पेशवाईच्या स्वैराचाराला 'फटका'वणारा तमासगीर कीर्तनकार

०४ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ७ मिनिटं


अनंत फंदी हा पेशवाईतला सर्वात लोकप्रिय शाहीर. ३ नोव्हेंबरला त्यांचं दोनशेवं स्मृतीवर्ष सुरू झालंय. तो आख्यायिकांचा विषय झालेला तमासगीर होता तसाच तेव्हाचा सर्वात लोकप्रिय कीर्तनकार होता. त्याने फटका हा काव्यप्रकार मराठीला दिला. त्याचबरोबर आपल्या समकालीन इतिहासाचं वास्तव पोवाड्यांमधून मांडलं. 

हे मूर्खा खूण तर्का पर्का पुरुष आपला नसे
तशा मधी कोणी विरळा प्रीत चालवीत असे
म्या म्हटले हा चक रुपया दिसतो माल खरा
वाजून जो पाहतो तो आत तांब्याचा भुरभुरा
म्या म्हटले हा जुरा शिपाई फाकडा खूप तऱ्हा
झुंजाचे जेंव्हा तोंड लागले पळतसे माघारा
म्या म्हटले हा सुरेख अंगठीवरला हिरा
बसता घण मस्तकी भोगीत कस्त झाला चुरा
म्या म्हटले कोणी आहे मिजाशी फार नाजूक दिसे
हस्तचरण सनकाड्या क्षयरोगाने जिंकिली असे 

शाहीर अनंतफंदीची ही एक लावणी आहे. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अत्यंत आगळ्या शैलीत घेतलेला समाचार आहे. पेशव्यांच्या विलासी वृत्तीचा अतिरेक, बारभाईचे राजकारण, कटकारस्थाने, फंदफितुरी, बढाईखोरपणा यामुळे पेशव्यांचा कारभार पोखरला गेला होता. परिणामी दरबारातील शिपाई, सरदार, कारकुनापासूनच्या लोकांचं वर्णन फंदी अशा पोवाड्यातून मोठ्या खुबीने करतो.

हेही वाचाः पेशवाईला वंदा किंवा निंदा, त्याआधी हे वाचा

अनंत कवनांचा सागर

अनंतफंदी हा पेशवाईतला एक दरबारी कवी होता. सन १७४४ मधे जन्मलेल्या फंदीचा मृत्यू १८१९ मधे झाला. त्याच्या मृत्यूला आता दोनशे वर्षे पूर्ण होतात. होनाजी या तत्कालीन प्रतिभावंत कवीने ‘अनंत कवनांचा सागर’ अशा शब्दात तारीफ केली आहे. अनंतफंदी हा मुळात तमासगीर शाहीर. बहुश्रुतता, वक्तृत्व आणि भाषेवरील प्रभुत्व यामुळे तो पुढे कीर्तनकार झाला, पण त्या संदर्भातील आख्यायिका मोठी गमतीदार आहे. 

फंदीने लावण्या, पोवाडे, कटाव आणि फटके रचले. त्यापैकी फक्त सात पोवाडे, आठ लावण्या आणि काही फटके आज उपलब्ध आहेत. श्लोक, ओव्या, आर्या आणि पदे अशाही रचना त्याच्या नावावर आहेत. 'रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा आणि फटका या फंदींच्या काही गाजलेल्या रचना. फंदीला मराठीतील फटका या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते.

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको
 

हा त्याचा उपदेशपर फटका फार प्रसिद्ध आहे. माणसाने आपला नीतीचा मध्यममार्ग सोडून भटकू नये. संसारात मुकाट्याने लक्ष घालावं असा उपदेश करणारा फंदी मात्र बालपणी फार खोडकर आणि उनाड होता. त्याच्या लावण्यांमधे स्त्रीदेहाचे आणि शृंगाराचे फार उत्तन वर्णन दिसतं. तरुणपणी त्याचा छंदीफंदीपणा टोकाला गेला म्हणून लोकांनी त्याचे फंदीबुवा असेच नामकरण केलं. त्याच्या फंदी या नावाबद्दल बऱ्याच आख्यायिका प्रसिद्ध आहेत.

हेही वाचाः पुण्याचे पेशवे: किती होते? कोण होते? कसे होते?

फंदी नाव कुठून आलं?

