डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी थेट अमेरिकेच्या संसदेत उतरत हैदोस घातला. आपल्या प्रत्येक वक्तव्याला डोळे झाकून पाठींबा देणाऱ्या 'होयबा' समर्थकांची टोळी ट्रम्प यांनी तयार केलीय. त्यांच्यासाठी खोट्या बातम्या,नेत्याची चिथावणीखोर वक्तव्य अंतिम असतात. बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी ट्रम्पना सोशल मीडियातून कायमस्वरूपी बॅन करण्यात यावं असं म्हणत त्यांच्यावर टीका केलीय. लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवणारी ही 'ट्रम्प प्रवृत्ती' सध्या जगभर फोफावतेय. अमेरिकेच्या संसदेवरचा हल्ला त्याचाच परिपाक आहे.
जगातल्या सर्वात जुन्या लोकशाहीची सर्वात रंजक निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष झाल्याने आपल्या सगळ्यांनाही या निवडणुकीच्या निकालानं आनंद झाला होता. पण निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले. ६ जानेवारीला या सगळ्याचा कहर झाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेचं संसद भवन असलेल्या कॅपिटल बिल्डिंगमधे घुसून मोडतोड केली.
अमेरिकेच्या इतिहासातली ही सगळ्यात लाजिरवाणी घटना म्हणावी लागेल. अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेचं जगभर कौतूक होत असताना तिथं असं काही घडणं म्हणजे सुरक्षा व्यवस्थेचं अपयश म्हटलं जातंय. पण ही घटना केवळ त्यापुरती मर्यादीत नाही. अमेरिकन राजकारण आणि लोकशाहीला एक वेगळं वळण देणारी ही घटना आहे. जगभरातून या घटनेचा निषेध होतोय. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चौफेर टीकाही होतेय.
हेही वाचा: अमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी
मागच्या नोव्हेंबरमधे जो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याचं स्पष्ट होताच ट्रम्प आणि त्यांचे समर्थक अधिक आक्रमक झाले. ट्रम्प आधीपासून माघार घ्यायला तयार नव्हते. त्यांनी आपली ताकद दाखवावी लागेल असं आधीच जाहीर केलं होतं. त्यामुळेच निवडणुकीत पराभव झाला तरी ट्रम्प सहजासहजी सत्ता सोडणार नाहीत हे स्पष्ट झालं होतं. अमेरिकेत सत्ता हस्तांतरण प्रक्रिया सुरू झाली होती. ही तारीख जशी जवळ येऊ लागली तसतशी ट्रम्प यांची भडका उडवणारी आणि चिथावणीखोर वक्तव्य सोशल मीडियावर पडू लागली.
त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. काल ६ जानेवारीला निवडणूक निकालाचा एक भाग म्हणून अमेरिकेच्या संसद भवनात महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीत राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार होती. तेव्हाच या संसदेबाहेर ट्रम्प यांचे आक्रमक समर्थक जमा होऊ लागले. त्यांच्या समर्थकांचे वेगवेगळे गट वॉशिंग्टन डीसीच्या दिशेनं पोचायला सुरवात झाली. त्यासाठी पद्धतशीरपणे सोशल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून पार्लर नावाचं एक ट्विटर अकाउंट उघडण्यात आलं.
जमाव थेट संसदेवर चाल करून आला. जगात महासत्ता म्हणून ओळख असलेल्या अमेरिकेची सुरक्षा व्यवस्था हतबल झाल्याचं चित्र होतं. जमावानं कॅपिटल बिल्डिंगमधे घुसायचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आलं. या सगळ्या प्रकारामुळे संसदेचं कामकाज थांबवलं गेलं. पोलीस आणि ट्रम्प समर्थक यांच्यात झटपट झाली. जमावावर नियंत्रण आणत असताना गोळीबारादरम्यान चार आंदोलकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले.
३० जणांना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी या जमावावर नियंत्रण आणलं असलं तरी त्यांनी वेळेत पावलं उचलली नसल्याचे आरोप त्यांच्यावर होतायत. वॉशिंग्टन डीसीमधे १५ दिवसांच्या इमर्जन्सीची घोषणाही करण्यात आलीय.
