमधल्या वादळी चर्चेनं अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची सुरवात झालीय. रिपब्लिकन पक्षाकडून पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रॅटिककडून माजी उप राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन मैदानात उतरलेत. ट्रम्प यांना आपण अराजकीय असल्याची जुनीच टेप वाजवावी लागतेय. त्यांच्या राष्ट्राध्यक्षीय कारकि‍र्दीचं हे अपयशच म्हणायला हवं.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीआधीच्या पहिल्या जाहीर चर्चेने निवडणूक प्रचाराची दिशा स्पष्ट झाली आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि माजी उप राष्ट्राध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जोसेफ बायडेन यांच्या व्यक्तिमत्वातला फरक अधोरेखीत करणाऱ्या चर्चेने या दोन्ही उमेदवारांच्या धोरण, प्राथमिकतेऐवजी प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध वापरण्यात येणाऱ्या मुद्द्यांवर अधिक प्रकाश टाकलाय.  अपेक्षेप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांचा स्वर आक्रमक, स्व कौतुकाचा आणि प्रतिस्पर्ध्याला तुतु मैमै च्या पातळीवर आणणारा होता. 

चर्चेदरम्यान काही क्षणांना जोसेफ बायडेन हे ट्रम्प यांच्या जाळ्यात अडकल्याचं जाणवत होतं. बायडेन यांनी ट्रम्प यांना ‘अमेरिकेच्या इतिहासातला सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष’ म्हणून हिणवलं. एका क्षणी बायडेन यांनी ट्रम्प यांची अवहेलना विदुषक म्हणून केली, तर दुसऱ्या क्षणी त्यांनी राष्ट्राध्यक्षांना शट अप असं सुनावत आपला राग व्यक्त केला. ट्रम्प यांना नेमकं हेच हवंय, ज्याचं भांडवल करण्यात ते वस्ताद आहेत. या काही क्षणां व्यतिरिक्त मात्र बायडेन स्वत:साठी तयार केलेल्या प्रतिमा निर्मितीच्या मार्गातून विचलित झाले नाहीत. 

ट्रम्प अराजकीय असल्याचं दाखवतायत

राष्ट्राध्यक्ष निवडणूकीपुर्वीच्या पहिल्या चर्चेत ट्रम्प यांच्या विरुद्ध स्वत:ची संयमी, दृढ आणि उदारमतवादी, पुरोगामी अशी प्रतिमा उभा करण्याचा बायडेन यांचा प्रयत्न पुरेसा नजरेत आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मध्ये जवळपास ४ वर्ष वास्तव्य असलेल्या आणि अमेरिकी कॉंग्रेसच्या सिनेटवर पकड असलेल्या राष्ट्राध्यक्षांऐवजी आपण प्रस्थापित राजकीय व्यवस्थेबाहेरची अराजकीय व्यक्ती असल्याचं मतदारांच्या मानसिकतेवर प्रतिबिंबित करण्याचं ठरवलेलं दिसतंय. २०१६ च्या निवडणुकीत ट्रम्प यांची ही रणनिती मतदारांना भावली होती. त्या वेळी हिलरी क्लिंटन या सत्ता वर्तुळाच्या आतले तर आपण सामान्य मतदारांसारखे राजकीय आखाड्याच्या बाहेरचे असल्याचं चित्र ट्रम्प यांनी रंगवलं. 

४ वर्षांनी ट्रम्प यांना पुन्हा तीच रणनिती वापरावी लागत असेल तर हे त्यांच्या राष्ट्राध्यक्षीय कारकि‍र्दीचं अपयश आहे. ट्रम्प यांनी त्यांची व्हाईट हाऊस मधली ४७ महिन्यांची कामगिरी त्या आधीच्या ४७ वर्षांच्या राष्ट्राध्यक्षीय कामगिरीपेक्षा वरचढ असल्याचा आवेश आणला, पण त्यासाठी तथ्य आणि आकडे त्यांना देता आले नाहीत. याचा अर्थ, अमेरिकी मतदार या आवेशाला नाकारतीलच असं नाही. मतदार अमेरिकेसारख्या आर्थिक महासत्तेतले असो की भारतासारख्या विकसनशील देशातले, त्याची स्मृती अचंबित करण्याएवढी लहान असते. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांची खरी, खोटी दुखणी ज्यांना कळली आहे असं वाटतं, त्यांना मतदारांची पसंती मिळत असते. 