अनंत फंदी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहणारा आणि घोलप हे त्यांचं आडनाव. आजही संगमनेरमधे दरवर्षी अनंत फंदी व्याख्यानमाला होत असते. वडिलांचं नाव कवनी बाबा आणि आर्इचं नाव राऊबाई तर पत्नीचं म्हाळसाबाई. अनंतफंदीला दोन मुलं होती. थोरला श्रीपतफंदी. त्याला सवाईफंदी असंही म्हणत. धाकटा बापूफंदी. सवाईफंदी हाही कवी आणि कीर्तनकार होता. अनंत फंदींचं घराणं परंपरेने गोंधळी. तसंच त्यांचा सराफीचाही धंदा होता. 

बालपणीच फंदीच्या वडिलांचं निधन झालं. विधवा राऊबाई त्यांना वळण लावण्याचं प्रयत्न करत. पण कुमारवयीन व्रात्य स्वभावाचे फंदी विद्याभ्यास सोडून दिवसभर गावात उनाडक्या करत आणि रात्र तमासगीरांच्या फडात घालवत. एक आख्यायिका अशी आहे, आईशी भांडण करून एक दिवस फंदीने गावातील भवानीबुवाच्या मठात जाऊन ठाण मांडले. पाठोपाठ राऊबाई तेथे गेल्या. त्यांनी फंदींचे गाऱ्हाणं मांडलं.

भवानीबुवांनी काही उपदेश करावा अशी विनंती केली. बुवांनी फंदींना एक दगड फेकून मारला. पण तो कृपाप्रसाद समजून फंदींनी आपला तमाशाचा फड सुरु केला. त्याच्या साथीदारांची तमाशांतील नावे मलकफंदी, रतनफंदी आणि राघवफंदी अशी होती. म्हणून हेही अनंतफंदी. आणखी एक दंतकथा सांगितली जाते की संगमनेरात मलकफंदी नावाचा फकीर होता. तो अवलिया होता. त्याच्या सहवासात अनंतफंदी राहत असे म्हणून फंदी. 

हेही वाचाः भीमा कोरेगावमधे २०१ वर्षांपूर्वी नेमकं घडलं काय?

प्रसिद्धी आणि समृद्धीच्या शिखरावर 

अनंतफंदी हा पेशवाईतील सर्वात लोकप्रिय आणि लौकिकप्राप्त कवी होता. तमाशातील शाहीर म्हणून त्याने निरनिराळ्या प्रांतात भरपूर मुलूखगिरी केली. सवाई माधवराव पेशवे यांच्यापासून तर रावबाजीच्या प्रारंभीच्या राजवटीपर्यंतचा काळ हा अनंतफंदीचा अत्यंत भरभराटीचा काळ होता. त्याने पुण्यात कीर्तनकार म्हणून अमाप कीर्ती मिळविली होती. जनमानसावर फंदीच्या काव्याची मोहिनी होती.

तो तत्कालीन तमासगिरात सर्वात श्रीमंत शाहीर होता. त्याने रचलेलं काव्य अतिशय लोकप्रिय होते. प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेल्या या शाहिराविषयी तत्कालीन ज्येष्ठ आणि प्रतिभावंत कवी होनाजीने फंदीच्या गौरवपर कविता लिहिली आहे. तीही फार प्रसिद्ध आहे. 

फंदी अनंद कवनाचा सागर
अजिंक ज्याचा हातखंडा 
चमत्कार चहूंकडे चालतो 
सृष्‍टीवर ज्याचा झेंडा

या कवनात मोठमोठे कवी फंदीपुढे कसे शरण जातात, हे लिहिले आहे.

अनंतफंदीची एक दीर्घ रचना म्हणजे 'माधवग्रंथ' हा ओवीबद्ध ग्रंथ. सवाई माधवराव पेशवे यांच्या मृत्यूपासून स्वतः पेशवेपदावर येईपर्यंतच्या पुण्यातील राजकारणावर काव्य रचनाची विनंती विशेष पत्र पाठवून दुसऱ्या बाजीरावाने अनंत फंदीना केली होती. त्यावरुन फंदीनी हा ग्रंथ रचला. ‘माधवनिधन काव्य’ असंही या ग्रंथाला संबोधलं जातं. या दीर्घकाव्याचे फक्त सहा अध्याय उपलब्ध आहेत. यावरून रावबाजीची अनंत फंदीवर किती मर्जी होती, हे लक्षात येतं, असं शाहिरी वाङ्मयाचे अभ्यासक म. ना. अदवंत म्हणतात. परंतु पुढे ती मर्जी टिकली नाही. 

