नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?

०१ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


आपण जे अन्न खातो त्यातलं ८० टक्के अन्न झाडांकडून येतं. पण कीटक आणि झाडाला लागलेल्या रोगांमुळे यातला जवळपास ४० टक्के भाग खाण्यालायक राहत नाही. यामुळेच जगभरात भूकबळीचं प्रमाण वाढल्याचं दिसतं. म्हणूनच २०२० हे वर्ष युनायटेड नेशन्सनं ‘आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष’ म्हणून जाहीर केलंय. त्यासाठी 'झाडं जगवा, जीव वाचवा' असा नारा दिलाय.

अन्न मिळवण्यासाठी आणि अर्थात श्वास घेण्यासाठी झाड हा प्रमुख स्रोत आहे. आपण खातो त्यापैकी जवळपास ८० टक्के अन्न झाडांकडून आलेलं असतं. उरलेलं २० टक्के मांस, मच्छी, अंडी वगैरे म्हणता येईल. तसंच हवेतल्या ऑक्सिजनच्या प्रमाणापैकी ९८ टक्के ऑक्सिजन झाडांनी सोडलेला असतो.

हे एवढे सगळे बारकावे माहीत असूनही माणूस सगळ्यात जास्त हलगर्जीपणा करत असेल तर तो या झाडांची काळजी घेण्यामधेच! म्हणूनच युनाटेड नेशन्स म्हणजेच युएननं नवं २०२० हे वर्ष या झाडांसाठीच राखून ठेवलंय. २०२० हे वर्ष इंटरनॅशनल इअर ऑफ प्लांट हेल्थ म्हणजेच ‘आवायपीएच २०२० म्हणून जाहीर केलंय. याला मराठीत आतंरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष म्हणतात.

युएनने प्लांट असा शब्द वापरलाय. प्लांट याचा मराठीत अर्थ होतो वनस्पती. पण फक्त वनस्पतीचं आपल्याला अन्न, ऑक्सिजन देत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारची फळ झाडं, रोपं, पीकं, रोपांची, झाडांची मुळं हे सगळंच अन्न या कॅटेगरीत येतं. म्हणूनच, वनस्पती म्हणण्यापेक्षा आपण झाडं असा शब्द व्यापक अर्थाने वापरूया.

कीटक संपवतात माणसांचं अन्न

शेतकरी अन्न पिकवतो. ते अन्न आपण खातो. हे असं फक्त भारतातच नाही तर सगळ्या जगात होत असतं. पण अनेकदा या अन्नाला कीड लागते. झाडं वेगवेगळ्या आजारांनी खचून जातात. त्यांची फळ ही रोगट होतात.

दरवर्षी झाडं किंवा पीकं जे अन्न देतात त्यापैकी ४० टक्के अन्न कीड आणि रोगामुळे वाया जातं, असं युएनच्या फुड ऍन्ड ऍग्रीकल्चर ऑर्गनायझेशननं म्हणजेच ‘एफएओ’च्या एका अहवालात सांगण्यात आलंय.

दहा लाख कीटकांची एक टोळी एका दिवसात एक टन अन्न फस्त करु शकते. कीटकांची अजून मोठी झुंड आली तर ते दहा लाख टनांहून जास्त अन्न संपवते. एवढ्या अन्नात दहा हजार माणसांची एका वर्षासाठी जेवणाची सोय होऊ शकते, असं या रिपोर्टमधे म्हटलंय.

हेही वाचा : आरेतल्या वृक्षतोडीचा झाडं लावून निषेध करणाऱ्या चिंचणीची भन्नाट गोष्ट!

शेताला कीड म्हणजे शेतकऱ्याच्या घराला कीड

अन्न वाया गेल्यामुळे साहजिकच लाखो कोटी लोक अन्नावाचून उपाशी राहतात. यात भर म्हणजे एवढं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरीसुद्धा हवालदिल होतो. ग्रामीण भागातल्या अनेक गोरगरीब कुटुंबांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. त्यांच्या शेतात कीड लागली म्हणजे सगळ्या घरालाच कीड लागल्यासारखं होतं.

त्यातच ही कीड कमी की काय म्हणून माणूस नावाची आणखी एक कीड या झाडांच्या आयुष्यात आलीय. सध्याच्या हवामान बदलाच्या परिस्थितीनं निसर्गाची संपूर्ण परिसंस्थाच बदलून टाकलीय. माणसानं केलेल्या प्रदुषणामुळेच तर ही स्थिती निर्माण झालीय. निसर्गात असलेली जैवविविधता नष्ट करुन कीटकांना वाढण्यासाठी नवं वातावरण करून द्यायचं काम आपणच तर करत आहोत!

पण हे इथंच थांबत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं दळणवळण आणि व्यापार गेल्या दशकाभरात जवळपास तिप्पट झालाय. खूप मोठ्या प्रमाणात आणि फार कमी वेळात लोकं इकडून तिकडे जातात. त्यामुळे त्यांच्यासोबत आपल्या देशातले कीटक दुसऱ्या देशात जायलाही जास्त वेळही लागत नाही. यामुळे स्थानिक झाडांना, वनस्पतींना मोठा फटका बसतोय. नव्याने आलेले कीटक जुन्यांच्या ओळखीचे नसतात. त्यामुळे या रोगांशी लढण्याची ताकदही या वनस्पती एकटवू शकत नाहीत.

आईच्या दुधात सापडले कीटकनाशकाचे अंश

हे सगळं वाचल्यावर भूकेनं मृत्यूमुखी पडलेली झारखंडमधली मुलगी कुणाला आठवणार नाही? संतोषी कुमारी या अवघ्या ११ वर्षांच्या मुलीनं ‘भात-भात’ करत आपला जीव सोडल्याच्या बातम्या भरपूर झळकल्या. झारखंडचं काय पण उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, दिल्ली अशा सगळ्यात राज्यात भूकेनं लोकांचा जीव गेलाय. पण त्याकडे लक्ष कोण देतो?