हेही वाचा : अर्थव्यवस्थेची काळजी करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकी ‘मास्क’वाद

कोविडवरून ट्रम्पना घेरण्याचा प्रयत्न

तीन प्रकारची दुखणी असलेला मतदारवर्ग ट्रम्प यांच्या मागे एकवटलाय. एक, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत अमेरिकेतल्या दोन्ही पक्षातल्या प्रस्थापित राजकारण्यांनी देशी भांडवलाला देशांतर्गत गुंतवणुकीऐवजी चीनमधे गुंतवणूक करणं सुकर केलं. त्यामुळे अमेरिकेत हवे तेवढे रोजगार निर्माण झाले नाहीत. मजूरी मूल्य वाढलं नाही अशी तक्रार असलेला वर्ग ट्रम्प यांच्या पाठीशी उभा आहे. यामधे अमेरिकेतले कृष्णवर्णीय कामगार मोठ्या संख़्येने येतात. काही प्रमाणात श्वेतवर्णीय कामगार सुद्धा या मुद्द्यावर ट्रम्प यांना पाठिंबा देतात. जोसेफ बायडेन यांनी ट्रम्प यांच्या नेमक्या या शक्तीस्थळावर वार करण्याचा घाट घातला. 

२९ सप्टेंबरला झालेल्या चर्चेत बायडेन यांनी स्पष्ट आरोप केला की ट्रम्प यांच्या कारकिर्दीत अमेरिकेच्या इतिहासातली सर्वात कमी रोजगार निर्मिती झालीय. तर कोविड १९ महामारीचा फटका बसण्याआधी अमेरिकेतली रोजगार परिस्थिती उत्तम होती असं प्रत्त्युत्तर ट्रम्प यांनी दिलंय. मार्च २०२० पुर्वी अमेरिकेत समाधानकारक रोजगार निर्मिती होती या ट्रम्प यांच्या दाव्याला ५५ टक्के पेक्षा अधिक मतदारांची सहमती असल्याचं अनेक सर्वेक्षणांतून पुढे आलंय. 

ट्रम्प यांनी कोविड १९ ची परिस्थिती व्यवस्थित हाताळली नसल्याचे मत सुद्धा या सर्वेक्षणांतून बहुमताने समोर आलं आहे. बायडेन तर या मुद्द्यावर ट्रम्प प्रशासनावर सातत्याने टिका करताहेत. प्रत्त्युत्तरात ट्रम्प यांनी म्हटलंय की बायडेन राष्ट्राध्यक्ष असते तर अमेरिकेत कोविड १९ ने घेतलेली बळींची संख्या २ लाख नाही तर २० लाख झाली असती. 

पहिल्या राष्ट्राध्यक्षीय चर्चेत गाजलेला मुद्दा

ट्रम्प यांच्या मागे जो दुसऱ्या प्रकारचा गट एकवटला आहे त्याची तक्रार आहे की अमेरिकेत सामाजिक न्यायाच्या नावाखाली श्वेतवर्णीयांची गुंडगिरी आणि दादागिरी खपवून घेतली जाते. साहजिकच, हा कृष्णवर्णीयांमधला गट आहे ज्यांना केवळ श्वेतवर्णीयच नाही, तर स्पॅनियार्ड्स मुख्यत: लॅटिन अमेरिकेतून आलेल्या लोकांबद्दल तिटकारा आहे. ट्रम्प यांच्या मेक्षिकनवॉल प्रकल्पाला त्यांचा पुर्ण पाठिंबा आहे. वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून अमेरिकेत अलिकडे घडलेल्या दंगलींत कृष्णवर्णीयांच्या प्राऊडबॉईज सारख्या कट्टर संघटनांचा हात असल्याचा आरोप ट्रम्प विरोधक आणि मानवाधिकार संघटना करताहेत. 

पहिल्या राष्ट्राध्यक्षीय चर्चेत सर्वाधिक गाजलेला हा मुद्दा आहे. चर्चेचे संचालक वरिष्ठ पत्रकार ख्रिस वॉलेस यांनी ‘तुम्ही प्राऊडबॉईजची निंदा कराल का’ असा प्रश्न विचारल्यावर ट्रम्प यांनी प्राऊडबॉईज ने ‘स्टॅंड अ साईड स्टॅंडबाय’ रहावं अशी टिप्पण्णी केली. लगेच प्राऊडबॉईजने सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत ट्रम्प यांच्या मागे ठामपणे उभं राहण्याची ग्वाही दिली. यामुळे ट्रम्प यांच्यावर टिकेचा भडिमार झाला आणि ट्रम्प यांना चर्चेनंतर प्राऊडबॉईजने ‘स्टॅंडडाऊन’ असावं अशी प्रतिक्रिया द्यावी लागली.

हेही वाचा : ब्लॅक लाईव्ज मॅटर चळवळीपासून भारतीय लोक दूर का राहतात?

ट्रम्प, बायडेन यांचे आरोप प्रत्यारोप

डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेत स्पष्ट मांडलं की वर्णीय दंगलींमधे उजव्या नव्हे तर अंतिफा सारख्या डाव्या संघटनांचा हात आहे आणि बायडेन कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलणं टाळताहेत. ट्रम्प यांनी मानवाधिकाराच्या प्रश्नांना कायदा आणि सुव्यवस्थेच्या विरोधात उभं केलं. यावर बायडेन यांनी ते कायदा आणि सुव्यवस्थेचे समर्थक असल्याची ग्वाही तर दिलीच, शिवाय प्राऊडबॉईज आणि तत्सम संघटनांना कायदा हातात घेणे आणि वर्णद्वेष पसरवणं आपली संस्कृती नसल्याची तंबी सुद्धा दिली. 

ट्रम्प हे सातत्याने बायडेन यांना अती डाव्यांचे प्रतिनिधी ठरवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातून अंतिफा संघटनेचा हिसेला हिंसेने उत्तर द्यायला नसलेला नकार ट्रम्प यांच्या कामाला येतोय. पण, पहिल्या चर्चेच्या माध्यमातून बायडेन, आपण अती डाव्यांपासून वेगळे आहोत, शिवाय डाव्या विचारांच्या बर्नी सॅंडर्स यांना पराभूत करत डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे उमेदवारी मिळवलीय हे दर्शवण्यात यशस्वी झालेत. 

ट्रम्प हे वर्णद्वेष्ट्या वर्गाचे प्रतिनिधी असल्याचे उघडपणे दिसतंय. महत्त्वाचं म्हणजे, ट्रम्प यांनी मतमोजणी नंतर गरज असल्यास न्यायालयीन निवाड्याची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत सत्तेचं हस्तांतर होणार नाही याचं सुतोवाच केलंय. लोकशाहीवादी नागरिकांना न पटणारी ही भूमिका असली तरी ट्रम्प यांच्या चाहत्यांना त्यात काहीही गैर वाटणार नाही आणि याची ट्रम्प यांना जाणीव आहे.   

ग्रामीण, शेती वर्ग कोणाच्या बाजूने?

ट्रम्प यांचा तिसरा मतदार गट हा सुरवातीपासून रिपब्लिकन पक्षाचा मुळ आधार असलेला ख्रिश्चियन  धार्मिक आणि कट्टरख्रिश्चियन वर्ग आहे. अलिकडच्या वर्षांमधे, विशेषत: ९/११ च्या अलकायदाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर, या वर्गामधे इस्लाम विरोधाचा प्रवाह प्रबळ झालाय. मागच्या ४ वर्षामधे ट्रम्प यांनी या मतदारांच्या भावनांना खतपाणी घातलं, पण चीनसोबत व्यापार युद्ध ओढवून घेत ट्रम्पनी यातल्या अनेक मतदारांना आर्थिक निराशेच्या गर्तेत ढकललं. 

रिपब्लिकन पक्षाचा हा मतदार वर्ग बहुतांशी ग्रामीण आणि शेती करणारा आहे. चीनने अमेरिकेकडून अन्न धान्याची आयात कमी केल्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर घाला आला आहे. हा वर्ग स्वत:च्या आर्थिक हितांना प्राधान्य देतो की त्यांच्यात मुरलेल्या इस्लाम विरोधानुसार मतदान करतो यावर काही महत्त्वाच्या राज्यांमधे ट्रम्प यांचं भवितव्य अवलंबून असेल. 

हेही वाचा : अमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाचं काळंगोरं वास्तव

तर भारताला फायदा होईल

पुढच्या प्रचार काळात ट्रम्प हे बायडेन यांना मुख्यत: तीन मुद्द्यांवर जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतील. एक, बायडेन आणि इतर राजकारण्यांनी मागच्या ५० वर्षांत काय केलं? दोन, बायडेन हे फक्त समाजवादीच नाही तर अती डाव्यांच्या मुठीतले आहेत. तीन, बायडेन हे चीन धार्जिणे आहेत. बायडेन जर या जाळ्यात अडकले नाहीत तर त्यांचा विजय नक्की आहे. नाहीतर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुर्वी व्यक्त केलेल्या अपेक्षेनुसार अमेरिकेत पुनश्च ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ नांदणार अशी चिन्हे आहेत. 

पंतप्रधान मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेली मित्रता वगळता ट्रम्प यांच्या लागोपाठ दुसऱ्या विजयानं भारताचं हित कितपत साधलं जाणार हे अद्याप पुरेसं स्पष्ट झालेलं नाही. राष्ट्राध्यक्ष उमेदवारांदरम्यानच्या पुढील चर्च्यांच्या फेऱ्यांमधे परराष्ट्र धोरण, चीन, अमेरिकेची जगातली भांडवली गुंतवणूक, अफगाणिस्तान आणि एच १ बी १ विसा इत्यादी मुद्द्यांवर वादविवाद झाल्यास भारतासाठी तुलनेने कुणाचा विजय अधिक फायदेशीर असेल याचं चित्र  स्पष्ट होईल.

हेही वाचा : 

सुशांतचा तपास आणि आपण सगळे त्यात नापास!

सगळ्याच देशांना का हवाहवासा वाटतो दक्षिण चीन समुद्र?

तालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत?

महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का?