रावबाजीची मर्जी आणि खप्पामर्जी

१८०६ मधे पुण्यात दंगल उसळली. हडपसरच्या लढाईत यशवंतराव होळकरांनी बाजीरावाचा पराभव करून त्यांना कोकणात पळायला लावलं. पुढे पुण्यात बराच काळ होळकरांचं राज्य होते. हडपसरच्या लढाईवर आणि होळकरांच्या कारभारावर फंदीनी एक पोवाडा रचला आहे. त्यामुळे अर्थातच बाजीरावाची खप्पामर्जी झाली. परिणामी फंदी बाजीरावाच्या निंदेची कवने गाऊ लागले. ‘अनंतफंदी यांच्या कविता व लावण्या’ या पुस्तकाची चौथी आवृत्ती पुण्याच्या चित्रशाळा प्रकाशनने १९२१ साली प्रसिद्ध केली आहे. त्यात ‘श्रीमाधव’ ग्रंथासह अनंतफंदीच्या लावण्या, पोवाडे, कटाव आणि फटके अशा एकूण २६ रचना प्रसिद्ध केल्या आहेत. विशेष म्हणजे यात दोन दुष्काळ लावण्या असून दोन लावण्या हिंदीत आहेत.           

अनंतफंदीच्या लावण्या पुराणातील कथाप्रसंगावर अधिक आधारित आहेत. कारण ते कीर्तन करीत. ‘अक्रुरा गोपि आक्रांदती’ आणि ‘चंद्रावळ’ या अशा प्रकारच्या लावण्या आहेत. ‘चंद्रावळ’ही तमाशेवाल्यांना फार प्रिय होती. श्रीकृष्ण स्त्रीचं सोंग कसं उघड होतं, हे सांगण्याच्या भरात कृष्णासारख्या पौराणिक व्यक्तिमत्वावर सामान्य माणसाच्या ‘वाह्यात कथेचं’ रूप फंदी देतात, अशी टीका रा. श्री. जोगांनी केली आहे. पण शृंगार हा तत्कालीन शाहिरी वाङ्मयाचा स्थायीभाव कसा होता, हे अनंतफंदीच्या ‘धन्य तुझें लावण्य’ या लावणीवरून लक्षात येते.

धन्य तुझे लावण्य प्रीतीचे बाण ग जैसे सणाणी
खरे सांगशील कधी तृप्त होईल गे आमुची मनानी
डोमाला पैठणचे पातळ लफ्फा घे टाचेची खबर
आधीच निबर जोबन  त्यावर पीतांबराची चोळी जबर
लाल शालू जशी मशाल घरची खुशाल दो पैशाने गबर
पाही कुणाची प्रभा उत्तमा तेव्हा तर्फडी मात जबर
मांड्या गुडघ्या सरळ पोटऱ्या पायी जोडवी खणाणी
जसे घोड्याचे नाल वाजती आवाज कानी दणाणी 

दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पुण्यातील सामाजिक जीवन कसं होतं, याचं विस्तृत वर्णन म. वा. धोंडांनी केलं आहे. त्यावरून अनंतफंदींच्या काव्याच्या प्रेरणा लक्षात घेण्यासारख्या आहेत. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या आठच महिन्यात पेशव्यांच्या वाड्यात नारायणरावाचा खून झाला. त्याचबरोबर मराठेशाहीच्या  अध:पतनाला सुरवात झाली. रघुनाथराव इंग्रजास मिळाला आणि नाना फडणीसाच्या हाती कारभार आला. स्वार्थ, हेवेदावे, स्वैराचार, अंदाधुंदी, सूडबुद्धी, धर्मभोळेपणा, दक्षिणा, नाचरंग आणि तमाशा यामुळे संपूर्ण सत्ता पोखरून गेली होती. 

हेही वाचाः पानिपतच्या आधी नेमकं काय झालं होतं?

पेशवाईत होते इश्काची कुश्ती

‘बाजीराव हा सर्व रंगेलांचा बादशहा’ असं धोंड म्हणतात. तो सदैव कामातुर स्त्रियांच्या घोळक्यात वावरत असे. रोज वाड्यात दोनतीनशे बायका न्हावयास येत असत. बाजीरावाच्या या रंगेलपणात साथ देईल, तो त्यालाच दरबारात स्थान होतं. म्हणून पेशव्यांच्या आश्रितांनी चारचार पाचपाच लग्नं केली होती. एक बायको घरी ठेवावी आणि बाकीच्या शनिवारवाड्यातील रासलीलेत पाठवायच्या. अनंत फंदीच्या शब्दात सांगायचं तर, 

रावबाजीचे शहर नमुना पुणे ग्राम वस्ती
अहोरात्र अहोदिवस होती इष्काची कुस्ती

अशी स्थिती होती. वाड्यात अहोरात्र असा उत्सव तर बाहेर दुष्काळाने कहर केला होता. आजाराने आणि भुकेने शेकडो लोक रस्त्याच्या कडेला मारून पडत असत. 

अनंतफंदीच्या लावण्यात दुष्काळाचे आणि दुराचाराचेही वर्णन दिसते. पण त्यांची कवने सामान्यांकरता नव्हती. ती सदैव सोन्याचे दागिने घालून हिंडणारे रंगेल आणि मलमली गाद्यागिरद्यांवर लोळणाऱ्या विलासिणींकरता होती. अनंतफंदीने एका लावणीत बत्तीस बाळ्याचे वर्णन केले आहे. 

कीर्तनकार आणि तमासगीरही

मराठीतील शाहिरी कवितेतील अभिरुचीचा विचार करताना रा. श्री. जोग विधान करतात, स्त्रीदेहाचं आणि शृंगारभावनांचं उत्तान वर्णन करणाऱ्या शाहिरांनी स्वत:चा अविनय स्त्रीजातीवर लादलं. अनंत फंदीची ‘त्रिस्तनीची लावणी’ जोगाना किळसवाणी चमत्कृती वाटते. फंदीचे उपदेशपर फटके त्यांच्या लावण्यांपेक्षा चांगले असले तरी चांगल्या वाङ्मयाची कलात्मकता नाही, अशीही टीका जोगांनी केली आहे.

‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको’ या गाजलेल्या फटक्यात अनंतफंदीने केलेल्या उपदेशामागे त्याच्या काळात त्याने अनुभवलेले व्याभिचार, अनीती आणि लोचटपणाचे प्रसंग कदाचित असतील. एखाद्या धर्मोपदेशकाच्या थाटात नीती, विवाह आणि कुटुंबसंस्थांचे पावित्र्य सांगणारा अनंतफंदी मात्र आपल्या लावण्यांमधे कामातुर स्त्रियांच्या विभ्रमांचं उघडउघड वर्णन करतो. हा फटका म्हणजे जगभरच्या तत्कालीन धार्मिक-नैतिक शिकवणीचा उत्तम नमुना आहे. या शिकवणुकीचा नंतर अतिरेकही झाला.

अशा आदर्श  शिकवणुकीची प्रतिक्रिया म्हणजे व्यक्तिवादासारख्या प्रवृत्तीचा उदय होय. विसाव्या शतकात पुढे धर्म, नीती आणि विवाहासारख्या व्यवस्थांविरुद्ध विद्रोह करणाऱ्या अनेक विचारसरणीचा स्फोट झाला. या पार्श्वभूमीवर विचार करता अनिर्बंध जीवनशैलीचा साक्षीदार असलेला हा शाहीर एकाचवेळी तमासगीर आणि कीर्तनकार होता, हेही लक्षात घ्यावे लागते.

हेही वाचाः 

इंग्रजांना हादरवणारे 'स्ये रा नरसिंह रेड्डी' कोण होते?

पानिपतच्या शौर्याची खरी लवस्टोरी समजून घ्यायला हवी

पानिपत : प्रत्यक्षात लढलं कोण? सिनेमात कौतुक कुणाचं?

शंभूराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत?

शंभुराजेंच्या बदनामीचा दोनशे वर्षांपासूनचा कट एका मालिकेने उधळला!

महात्मा जोतीराव फुलेच पहिले शिवचरित्रकार आणि शिवजयंतीचे उद्गातेही

(लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख आहेत.)