कीड लागू नये म्हणून या पीकांवर, झाडांवर कीटकनाशकांचा भडीमार केला जातो. त्यात वनस्पतींच्या वाढीसाठी गरजेचे असणारे काही कीटकही मरतात. ही कीटकनाशकं फक्त कीटकांसाठीच नाही तर मानवी शरीरासाठीही विषारी असतात.

भाज्यांबरोबर, फळांबरोबर ही कीटकनाशकं आपल्या पोटात जातात आणि नव्या आजारांना आमंत्रण मिळतं. मॉम्स एक्रॉस या अमेरिकी संस्थेनं २०१४ मधे केलेल्या एका संशोधनातून बाळाला पाजणाऱ्या आईच्या दुधात घातक प्रमाणात कीटकनाशकाचे अंश सापडल्याचं समोर आलं होतं.

आधीच चिलखत घालूया!

पृथ्वीवरची लोकसंख्या वाढत जातेय. या लोकसंख्येला पुरेसं आणि निरोगी अन्न मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी २०५० पर्यंत आत्ता आहे त्यापेक्षा ६० टक्के जास्त अन्न उत्पादन आपल्याला घ्यावं लागेल. म्हणूनच या झाडांची, भविष्यात येणाऱ्या महासंकटाचं निवारण करण्यासाठी पैसा आणि संसाधन खर्च करण्यापेक्षा आत्ताच वनस्पतींची काळजी घेणं हे माणसाला जास्त परवडेल, असं युएनने आपल्या रिपोर्टमधे म्हटलंय.

वनस्पतींवरचे कीटक एकदा जम धरून बसले किंवा वनस्पतींच्या रोगाची साथ एकदा सुरू झाली की ती थांबवणं जवळजवळ अशक्य होतं. फक्त त्याचा प्रतिकार कमी करता येऊ शकतो. पण ती प्रक्रियाही अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक आहे. त्यामुळे हल्ला झाल्यावर चिलखत घालण्यापेक्षा आत्ताच आपण आपल्या वनस्पतींचं संरक्षण केलेलं बरं, हे ओळखून युएननं यंदाचं वर्ष हे वनस्पतींच्या आरोग्यासाठी बहाल केलंय.

युएननं २०२० हे वर्ष झाडांच्या आरोग्यासाठी असणार हे २०१८ मधेच जाहीर केलं होतं. या प्रोजेक्टला आयवायपीएच २०२० असं नाव दिलं गेलंय. यूएनच्या वार्षिक पुस्तिकेत दिलेल्या माहितीनुसार, या प्रोजेक्टमधे दोन ‘पी’ महत्त्वाचे आहेत. एक प्रिवेंशन म्हणजे प्रतिबंध आणि दुसरं प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण. झाडांना कीड लागू नये यासाठी कीड प्रतिबंधक उपाययोजना करायच्या, जनजागृती करायची आणि दुसरं म्हणजे कीड लागू नये यासाठी झाडांचं सरंक्षण करायचं.

हेही वाचा : शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन

सगळ्यांनी सहभागी होणं गरजेचंय

विशेष म्हणजे, या प्रोजेक्टमधे पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाची भूमिका महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या सामान्य माणसांनी त्यांच्यासोबत झाडं किंवा रोपं किंवा त्यासंबंधीची उत्पादनं नेताना काळजी घ्यायचीय. दळणवळण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी आपल्या कामापलीकडे जाऊन निसर्गाचा विचार करायचाय.

आपल्या कंपनीतल्या ट्रकमधून, ट्रेनमधून, जहाजातून, बसमधून, विमानातून रोग पसरवणारी झाडं आणि कीटक यांचं स्थलांतर होत नाहीय ना हे बघणं गरजेचंय.  स्थानिक आणि राज्य पातळीवर काम करणाऱ्या पर्यावरणवादी संस्थांना झाडं वाचवण्यासाठी सरकारी संस्थांनी मदत करावी, असं आवाहन युएननं केलंय. याबाबत जनजागृती वाढावी म्हणून फोटो स्पर्धा, पोस्टर स्पर्धा अशा विविध स्पर्धाही युएननं जाहीर केल्या आहेत. त्याची माहिती युएनच्या वार्षिक पुस्तिकेत देण्यात आलीय.

आपण सगळ एकत्र आलो तरच कीटक आणि रोगांना प्रतिबंध बसेल. संपूर्ण जगाची एकी झाली तरच हा गंभीर प्रश्न इकोफ्रेंडली पद्धतीनं हाताळता येईल. कीटक व्यवस्थापनासारखे कार्यक्रम राबवता येतील. कीटकनाशकांचा कमीतकमी वापर करुनही कीटकांना पिकांपासून, झाडांपासून दूर ठेवण्याचं तंत्र राबवता येईल.

झाडं निरोगी असतील, उत्पादन मुबलक प्रमाणात झालं तरच पृथ्वीवर मानवी वंश टिकेल. झाडं संपल्याचे परिणाम फक्त माणसाच्या अन्नावरच नाही तर त्याच्या राहणीमानावरही होतील. म्हणूनच ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नाराज यूएनने दिलाय.

हेही वाचा : 

२०१९ चा निरोपः आपला मोबाईल कसा बदलला?

२०१९ चा निरोप : गेल्या वर्षभरात स्त्रियांच्या जगात काय काय झालं?

२०१९ चा निरोपः जगाच्या सारीपाटावर परिणाम करणाऱ्या पाच घटना

रात्रभर झाडांचे खून होत राहिले, रात्रभर जागणारी मुंबई झोपून राहिली