हेही वाचा: अमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाचं काळंगोरं वास्तव
झाल्या प्रकारामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियातून टीका होतेय. ट्रम्प यांनी सोशल मीडियातून आपला संदेश योग्य पद्धतीनं समर्थकांपर्यंत पोचेल याची तजवीज केली. त्याचा भाग म्हणून ट्विटरवर क्यूनॉन कॉन्स्परसी थेअरीच्या नावाखाली जवळपास १४०० च्या आसपास पोस्ट वायरल झाल्या. त्याचा वापर ट्रम्प समर्थक एकटवण्यासाठी करण्यात आल्या. जमाव हिंसक होईल यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न करण्यात आले. याच ट्विटर आणि फेसबुकनं आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई केलीय. त्यांचं अकाउंट ब्लॉक करत त्यांनी जे आक्षेपार्ह विडिओ शेअर केले होते तेही काढून टाकलेत.
ट्रम्प यांचं अकाउंट ट्विटरनं १२ तासांसाठी ब्लॉक केलंय. ट्रम्प यांनी वाद निर्माण करणारी ट्विट्स हटवली नाहीत तर त्यांचं अकाउंट कायमचं बंद केलं जाण्याची तंबीही ट्विटरनं दिलीय. तर फेसबुककडून ट्रम्प यांचं २४ तासांसाठी ब्लॉक केलेलं अकाउंट अनिश्चित काळासाठी ब्लॉक करत असल्याचं मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटलंय. फेसबुकसोबत त्यांच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटचाही यात समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली वक्तव्यं ही हिंसेला प्रोत्साहन देणारी असून त्यांना हे प्लॅटफॉर्म वापरायला देणं धोकादायक ठरेल असं झुकेरबर्ग यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय.
हेही वाचा: हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?
अमेरिकेतल्या संसदेवरचा हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला असल्याचं म्हणत जगभरातल्या नेत्यांकडून निषेध व्यक्त केला जातोय. अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिकच्या संसद सदस्यांनी उपराष्ट्रपती माइक पेंस यांनी ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवत त्यांना पदावरून हटवावं अशी मागणी केलीय. 'कॉन्स्टिट्युशन डेली' अमेरिकन राज्यघटनेशी संबंधित विषयांवर काम करणारी वेबसाईट आहे. त्यांच्या मते, अमेरिकन राज्यघटनेच्या २५ व्या घटनादुरुस्तीच्या आधारे मंत्रिमंडळ बहुमताने उपराष्ट्रपतींच्या सोबतीनं राष्ट्रपतींना पदावरून हटवू शकतं. बीबीसी मराठीवर हा महत्वाचा संदर्भ वाचायला मिळतो.
ट्रम्प ज्या पक्षाकडून राष्ट्रपती म्हणून निवडून आले त्या रिपब्लिकन पक्षातल्या नेत्यांनीही या हल्ल्याचा निषेध केलाय. माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी ट्विट केलंय. त्यात ते म्हणतात की, 'देशासाठी हा अतिशय शरमेचा, अपमानाचा क्षण आहे. रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांकडे आग भडकवत ठेवणं किंवा अमेरिकेची निवड करणं असे दोन पर्याय आहेत.' नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी आजचा दिवस लोकशाही म्हणजे काय याची आठवण करून देणारा आहे. लोकशाही अप्रत्यक्षरीत्या धोक्यात सापडली असून कॅपिटलमधे जबरदस्तीने घुसून खिडक्या तोडणं, प्लोअरवर येणं आणि गोंधळ करणं याला विरोध नाही हिंसाचार म्हणतात'असं म्हणत ट्रम्प यांच्यावर निशाणा साधलाय.
बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांना सोशल मीडियातून कायमस्वरूपी बॅन करण्यात यावं असं म्हणत टीका केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेचा निषेध केलाय. आपल्या ट्विटमधे त्यांनी म्हटलंय की, 'वॉशिंग्टन डीसीतल्या हिंसक घटनेनं मी दुःखी आहे. सत्ता हस्तांतरण शांततेनं व्हायला हवं. बेकायदेशीर विरोधामुळे लोकशाहीतल्या एका प्रक्रियेत अडथळा येता कामा नये.' कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी हिंसा लोकांच्या इच्छांवर विजय मिळवू शकत नाही, असं म्हणत लोकशाहीवरच्या हल्ल्यामुळे सबंध कॅनेडियन लोक दुःखी असल्याचं म्हटलंय.
न्यूझीलँडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डेन यांनी जे झालंय ते चुकीचं असल्याचं म्हटलंय. त्यांनीही घटनेचा निषेध केलाय. लोकशाहीच्या मार्गाने घेतलेले निर्णय कोणत्याही जमावाद्वारे बदलता येणार नाहीत असं जेसिंडा म्हणतात. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही अमेरिकी काँग्रेसमधलं चित्र अपमानजनक असल्याचं सांगत, अमेरिका जगभरच्या लोकशाहीचं एक आदर्श उदाहरण आहे. म्हणूनच इथलं सत्तेचं हस्तांतरण शांततापूर्ण मार्गानं व्हायला हवं असं म्हटलंय. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरियन, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सँचेज यांच्यासोबत जगभरातल्या अनेक नेत्यांनी या घटनेचा निषेध केलाय.
हेही वाचा: 'ओबामा' नावाचा 'सक्सेस पासवर्ड' जगाला पुन्हा गवसतोय, तर!
डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी चिथावणीखोर वक्तव्य केलीयत. आताच्या हल्ल्याला या वक्तव्यांचीही पार्श्वभूमी आहे. आपल्या पहिल्या टर्मच्या आधी निवडणूक प्रचारादरम्यान 'अमेरिका फर्स्ट' हा त्यांचा नारा होता. मुस्लिमांबद्दलची त्यांची वक्तव्य वादग्रस्त ठरली. जगातले २७ टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लिम हे दहशतवादी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यांचं खाजगी आयुष्य, त्यांची अफेअर्स कायम चर्चेत राहिली. राष्ट्राध्यक्ष पदावर असतानाच त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले.
डोनाल्ड ट्रम्प हे महिला विरोधी आणि पुरुषसत्ताक मानसिकतेचे असल्याची टीका त्यांच्यावर होत राहते. त्याला कारणही तशीच आहेत. ट्रम्प यांना कायम स्वतःचं कौतुक केलेलं आवडत. त्यांच्यावर कुणी टीका केली की त्याला खोटं ठरवण्याचा प्रयत्न ते वकरतात. अमेरिकन पत्रकार आणि त्यांच्यातलं सख्य जगजाहीर आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना बगल देत ट्रम्प यांनी त्यांनाच वेळोवेळी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला डोळे झाकून पाठींबा देणाऱ्या 'होयबा' समर्थकांची एक फौज त्यांनी तयार केली.
सोशल मीडिया हा या समर्थकांसाठी आधार ठरला. कृष्णवर्णीयांविरोधात पद्धतशीर वातावरण तयार करण्यात आलं. ट्रम्प यांचा स्वभाव स्वमग्न, चाकोरीबद्ध असाच आहे. त्यांनी तयार केलेल्या समर्थकांच्या फौजाही तशाच प्रकारच्या आहेत. आपल्या बाजूचे आहेत त्यांनाच ट्रम्प पाठिंबा देतात. बाकी सगळे त्यांना आपल्या विरोधी वाटतात. ही सगळी मंडळी जुनाट विचारांची आहेत. त्यातच त्यांना रहायला आवडतं. लोकशाही वगैरे शब्दांशी त्यांचं देणं घेणं नसतं. तोच ट्रम्प यांचा जनाधार आहे. त्यांच्यासाठी ट्रम्प मसीहा आहेत. ही सगळी मंडळी सोशल मीडियावर ऍक्टिव आहेत.
हेही वाचा:
लोकशाहीमुळे आर्थिक विकास खुंटतो?
लोकशाही वाचवण्याचा वीस कलमी कृतीक्रार्यक्रम
समाजाच्या अंधारात विज्ञानाचा दिवा तेवत ठेवायलाच हवा
तालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत?